(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
August 23, 2018
भरून आले डोळे जेंव्हां,
कढ मायेचे उचंबळले,
हृदयामधल्या भावनेला,
अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।।
प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक,
लोभसवाणे रूप मनोहर,
आपुलकीने मने जिंकलीस,
आनंदूनी सान थोर ।।२।।
वागणुकीत दिसते किमया,
हवी हवीसची तू सर्वांना,
टिकवूनी ठेव गुणविशेष हा,
यशस्वी करील तव जीवना ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 28, 2016
सासुरवाशिण
July 7, 2010
ताटासमोर बसताना
हात जोडले जातात नकळत
भूक फक्त पोटाची नसते,
ती असते जगण्याची, ओळखीची, आपलेपणाची.
भाताचा तो शुभ्र श्वास
जमिनीच्या छातीतून उगवलेला,
शेतकऱ्याच्या तळहातावरच्या घट्ट रेषांतून घरापर्यंत पोहोचलेला.
तुपाची एक सोनेरी रेघ
आईच्या मायेची सही घेऊन उतरलेली.
डाळीत विरघळलेले उन्हाळे-पावसाळे,
भाजीच्या हिरवाईत दडलेली
मातीतली ओल आणि श्रमांची चाहूल.
चटणीचा तिखट स्पर्श
जिभेवरच नव्हे तर स्मृतीवरही उठणारा,
लोणच्याच्या आंबटपणात
काळाचा साठवलेला अनुभव.
पोळीचा गोल चंद्र
तव्यावरून आकाशात झेपावल्यासारखा,
प्रत्येक फुगण्यात
स्वप्नांची एक हलकी उसळी.
दह्याचा थंड गारवा
मनातल्या अस्वस्थतेवर हात फिरवणारा.
हे वाढलेलं पान
फक्त पदार्थांची मांडणी नसते
ते असते हातांच्या कष्टांचं वर्तुळ,
मायेच्या नजरेचं छत्र,
आणि घर नावाच्या शब्दाची प्रतिमा.
प्रत्येक घासात
आपण कोण आहोत याची जाणीव असते,
कुठून आलो याची आठवण,
आणि कुणासाठी जगतो याचं उत्तर.
शेवटचा घास घेताना,
ताटात उरते शांतता.
पण ती रिकामी नसते,
ती भरलेली असते कृतज्ञतेने.
कारण वाढलेलं पान म्हणजे
देवापेक्षा मोठं काही असेल तर ते,
आपल्याला रोज जगायला
नव्यानं कारण देणारं
घराचं उबदार विश्व.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 28, 2026
-- सौ. सुधा नांदेडकर
November 12, 2010
माझे म्हणूनी जे मी धरले,
दूर होई ते मजपासूनी,
दूर ही जावूनी खंत न वाटे,
घडत असते कसे मनी ।।१।।
बहुत वेळ तो घालविला,
फुल बाग ती करण्यामध्ये,
विविध फुलांची रोपे लावूनी,
मनास रमविले आनंदे ।।२।।
कौतुकाने बांधी घरकूल,
तेच समजूनी ध्येय सारे,
कष्ट करूनी मिळवी धन,
खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।
संसार करूनी वंश वाढवी,
संगोपन ते करूनी त्यांचे,
थकूनी जाई देह आता तो,
चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।
ओढ आतां उरली न काही,
ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी,
समाधानी तो होऊ शकलो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 11, 2017
हवाच मजला तोच चंद्रमा
तेच नभी चांदणें
गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।
आजीसंगे गच्चीवरती
फुलराण्यांच्या कथा ऐकती
बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
फुलले होते यौवन सारे
अंगी झोंबे शितल वारे
पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
सगे सोयरे मित्रमंडळी
परसदारी तुळशीजवळी
गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 25, 2017
शौर्य,ध्येर्य ,कर्तव्यनिष्ठा
हीच प्रभू श्री रामांची ओळख
कौशल्यापुत्र प्रभू श्री राम
दशरथ नंदन प्रभू श्री राम
सत्य,धर्म, सद्गुणांचे प्रतीक
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम
भगवान विष्णूचा सातवा अवतार
सद्गुण,करुणेचे प्रतीक प्रभू श्री राम
कौशल्यापोटी जन्म घेतला
अयोध्यापती श्री राम जन्मला
चैत्र मासातील शुक्ल पक्षाला
प्रभू श्री रामाचा जन्म जाहला
त्रेता युगात धर्म स्थापनेला
पृथ्वीवर प्रभू राम अवतरला
प्रभू श्री रामाचा जन्म सोहळा
रामनवमी म्हणून साजरा झाला .
लेखक - उमेश महादेव तोडकर
April 28, 2024
स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान
त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ
सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते
-- विजय प्रभाकर नगरकर
(अनुवादित कविता)
मुळ हिंदी कविता- " क्या क्या मिलता "
डॉ मधु चतुर्वेदी, स्क्रिप्ट लेेखिका , मुम्बई
November 7, 2020
स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात
आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात
नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती
तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती
कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना
नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना
अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा
सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा
आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा
अखंड असे हा होम पेटता, धगधगती अंतःप्रेरणा
रोरावणाऱ्या प्रपातास, कुठे कधी का उसंत आता
नशीबी त्यांच्या ती, तेवढी, एक शेवटची शांतता
बदकांच्या कुडीत कोणी कोंडिले हे राजहंस गोजिरे
अश्वत्थामाच्या जखमेला घेऊन कपाळीच्या देव्हारे
जनाकलनाच्या कक्षेपार भ्रमणारे हे भूस्तरीय तारे
ओसंडणाऱ्या गर्दीतही, एकाकी व्यथित बिचारे
हिंदोळून पारंब्यांना आशेच्या, लोंबकळती हुतात्मे
आसूसले प्रतीक्षेत मुक्तीच्या, केव्हाचे शापित आत्मे
- यतीन सामंत
August 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti