लय फोफावलय तणकटं....
धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं.....
रान कमी पडलं मनुन काय की,
आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं...
आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं,
निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं...
काल घरातुन निंघताना भिंतीवर
एक पिंपळाचं झाड पाह्यलं...
मनात विचार आला,
मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय,
मनुनं ईथबी एक उगवलय काय की?
लय फोफावलयं....
गल्लीतंबी अन दिल्लीतंबी,
घरातंबी अन दारातंबी...
कुठं नाही मनुन सांगु,
ईथं जागाचं शिल्लक राह्यली नाही...
रस्त्यावुन पुढ चलतांनी,
याच तनकटांचे दोरखंडं व्हवून,
माघं खेचतायतं मलं...
असं वारंवार जाणवायलय आजकालं...
आज तं कहरच झाला...
मह्याच मस्तीत विहरत असतांनी ,
अचानक तनकटाच्या दोरखंडांनी,
महे पायचं आवळून जागीच थिजवले...
तसं पाह्यलं तं त्या तणकटाचं,
मह्या मार्गावर,
अतिक्रमनचं व्हतं ते......!
मी पुर्ण ताकदीनिशी मुक्तं व्हवू पहातं व्हतो....
जोर जोरातं ओरडतं मदतीची याचना करत व्हतो....
पण कुनिही मह्या मदतीलं येतं नव्हतं....
जो तो मह्याकडं पाहूनं हसतं व्हता...
मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतं व्हतो.....
पण न का जाने मह्याबी मनातं घालमेलं चालली व्हती....
क्षणातचं मह्याबी अंगावरं सळसळत्या गवताची,
हालचाल जानवाय लागली व्हती...
रोम आता राह्यलाचं नव्हता...
मह्या रोम रोमात तणकटं भिनतं व्हतं....
का मीच तणकटं बनतं व्हतो...?
मी भांबावलो,बावचळलो.....
सहज आजुबाजुलं पाह्यलं .....
आत्ता सगळ्या लोकांच्या डोक्यावरं
मलं तणकटं दिसतं व्हतं.....
अन त्याची मुळं,
आरपार मेंदुतं रूजलेली जानवतं व्हती.....
मी ओरडलो....तळमळलो....शेवटी हतबल झालो....
मग शेवटी त्या विधात्यालचं मनलो,
हे विधात्या.....,
तणनाशकानं शेतातल्या तनाचा नाश करता येईल रे....
पण मेंदुतल्या तनाचा नाश कुठल्या तननाशकानं करायचा.....?
©गोडाती बबनराव काळे
9405807079
July 27, 2023

December 24, 2011
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 23, 2020
लोंबकळलेल्या खाली शेपट्या,
पिल्लू मौज करे कशी,---?
शोधक बुद्धी, चौकस नजर,
अफलातून फळते अशी,--!!
युक्ती,शक्ती, बुद्धी,
जिवाला आहे देणगी,
सदुपयोगाने करा किमया,
मौजेने जगा,ही वानगी,---!!
दिसे पिल्लू छोटेसे,
तरी मस्त आहे कल्पनाशक्ती,
आरामात कसे झोके घेई,
दुनियाच भासे त्यास छोटी,---!!
डोळे मिचकावत, पिल्लू बघते
आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे,
भरभरून लुटेन आनंद मी,
सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,!
©️ हिमगौरी कर्वे.
March 23, 2021
June 13, 2013
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले
जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।।
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण
आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी
काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।
सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे
तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच समजावे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 21, 2018
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार
शिकला सवरला परि न जाणला संसार
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 19, 2019
ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर
सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार.....१
स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे
मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे...२
लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी
कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी...३
साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत
शांत करिल मना, बघून प्राण ज्योत...४
काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान
करण्यास तुम्ही जावे, जाईल सारे बिघडून.......५,
ध्यानात झोपे शरीर, शांत करूनी मन
आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन....६
वेळ थोडा जाता, ध्यान सहज लागते
अंतरीचा प्रकाश दिसता, मन आनंदात डूबते.....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 13, 2019
तू आहेस ना घरट्यात
मी आत्ता आलो'
असं म्हणून तो गेला
तेव्हा मला दिसला - अपरंपार विश्वास
.त्याच्या डोळ्यात
दूरदेशी जाताना लढावं लागलंच
तर आपले जायबंदी पंख घेऊन
तो येईल माझ्याचकडे
किंवा टिपलेलं सोनं मोती
आणून देईल माझ्याच पदरात !
त्याच्या डोळ्यातला विश्वास - मला जपायलाच हवा !
हसरं चिवचिवतं चिमणंपाखरू घरट्यात शिरलं
तर त्याला मी दिसलेच नाही
त्याला मी हवी होते.
त्याच्या दृष्टीत पोरके अश्रू तरळले
तेवढ्यात त्याला मी दिसले
आणि पाखरू चिवचिवलं हसून पुन:
त्याच्या हसण्यानं घरट्यामध्ये आभाळ थिटं झालं
त्याचं हसणं मला जपायलाच हवं !
एकदा मीही आभाळात गेले
परतल्यावर दिसली त्याच्या नजरेत माझी प्रतीक्षा
आणि चिवचिवत पाखरू माझ्या गळ्यात पडलं
तेव्हाच ठरवलं -
आभाळ निसटलं हातातून तरी चालेल
घरटं जपायला हवं!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
May 1, 2023
रंग निळ्यासावळ्या घनांचा, आज आभाळी पसरला,
जसा विविधरंगी मुलामा,
नभांगणाला कुणी दिधला, ---
दिनकर उगवला जसा ,
रंगांचे अगदी पेंव फुटतां,
नभी जादू -ई खेळ चालला,
जो पाहे तो चकित जाहला,--!!!
सोनेरी, पांढरट, निळा,
काळा जांभळा, पिवळा,
रंग सज्ज भास्कर-स्वागतां,
जणू विजयोत्सव साजरा,--
मित्रराज डुलत येता,
गडगडाट झाला ढगांचा,
मेघमल्हार कोणी गायला ,
कल्लोळ उठला पहा विजेचा,
सुरुवात झाली चमचमाटा,
धांदल सगळी मेघांची उडता,
सूर्यराज विराजमान झाला,---
धरती ल्यायली सोनशेला..!!!
प्रकाशाचे रांजण उधळता,--
प्रभाव सोनेरी किरणांचा,
आकाशात जसा पडला,
उन्हात न्हाली वसुंधरा,
उजेडाचा सारा पसारा,-
सीमा नाही तिच्या आनंदा,--!!!
हिमगौरी कर्वे ©
January 22, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti