प्रस्थापितांनो मी तुमच्या विरुद्ध आहे
मला माहीत आहे,
साहेबाला न पटणाऱ्या त्या अंधश्रद्धा बनतात
साहेबाला रुचणाऱ्याच गोष्टी विज्ञाननिष्ठ असतात
कदाचित साहेबाचे बूटही विज्ञाननिष्ठ असावेत
कारण ते चाटण्यात प्रस्थापितांचा पुढारलेपणा असतो
म्हणूनच मी अंधश्रद्धाळू आहे
कारण साहेबाची लाचारी मला जमत नाही
'पिंजऱ्यातील' पुढारलेपण मला भावत नाही
मी मागासलेला आहे, कारण-
माझ्या पूर्वजांचा मला यथायोग्य अभिमान आहे
माझ्या हृदयातील कोरीव लेण्यांचं नाव शिवाजी आहे
माझ्या देशातून गंगा वाहते याचा मी गर्व करतो
माफ करा प्रस्थापितांनो
तुमच्या 'पुढारलेल्या' वाटेने मला चालता येत नाही
कारण- त्या वाटेवर होणारं अस्मितेचं वस्त्रहरण
मी पाहू शकत नाही
त्या वाटेवरच्या स्वाभिमानशून्यतेच्या छायेला मी भितो
त्या वाटेवरची लाचारीची लक्तरे मला झेपत नाहीत.
मला ठाऊक आहे
माझ्या मागासलेपणाची तुम्हाला लाज वाटते.
पण, तुम्हाला ठाऊक नसेल- प्रस्थापितांनो,
तुमच्या पुढारलेपणाची मी कीव करतो
देहरुपी घराचा अस्मितेचा पाया उखडून टाकून
त्यावर पुढारलेपणाचा कळस चढवण्याचा
मूर्खपणा मी करत नाही
माझ्या कंठातल्या मराठीचं अस्तित्व हिमालयाएवढं आहे
तुमच्या बंदिस्त पुढारलेपणात ते सामावणारं नाही
प्रस्थापित पुढारकांनो तुम्हीही मराठीकडे येऊ नका
कारण तिच्या केवळ संसर्गाने,
तुमचं तकलादू पुढारलेपण वितळून जाईल
मराठी अस्मितेचा आवेग तुम्हाला सहन होणार नाही
सह्याद्रीचा कडा चढताना कदाचित तुम्हाला दम लागेल
नि स्वाभिमानागत घातक चीज तुमच्या मनात घर करेल
जी बाळगणं आज तुमच्या ताकदी बाहेरचं आहे
तेव्हा प्रस्थापितांनो,
तुम्ही स्वस्थपणे साहेबाचे बूट चघळत बसा
कारण ते विज्ञाननिष्ठ आहेत
सोडून द्या माझा नाद, कारण,
संस्कृतीचा अभिमान बाळगणारा मी एक मागासलेला वेडा आहे
असे बिचकू बिलकूल नका,
संस्कृती अस्मिता, उदात्तता यांचं गुंडाळलेलं गाठोडं
बिनधास्तपणे माझ्याकडे सोपवून
नि:शंकपणे पुढारलेपणात बंदिस्त व्हा
साहेबाचे बूट तुमचीच वाट पहात आहेत-
त्यांचा योग्य तो आदर राखा
संस्कृती सांभाळायला मी आहेच, विश्वासू माणूस गंगेच्या काठावर
अनादिपासून अनंतापर्यंत, असाच
गाठोड्याची आठवण झालीच कधी तर जरुर या
मी आहे तिथेच असणार आहे
अखेर प्रत्येकाला कुणीतरी मैलाचा दगड हवाच असतो
मी मागासलेलाच रहाणार कारण,
या मागासलेपणाचा मला जबरदस्त अभिमान आहे
हीच तर माझी जीवनमूल्यं आहेत
पण लक्षात घ्या;
तुमचं गाठोडं सांभाळण्यासाठी तुम्ही गहाण टाकलेला
तुमचा स्वाभिमान, तुमची अस्मिता मात्र
मी तुम्हाला परत करणार नाही
कारण, तेच माझं एकमेव खाद्य आहे- मागासलेपणाचं
-- यतीन सामंत
October 30, 2022
गरीब माणुस दारु पितो.
मध्यमवर्गीय मद्यपान करतो..
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात...!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते..
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते...!
गरीब माणुस करतो ते लफडं.
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम..
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर...!
शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते.
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते..
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वप्न फरारीच बघायच का ?
अपना बजाज मधे सुख शाेधायचं...!
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ?
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे...!
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ?
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ?
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं...!
What's Up वर स्वत:चं मनोरंजन करायचं का ?
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं...!
जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच का ?
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ?
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा...!
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ?
निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...!
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ?
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं...!
वेस्ट केलं तरी वितळतं...!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका...!
वेस्ट तर ते तसंही होतच आहे...!
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा...!
कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...!
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!
टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते....
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
हा जन्म पुन्हा नाही
-- भरत कानविंदे
January 3, 2017
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला ...१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा करी...३,
अंतरातील सुख, नितांत असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 25, 2020
May 27, 2022
कापलेले पंख अन्,
तोडलेले हातपाय,
विचारेना इथे कुणी,
देईना धरणी ठाय,--!!!
काय करू, जाऊ कुठे ,
मन विषण्ण होई,---
सांगायाची कोणाला
आपुली कर्मकहाणी,--!!!
जग सारे पसरलेले,
चालते आहे एकटी,
स्थिती अगदी अनवाणी,
रणरणत्या वाळवंटी,--!!!
पाखरा किती गोंडस तू,
गोडुली तुझी वाणी,
आधार देई मम बुडती'ला,
देऊन काडी काडी,--!!!
*निराशेच्या गगनीही,
आशेचा पक्षी उडे,
संगतीला मी तुझ्या,
शांत हो राजसबाळे*,--!!!
दूर क्षितिजावरती,
प्रकाशकिरण चमचमती,
तुझ्या जीवनपथावरही,
डोकावेल तो एक दिनी,--!!!
सुमार"" नसेल आनंदाला,
इतुके सुख येईल जीवनी,
हे घेऊ की ते घेऊ,---
सुख वाटशील भरभरूनी,--!!!
एवढी खिन्नता कशाची,
काळोख दाटे का मनी,
आनंद जगाला वाटसी,
खूण पटेल समाधानी,--!!!
गर्तेत उदासीनतेच्या,
का अशी जाऊन पडशी,
पुन्हा पंख फैलावुनी,
आसमंती घे भरारी,--!!!
कितीदा तरी दुःखे,
मानवाला मागे लोटती,
परंतु बाहू फैलावुनी,
नव्हत्याचे होते करती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
February 7, 2019
पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई
वाट पंढरिची पावन ही ।।
चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे
दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे
भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।।
सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी
चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी
ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।।
प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास
पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास
रूपडें दिसेल कधि तें, अती मनां घाई ।।
नेते ही वाट सर्वां विठुरायाच्या पदीं
पापांचें करेल क्षालन चंद्रभागा नदी
शुचिर्भूत अंतर्बाह्यच करते सरिता ही ।।
याचि देहिं याचि डोळा पाहुनिया पंढरी
नाद अनाहत हृदयीं अन् अमृतवर्षा शिरीं
नेइल वैकुंठीं विठ्ठल, संशय ना कांहीं ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
October 31, 2017
कुठे जातो हा रस्ता
कुठेच नाही
इथेच पडून असतो नुसता !
कुठे नेतो हा रस्ता
कुठेच नाही
जागचा हलतही नाही नुसता !
अजबच म्हणायचा
हा रस्ता
भुईला म्हणायचा भार नुसता !
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
रस्ता जागच्या जागीच असतो
प्रवासी मात्र चालत असतो
रस्ता जरी स्वस्थ असतो
तरी त्याला शेवट असतो
प्रवाशाने चालायचे असते
रस्त्यारस्त्याची गोष्टच वेगळी असते
आपला कोणता रस्ता ते
आपण ओळखायचे असते
भलत्याच रस्त्याने जाऊन
खड्ड्यात पडायचे नसते
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
कुठल्या रस्त्याने चालायचे ते
आपले आपणच ठरवायचे असते
-- विनायक अत्रे
May 24, 2021
एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.
तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला. पण तसे नव्हते. पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान ऍडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे. कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे ऍडजेस्ट करायला सुरवात केली. पुढे जस जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली. ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही. त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.
आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात. अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. ती म्हणजे सोशीकता, सहन करण्याची ताकद किंवा सहिष्णुता. आपण नेहमीच आलेल्या परिस्थितीला ऍडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण ऍडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण सहिष्णुतेच्या नावाखाली आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. पण यामध्ये आपली बरीच ताकद खर्च होत असते हे आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही. आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दैवाला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही.
सहनशिलता किंवा सहिष्णुता हा चांगला गुण आहे पण त्याचा अतीरेक झाला तर तो दुर्गुणच ठरतो. गुणांचे सद्गुण व दर्गुण असे दोन प्रकार आहेत. पण अनेक वेळा दुर्गुण हे सद्गुण ठरत असतात तर सद्गुण हे दुर्गुण ठरत असतात.
तुम्ही कोणालाही तुमचे शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करू देऊ नका.
पाणी गरम होत असताना जोपर्यंत आपल्याकडे उडी मारून बाहेर पडण्याची ताकद आहे तोपर्यंत उडी मारून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.
तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
--उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
(सौजन्य- व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज)
February 24, 2016
November 21, 2021
निरोगी असतां तुम्ही,
नामस्मरण करा प्रभूचे,
ठेवू नका उद्या करीता,
महत्व जाणा वेळेचे ।।१।।
शरिराच्या नसता व्याधी,
राहू शकता आनंदी,
आनंदातच होऊ शकते,
चित्त एकाग्र ते ।।२।।
व्याधीने जरजर होता ,
चित्त होई अस्थीर,
स्थिरतेतत दडला ईश्वर,
जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti