वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
June 9, 2025
…महाराष्ट्राचे कर्णधार राजा गोखले आणि सामनाधिकार्यांची ठाकूरसाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांचा तरी खेळ व्हावा आणि भाऊसाहेबांना ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी दिली जावी अशी विनंतीही करून पाहिली, पण व्यर्थ…ठाकूरसाब संघाला घेऊन मैदानाबाहेर गेले आणि त्यांनी थेट स्टेशन गाठले !
December 21, 2010
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये धनश्री लेले यांनी लिहिलेला हा लेख
'ग्यानबा-तुकाराम' या दोन शब्दांवर, मंत्रावर, वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे. महाराष्ट्र हा असा एकमेव प्रांत असेल, की जेथे देवाच्या आधी त्याच्या भक्तांचा जयघोष होतो. वारकऱ्यांच्या गळ्यातले दोन टाळ जणू ग्यानबा तुकाराम हा मंत्रच गात असतात.
ज्ञानदेवांनी पाया रचला तर तुकाराम त्याचा कळस झाले. कोणत्याही गोष्टीच्या कळसापर्यंत पोहोचणं ही गोष्ट सोपी नाही. कुठल्याही पोथीचा कळसाध्याय लिहिणं सोपे नाही. कारण त्यात सगळ्या पोथीभर विखुरलेले विषय, विचार यांचं संकलन, एकत्रीकरण करून, सारांश काढून सोप्या भाषेत लोकांसमोर मांडायचे असतात. ज्ञानदेवांपासून जे संत झाले त्यांचा उपदेश जणू साररूपाने, अधिक स्पष्टपणे, पण अधिक सोप्या भाषेत तुकारामांनी मांडला. फक्त एवढंच नाही तर त्याला स्वतःच्या चिंतनाची, मननाची, स्पष्टवक्तेपणाची आणि विनम्र भक्तीची जोड दिली आणि म्हणूनच 'तुकाराम गाथा' हे वारकरी संप्रदायाचं सार आहे.
तुकोबारायांनी गाथा लिहिल्यालाही तीन-साडेतीन शतकं होऊन गेली पण ती जुनी वाटत नाही. ती शाश्वत आहे कारण त्यातले विचार हे कालौघात पुसले जाणारे नाहीत. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत' तेच कालप्रवाहात टिकते. तुकारामांची गाथा तर इंद्रायणीत बुडूनही तरलेली आहे. ती काळाच्या नदीत बुडेल का? त्यातले विचार आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळातही लागू पडतात. आधुनिक काळात उलट या गाथेच्या वाचनाची फार जास्त गरज आहे. आजच्या काळात ही गाथा वाचताना तुकाराम महाराज संतापेक्षा मानसशास्त्रज्ञ म्हणून अधिक जाणवतात. माणसाच्या मनाचा त्यांनी किती सूक्ष्म विचार केला होता हे जाणवतं. त्यांची वचने आपल्याला आजही मार्गदर्शक ठरतात. जणू ती त्रिकालाबाधित सुभाषितेच वाटतात.
तुकाराम महाराजांचं पहिलं १६-१७ वर्षांचं आयुष्य सर्वसामान्य गेलं पण नंतर मात्र संकटांची मालिकाच सुरू झाली. साहजिकच त्यांचं मन संसारातून उडालं आणि परमार्थात जडलं. त्यापेक्षा ज्याने हा प्रपंच घडवलाय त्या पांडुरंगाला शरण जावं. सगळ्या चिंता-काळज्या त्याच्यावर सोपवाव्या आणि आपण आपल्या जीवनकार्याला लागावं हा विचार त्यांच्या मनात आला.
तुका म्हणे घालू । तयावरी भार ।
वाहू हा संसार । देवापायी ।।
हे फक्त तुकोबांच्याच बाबतीत घडतं असं नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीतही घडतं. चिंता फक्त जाळत राहते. काळजी फक्त मन जाळत राहते. किती काळ असं जळायचं त्यापेक्षा तुकोबांचं हे वचन डोळ्यासमोर आणावं. संसार त्याच्या पायी, काळजी त्याच्या माथी सोपवावी आणि आपण प्रयत्नांना, कार्याला लागावं हेच योग्य. मानसशास्त्रज्ञ सांगतात की जी गोष्ट अजून घडलीच नाही त्याचीच काळजी माणसं जास्त करतात. काळजी मनातून काढून टाकावी, चिंता काढून टाकाव्या. पण कुठे? ते मानसशास्त्रज्ञ सांगत नाहीत. ते तुकाराम महाराज सांगतात. जिथे मनाची श्रद्धा आहे तिथे चिंता, काळज्या ठेवाव्यात.
प्रतिकूल तेच घडेल असा विचार करून काम करायला सुरूवात केली तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही असंही काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तुकाराम महाराजांनी हेच थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलंय. ते म्हणतात, 'मी खूप सुखी होईन, सुखाचे पाट माझ्या घरी वाहतील' असा स्वप्नीय विचार करण्यापेक्षा 'सुख पाहता जवाएवढे । दुःख पर्वताएवढे ।' हा विचार मनात ठेवावा. दुःख सुखापेक्षा अधिकवेळा स्वीकारावं लागणार आहे हे वास्तव आधी स्वीकारायला हवं. पण सुखापेक्षा दुःख अधिक का? याचं उत्तर म्हणजे आपलं मन. मनाची सवय असते तक्रारी करत राहण्याची. कितीही चांगले घडले तरी छिद्रान्वेषी मन त्यातली छिद्रच, न्यूनच पाहते. आणि त्यामुळे चांगलं मिळूनही मनाला दुःखच वाटतं. शिवाय आपल्यापेक्षा दुसरा जास्त सुखी आहे असा विचार मनात येतो आणि उगाचच त्याचा हेवा वाटतो.
आपलं सुख दुसऱ्याच्या सुखातच जडलंय व दडलंय (सुखे दुज्याच्या हिरवत चित्ती । दुःखे डोळा पाणी ही बा. भ. बोरकरांची ओळ नकळत आठवून जाते.) ते ओळखता यायला हवे. शेवटी सुख हे बाहेर शोधण्याची वस्तू नाही. सुख, आनंद आपल्यातच असतो तो मिळवायचा असेल तर मनावर ताबा हवा. कायम मन प्रसन्न ठेवायला हवे. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण. सुखप्राप्ती ही मोठी सिद्धी आहे ती मनाच्या प्रसन्नतेनेच मिळणार आहे. सुखाची गुरूकिल्लीच एका ओळीत तुकोबांनी दिली.
पण मन प्रसन्न करावं हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. मन प्रसन्न ठेवता आले तर उत्तमच नाही तर जे सामोरं आलंय, ते चांगलंच आहे असं मानावं. घडतं ते भल्यासाठी. दुःखातही सुख हुडकावं, वाईटातूनही चांगलंच निवडावं, आपत्तीलाच इष्टापत्ती मानावं. जशी तुकोबांनी मानली.
बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळे पीडा केली ।
अनुतापे तुझे राहिले चिंतन |
जाला हो वमन संवत्सरा ।।
जीवनातला उणेपणा या अशा विचाराने जीवनाला पूर्णत्व देत असतो. ही संताची दृष्टी आहे. जीवनातल्या शिशिरऋतूतही संत वसंतच शोधतात तो असा.
जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? असा प्रश्न एका मानसशास्त्रज्ञाना केला तेव्हा त्याने सांगितले ‘आपल्या जगण्याला उद्दिष्ट नसणं, हे जीवनातलं मोठं दुःख आहे. म्हणून प्रथम आपल्या जगण्याचं उद्दिष्ट ओळखलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, 'उजाडावया आलो वाटा'... आमच्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे संतांचे मार्ग स्वच्छ करणं, वाटा उजळणं. या वाटा संतांच्या असतील, दुःखितांच्या असतील, आपल्या स्वतःच्या असतील पण वाटा उजळावयाच्या आहेत. किती अर्थपूर्ण आहे हे वचन. आपण वाटा उजळायच्या आहेत का जाळायच्या आहेत हे आपण प्रथम ठरवायला हवं, गीतेत म्हटलं तसं. आत्मैव आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मना । आपणच आपले मित्र आहोत नि शत्रूही आहोत. हा विचार मनात ठेवून तुकोबांचे वचन वाचल्यास अधिक स्पष्ट होतं.
एकदा उद्दिष्ट ठरले की माणूस त्या उद्दिष्टाने प्रेरित होतो. त्याचाच ध्यास, त्याचीच आस, त्याच्यासाठीच खास अशी एकदा अवस्था आली की आपला मोठा शत्रू आळस कुठच्याकुठे दूर पळून जातो. (तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नाश ।) आणि लक्षात येतं की जी गोष्ट अवघड वाटत होती ती सहज साध्य झाली आहे. (असाध्य ते साध्य करिता सायास ।) हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्यवेळी योग्य भूमिका घ्यावी लागते. नम्र जाला भूता तेणे कोंडिले अनंता । अशी नम्रत्वाची महती सांगणारे तुकाराम महाराजच या दोन भूमिका सांगतात. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । पण दरवेळेला इतकं मऊ राहता येत नाही तेव्हा कठोर व्हावंच लागतं. कठिण वज्रास भेदू ऐसे । नाठाळाच्या माथी हाणू काठी । असे कठोर उद्गार तुकाराम महाराजांचेच. बरेचदा नाठाळ कोण हेच आपल्याला समजत नाही. कोणाच्या बोलण्यावरून एखाद्या व्यक्तीला नाठाळ ठरवायचं! तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः पडताळून पहावं.
सत्य असल्याशी मन देते ग्वाही ।
मानिवले नाही बहुमता ।।
काठी हाणायची नाठाळाच्या माथी पण इतरांसाठीनम्रपणाच असावा. (व्हावे लहानाहून लहान). एकदा हा नम्रपणा अंगात भिनला की मग हा मोठा तो लहान हा भेदच उरत नाही. सगळे सारखेच वाटतात. (अवघी भूते साम्या आली) (तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ।) हे सगळं जग एकाच तत्त्वापासून बनलंय - विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। जे माझ्यात तेच तुझ्यात, जे पिंडी ते ब्रह्मांडी हे अध्यात्माचं महत्त्वाचं तत्त्व तुकाराम महाराज किती साध्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवतात. ते तत्त्वचिंतन तर आहेच पण ते तत्त्व लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार करणारे, लोकांच्या मनाशी संवाद साधणारे ते द्रष्टे कवी आहेत आणि म्हणूनच त्यांना फक्त संत नाही तर मानसशास्त्रज्ञ तुकाराम असंच म्हणायला हवं.
वारकरी एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात. अशा वेळी ज्येष्ठ वारकरीही आपल्यापेक्षा लहान असलेल्या वारकऱ्याच्या पाया पडतो. हे दृश्य मोठं लोभसवाणं दिसतं. पाया पडताना जसा वयाचा विचार केला जात नाही तसंच कुणी कोणत्याही जातीच्या वारकऱ्याच्या पाया पडतो. निदान देवाच्या दारी वारकरी जात पाळीत नाहीत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, 'वैष्णवाचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ असा भेदाभेद करणं हे अमांगल्याचं समजावं. सर्व प्रकारचा भेदाभेद करणाऱ्यांना तुकोबा बजावतात, 'अहो, देहात अवयव जरी वेगवेगळे असले तरी जीव एकच असतो ना? तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ||
कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव मागे पावे ।।
तीर्थाला गेलं म्हणजे पुण्य लागतं अशी सर्वसामान्य लोकांची समजूत आहे. परंतु संत सावता माळी यांचे गाव पंढरपूरापासून हाकेच्या अंतरावर असूनही ते दरवर्षी इतरांप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जात नसत. कारण त्यांचे म्हणणेच असायचे, 'कांदा-मूळा-भाजी-अवघी विठाई माझी ।।'
संत तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थक्षेत्री काय असतं, तर दगड, धोंडे अन् माती! देव तीर्थाच्या ठिकाणी नसतो. तर तो असतो सज्जन लोकांच्या ठायी! म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।
मिळालिया संतसंग । समर्पिता भले अंग ।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।
-- धनश्री लेले
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 25, 2022
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!
गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
September 8, 2016
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे.
July 25, 2021
हवामान खात्याने “आज कडकडीत ऊन पडणार” म्हटले असेल तर बाहेर पडताना नक्की छत्री बरोबर ठेवावी असे एकेकाळी उपहासात्मक बोलले जायचे. परंतू त्याच हवामान खात्याचे अंदाज आता हमखास बरोबर ठरू लागले आहेत. हवामानाची माहिती मिळविण्यासाठी आधुनिक प्रगत साधने आणि हवामान प्रारूपांमधील अचूकता यामुळेच ही नेत्रदीपक प्रगती हवामान विभागाने साधली आहे. याचीच साद्यंत माहिती देणारा हा लेख…
February 28, 2024
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची हाक आहे. एकाच वेळी धरणी आणि आकाशावर प्रीत करायची जीवनशैली ही तुकोबा-जीवनशैली आहे. ते म्हणतात 'आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी ।' केवढा व्यापक पैस तुकोबा आपल्यासाठी आखतात. ते स्वतःला अगदी अणुरेणूहूनि थोकडा मानत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते आकाशाएवढे सिद्ध झाले. त्यांच्या मते संतजन ही फार मोठी सिद्धी होती. लब्धी होती. साधु संत ज्या दिनी घरी येतील तो त्यांच्यासाठी दिवाळी दसरा होता. संतजन म्हणजे सर्वत्र पसरलेले गगन आहे असे ते सार्थपणे म्हणतात.
तुकोबांनी वेदनेचा वेद वाचला व प्रेमाचे उपनिषद अभ्यासले. यामुळेच तर त्यांचे अभंग विचार प्रमेय बनलेत. यामुळेच तर ते धरणी-आकाशाच्या नात्याच्या मिलनाची महन्मंगल कथा मांडू शकले. सतराव्या झंझावाती शतकात तुकोबांचा तारा गगनात विलसतो. त्यांचा काळ हा १६०८ ते १६५० असा आहे. ही तुकोबांच्या जगण्याची, झुंजण्याची आणि समर्पित होण्याची बेचाळीस वर्षे आहेत. हा काळ इतिहासाच्या पटलावरचा अत्यंत संक्षिप्त असा काळ आहे पण असाच काळ तर शंकराचार्य काय आणि ज्ञानेश्वर काय यांना लाभला होता. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. तुकोबांची जीवनगाथा साधक, कवी, समाजसुधारक अशा त्रिपदा गायत्रीवर मंडित आहे. तुकोबा या त्रिवेणीवरील जंगम तीर्थ आहेत. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा हे नामदेवांच्या समकालीन होते. ते वारीला नियमितपणे जात असत. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आदेशावरून तुकोबांनी केलेल्या अभंग रचनेचे रहस्य उकलते.
तुकोबा हे नाव फार अद्भुत आहे. तुकणे म्हणजे तोलणे, वजन करणे. तुकणारा तो तुका. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई असून वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. त्यांना दोन भाऊ होते. मोठा सावजी तर धाकटा कान्होबा. दोन बहिणी होत्या. त्यांचे आई-बाबा निवर्तले आणि भाऊ सावजी गोसावी झाले. भावजय वारल्या. पहिली पत्नी रुखमा गेली. पुत्र संतोबा गेले. अन्नान्न दशा झाली आणि घरातल्या परिचित जनांच्या चिता धडधडताना बघाव्या लागल्या होत्या. तुकोबांची मशाल मात्र पेटती राहिली. वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा विवाह करावा लागला. पत्नी जिजाबाई म्हणजे आवली. तुकोबांच्या समोर संघर्षाच्या जळत्या वाटा संतप्त होत्या. दिवाणी दावा अंगावर कोसळला होता. घरादारावर जप्ती आली होती. बहिष्कार होता. गाव सोडून जायचा हुकूम झालेला. अशा प्रकारे तुकोबा निराधार झाले. तुकोबांना दुष्काळाने गाठले. त्यांचे दिवाळे निघाले. एकूणच उद्ध्वस्त जीवनाची ही दशा होती. इतिहासाची पाने फडफडत होती. तिकडे दक्षिणेत भयावह अशांतता होती. बहामनी मोगल संघर्ष वातावरणात दहशत पेरत होता. धाकदपटशा आणि अश्वारोहींच्या धुळीने जनजीवन माखलेले होते.
तुकोबांच्या पारंपरिक गतानुगतिक आयुष्याचा पट हा असा आहे सगळा. त्यांना ना जातीचे पाठबळ, ना गुरुंचा आसरा, ना कुणी मार्गदर्शक, ना हितकर्ता, ना कवडी ना चावडी म्हणजे ना पैसा ना अधिकार. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तिन्हीही स्तरावर उपासमार होती. एक पराभूत आणि लज्जित जीवन वाट्याला आले होते पण तुकोबांनी प्रत्येक संकटावर आंतरिक सामर्थ्याने मात केली. कठोर आत्मपरिक्षणाचा जळता वणवा सभोवती असताना चेहऱ्यावरील स्मितरेखा पुसू दिली नाही. प्रत्ययकारी आत्मसन्मानाची उजळती ज्योत असे त्यांचे जीवन राहिले. आंतरिक प्रतिभेचा स्वच्छ-निर्मळ प्रवाह वहाता होता. त्यांच्या ठायीच्या प्रकाश जाणिवा विरक्तीने झोडपल्या गेल्या पण आंतरिक उजेड मात्र कायम होता. कोवळी भाव संवेदना जळती आणि उजळती होती. ते म्हणत होते 'अंतरी पेटता ज्ञानज्योत धवळेल जगदाकार.'
तुकोबांसाठी जगण्याचा अर्थ झुंजणे होता आणि संदर्भ समर्पित होण्याचा होता. आपल्या जीवनातील कुरुक्षेत्राला त्यांनी धर्मक्षेत्रात परिवर्तित केले. 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन' हे अंतरंगातील सत्य तुकोबांनी परखडपणे मांडले. कुठल्याही परिस्थितीत ना शरणागती स्वीकारली ना परिस्थितीशरण बनले. 'न दैन्यं पलायनं' हा गीताबोध ध्यानी घेऊन ते जळत्या पायवाटेवर अनवाणी प्रवास करत राहिले नि मळलेली पायवाट चालत राहिले. एक अनवट व अवघड वाट चालणारा हा फकीर अक्षरशः पंख मिटून बसलेल्या गरुडासारखा उज्ज्वल उद्याची वाट बघत राहिला होता.
तुकोबांना आपल्या मूळाचा नेमका शोध लागलेला असल्यामुळेच ते म्हणू शकत होते 'आम्ही मूळचे वैकुंठीचे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते स्वयंभू आहोत केले नव्हे' या प्रमाणे त्यांना आपल्या स्वप्नांना जागरणाचा संदर्भ सहजीच देता येत होता. बाबाजी चैतन्य त्यांच्या अध्यात्म साधनेचे अधिष्ठान होते. आपल्याला संत नामदेवांनी कविता कार्य सोपवले आहे याची खूणगाठ हे त्यांच्या कवित्व साधनेचे बलस्थान होते. तुकोबांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने गीता भाष्य लिहिले एकूणच परंपरा नाकारणारे बंडखोर असे मन त्यांना लाभले होते. हिंदी भाषेत असे मन कबीर यांना तर गुजराती भाषेत असे मन नरसी मेहता यांना लाभले होते. या वैष्णव वीरांनी शास्त्रसत्ता नाकारली. ग्रंथ सत्ता झुगारून दिली. कबीर ठामपणे म्हणाला होता 'तू कहता कागज की लेखी में कहता आँखन को देखी. ' तुकोबा यामुळेच तर केवळ आपण वेदांचा अर्थ जाणतो असे हिंमतीने म्हणू शकत होते. कबीराच्या शैलीत तुकोबा माळा-टिळा-जानवे-ज्योतिष-कर्मकांड नाकारून कर्मयोगाचा स्वीकार करतात. ज्ञानसाधना आचरतात आणि दंभ व अहंकारापासून मुक्त होतात. भक्तिला कधीही विभक्त न होण्याची दीक्षा देत देखावा नाकारतात. पंचांची सत्ता नाकारत असल्यामुळेच ठणकावून सांगतात 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत.' तुकोबांच्या जाणीवांचे असे स्वनिर्मित विश्व आहे. यामुळे ते थोर महाकवी ठरतात. थोर महाकविचे रहस्य समजून घ्यायला हवे. असे कवी खोल मानवी आस्था, गहिरे करुणामूल्य, मानवतेची असहाय आर्तता व दुःखाला काव्यात्म परिमाण देण्याची क्षमता बाळगतात. प्रज्ञासंपन्न कविची शब्दसत्ता ही खरे तर त्याची अर्थसत्ता आहे. शब्दांचा अर्थ त्यांनाच कळतो जे अनुभवाचा ईसार देतात. बाकी लोकांना शब्दांचे पर्याय कळत असतात. शब्द मारतो अर्थ तारतो हे तुकोबांनी मनात जाणून घेतले होते. शब्दांचे शिक्षक असतात पण अर्थाचे आचार्य असतात अशा आचार्यांना हे पुरते ज्ञात असते की शब्द पुस्तकात असून अर्थ जीवनात शोधावा लागतो. तुकोबांच्या कवितेला यामुळे एक दृढता येते. ते म्हणतात 'वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.' शब्द आपल्या जीवाचे जीवन असल्यामुळे आपण जनलोकांसाठी शब्द वाहतो. आपल्या घरी धन शब्दांचीच रत्ने असल्याचा अभिनव साक्षात्कार त्यांना घडतो. तुकोबा यत्नपूर्वक मग शब्दांचीच शस्त्रे करतात. क्रांतिकारक, वैज्ञानिक, जीवन सन्मुख आणि ऋषी या चार लोकांचीच शब्दांवर सत्ता असते. तुकोबा या चारी वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतीक-प्रतिनिधी होते. आपला अनुभव आपले मित्र शत्रू होण्याचा आहे तर तुकोबांना आपले शत्रू मित्र झाल्याचा अनुभव आला. कवितेमुळे जन्मजात वैर विस्मरणात जाण्याची सिर्द्ध लाभते असा संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी दिला आहे. तुकोबांना हा अनुभव प्रत्यक्षात झेलता आला. त्यांचे शत्रू मित्र झाले. धर्मपीठावरून धर्माज्ञा करणाऱ्या रामेश्वर भट यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची आरती रचली.
तुकोबांची कविता समजून घेताना त्यांचे जीवन धडपणे समजून घ्यावे लागते. ते समजून घेण्यात जर गफलत झाली तर मग त्यांची वचने सामान्य बुद्धिच्या माणसांना अहंकार भरली वाटू लागतील. तुकोबा म्हणतात 'आजि म्यां पांडुरंग पाहिला.' आपल्या अध्यात्म अनुभवाचा असा जाहीरपणे डंका मिरवणारे तुकोबा कमालीचे निरलस आणि विनम्र आहेत. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास.' असा आपला परिचय करून देणारे तुकोबा मग 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' अशी संताघरची खूण सांगतात. सकलांच्या पाया दंडवत करतात याचे कारण आपापली चित्ते शुद्ध करा असा त्यांचा आग्रह असतो. तुकोबांचे पाईकाचे अभंग तर सैनिकाची आचारसंहिता आहे. शिवकल्याण राजा मावळतीच्या प्रदेशातील उजळते मावळे सोबत घेऊन एक क्रांती करू जात होता. त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळवताना आणि मिरवताना संत रामदास यांच्या सोबत तुकोबांच्या स्नेहाचे गाठोडे घेऊन चालावे लागते हा चमत्कार केवळ महाराष्ट्र देशीच घडला असे नाही तर एकूणच संत परंपरेत राजसत्ता आणि धर्मदंडाची ही जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते.
तुकोबांचे निवेदन यामुळे अतिशय परखड, स्पष्ट आणि कुणाचीही भीड मुर्वत न ठेवणारे आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही. कधीतरी या धरतीवर शंकराचार्य बोलले होते 'न मे मोक्षस्याकांक्षा' त्याच चालीवर तुकोबा म्हणतात 'नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून वेगळे देईल जो' आणि आपल्या आनंदलोकाचा परिचय या शब्दात करून देतात 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' आणि त्यांनी व्यक्तवलेला 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले' हा समंजस सूर जीवन आणि ईश्वर या दोन संकल्पना मुळातून समजून घेण्याचा परिपाक आहे. मागणे काय तर ते लई नाही असे ते म्हणतात. पोटापुरते मागतात पण तुकोबांचे खरे सांगणे तर हे आहे 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.'
तुकोबांची कविता अमर आत्मतत्त्वासारखी दृढ प्रतिज्ञ आहे. तिचा पोत गीतेच्या आत्मतत्त्वा सारखा आहे. 'नैनं छिदंति शस्त्राणि' अशी ही कविता असल्यामुळे मंबाजीचे शस्त्रास्त्र तिजवर काही परिणाम करू शकत नाहीत. पंडित क्षोभाचे अग्निदिव्य तुकोबा पत्करतात आणि गाथेचे जलदिव्य साधले जाते. इंद्रायणीने तुकोबांची गाथा तारली की नाही हे काही माहित नाही पण लोककंठात ती सुरक्षित राहिली होती हे मात्र खरे. याचे कारण असे होते की ही गाथा कालोचित, कालसंमत आणि काळाला उत्क्रांत करणारी कविता आपल्या काळजाशी वागवून होती. कधी काळी उत्तरेत रामानंद साधुचा डंका वाजला होता 'जातिपाँति पुछे नहीं कोई हरि को भजे सो हरिका होई.' याचा आधार घेत कबीर बोलला होता 'जाति न पूछो साधु की. ' तुकोबांनी या वचनांना मराठी पोशाख देत म्हटले 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ' या वचनांच्या मागे तुकोबांची कळकळ होती. ते म्हणाले होते 'उपदेसी तुका मेघवृष्टिने आईका, 'बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनि. ' तुकोबांनी रोकडा व्यवहार I शिकवला. स्वर्गाचे ना आकर्षण दाखवले ना भय दाखवले. त्यांनी हा ईहलोक भावसमृद्ध केला. ते म्हणाले होते 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार घ्यावे वनांतर भस्म दंड.' ते अंधश्रद्धायुक्त समाज जीवनाला सश्रद्ध जीवनाचा आधार देत राहिले. अगदी सोप्या उदाहरणांनी समजावून सांगितले की बाबांनो 'मंत्राकारणे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ' समाज जीवन ढवळून निघाले. त्यांच्या मते धर्मपालनाचा अर्थ होता पाखंड खंडन. धर्मनीतीचा संकेत होता अखंड सावधान असणे. ते म्हणतात 'तुका सावधान हेचि देवाचे भजन' या विचार मांडणीत कुठेही भोंगळपणा नाही, भोळसटपणा नाही. या उलट अगदी स्पष्टपणे 'नाठाळाचे माथा हाणू काठी' अशी प्रतिज्ञा आहे आणि 'ऐशा नरा द्याव्या पैजारा मोजूनि' असा सल्ला आहे. ते शिवपिंडीवरच्या विंचवाला वहाणेने ठेचावे असे सांगत होते.
तुकोबांनी माणूसपणाची व्याख्या आपल्या अभंगांमधून मांडली. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,' 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. 'साधूची व्याख्या करताना तुकोबा म्हणाले 'अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो.' त्यांना अपेक्षित होता वैष्णव धर्म. सारे जग विष्णुमय व्हावे अशी आशा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यांनी समाज जीवनाचे ऊर्धीकरण मांडले. हा नूतन युगधर्माचा संदेश होता. सामान्य माणूस व देव यांच्यातील दलालीचा हक्क सांगणारा शोधक पुरोहित वर्ग तुकोबांनी नाकारला, थांबवला आणि संपवला. त्यांनी कमालीचे तीक्ष्ण प्रश्न उपस्थित केले. 'कोणे केले बाळा दुधाची उत्पत्ती ऊष्ण काळमासी फुटे तरुवर कोण तयासी जीवन देई.' हे प्रश्न पडले की 'कोण सांगावयासी गेले होते देशोदेश नेले वाऱ्याहाती माप समर्थ तो माझा बाप, ' 'मुंगिचिया घरी कोण धाडी मूळ.
तुकोबा म्हणाले होते 'आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । तुमची आमची भेटी येथूनिया जन्मतुटी. ' या जन्मतुटीबाबत विद्वानांचे मन आणि मत शंकांनी भरलेले आहे. 'तुकोबांचे सदेह वैकुंठगमन की खून' हा श्री. सुदाम सावरकर यांचा ग्रंथ यावर फार भेदक प्रकाश टाकतो. मीरा मुरलीधराच्या मूर्तीत सामावली हे पटत नाही. ती त्या मंदिराच्या मागे लहरणाऱ्या सागरात विलीन झाली असे अधिक तीव्रतेने वाटते. हे असे उदाहरण यापूर्वी नव्हते आणि नंतरही दिसले नाही. तुकोबा गेले निघून हे तर वाईट होतेच पण सर्वांत वाईट हे होते की त्यांची कविता बेपत्ता झाली. इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तिला बुडवता न आल्याचा शोक करणाऱ्यांनी हे पापकृत्य केले. एक शतक लोटले. थोर तुकारामभक्त वारकरी त्रिंबक कासार ४० वर्षे हिंडले आणि त्यांनी विखुरलेली मौखिक कविता गोळा केली. १९६९ साली तुकाराम भक्त इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट याने पुढाकार घेतला आणि ४५०० अभंगांची गाथा सिद्ध केली. ही गाथा पूर्णपणे निर्दोष नसली तरी अधिकृत आहे हे मात्र खरे. एकटा माणूस समाजपुरुष बनतो आणि तुका आकाशाएवढा बनतो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे.
- प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 8, 2022
रत्नागिरी केळशी गावात हे स्थान असून, हे ठिकाण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे; मंदिर अगदी लहान असलं तरीपण ते अनेक शतकांपूर्वीचं आहे;
October 5, 2013
वंशाचा दिवा, कुलदिपक, संपत्तीचा वारस..काय काय नांवाने याला पुकारलं जात. भारतात कुठेही गेलात तरी ‘मुलगा’ हा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला आढळेल ( केरळ व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे सन्माननीय अपवाद! इथे मुलग्यांची क्रेझ नाही) महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर ‘मुलगा’ हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतला वाटतो. पण मित्रांनो, अस्सल मराठमोळा वाटणारा हा शब्द मुळचा मराठी नाही हे आपल्याला माहित आहे का?
August 11, 2016
विदर्भाचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न दाखविणे सोपे आहे; परंतु लोकांना तुमची कुवत माहित असल्याने विदर्भाचा रेगिस्तान होण्यापेक्षा सध्या आहे तेच बरे, असे वाटत असेल, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण स्पष्ट आहे. उद्या विदर्भ राज्य झालेच, तर आमदार-खासदार कोण होतील?
January 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti