झुळूक इतक्या मंदपणे ती झुळकत होती

गझल ; जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला; मात्रा: ८+८+८=२४ मात्रा



गझल

जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला

मात्रा: ८+८+८=२४मात्रा

**************************************

झुळूक इतक्या मंदपणे ती झुळकत होती

खिन्न मनाची राख बिचारी धुमसत होती

का न उडाली चैतन्याची ठिणगी देखिल

आशेची धग नैराश्याला जाळत होती

अवघी दुनिया निद्रेमध्ये बुडली होती

नि:शब्दाची निश्चलता कल्लोळत होती

सुखलोलुप कोलाहलास ना ऐकू गेले

मुकी आसवे दु:खांची किंचाळत होती

कधी तरी गाठेल वाट ही गन्तव्याला

याच खातरीमुळे पावले चालत होती

तख्त उगा ना गेले त्यांचे हा हा म्हणता

उक्ती अन् करणी यांच्यात तफावत होती

असे बोललो जणू जन्मजन्माची ओळख

तिची नि माझी ती पहिलीच मुलाखत होती

तडजोडी केल्यात त्यामुळे तगलो इथवर

कुठे मला जिंदगी स्वत:ची भावत होती

हेच खरे की, स्थान अढळ नसते कोणाचे

आज कुठे तारका, काल जी चमकत होती

अपरात्रीच्या सूर्यानेही वंदन केले

एक ज्योत अगदी नेटाने तेवत होती

प्रा.सतीश देवपूरकर

Author