तुझी पावलं माझ्या दारावरून जाताना
मी पुसली नाही कधी तुझी पाऊलवाट
नि ठरवलं नव्हतं येणं
कधीच त्यांच्यामागून |
मस्त रंगले होते मी माझ्यातच
माझं काही मला खरंच द्यायचं नव्हतं
पण तुझी पावलं थबकली माझ्या दारात
तेव्हा देऊन बसले सारंच मंत्रमुग्धेप्रमाणं
माझे प्राण...माझे श्वास.....माझं जगणं...
आता दूर गेलास तर
माझे प्राण नसतील माझ्याजवळ संपवण्यासाठीसुध्दा
एखादा श्वासही तुझ्याकडून उसना घ्यायला हवा !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 7, 2023
लोहगडाच्या त्या कड्यावरून
आज फक्त एक देह कोसळला नाही,
कोसळला विश्वास,
कोसळली स्वप्नं,
आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
माणुसकीचं मंदिरही ढासळलं.
ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
तर जखम रक्ताची नसते,
ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.
तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो...
प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
तर अश्वत्थाम्यासारखं
युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
कारण एकटेपण जगायला शिकवतं,
पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.
प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
प्रेम म्हणजे समर्पण.
प्रेम म्हणजे संशय नव्हे,
प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.
जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
उरतात फक्त आठवणी,
आणि न भरून येणाऱ्या जखमा.
म्हणून प्रेम करा
पण इतकं निर्मळ,
की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.
कारण...
खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो...१
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण...२
फुलांमधला रस शोषतां, फूल पाखरू नाचते
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते...३
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला...४
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते...५,
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ...६
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 11, 2020
तो आल्हादी पाऊस
ढगफुटीचा गडगडाट
रिमझिम पाऊसधारा
मृदगंघली पाऊलवाट
ती नितळ ओथंबलेली
चिंबचिंबलेली बरसात
शिडकावा मृदुलस्पर्शी
अलवार तृप्ततो मिठित
ऋतु, बावरा बरसणारा
गगन, धरेस बिलगणारे
मनामनांत पाऊस ओला
निर्झर प्रीतीचे झरझरणारे
रूप, मनोहारी चराचराचे
चैतन्यांगण ते लुभावणारे
वर्षाऋतु हा राजा ऋतुंचा
क्षणक्षण मना रिझविणारे
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १६८
१७ - ७ - २०२२
August 12, 2022
शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो
गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो
अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही
अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो
शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत
क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो
आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा
उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो
ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा भरोसा
अंधारास फितूर होणाऱ्या सावल्या विकाया शिकलो
साक्षात्कार जरी मोक्षाचा आहे मृत्यूस चुंबल्यानंतर
सुखी माणसाचा नागव्याने सदरा विकाया शिकलो
रजनीकान्त
March 19, 2018
का असे जगणे होते,
भलतेच कधी जीवघेणे,
वेदनांचे उठती टाहो,
आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे,
सहावे कुठवर, सोडून द्यावे,
जखमी घायाळपण लपवावे,
कोण त्राता, कोण करविता,
संभ्रमी सारे जीव पडावे,
अगदी अनाकलनीय ना,
आपल्या आयुष्याचे कोडे ,
त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,--!!!
संयम, नि संतुलन किती,
जागोजागी का दाखवावे,
माणूस म्हणून जगणे मग,
शेवट यंत्रवतच"" बनावे, ---
कुठे जातात सगळ्या,
भावना,अन् संवेदना,
जसे या जीवनारण्यी,
ठेचकाळतच फक्त हिंडावे,
माया ममता प्रेम आस्था,
वागणे का असे नसावे,
उथळ, स्वार्थी वरपांगी,
पुरते आयुष्य असेच जावे,--?
लावावा जीव कुणाला,
पदरी येते फक्त फसवणे, तोंडावरती गोड बोलती,
प्रत्यक्षात काही वेगळे,--!!!
ताणतणांवा सीमा नसे ,
दुनिया कशी वेगळे टोचे,
जखमा आणखी खोलत,
वर मीठ चोळण्यां काहीसे, समस्यांना सीमा नसतां,
दोष तरी कुणाला द्यावा,-?
हेच आपले प्राक्तन म्हणत,
--- आहे तेच स्वीकारावे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
September 6, 2019
तुझे भाव रूप । पाहतो कृपाळा।
नयनी सोहळा। स्वामीराया।।
नाम तुझे घेता । अंतरंगी सुख।
घडते लौकिक । कृपासिंधु ।।
पामर मी देवा। तुज काय देऊ ।
चरणास वाहू। पुण्य नाम।।
संकटी उद्धार। ब्रम्हांड नायक ।
विश्वाचा पालक। सद्गुरू ।।
गुरू वसे ह्दयी। व्हावा परमार्थ।
संसारास सार्थ । स्वामी भेट ।।
घ्यावा तुम्ही पोटी । माझा अपराध।
धरूनी हा हात। चाललो मी।।
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 10, 2026
करू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला
मोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१
दोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी
कुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी....२
लहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी
विवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी....३
मर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस विचार प्रवाही
भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 18, 2018
भटकत जातो वाटसरू ,
जंगलामधील अज्ञात स्थळी,
आंस लागते जाण्याकरिता,
दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।
मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,
निराशेने वेळ दवडितो,
ध्येय दिसत असून देखील,
मार्गामुळे अडून पडतो ।।२।।
अज्ञानाच्या अंधारात ,
शोधत असतो असेच त्याला
मार्गदर्शन सद्गुरुचे,
न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।
वाट दाखवी सद्गुरु ,
प्रभूचरणी जाण्याचा,
दुवा साधतो आमच्यामध्ये,
त्यात एकरूप होण्याचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 21, 2021
ठसका लागून प्राण जातो,
घशांत अडकून काही तरी ।
क्षणांत सारा खेळ आटपतो,
धडपड केली किती जरी ।।
हृदय जेव्हा बंद पडते,
उसंत न मिळे एक क्षणाची ।
केवळ तुम्हीं चालत असतां,
यात्रा संपते जीवनाची ।।
कांचेचे भांडे निसटता,
तुकडे त्याचे होऊन जाती ।
देहाचा काय भरवसा,
जेव्हां सांपडे अपघाती ।।
वाढ करण्या शरीराची,
पडत असती बहूत कष्ट ।
क्षणभंगूर देह असूनी,
केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 27, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti