विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा ।
रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।।
संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित ।
प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।।
जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक ।
आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।।
विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत ।
समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 16, 2017
अ ' ने खाल्ले अननस
'आ ' पळाला आईकडे
' इ ' ने घातली इजार
' ई ' ने पाहिले ईडलिंबू
' उ ' ना माहिती उपमा
' ऊ ' ने खाल्ला ऊस
' ए ' तर एकलकोंडा
' ऐ ' ची वाढते ऐपत
' ॲ ' तर घेतो ॲक्शन
' ओ ' ची जुनीच ओळख
' ऑ ' सतत ऑनलाईन
' औ ' चे शेतात औत
' अं ' ने कापले अंतर
' अ: ' मिसळे अक्षरांत
चौदाखडीची गंमत भारी
मज लागे प्यारी प्यारी
विठ्ठल मारूती जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
November 21, 2018
पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील
आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।।
अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती
अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।।
परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती
अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।।
अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची
ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।।
--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
October 4, 2025
बापू,
आजही तु दिलेल्या टोपीच्या,
झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
नासके विचार वाहू लागतात ना
तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते....!!!
बापु,
तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
मारायचा प्रयत्न केला नं,
तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
पुनर्जिवीत झालास...!!!
वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
मारायचा खुप प्रयत्न केला,
टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
चकाकुनच निघालास....!!!
बापु
आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
हि पृथ्वी तगुन आहे....!!!
जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
पण तुह्याच विचारानं,
मह्या डोक्यातीलं आग शांत केली...!!!
बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
बंदुकिच्या गोळीनं केली असेल
पण तुह्या विचारांची हत्या,
ते कोणत्या बंदुकीनं करतीलं...?
बापु,
तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
तरी तु टस का मस झाला नाहीस,
भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
गोळ्या झाडल्या असतीलं रे,
अन तुही “हे राम!” म्हणत,
धारातीर्थी पडला असशीलं...
पण तुह्या विचारांतला “राम”
ते कव्हाच मारू शकणार नाहीतं.....!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 5, 2023
भगवान श्रीकृष्ण
September 21, 2010
रुजविता बियाणें
अंकूर फुटती
असतील दाणे जसे
तेच उगवती
पेरता आनंद
आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें
प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी
आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे
मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी
कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे
शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें
नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण
स्वभाव ज्याचा त्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 3, 2017
राधा…
ती शब्द नाही, ती शब्दांच्या आधीची शांतता आहे,
ती प्रेम नाही, ती प्रेमाला जन्म देणारी वेदना आहे…
ती हसते… पण आतून विरघळत राहते,
ती जिवंत असते… पण स्वतःलाच हरवत राहते.
तिचं अस्तित्व म्हणजे एक न संपणारं मौन,
जिथे प्रत्येक भावना स्वतःलाच ऐकत राहते…
मन तिचं रणांगण,
आठवणी तिचे बाण,
आणि स्वतःच स्वतःवर चालवलेलं युद्ध,
ज्यात जिंकणंही हारच ठरतं…
कृष्ण तिच्या आयुष्यात नव्हता,
तो तिच्या आत होता…
म्हणूनच तो प्रत्यक्ष जवळ नसला तरी,
तो कधी तिच्यापासून दूर गेला नाही…
ती कुणालाही धरून ठेवत नाही,
कारण तिला माहिती आहे,
हातात धरलेलं सगळं सुटतं,
पण मनात साठवलेलं कधीच हरवत नाही…
राधा म्हणजे…
एक न बोललेलं गूढ,
ज्याचं उत्तरही तिलाच माहीत नसतं…
पण तरीही ती विचारत नाही,
कारण काही प्रश्न जिवंत ठेवले कीच प्रेम जिवंत राहतं…
ती तुटते…
पण आवाज करत नाही,
ती रडते…
पण अश्रूही तिच्याशी दगा देतात…
तिच्या शांततेत एक आक्रोश असतो,
जो कुणालाच ऐकू येत नाही…
आणि कदाचित,
तो ऐकण्यासाठी कुणी असावं अशी अपेक्षाही नसते…
ती प्रेम करत नाही,
ती प्रेम जगते…
जसं आकाश ढगांना अलगद सामावून घेतं,
आणि पावसानंतरही त्यांची आठवण जपत राहतं…
राधा म्हणजे एक अधूरं गीत,
ज्याला शेवट नाही…
आणि कदाचित म्हणूनच,
ते कधी संपतही नाही…
ती शिकवते,
स्वतःला हरवणं हीच खरी सापडणं आहे,
आणि ज्याच्यावर प्रेम करतो
त्याला मिळणं गरजेचं नसतं…
कृष्ण तिचा नव्हता,
हे तिला माहीत होतं…
पण “तो माझ्यात आहे”
ही जाणीव तिचं संपूर्ण जग होतं…
ती कुणाची वाट पाहत नाही,
कारण ती थांबलेलीच असते.
काळाच्या एका क्षणात,
जिथे सगळं संपतं… आणि सगळं सुरूही होतं…
राधा म्हणजे…
स्वतःच्या राखेतून रोज पुन्हा उभी राहणारी ज्वाला,
जी जळते,
पण कधी विझत नाही…
ती शेवट नाही,
ती एक अनंत सुरुवात आहे…
जिथे प्रेम जिंकत नाही,
पण कधी मरतही नाही…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 1, 2026
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।
चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।
परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।
कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।
असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 12, 2020
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 28, 2020
चिंव चिंव करीत चिमणा चिमणी,खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून,माळ्यावरती ती बसली
वाचन करण्यात रंगून गेलो,लक्ष्य नव्हते तिकडे
आश्चर्य वाटले बघून मजला,काड्या गवताचे तुकडे
घरटे बांधण्या रंगून गेली,आणती कडी कचरा
मनांत बांधे एकच खुणगांठ,तयार करणे निवारा
भंग पावता शांत वातावरण,वैताग आला मला
कचरा आणि घरटे काढून,खिडकीतुनी फेकला
काम संपवूनी सांज समयी,घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे,पाहून चकित झालो
पहाट होता चिमण्या उडाल्या,काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस,परी जिद न सोडी ते
चार दिवसाची सुटी घालउन,गांवाहून परतलो
घरटे बघता संताप येऊन,मुठी वळवूनी धावलो
घरट्या मधूनी चिमणी उडाली,बसली पंख्यावरती
चिव चिव करुनी विनवू लागली,दया दाखवा ती
परी मी तर होतो रागामध्ये,चढलो माळ्यावरी
मन चरकले बघून अंडी,छोट्या घरट्यामध्ये
असहाय्य दृष्टीने चिमणी,पाही मज करुणायुक्त नयनी
यश मीळाले तिनेच,शेवटी भूतदया जागवूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti