माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर
अन् वाढली आता माझी पॉवर...
लिफ्टने आता मी होणार लिफ्ट
गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट...
टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश
इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश...
चुरगळले कपडे आता होणार हद्दपार
सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार...
एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर
मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर...
मुंबई होणार आता झोपडी मुक्त
उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 14-04-2016
April 23, 2016
August 25, 2013
एकाच दिशेने जातां,
प्रभू मिळेल सत्वरी,
रेंगाळत बसाल तर,
गमवाल तो श्री हरी ।।१।।
तुम्ही चालत असतां,
अडथळे येती फार,
चालण्यातील तुमचे,
लक्ष ते विचलणार ।।२।।
ऐष आरामी चमक,
शरिराला सुखावते,
प्रेम, लोभ, मोह, माया,
मनाला ती आनंदते ।।३।।
शरिराचा दाह करी,
राग द्वेष अहंकार
मन करण्या क्षीण,
षड् रिपू हे विकार ।।४।।
सुख असो वा ते दु:ख,
बाह्यातील अडथळे
सारेच सारता दूर,
प्रभू तुम्हास मिळे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 28, 2016
आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे...
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि ...
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ....
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
'नाहीच बोलणार मी आता'
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो.....
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८
August 20, 2018
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे....१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले.....२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते.....३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ....४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 15, 2019
स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि
तितकंच अथांग असं आकाश
एकमेकांना भेटतात
क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर
आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते
त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले..
त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त
त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला
काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं...
---आनंद
June 13, 2022
शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे ।
सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे ।।
बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे ।
निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे ।।
कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता ।
क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता ।।
शिवीगाळ स्वभाव असतां आदरभाव कसा मिळे ।
शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे ।।
इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा आनंद ।
शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद ।।
वागतां कसे या वरती आवलंबून सारे असे ।
वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले उगवेल कसे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 25, 2020
ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात.
September 20, 2022
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी ।।धृ।।
व्याकूळ होती राम भेटी
रात्रंदिनी नाम ओठी
नाचूनी गाऊनी भजन करी ।।१।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
बोरे जमवित चाखूनी वेचली
अंबट तुरट दूर फेकली
भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी ।।२।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
उष्टी बोरे प्रभू चाखती
शोषूनी त्यातील रसभक्ती
शबरी त्यांत जी जमा करी ।।३।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 13, 2018
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर
ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी
साऱ्यांच्या कष्टामध्यें तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वर
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकर
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti