सांगा कुणी पाहिला देव तो त्राता
जो तारतो, सकल जीव सृष्टीला
सत्य अटळ भोग भोगणे प्रारब्धाचे
कधीतरी चुकले कां सांगा कुणाला
सातत्याने नीजकर्म करीतची रहावे
त्याविण दूजा आनंद नसे जीवाला
यत्न प्रामाणिक साक्षात रूप देवत्वी
स्मरावे क्षणाक्षणाला अनामिकाला
सत्कर्मी संकल्पाचीच कांस धरूनी
निर्मोही जावे सामोरे या प्रारब्धाला
मनामनातील भाव निर्मल निरागस
मोक्षानंदी घेवुनी जाती पैलतीराला
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८४
३/११/२०२२
November 13, 2022
बागेतील तारका –
May 20, 2013
डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।
महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।१।।
जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।
आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।२।।
दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।
परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।।३।।
डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।
कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।।४।।
कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।
परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।।५।।
आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।
परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।।६।।
ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।
पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।।७।।
विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।
मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।।८।।
अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।
अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।।९।।
गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।
चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।।१०।।
विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।
परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।।११।।
ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।
हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।।१२।।
तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।
नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।।१३।।
अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।
चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी ।।१४।।
प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या ।
करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या ।।१५।।
दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे ।
आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे ।।१६।।
विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला ।
अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला ।।१७।।
फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले ।
कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।
विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा ।
वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा ।।१९।।
सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई ।
कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई ।।२०।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 7, 2018
न पोंहचे झेप विचारांची, टिपण्या त्याचेच सौंदर्य
अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता, शोधण्या तयासी मन जाय
थवेच्या थवे उडत जातां, पक्षी दिसती आकाशीं
विहंगम ते दृष्य भासे, आनंदूनी टाकती मनासी
बघतां संथ नदीकडे, लय लागूनी जात असे
प्रचंड बघूनी धबधबा, चकीत सारे होत असे
ऐटदार तो मयुर पक्षीं, आकर्षक ते नृत्य दाखवी
सप्तरंगाचे इंद्रधनुष्य, काळजाचा ठाव घेई
निसर्गातील प्रत्येक अंगी, भरलाआहे सौंदर्य ठेवा
आंस राहते लागून मनीं, कलाकार श्रेष्ठ तो जाणावा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 26, 2017
वृत्त :- आनंदकंद
सोडून साथ सारे साथी निघून गेले
ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले
घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले
ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले
दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले
जित्राब पोसलेले भूके मरून गेले.
रडणार कोण येथे मरणास रोजच्या या
डोळ्यातले तळेही आता सुकून गेले
दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले
जिंकायचे सदा पण ,येथे हरून गेले
तांडे भुकेजलेले बेजार फार होते
बदल्यात भाकरीच्या गाई विकून गेले
रूपात सारथ्याच्या कृष्णास पाहताना
अवसान कौरवांचे साऱ्या गळून गेले
होतो जिवंत तेव्हा दारी कुणी न आले
मरताच मी कशाला खोटे रडून गेले
© जयवंत वानखडे,कोरपना
October 21, 2018
बरेच दिवस झाले
काही लिहिले नाही
तुझ्या आठवणीत...
तुझी ती आठवणच
हरविली नाही ना ?
माझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज रचल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज सोडल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
माझ्या आयुष्यातील कित्येक
वर्षे वाया गेली
तुझ्या आठवणीत...
मी राहात होतो
तुझ्या नाजूक हृदयातील
माझ्या आठवणीत...
आठवणीतील माझी तू
तुझा मी राहतील
जगाच्या आठवणीत...
©निलेश बामणे
May 28, 2017
आमच्यासाठी घर हेच
आमचं संपूर्ण विश्व होतं
विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग
आमचंच घर कसं दिसत नाही
आसूसून यांच्यासाठी आम्ही
किती जमवले आनंदाचे कवडसे
नाही खिजगणतीतही त्यांच्या
आम्ही किंवा आमचे उसासे
उमेद होती तेव्हा कशाकशाची
तमा नाही बाळगली श्रमाची
उमजत नाही बाळगावी का
उमेदही यांच्या तारतम्याची
केवढा ध्यास आम्हाला, यांचे
हात लागावेत गगनाला
पाय तरी ठरतील जमिनीत का
वाटते आता शंका मनाला
घ्यावी भरारी त्यांनी म्हणून
धावलो घेऊन वेड्यागत आपण
दिशा हुकली की आशाच चुकली
वाटतं पाहून आता रिकामं अंगण
कळकळ नि काळजी आमच्या
असायची काळजात घर करुन
आता नशिबी आहे रहाणं
काळजाला पडलेली घरं मोजून
काळजातले झरे आमच्या
वाहले प्रसंगी प्रवाही बनून
कातळात खडखडाट यांच्या
नसावा पाझर जराही काहून
सदैव अवतीभोवती यांच्या
करत आम्ही बाळ, बाळ
त्यांना फुरसत नसावी पुसाया
का असाही आता यावा काळ?
व्यापात कामाच्या आपण
तरीही घेत होतो यांची चाहूल
गुंग हे स्वतःतच कायम
विश्वात आपल्या होऊन मश्गूल
यांच्या हुसक्याच्याही धसक्याने
जागलो कितीकदा दचकून आपण
धसका अजूनही बसतो हृदयाला
हाक आमची कुठंवर पोचेल
कानावर यांच्या की पल्याड होऊन
आमच्या अपेक्षांची तुम्ही
करा भले उपेक्षा, केवळ
उपेक्षेचीच तुमच्या करायला
लावू नका आम्हाला अपेक्षा
एकंदरीत हे जगच सारा आहे केवळ भास
तेव्हाही, जेव्हा वाटलं आपण होतो मुलांचे
आताही, अन्... जेव्हा जाणवतं मुलं नव्हतीच आपली
-संगोपनास समर्पण
(आईच्या, आईच्या पिढीच्या आशंकित भावनांना शब्दरुप)
--यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(९/१२/२००१)
June 7, 2022
April 26, 2022
ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी
विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।
द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे
द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।
वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन
हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।
' द्वारकेच्या कृष्णा ' धावूनी ये मी दुःखत पडे
मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।
धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी
लाज राखली द्रपदीची उभे राहूनी पाठीं ।।५।।
कां उशीर केलास मदत देण्या मजला
लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।
बसलो होतो 'तुझ्याच ह्रदयी ' अति जवळ
संबोधितां तूं ' द्वारकेच्या कृष्णा ' येण्या झाला वेळ ।।७।।
म्हटले असते ' ह्रदयातील कृष्णा ' ये धावूनी लवकर
येथेंच होतो मी मदत केली असती सत्वर ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 21, 2019
कधी उमजणार तुला मनुजा
क्षणक्षण सरतो जीव आपुला
जीव हा क्षणभंगुर, अशाश्वत
क्षणाचाही नाही इथे भरवसां ||१||
तरी मुक्तनिर्बंधी जगतो आपण
भौतिक सुखात, बेधुंद अविरत
परिणामाचीही, न करता चिंता
अविचारी, हा विनाशी भरवसां ||२||
जे जे पेरावे, ते ते इथेच उगवते
जे जसे करावे तसेच इथे भरावे
हीच तर असते, नियतीची रीती
समजुनिया मनुजा वाग जरासा ||३||
प्रीतीतुनी, तर सारी सृष्टी फुलते
वासल्याविण, दूजे कुठले अमृत
साऱ्यांच्या मनामनात सदा रहावे
तृप्त कृतार्थतेचा, पेरूनी वारसा ||४||
जे जे आहे, ते ते मुक्त देत रहावे
सहृदयता,अंतरी जपावी निरंतर
मानवतेचाच, तोच एकची रे मंत्र
ध्यास! हृदयांतरी तोची असावा ||५||
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ११.
११ - १ - २०२२.
January 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti