(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शून्याला शरण !

    त्यांना ती शांतता समजली असावी कदाचित,
    योग्यतेशिवाय शून्य होण्यापेक्षा, शून्याला शरण केंव्हाही उत्तमचं..!

    हा व्यक्त होण्याचा सर्वात पवित्र मार्ग असतो
    व्यर्थ शब्दांशिवाय...!

    नजरेआडून फिरणाऱ्या त्या सर्व गोष्टी एकसारख्या नसतातचं,
    बरबटलेल्या ऐहिक सुखापेक्षा शुद्ध मन पर्वतासमान असतं..!

    आणि ती दैहिक भावना, ते राखेसारख्या निपजलेल्या अंगाराला सोबती करावी लागते. कधी कधी त्याच्याही स्पर्श केवढा थंड भासतो...!

    कर्त्याला नाकर्तेपणाचं ग्रहण लागलं की जळणारा सूर्य देखील अलगद गिळला जातो..
    त्यावेळी टिमटीमणाऱ्या काजव्याचा प्रताप कोणी सांगावा..?

    डोंगरकड्याचा माज उतरवत त्याच्या बाहुपाषातून मुक्त होणारा झरा सुध्दा निस्वार्थी गीत गतोच की..?
    पण लाटांच्या उच्छादात सर्व गिळंकृत करू पाहणाऱ्या समुद्रला हे कोण समजवणार..?

    बलशालिपणाच हत्यार हे उंबरठ्याच्या बाहेर मिरवायचं असतं..
    कारण आतून तर आपल्याच लोकांचं अस्तित्व पणाला लागलेलं असतं..!

    © अनिलराव जगन्नाथ

      May 5, 2020


  • ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला

    आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले.

    बोल सारे अनुभवाचे त्या बोलीची भाषाच न्यारी

    सुख दुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणीतरी.

    काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते.

    आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली

    त्यावर ज्येष्ठ नागरिकाचा अनुभवी सल्ला.

    उगाच नाही झाले आमचे केस असे पांढरे

    दिवस गेले रात्र गेली झेलले अनेक पाऊस वारे /१/

    दैनंदिनीच्या चक्रामध्ये फुललो, होरपळलो

    मंद मंद वारा पिऊनी उन्हात कोमेजलो /२/

    तुम्हां न मिळे आजपावेतो ते आहे आमच्या पाठी

    अनुभवाची उकल करितो सोडून एक एक गांठी /३/

    असेच होईल जीवनी तुमच्या हा नसे माझा हट्ट

    सावध करणे तुम्हास आधीं हीच खूणगांठ /४/

    (तरुण विद्यार्थ्यासाठी)

    कॉलेजातील मुले तुम्ही शिकण्या खेळण्या जाता हो

    ज्ञान मिळवून खेळ खेळूनी नांव आपले करता हो /५/

    काय बघतो आम्हीं येथे चित्रच उलटे पालटे

    अभ्यास नाही ज्ञान नाही संस्कृती गेली लयास वाटे /६/

    कोठे गेला आदर्श सारा पूर्वजांनी जपलेला

    सिगरेट दारु चरस गांजा ह्यानीच सगळा झाकोळलेला /७/

    शिक्षणाचा खेळ खंडोबा ज्ञानही घेती विकत

    अज्ञानाच्या सागरामध्यें तरुण चालले वहात /८/

    तोड-मोड आणि संप, रँगींग शिक्षकालाही मार मिळे

    कशी वाहते ज्ञान गंगा हिशोब त्याचा कुणा न कळे /९/

    आहो ही तर झाली रीत तुम्हास समजूनी घेण्याची

    उलट सुलट होऊन जाते हीच तऱ्हा आजची /१०/

    कॉलेजेस कमी आणि शिक्षक नाही विद्यार्थाचा भरणा होतो

    ढोर समजुनी एकत्र कोंबूनी कोंडवाडा हा केला जातो /११/

    कशी न होतील जनावरे ती विचार करा थोडा

    भांडण तंटे गटबाजी आणि बेंच खुर्च्या तोडा /१२/

    कॉपी करणे हक्क झाला व्यवस्थापनेलाही मार मिळे

    खून खराबा बलात्कार ह्यातच अडकले सगळे /१३/

    सारेच जमले चोर येथे लूटण्यासाठी टपलेले

    कसे मिळतील शोधून त्यातूनी ज्ञानासाठी वाहीलेले /१४/

    शिक्षकांची भरती होते जात पात बघूनी

    अनुदानाच्या संख्येकडे लक्ष सारे ठेवूनी /१५/

    कुणास आहे घोर भले करण्या विद्यार्थ्याचे

    पोट माझे ओठ माझे जीवन जगावे चैनीचे /१६/

    कसा घडेल विद्यार्थी येथे नसे कुणाला चिंता

    मागविले जातील शिक्षक ही परदेशातून आता /१७/

    अभिमान असावा राष्ट्राचा हे तर ब्रिद पूर्वीचे

    घुसा आणि घुसू द्या तत्व ग्लोबल जीवनाचे /१८/

    आरे खावो पिओ मौज करो जीन्दगी है चार दिनकी

    ह्याच विचारे विचार वाही परवा किसको कलकी /१९/

    प्रेम करणे हक्क तुमचा आनंद लूटणे जीवनी

    परी विसरु नका सभोवताल प्रेमाच्या त्या क्षणीं /२०/

    कुणी हसतो कुणी बघतो तुमच्या प्रेमाचे चाळे

    निवडू नका ह्यासाठी बाग बगीचे सार्वजनिक स्थळे /२१/

    गळ्यात गळा हात घालूनी व्यक्त करिंता मस्ती

    विसरुनी जातां क्षणांत सारी भारतीय संस्कृती /२२/

    प्रेम करावे जीव तोडूनी परी ह्रदयामध्ये घुसूनी

    व्यक्त करावे हाळूवार ते मर्यादा पाळूनी /२३/

    थांबा तुम्ही तरुणानो विचार करा हो राष्ट्राचा

    धर्म जगणे, संस्कृती जगणे, प्रश्न असेल तो अस्तित्वाचा /२४/

    राष्ट्राचे तुम्ही आधारस्तंभ आणि खांब सारे तंबूचे

    एक मनाने एक सुराने दर्शन घडू द्या शक्तीचे /२५/

    ज्ञान संपदा, शक्ती संपदा हा ठेवा, तुमच्या संस्कृतीचा

    विद्यार्थ्यामध्ये नांव होऊं दे लौकीक आपल्या भारताचा /२६/

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 2, 2016


  • देव…फसवणूक का सत्याची जाणीव?

    देवानेच आपल्याला फसवलं आहे,
    हे वाक्य माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
    वेगवेगळ्या आवाजात उमटलं…

    लहानपणी...
    आईच्या कुशीत झोपताना वाटायचं,
    जग खूप सुरक्षित आहे,
    देव म्हणजे गोष्टीतला राजा,
    जो शेवटी सगळं ठीक करतो…
    पण पहिल्यांदा जेव्हा हरवलं एखादं खेळणं,
    किंवा तुटली एखादी मैत्री.
    तेव्हा कळलं,
    “गोष्ट संपली तरी सगळं ठीक होतंच असं नाही…"

    किशोरवयात...
    स्वप्नांना पंख फुटले होते,
    आकाश स्वतःचं वाटत होतं,
    पण पहिल्याच अपयशाने
    ते पंख जळाले…
    रात्री उशिरा देवाला विचारलं,
    "मी एवढं मनापासून मागितलं होतं,
    मग का नाही दिलंस?"
    उत्तर आलंच नाही…
    तेव्हाच पहिल्यांदा वाटलं,
    देवानेच आपल्याला फसवलं आहे…

    तरुणपणात...
    प्रेमावर विश्वास ठेवला,
    एखाद्या माणसात देव पाहिला…
    पण जेव्हा तोच माणूस दूर गेला,
    हातातून हात सोडून.
    तेव्हा समजलं,
    देव कधी कधी माणसांच्या रूपात
    आपल्याला तोडतो…

    मध्यमवयात...
    जबाबदाऱ्या, कर्जं, अपेक्षा,
    सगळं पेलताना स्वतःच हरवून गेलो,
    आरशात पाहिलं तर
    ओळखीचे चेहरेही अनोळखी वाटले…
    देवाला विचारलं
    "हीच का माझी वाट?"
    तो पुन्हा शांत…
    आणि ती शांतता
    सगळ्यात मोठी फसवणूक वाटली…

    वृद्धावस्थेत...
    हात थरथरू लागले,
    पावलं मंदावली,
    आणि आयुष्य मागे वळून पाहताना
    एक प्रश्न कायम उरला,
    "खरंच, देवानेच आपल्याला फसवलं का?"

    कदाचित...
    फसवणूक ही त्याची नव्हतीच,
    आपणच स्वप्नांना कायमस्वरूपी समजलं,
    आपणच नात्यांना शाश्वत मानलं,
    आणि अपेक्षांना देवाचं वचन समजलं…

    तो तर फक्त उभा होता,
    आपल्या प्रत्येक पडण्यात.
    प्रत्येक अश्रूमध्ये,
    प्रत्येक तुटण्यात…

    देवानेच आपल्याला फसवलं आहे,
    हे वाक्य अजूनही मनात येतं.
    पण आता त्यात राग नाही,
    फक्त एक थकलेली जाणीव आहे.

    की कदाचित,
    देव फसवत नाही…
    तो फक्त आपल्याला
    सत्याच्या इतकं जवळ नेतो,
    की आपलेच भ्रम आपल्याला
    फसवणूक वाटायला लागतात…

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 3, 2026


  • सह्याद्री पुन्हा गहिवरणार

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला... आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन..

    माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो... काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा....

    चिरून तो काळाचा पदडा
    सह्याद्री पुन्हा गहीवरणार
    जाणता राजा शिवछत्रपती
    अवतार विलीन तो होणार...

    केले उभे हे स्वराज्य त्यांनी
    लेक जिजाऊ मातेचा तो असा..
    मुघली शासन मोडीत धरी
    झुंजे वाघ सह्याद्रीचा तो असा..

    नथ मस्थक झाली ती युगे
    अखंड स्वराज्य श्रीची रे ईच्छा..
    हाती धरून एक एक मावळा
    केली स्वराज्याची पुर्ण ईच्छा..

    सह्याद्री चौफेर पराक्रम त्याचा
    दुमदुमली मराठी माती अशी
    गड ,बुरुज देहहरवून देई लढा
    बलिदानी लाल झाली माती अशी..

    चरित्र शिवाजीचे ऐकता
    चैतन्य प्रत्येक रे मनी पेटे..
    धकधक करुनी धमण्या
    अस्मिता ह्दयी, ती दहक पेटे..

    असा वाघ जेव्हा गडबडला
    काळाचा ओघ तो जणू चढला
    अचानक रोग रुपी शुत्रूचा
    नकळत हल्ला देवाला अडला..

    ओठी एक नाव ते शुंभू शुंभू
    एक बाप असा व्याकूळ झाला..
    भेद काळाचा नाही कधी कळला
    माझ्या राजाचा प्राण आडकला..

    शुंभू राजे होते तेव्हा पन्हाळी
    रायगडाला लागली हो जिव्हाळी
    राजघराण्यातील सगळे दु:खी
    राज्य कारभाऱ्याच्या देव जाप मुखी..

    लागे मनी चाहूल शुंभू राजास
    मन बोले, देई हाक पित्यास..
    अस्वस्थ झाले पुत्र युवराज
    कुठे काही घडतं ?.. काय ते राज .?

    चाले प्रयत्न शरर्थीचे , वैद्य लढे
    एक एक अनुभव आज मागेपढे
    नाही असर होई जेव्हा ती दवा
    सगळ्यांनी मग मागितली दुवा...

    नाही कामी आली दवा, दुवा
    स्वराज्याचा प्राण तो हरवला
    खेळी आज काळाची ही अशी
    माझा जाणता राजा हरवला....

    उमाकांत कळे
    अकोला
    ९९२२८५५५३९
    http://umakantk.blogspot.com

    “आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन

      November 23, 2018


  • विपरीत आनंद

    खोड्या करणे, त्रास देणे, हाच बनला स्वभाव त्याचा

    वाटत होते बघून त्याला, दूरोपयोग करि तो शक्तीचा...१

    पाय ओढणे, खाली पाडणे, कपड्यावरी तो चिखल फेकणे

    मारपिट ती करूनी केंव्हां, गुंडपणा तो करित राहणे...२,

    बेफिकीर ती वृत्ती तयाची, स्वार्थाने तो भरला पुरता

    तुच्छ लेखी इतर जनाना, स्व आनंद साधत असतां....३,

    'आनंद' मिळवणे हेच ध्येय, जीवनाचे तत्त्व खरे ते

    विपरीत मार्ग अवलोकितां, समाधान राही दूर तेथें...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 15, 2019


  • ईश अस्तित्वाची ओढ

    उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
    चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।

    किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
    गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।

    सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
    पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।

    पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
    शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।

    निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
    उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 21, 2017


  • अस्तित्व !

    || हरी ॐ ||

    जगात अस्तित्व टिकविण्याच्या
    स्पर्धा लागल्या आहेत,
    आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी
    दुसऱ्याचं अस्तित्व संपवू पाहात आहेत !

    देवाचं अस्तित्व झुगारून,
    सैतानाचं स्वीकारताहेत,
    बुद्धीभेदाच्या अस्तित्वाला खरं मानून,
    देवाच्या अस्तित्वाला नावं ठेवत आहेत !

    धर्माच्या नावाने अस्तित्व जपण्याचा
    काहींचा व्यर्थ प्रयत्न चालू आहे,
    तरुणाईला प्रलोभने दाखवून
    दिशाहीनतेकडे फरफटत नेले जातं आहे !

    अस्तित्वाचे भूत मानगुटीवर बसले आहे
    त्यापासून सुटका मिळविण्यासाठी,
    निरप्राध, अनाथ, दिन-दुबळे
    मारले जात आहेत !

    आपलाचं अस्तित्व आपल्याला
    अजून नीट कळलेलं नाही,
    आपल्या आजूबाजूच्या माणसांचं
    अस्तित्व आपल्याला मान्य नाही !

    मग मित्रांनो
    अस्तित्वाची लढाई कश्यासाठी?
    वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर
    झळकण्यासाठी?

    नाही नाही मित्रांनो
    आज खरी आवश्यकता आहे,
    निस्वार्थ प्रेमाची, सच्या मैत्रीची
    अकारण कारुण्याची !

    अस्तित्वासाठी आपण नाही,
    आपण आहोत म्हणून अस्तित्व आहे !
    देवाचे अस्तित्व मान्य करू,
    दुसऱ्याच्या अस्तित्वाला मान देऊ !

    जगदीश पटवर्धन, दादर

      February 19, 2015


  • केला एवढा अट्टाहास

    केला एवढा अट्टाहास,रसिका केवळ तुझ्यासाठी,
    मांडली काव्याची आरास,
    तुझ्याच फक्त आशीर्वादासाठी,

    दत्तगुरूंचे धरून बोट,
    लेक लिहीत गेली,
    आईवडील, भाषाईने,
    समृद्धी तिज दिधली,--!!!

    माया करती मित्रवर्य,
    शिक्षकांचे आशीर्वाद मागुती,
    असे संस्कार,सहकार्य,
    उभे राहिले बघा पाठी,--!!!

    काव्यप्रेमी देती दाद,
    त्यांची ममताच उदंड,
    पावती देती रसिक,
    कृपा त्यांची भरभरून, --!!!

    त्यांच्या सदिच्छा-भेटी,
    पत्रे शिवाय, संदेश खास,
    खाऊ, फुले, आशीर्वादाची, मजजवळ जमली रास,--!!!

    खरेतर हा सन्मान,
    आपुल्या मराठी आईचा,
    "मी"तर एक निमित्तमात्र,
    माध्यम माझे फक्त समजा,--!!!

    राहिले काही चुकून माकून,
    तर, मीही एक मानव अपूर्ण, उदार अंत:करणाने माफ,
    करावे रसिकजन हो आपण,--!!

      September 12, 2019


  • गतकाळ विसर

    विसरून जा भूतकाळ तो,

    नजर ठेवूनी भविष्यावरी,

    वर्तमानी राहून प्रवाही,

    जीवन सारे यशस्वी करी ।।१।।

    व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,

    उगाळता गत आठवणी,

    खीळ पडेल उत्साहाते,

    अपयश आले हे जाणूनी ।।२।।

    ज्ञान जगाचे मिळूनी तुला,

    जन्म जहाला आजच खरा,

    अनुभवी नव बालक तूं,

    वाहून नेई जीवन धुरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 25, 2016


  • इतकाच माझा गुन्हा

    काय बोलू मी तुला, काय झाला माझा गुन्हा,
    प्रेम केलं तुझ्यावर, इतकाच माझा गुन्हा.

    तुझ्या नजरेत अपराधी ठरलो मी कसा सांग,
    श्वासोश्वासात जपलं, इतकाच माझा गुन्हा.

    शब्द झाले अपुरे, भावना राहिल्या ओठांवर,
    मनात तुला पूजलं, इतकाच माझा गुन्हा.

    दूर गेलीस तू तरी दोष माझ्याच माथी आला,
    तुझ्यावर श्रद्धा ठेवली, इतकाच माझा गुन्हा.

    आज आरशासमोर उभा राहून विचारतो स्वतःला,
    स्वतःपेक्षा तुला जपलं, इतकाच माझा गुन्हा.

    लोक म्हणाले वेडा, काहीं हसले माझ्यावर,
    निस्वार्थ प्रेम मागितलं, इतकाच माझा गुन्हा.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 13, 2026