ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 12, 2020
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते
आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते
ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते
प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते
मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी
परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं
मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार
ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 24, 2015
गजानना तू स्फूर्तीदाता
तू सकलांचा विघ्नहर्ता ।।धृ।।
वक्रतुंड लंबोदर मूर्ती
परशु विराजे एका हाती
दुजा वर देता ।।१।।
पितांबर शिरी मुकुट शोभतो
जास्वंदी दुर्वांनी सजतो
मोदक आवडता ।।२।।
विनम्रभावे तुझिया चरणी
अर्पियली मी माझी झरणी
उमटू दे कविता ।।३।।
October 10, 2018
जेंव्हा ठरले गावी जाणे
हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता
आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता
सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये
राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी
सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली
क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी
जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण
पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो
झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद
झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली
नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात
मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या
तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी
काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा
पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते
कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,
मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही
प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले
काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता
पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 29, 2020
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 25, 2017
मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान
वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन
शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल
उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल
शेषापरी वेटोळे असुनी, ' नाळ ' तयाला म्हणती
क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती
बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग
जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग
' सो हं ' निनादुनी सांगे, ' मीच तोच ईश्वर आहे '
चुकीचा समज करुनी, तयास सागरीं पाहे
विवीधतेनें सुचवी, ' अहं ब्रह्मास्मि ' सत्य ते
कां आम्ही धांवत असतो, त्यास शोधण्या बाह्यांते
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 18, 2019
स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो
अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो....१,
पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे
थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे....२,
धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते
जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते....३,
पूरक बनती गुणधर्म परि, स्थिर असतो वा अस्थिर ते
विश्वचक्र फिरवित राहणे, निसर्गाचे तत्वची असते......४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 14, 2021
लेखणी व तलवारीची
आमनेसामने भेट झाली,
दोघात मग श्रेष्ठतेवरून
बरीच वादावादी रंगली !
सांगे तलवार लेखणीला,
इतिहासाच्या वाच कथा,
वाचून बघ समजतील तुला
माझ्या पराक्रमांच्या गाथा !
जिंकली अनेक वीरांनी
युद्धे माझ्याच बळावर,
ठेवून भरवसा माझ्याच,
धारधार तलवारीवर !
बोले तलवारीस लेखणी,
रक्तरंजित तुझी कहाणी,
झाल्या तुझ्यामुळे विधवा
नाहक गरीब सवाशिणी !
माझ्या शब्दांच्या माऱ्यापुढे
धार ठरते तुझी बोथट,
मी रक्तहीन करून क्रांती
*उलटवते जुलमी राजवट !*
*उलटवते जुलमी राजवट !*
-प्रमोद वामन वर्तक,
२८-०५-२०२३
Mauritius?
Mob.9892561086
May 29, 2023
विसरुनिया अस्तित्वाला
निसर्गात एकरूप व्हावे
क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा
एकांती आत्ममुख व्हावे....
शमता अशांत कोलाहल
हळूच मागे वळूनी पहावे
शिशुशैवव, पौगंड यौवन
पुन:, पुनः,पुनः आठवावे....
वास्तव, हे भाग्य भाळीचे
ते, वात्सल्यप्रेम आठवावे
व्याकुळ उर, भरूनी येता
मौनी अश्रुंना प्राशित रहावे....
जे लाभले ते दान प्राक्तनी
अंतर्मुख ! सदा होत रहावे
सुख,दुःख, संवेदनां, चिंता
रेतीवरच्याच, रेषा समजावे....
वास्तवता ! विरणाऱ्या लाटा
क्षण जीवनाचे मीठीत घ्यावे
सावरणारा, तो एक विधाता
त्या कृपावंताला शोधत रहावे....
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १९६
१२/८/२०२०
September 14, 2022
(अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी प्रथा. आता सासूने आपल्या सुनेला वाण देऊन तिच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर)
अधिकाचे फळ अधिकच लाभते
अशा कथा ऐकते
तीसतीन ह्या वर्ष दिनाला
अभिनंदन करते ।
पोटी न आलीस
तुझ्या आईने भरली माझी ओटी
देवाजीने तुला नर्मिले
केवळ आमच्यासाठी ।
घरात आलीस घरची झालीस
दूधात साखर पडली
दुध कोठले साखर कुठली
अवघी गोडी उरली ।
किती करिशी तू आमची सेवा
होऊ कशी उतराई
ह्या वास्तूतील वस्तू वस्तू
तुझे गोडवे गाई ।
गृहलक्ष्मी तू स्थान तुझे ग
घरच्या देव्हार्यात
दुर्गा होऊन झुंजून
करसी संकटावरी मात ।
जगावेगळे असे कसे हे
सासूसुनेचे नाते
दृष्ट लागो तुझ्यावरोनी
शब्दफुले उतरते ।
October 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti