ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला ।
अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।१।।
नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली ।
मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।२।।
प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला ।
आत्मविश्वास जागृत करण्या, 'भविष्य' शब्द कामी आला ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 6, 2018
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 2, 2019
तू गेल्यावर माझ्यात मी उरलोच नाही,
श्वास चालू आहेत,
पण जिवंतपणाच नाही.
तुझ्या पावलांच्या खुणा अजून दाराशी आहेत,
घर रिकामं आहे,
तरीही एकटेपणाच नाही.
रात्र विचारते मला,
“किती रडशील अजून?”
अश्रू सुकलेत आता,
पण कोरडेपणाच नाही.
तुझं नाव घेताच वेळ थांबतो क्षणभर,
घड्याळ पुढे सरकतं,
पण काळ सरतच नाही.
आरशात पाहतो तेव्हा चेहरा तसाच दिसतो,
डोळ्यांत मात्र पूर्वीसारखा उजेडच नाही.
जखमा झाकून ठेवतो हसऱ्या शब्दांनी,
कोणी ओळखत नाही,
पण दुखणं कमीच नाही.
प्रेम इतकं खोल होतं, की विरहही पवित्र झाला,
तू नसणं स्वीकारलं,
पण विसरणं शक्यच नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 29, 2026
गझल
समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा
देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा
आलीच ना कधी ती भेटायला मला पण
स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा
नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो
सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा
युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना
जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा
भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा
या बावऱ्या मनाला समजावले कितीदा
खाणीत कोळशाच्या नाही हिरा मिळाला
काळेच हात झाले मी खोदले कितीदा
देवासमान वैद्या मी मानतो तुला रे
दुखण्यामधून मोठ्या तू तारले कितीदा
© जयवंत वानखडे,कोरपना
October 5, 2018
मला राज रस्त्यावरुन
चालता येत नाही
कारण ती शान
मला पेलवत नाही |
मला हम रस्त्यावरुन
चालता येत नाही
कारण सुखदु:खाच्या गर्दीतून
वाट काढता येत नाही |
मला आड वाटेंने
चालता येत नाही
कारण त्याचा तोकडेपणा
मला झेपत नाही |
मला वळणा-वळणाने
चालता येत नाही
कारण भोवळ येऊन
मला मार्ग दिसत नाही |
मला काट्याकुट्या
पायवाटेंनं चालतां येतं
कारण त्या काट्यांच्या टोकाला
माझंच रक्त लागलेलं असतं |
July 28, 2015
प्रश्न
जय कशाला म्हणतात हो?
उत्तर कुणी देणार का?
प्रतिस्पर्धि होता पराजित
त्यालाच जय म्हणावे का?
उत्तर
आपला हक्क हस्तगत करणे
आक्रमकाला समज देणे
नाहीच येता समज,पराभूत करणे
अशी जयाची परिभाषा करणे
सौ.माणिक (रुबी)
December 10, 2019
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली भारती बिर्जे डिग्गीकर यांची हि कविता
होवो भारत आत्मनिर्भर नवी जागो इथे प्रेरणा
सांगे गर्जून लोकनायक असे देण्या नवी चेतना
आहे काय म्हणायचे? कुठून या येतात संकल्पना ?
आता पूर्ण अशक्यही परतणे कोशामध्ये त्या जुन्या
आला निर्मम काळ एक असला आक्रित हे आगळे
सारी मानवजात बंद कसल्या कैदेत ते ना कळे
येते संकट शक्यता नवनव्या घेऊन त्याच्यासवे
सांगे हा कृतिशील नायक, नवे रणसूत्र हा ऐकवे
या भूमीतच नांदली विकसली ऊर्जा तपोसाध्य ती
पूर्वापारचं आत्मतत्त्व जपणारी ही जुनी संस्कृती
सारे तेच प्रमेयसाधन नव्या संकल्पकार्यास्तव
आता एक करू पुनश्च प्रण की लाभो नवे वैभव
आम्ही निर्मल विश्वभाव धरला आहे जरी अंतरी
आधी उद्यमशीलताच जपणे जी स्वावलंबी करी..
आता आकळतो चिरंतन असा संदर्भ भाष्यातला
सायासाविण बंध एक जुळतो विश्वासवे आपला..
- भारती बिर्जे डिग्गीकर
December 6, 2023
एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
March 2, 2012
अशी अामची भक्ती देवा
प्रभादेवीला धाव
शेंदूर फासलेल्याला महाग हार
हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१||
अशी अामची भक्ती देवा
लालबागच्या राजा , पाव !
बायको—पोरासाठी वेळ नाहि
उंडारतोय सारा गांव ! ||२||
अशी अामची भक्ती देवा
महालक्ष्मीला रांग
खणा—नारळाची ओटी तिला
गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३||
अशी अामची भक्ती देवा
तिरुपतीला टक्कल
अाई—बाप गेल्यावर कशाला मुंडन ?
लोक हसतील ! — ही शक्कल ! ||४||
अशी अामची भक्ती देवा
पंढरपुरात संत
घरच्या माणसांना नमस्कार सोडा ,
टळंत नाहित हि खंत ! ||५||
अशी अामची भक्ती देवा
कोंबड्या—बकर्या बळी
उजळ माथी मारेकरी अन्
हाल हाल हलाल निर्दोषांच्या भाळी ! ||६||
अशी अामची भक्ती देवा
दगडापुढे झुकती
भावंडं उठती जीवावरती
मनुष्य जन्माची माती ! ||७||
अशी अामची भक्ती देवा
हात जोडून मागणं
दिलंय त्याचे अाभार नाहित.....
सदा भिकार्यासारखं वागणं ! ||८||
अशी अामची भक्ती देवा
सिंधूताईंचा सत्कार
पी.व्ही.सिंधूवर लाखोंचीउधळण
अनाथांना मात्र फुत्कार ||९||
अशी अामची भक्ती देवा
जनगणनेतत पण जात
लायकी नसताना पद मिळतं
देशाचा होतोय घात ! ||१०||
अशी अामची भक्ती देवा
नरेंद्रांवर टिका
पासष्ट वर्षांत जमलं नाहि
सगळं एका वर्षात टाका ||११||
अशी अामची भक्ती देवा
समुद्रांत करोडोंचा पुतळा
शिवरायांचा दीन मराठा
अारक्षणासाठी दुबळा ! ||१२||
अशी अामची भक्ती देवा
पुंडलिक पण लाजतो
टाळ मृदंग नकोत अाता ,
शांताबाय अन् सैराटवाजतो ! ||१३||
माणुसकीचं तेरावं चाललंय म्हणून मुद्दामंच या कवितेला तेरा कडवी अाहेत { म्हणजे तेवढंच सुचलं हो ..... }
इति कवी : उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
Forwarded Post from Whatsapp
September 16, 2016
आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी
मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती...१
एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली
पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली...२,
मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची
जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची...३
युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी
रक्त बंबाळ ते केले शरीर, चोंच मारीत धामणीवरी....४
अखेर धामण वृक्ष सोडते, जखमी होवूनी शरिराने
पिल्लामध्ये बसूनी मैना, शांत करिते हृदय स्पंदने
डॉ. भगवान नागापूरकर
३०९- १८०६८४
August 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti