सख्या, तुझ्या आठवात
मी, चालते संथ पाऊली
सांजवर्खी या सांजवेळी
ओघळले, काजळ गाली
सोबती तीच वाट निरंतर
तुझ्याच स्पर्शात नाहलेली
पापण्यातील अस्तिव तुझे
खुलवीते या गालीची खळी
ही नित्याची साक्ष अंतरी
उमलते पाकळी पाकळी
अनवट मोहक वाटेवरचा
तूच नटखट माझ्या भाळी
तुज मी स्मरता वेळोवेळी
लोचनी प्रीत गहिवरलेली
तुझा असा असह्य दुरावा
सर्वत्र तुझी स्मृती रंगलेली
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२७
६/९/२०२२
October 6, 2022
पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे
क्षणा क्षणाला बदलून जाते, मन चकित करणारे....१,
सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात
पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंतीचा थाट....२,
चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी
फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असुनी....३,
हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य
नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश....४,
ओबड धोबड बटबटती ते, रंग पसरवी सारे,
कुणा न कळे आधुनिक कला, ही फसती ज्याला बिचारे....५,
नाद मधूर हा प्रवाह वाहे, हृदयस्पर्शी जो असे
जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे....६,
अर्थ काय आणि भाव कोणता, उलघडण्याचे कष्ट पडे
नव काव्याची चाल कशी ही, वाटते सर्वांना कोडे....७,
जे जे होते सुंदर मौलिक, दृष्टी आड चालले
सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 21, 2017
तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां
आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,
शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी
फडफड करित मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी
जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकूनी हास्य टिपते
हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते
अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसूनी येती
दिव्यामधले तेल संपता, काजळी धरल्या दिसे वाती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 11, 2019
दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता
तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता
शुश्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा
शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा
पाझर फुटण्या प्रेमाचा तो, भाव लागती एक वटूनी
उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी
दया प्रेम या भावांमध्ये, दडला आहे ईश्वर तो
मनांत येता हेच भाव ते, दर्शन त्याचे घडवूनी जातो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 9, 2019
सोडूनी दिली मी पूजाअर्चा,समाधान मज ज्यात न लाभले
दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,एक भाग तो सदैव वाटले
बालपणी मज कुणी शिकविले,पूजाअर्चा आन्हकी सारे
ठसले नाही मनात कधीही,भक्तीला हे पोषक ठरे
पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,लक्ष आमचे केंद्रीत होते
हळदी कुंकू गंध फूले आणि,दीपधूप हे मधूर जळते
सुबकतेच्या पाठी लागूनी,यांत्रिकतेसम आम्ही झालो
अर्थ ज्याचा कधी न कळला,मंत्र मुखोदगत वदू लागलो
वास्तव्य ज्याचे सदैव सागरी,स्नान तयाला काय घालता
नैवैद्य ज्याला अर्पण करितो,तो विश्वाचा असे अन्नदाता
प्रेमभाव भक्तीसाठा उचंबळूनी,तेव्हा न आला
तांत्रिकतेच्या आहारी जावूनी,मुख्य गाभा विसरूनी गेला
पूजा विधी हा मार्गदर्शक,समरस होण्या प्रभू चिंतनी
रेंगाळूनी जाता वाटेवरती,वेळ दौडतो ध्येय विसरूनी
चिंतन मनन ध्यानामध्ये,पूजा अर्चा जावे विसरूनी
हेच खरे ते साध्य आहे,जे समर्पीत होते ईश्वर चरणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 16, 2017
उन्हाळ्यातल्या निवांत रात्री
मंद मंदसा वाहे वारा
चांदण्यांच्या स्वप्निल नेत्री
निरवतेचा शुभ्र किनारा
शब्दांचे विणता धागे
आठवणींचे घेऊन मोती
हृदयाचे आर्जव विरते
उन्हाळ्यातल्या चांदण राती...
-- आनंद
November 14, 2022
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 12, 2021
तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य
समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य
तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती
प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती
कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी
मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी
हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी
दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही
गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी
स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 7, 2019
November 12, 2021
प्रभात झाली रवी उगवला
दाही दिशा उजळल्या
रात्रीचा अंधार जावूनी
नवीन आशा अंकूरल्या १
बरसत आहे सूर्यकिरणे
पृथ्वीच्या भूतली
आनंदाने पुलकित होवून
धरणीमाता शहारली २
निघूनी गेला रात्रीचा गारवा
त्याच्या आगमानाने
उल्हासीत होवून प्राणी जीवन
नाचत राही ऊबेने ३
पुनरपि आता झाले सुरु
चक्र जीवनाचे
मिळवू आज काही तरी
किरण चमकती आशेचे ४
काळोखाची भयाणता
आता गेली निघूनी
प्रकाशाच्या मदतीने
कामास लागती जोमानी ५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti