वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती झाल्यास कोट्यवधी रुपयांची सामग्री ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार आहे, त्याकरता तिन्ही सैन्यदलांनी एकत्रित विचार करुन धोरण आखले जाइल. तर पुढील काही वर्षात देशाला कशाचा धोका आहे याचा विचार करुन किती शस्त्रास्त्रांची गरज आहे हे लक्षात घेऊन शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. देशांतर्गत शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली तर अर्थातच आपल्या खर्चात बचत होईल. तसेच लढाईत एकत्रित नियोजन करुन लढल्यास त्याचा निश्चितच फायदा होइल.
May 14, 2018
मोबाईल फोन म्हणजे सेलफोन. यात मोबाईल हे नाव अशासाठी की, आपण कुठेही असलो तरी मोबाईलवर बोलू शकतो म्हणून आणि सेलफोन अशासाठी की, मोबाईल फोनच्या कार्यासाठी कुठल्याही महानगराचे काही विभाग पाडतात त्यांना सेल म्हणतात.
September 12, 2023
ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो.
November 3, 2024
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.
August 6, 2020
मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.
घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.
आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी...! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?
आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.
त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.
औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?
मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?
पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुकच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...! हे थांबायला हवे.
मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...
-- अतुल कुलकर्णी
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
July 26, 2017
ऑक्टोबरपासून थंडी वाढायला लागते. या सुमारास धुकं देखील खूप पडायला लागतं. धुक्याच्या आवरणातून जवळची झाडं तेवढी दिसत असतात; तर लांबच्या टेकड्या, झाडं धुक्यात गुरफटून गेलेली असतात. त्यातून दुरच्या झाडांचे नुसते शेंडेच दिसत असतात. आसपासच्या दर्यांतून धुक्याच्या लाटा उठत येतात. एखादा तलम दुपट्टा वार्यावर तरंगत जावा तसं धुकं वार्यावर लहरत जातं. फॉल मधल्या धुक्याची मजा काही औरच असते. टेकड्या, डोंगरांची होळी रंगात आलेली असते. एखादं नाटक सुरू व्हायच्या आधी रंगमंच पडद्याने झाकलेला असावा तसे धुक्याने डोंगर झाकलेले असतात. मग एखाद्या वळणावर गाडी वळते आणि धुक्याचा पडदा सारून आपली रंगलेली डोकी दाखवत डोंगर अचानक समोर येतात.
रस्त्यांच्या बाजूच्या फुलांचा बहर ओसरत जात असतो. रंगांची वेडी उधळण आता आटोपती घेतली जात असते. गवत पिवळं पडत असतं. शेतातल्या मक्याची कापणी होऊन गेलेली असते आणि शेतामधे आता नुसते खुंट राहिलेले असतात. मक्याशिवाय काही शेतांमधे भाजीपाला देखील तयार झालेला असतो. या हंगामात लाल भोपळा खूप येतो. शेतांत मधे मधे पसरलेले त्यांचे वेल आणि शेंदरी रंगाचे तयार झालेले भोपळे दिसत असतात.
कधी तरी फॉल सिझनमधे पाऊस पडतो. आधीचेच स्वच्छ रस्ते आणखी चकचकीत होऊन जातात. सुकलेली पानं रस्त्याच्या कडेला लोटली जाऊन पावसाने चप्प होऊन रस्त्याच्या किनारी बनून रहातात. धुक्याच्या आणि लोंबत्या ढगांच्या तलम वस्त्रातून रंगीत झाडं लंपंडाव खेळत असतात. पावसामुळे झाडांचे बुंधे आणि फांद्या काळसर ओल्या झालेल्या असतात. त्यांच्या पार्श्वभूमीवर झाडावरची उरली सुरली रंगीत पानं तग धरून वार्यावर फडफडत असतात. दाटी वाटीने उभ्या असलेल्या त्या रंगीबेरंगी झाडांमुळे टेकड्या म्हणजे जणू महाकाय Flower arrangements झालेल्या असतात.
बर्याचदा सस्कुहाना नदीच्या वरच्या अंगाने गाडी चालवताना नदी धुक्याच्या शालीत लपेटून गेलेली दिसते. नदीच्या अल्ल्याडची झाडं नि:शब्दपणे उभी असतात. पल्ल्याडचा काठ आणि त्यावरची झाडी धुक्यात धुसरशी दिसत असते. पल्ल्याडच्या काठावरच्या झाडांची स्वतंत्र आकृती नाहीशी झालेली असते, आणि एक लांबच लांब बाह्याकृती (silhouette) मात्र अंधुकशी दिसत असते.
ऑक्टोबर पासून सुरू झालेली थंडी नोव्हेंबर – डिसेंबर पर्यंत चांगलीच वाढलेली असते. सूचिपर्णी वृक्ष सोडले तर इतर झाडांवर पानांचं नामोनिशाण राहिलेलं नसतं. झाडांचे बुंधे, फांद्या, झुडपांच्या बारीक काटक्या, खालचं गवत, सगळं शुष्क होऊन गेलेलं असतं. हिरव्या रंगाचा एकछत्री अंमल संपुष्टात आलेला असतो. एखाद्या कार्यक्रमाचा grand finale मोठ्या झोकात करावा तसं ह्या फॉल सिझनमध्ये एक नेत्रदीपक रंगायतन साजरं करून पानं निपचित धुळीत पडलेली असतात. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती…’, याची वर्षामागून वर्ष प्रचिती येत रहाते. सगळीकडे करड्या, तपकिरी रंगाचं एकसुरी साम्राज्य पसरलेलं असतं. डोंगरांवर, टेकड्यांवर पर्णरहित झाडांची आणि हिरव्या सूचिपर्णी वृक्षांची सरमिसळ नजरेत भरत असते. ह्या पर्णरहित वृक्षांच्या पार्श्वभूमीवर, ते हिरवेगार सूचिपर्णी वृक्ष अधिकच उठून दिसत असतात. जणू एखाद्या युद्धभूमीवर, पराभूत नि:शस्त्र घायाळ सेनेमधून, दिमाखदार शिरस्त्राणे घातलेल्या विजयी सेनेच्या सैनिकांचा उत्साहाने वावर चालला असावा, तसं दृश्य दिसत असतं.
नाटकाचा हसता खेळता रंगीबेरंगी अंक आता संपलेला असतो. पुढचा हिवाळ्याचा अंक, एक लांबच लांब, एकसुरी, प्रौढ आणि गंभीर असणार असतो. तपकिरी करड्या पडद्याकडे बघत, संपलेल्या अंकाच्या सुखद आठवणी मनात घोळवत, पुढच्या अंकाची वाट बघत बसावं, तसा हा मधला काही आठवड्यांचा काळ असतो.
August 12, 2015

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय
सञ्जय उवाच ।
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥
अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १
श्रीभगवानुवाच ।
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२॥
“आर्यांना शोभा ना देती असली ही तर्कटे
कुठून तुझिया मनात, पार्था‚ आली ही जळमटे २
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥३॥
नको दाखवू नामर्दपणा जो लांछनकारी
खंबीरपणे युध्द कराया ऊठ‚ धनुर्धारी ३
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥४॥
अर्जुन म्हणाला‚
श्रीकृष्णा‚ हे भीष्म‚ द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४
गुरूनहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥५॥
गुरूहत्येपेक्षा खावे मी भिक्षा मागून
माखावें त्यांच्या रक्ताने अयोग्य त्याहून ५
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
व हत्वा न जिजीविषामस्-
तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥६॥
आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारुन आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरी लढण्या‚ मम कौरव भ्राते ६
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥७॥
कुंठितमति मी‚ काय करू हे कळते ना मजसी
सांग केशवा शिष्य तुझा मी‚ शरण येत तुजसी ७
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥८॥
स्वर्गधरेचे राज्य दिले तरि कुणि न सांगू शकते
अनुत्तरित शंका हि सर्वथा मनास मम शोषते ८
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥९॥
संजय म्हणाला‚
इतुके सारे सांगुनी अर्जुन कृष्णासी बोलला
“नाही मी लढणार” म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥१०॥
दोन्ही सैन्यांमध्ये थांबल्या खिन्न अर्जुनाला
अस्फुटसे हसुनिया कृष्ण मग वदले या बोला‚ १०
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥११॥
श्री भगवान म्हणाले‚
“शोकासाठी पात्र जे न, तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥१२॥
असे न की मी‚ तू‚ हे राजे‚ नव्हतो पूर्वी कधि
असेहि नाही की आपण यापुढे न होणे कधी १२
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥
जो जन्मे त्या येइ बालपण‚ यौवन‚ वृध्दपणा
अन् मग मिळते शरीर त्या दुजे ही तर क्रमधारणा
हे ठाउक ज्या ते ज्ञानीजन पडति न मोहात
कारण त्याना ज्ञात कि सारे असते क्रमप्राप्त १३
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥१४॥
हे कुन्तिसुता‚ शीतउष्ण वा सुखदुखकारक जे
येते‚ जाते‚ संतत नसते‚ सहन करी तू ते १४
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥१५॥
ज्या पुरूषाला या सर्वांची व्यथा न बाधे तो
सुखदु:खाला समान मानुनि अमरत्वा जातो १५
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥१६॥
जें ‘आहे’ ते ‘नाही’ नसते जे ‘नाही’ ते ‘असते’ ना
ज्ञानी जाणति पूर्णपणें ‘आहे–नाही’ च्या तत्वाना १६
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥
ज्या शक्तीने केलि निर्मिती अन् राहे व्यापून
तिच्या विनाशा समर्थ कुणिहि नसे‚ कुन्तिनंदन १७
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥१८॥
नाशवंत देहांचा धारक ‘आत्मा’ अविनाशी
जाणुनि घे अर्जुना‚ आणि हो तयार युध्दासी १८
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥
आत्मा मारी सर्वांना अन् स्वत:हि पावे मरण
असे समजती जे जे कोणी ते ते अनभिज्ञ १९
न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥
नाही जन्मत‚ मरतहि नाही आत्मा चिरंजिवी
आज असे अन् पुन्हा न होइल असाहि तो नाही
चिरंजीव अन् पुरातन असा हा आत्मा आहे
नाश पावली जरी शरीरे तरी उरून राहे २०
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥२१॥
आत्म्याचे अविनाशि रूप हे असे जया अवगत
तो कैसा मारील‚ मारविल कुणासही‚ पार्थ ? २१
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥
सहजपणे जैसी मनुजाने वसने बदलावी
तशीच आत्मा जीर्ण शरीरे त्यागुनी चढवी नवी २२
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥
शस्त्रे नाहित समर्थ चिरण्या यास‚ अग्नि जाळण्या
पाणी पण असमर्थ भिजवण्या‚ वाराही शोषण्या २३
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२४॥
शस्त्र‚ अग्नि‚ जल‚ वारा याना करी पराभूत
सर्वव्यापि अन् स्थिर सदैव हा आत्मा कालातीत २४
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥२५॥
अविकारी‚ अव्यक्त आणि समजाया कठिणतर
ऐशा आत्म्या जाणुन घेउनि शोक तुझा आवर २५
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥२६॥
आणि जरी तू मानत असशिल जन्मुनि मरतो हा
तरी तयास्तव शोक मांडणे तुला न दे शोभा २६
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥
जो जन्मे त्या मरणे आणि मॄता पुन्हा जन्मणे
असते हे अनिवार्य जाण अन् टाळ शोक करणे २७
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिवेद ॥२८॥
प्राणिमात्र अदॄश्य आधि अन् मध्यकाली दॄश्य
पुन्हा अंति अदृश्य होति, मग शोक अनावश्य २८
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन-
माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥
कुणास भासे नवल‚ वर्णितो कुणी नवलवत् हा
कुणी ऐकितो नवलच याचे‚ तरि कुणा न ठावा २९
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥
अवध्य हा आत्मा सजिवांच्या शरिरांचा स्वामी
म्हणुन शोक सजिवांस्तव करणे ठरते कुचकामी ३०
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥
धर्मोचित युध्दापरि श्रेयस्कर ना काहीही
युध्दापासुन विचलित होणे क्षात्रधर्म नाहीं ३१
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥३२॥
स्वर्गाचे जणु द्वार असे हे धर्मयुध्द जाण
भाग्यवंत क्षत्रियास केवळ मिळतो हा मान ३२
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥३३॥
तरि धर्मोचित युध्दाला जर नकार तू देशी
स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापभार घेशी ३३
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥३४॥
छी थू होइल तव कौंतेया‚ साऱ्या लोकात
मरणाहुनिही दु:खद ऐसी होइल दुष्कीर्त ३४
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥३५॥
रणावरूनि पळणारा म्हणुनी तुझ्याकडे बघतील
प्रतिष्ठा तुझी विसरून तुजला कस्पटाशि तुलतील ३५
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥३६॥
नको नको ते शब्द बोलतिल तव कुवतीविषयी
अशी कुचेष्टा ऐकुन घेणे होइल दुखदायी ३६
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥३७॥
रणात मरूनी स्वर्ग मिळवशिल‚ विजयि होउनी राज्य
ऊठ करोनी विचार याचा हो युध्दाला सज्ज ३७
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥
सुखदु:ख तसे नफा नि तोटा जय नि पराजयही
उभयाना सारखे गणुनि‚ लढ त्यात पाप नाही ३८
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥३९॥
इथवर पार्था मी सांगितला सांख्ययोग तुजप्रती
कर्मयोग हा ऐक आता जै कर्मबंध तुटती ३९
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥४०॥
प्रारंभित कर्माचा त्याने नाश नाहि होत
अल्पहि पालन या योगाचे करी भीतिमुक्त ४०
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥४१॥
कर्में निश्र्चित करते जी ती बुध्दि हवी एकाग्र
विचलित बुध्दीचे नर होती वासनांमुळे व्यग्र ४१
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥
वेदांमधल्या कर्मकांडपर वाक्यांना भुलणारे
वेदविशारद समजतात कर्माविण काहि न दुसरे ४२
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥४३॥
‘नानाविध कर्मे केल्यावर होते फलप्राप्ती
जी असते ऐश्र्वर्यभोग’ ऐसे ते प्रतिपादिती ४३
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥
भोग आणि ऐश्र्वर्यामागे जे हे पळतात
बुध्दि तयांची होउ न शकते स्थिर समाधिस्त ४४
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥
सत्व रज तम या त्रिगुणानी भरलेले वेद
त्रिगुणांच्या पलिकडे अर्जुना‚ हो तू स्वयंसिध्द ४५
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥
महापूर पाणी असता जे महत्व विहिरीचे
ज्ञानी पुरूषाना बस् तितुके कौतुक वेदांचे ४६
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥
कर्म करावे‚ करित रहावे हाच हक्क तुजला
कर्मफलाचा वाटा मिळणे हा नाही दिधला
फलप्राप्ति झालीच पाहिजे असा नसे न्याय
फलाअभावी कर्म न करणे हा नच पर्याय ४७
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥
अनासक्त होऊन कर्म कर योगाच्या ठायी
कार्यसिध्दि हो वा ना हो तरि निर्विकार राही
यश अपयश मानुनी एक अन् राहुनि नि:संग
कर्म असे करण्यास अर्जुना‚ नाव कर्मयोग ४८
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥
कर्म कधीही कनिष्ठ ठरते समबुध्दीपेक्षा
बापुडवाणे मनात धरती कर्मफल अपेक्षा ४९
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥
पाप पुण्य दोन्हीतुन राही अलिप्त समबुध्दी
चतुराईने आचर कर्मे हीच कर्मबुध्दी ५०
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥
कर्मफलाला दुर्लक्षिति जे राहुनी अलिप्त
जन्मबंधनापासुन होती ऐसे नर मुक्त ५१
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥
गढुळ मोहपर्यावरणातुन मुक्त जधि होशी
ऐकलेस त्या‚ ऐकशील त्या वेदां कंटाळशी ५२
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥
अन् वेदांनी कुंठित मति तव होइल स्थिर जेव्हा
स्थिरबुध्दी तुज कर्मयोग होइल प्राप्त तेव्हा ५३
अर्जुन उवाच ।
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥
अर्जुन म्हणाला‚
सांग‚ केशवा‚ मज स्थिरबुध्दी मनुजाची लक्षणे
कैसे त्याचे उठणे‚ बसणे‚ अन् कैसे बोलणे? ५४
श्रीभगवानुवाच ।
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥
श्रीभगवान म्हणाले‚
सर्व कामना तशा वासना सोडुनि जो तुष्ट
तो स्थिरबुध्दी अलिप्ततेने राहि आत्मनिष्ठ ५५
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥
दु:खामधि ना खेद जया‚ ना सुखात आसक्ती
स्थिरबुध्दी तो सुटली ज्याची प्रेम‚ राग‚ भीती ५६
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥
या सर्वांतुनी मुक्त होउनी हो ज्याची शुध्दी
शुभाशुभाचा मोद खेद ना ज्या तो स्थिरबुध्दी ५७
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥
कासव जैसे अवयव आपुले घेइ आवरून
तसा विषयवासना आवरून धरी स्थितप्रज्ञ ५८
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥५९॥
निराहारिचे भोजन सुटते परी न रसभक्ती
परमज्ञान मिळता पण सुटते सर्वच आसक्ती ५९
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥६०॥
परमज्ञान ना‚ अन् आचरिती दमन इंद्रियांचे
सुप्तवासनांमध्ये भरकटे मनमानस त्यांचे ६०
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥
संयम करूनी होती जे मम ठायी परायण
त्यांच्या स्वाधिन त्यांची इंद्रिये तेच स्थितप्रज्ञ ६१
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥
विचार मनि जो करि विषयाचा‚ होई आधीन
आधिनता मग जने वासना‚ राग वासनेतुन ६२
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥
रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरणऱ्हास
विस्मरणाने बुध्दि फिरे‚ तदनंतर हो नाश ६३
रागद्वेषविमुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥
अंकुश ठेवी मनावरी तो असे स्थितप्रज्ञ
रागद्वेषविरहीतपणे घे भोग‚ तरि प्रसन्न ६४
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥६५॥
अन् प्रसन्न मन करते साऱ्या दु:खांचे हरण
प्रसन्नमन जो तो स्थिरबुध्दी हे निश्र्चित जाण ६५
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६॥
अस्थिर बुध्दी ज्याची तो भावनाशील नसतो
शून्य भावना ज्याला तो कधि शांती न मिळवतो ६६
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥६७॥
विषयवासनांच्या मागे मन स्वैर धाव घेई
वारा जैसी पाण्यावरली नौका भिरकावी ६७
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥
जये इंद्रियांना आवरले मन करूनी ठाम
ते नर करती स्थिर आपुली बुध्दी निष्काम ६८
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥
जागा राही‚ जग सारे असताना झोपेमधीं
अन् जग जागे असता झोपे तो नर स्थिरबुध्दी ६९
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७०॥
तुडुंब भरला सागर राही बंद किनाऱ्यात
तरिहि पुराचें पाणी समावे त्याच्या उदरात
तसा शांत स्थितप्रज्ञ, असुनिही विषयज्ञान त्याला
अशी शांति नच लाभे कधिही विषयलोलुपाला ७०
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥
सर्व कामना त्यागुनि जगतो जो निरिच्छवृत्ती
निगर्वी तसा निर्मोही हो त्यास शांति प्राप्ती ७१
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥७२॥
अशी स्थिती ही ब्राह्मी म्हणुनी ओळखली जाई
मिळता जी मनुजाला कसला मोह कधि न होई
अशा स्थितित जरि मनुष्य राहिल अंतिम समयाला
तरि ब्रह्मनिर्माणस्वरूपी मोक्ष मिळे त्याला ७२
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः
अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
*******
April 21, 2022
कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली.
September 23, 2025
उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.
ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे
ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ताडगोळ्याचे घरगुती उपयोग
उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.
सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड
साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.
कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 6, 2017
हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता.
May 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti