झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ,
विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी
कुणी गडद, कोणी लालेलाल झाला
बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला
कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला
कोणता अधिक सुंदर ते विचार करे
माझा रंग बिनतोड', ते पक्के ठरवे
मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,--
निसर्गघटक कितीतरी, असती,
कोण दाखवेल असे औदार्य,--?
एकट्या मला या जगी तोड नसे,
कुणी कोणतेही रंग आणो,
निळ्या नभाला तर 'होड" नसे,--!!
रंग माझे बदलती, नेहमी
रंग पांढरे, काळसर,केशरी,
रंगतदार सूर्योदयी, सूर्यास्ती,
धुळवड खेळतो रोज मी,--
सांगा कोणता रंग नसतो,
इंद्रधनुष्याची पहा ना जादू,
रंग सारे उतरती खाली,
धरतीला घालती न्हाऊ,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 14, 2019
( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
-- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !
May 3, 2021
तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी ।।
जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे ।।
व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही ।।
धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 21, 2019
सत्य, अहिंसा, साधी राहणी,
महात्मा गांधींची विचारसरणी
तत्वांची सगळ्या किती हेटाळणी,
कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
May 13, 2019
तिळ स्नेहाचा गुळ गोडीचा ।।
पौषातला सण संक्रांतीचा ।।
स्नेह वाढता वाढे गोडीने ।।
करिदिनी घाट धिरड्याचा।।
हर्ष पतंग महोत्सवाचा।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 15, 2020
बालकांनी खावा
छान छान मेवा
वाटावा त्यांना
सदा हवा हवा
शाब्दिक मेवा
बुध्दीचा ठेवा
येता-जाता
खावा खावा खावा
मित्र-मैत्रिणींना
द्यावा द्यावा द्यावा
-- सुधा नांदेडकर
July 24, 2015
विठूचे पद मजला लाभावे
देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ?
नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ?
असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा ?
विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।।
अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं
त्या सार्यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती
मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।।
क्षणभंगुर ही दुनिया चंचल, पळभर येथें थांबायाचें
त्या थांब्यावर, अखंड तोंडीं नाम चिरस्थिर-विठुरायाचें
नच गंगा, अंतीं ओठांना विठुनामच लागावें ।।
-- सुभाष स.नाईक
पंढरीचा राणा
July 3, 2017
आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून गोंधळयांची व्यवस्था करायला सांगितले. त्याने स्वत:च जाउुन सांगितलं असतं, पण गावात गोंधळी नव्हते आणि नवरदेवाने लग्न झाल्यावर हातातले हळकुंड सोडेपर्यंत तोंड वर करून गावाची शिव ओलांडायची नसते अशी प्रथा असल्याने आण्ण्याचा नाईलाज होता.
बापूचा लोकसंग्रह दांडगा म्हणून लग्नाची सगळी व्यवस्था बापूने अंगावर घेतलेली. त्यात बापूचा काहीही फायदा नाही पण पुढे पुढे होउुन पुढारीपणा करायचा त्याचा शौक तो अशा प्रसंगातून भागवून घ्यायचा. शिवाय वयाने सगळ्यांनाच वडिलधारा असल्याने सहसा त्याचा शब्द कोण मोडत नव्हते. पाच मैलांवर शिंदेवाडी होती. तिथल्या गोंधळयांची जोडी सगळया पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बापूने सांगितल्यावर लगेच एक माणूस टांग टाकून सायकलीवरून शिंदेवाडीला गेला आणि त्याच रात्रीची गोंधळाची सुपारी देउुन आला.
“बाबा, त्यांना लवकर यायला सांगितलं आहेस का?”
“मग, दिवस बुडायच्या आत टच व्हायला सांगून आलोय.”
“ते एक चांगल केलंस बघ. आणि त्यांना रस्ता कुठला सांगितलास?”
“काय बापू तुम्ही पण विचारताय राव रस्ता कुठला सांगितलास म्हणून! त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला?”
बापू त्याच्या उत्तरावर गप्प बसला. भूताची पांद ही वाडीजवळची ऐतिहासिक जागा होती. रात्री अपरात्री तिथून कोण आला की त्याला काहीतरी विचित्र अनुभव यायचे. लक्सूबापूला याच पांदीने वेड लावलं होतं. शेवटी त्याने तिथल्याच एका विहीरीत उडी टाकून जीव दिला होता. तेव्हापासून तर लोक दिवसाही तिथून जायला घाबरायचे. एकदम निर्मनुष्य रस्ता होता. रस्त्यावरून चारचाकी चालायचीच नाही. कशीबशी बैलगाडी जात असे एवढा ओबडधोबड. सायकल मात्र एका बाजूने चाकोरी धरून चालवता यायची. पण जी काही वर्दळ असेल ती दिवस बुडायच्या आतच असायची. बाकी इतरवेळी चिटपाखरूही नसायचं. म्हणून या बाबाने नीट सांगितलं नसेल तर गोंधळाची पंचाईत व्हायची ही बापूला काळजी लागलेली.
दिवस बुडाला. सात वाजून गेले, आठ वाजले तरी गोंधळयांचा पत्ता नाही. गोंधळाला लागणारं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं. अण्ण्या घाईवर आलेला. लग्न होउुनही काही उपयोग नव्हता. गोंधळ झाल्याशिवाय बायकोजवळ जाता येणार नव्हते म्हणून तो वैतागला होता. लोक बायकोशी बोलूही देत नव्हते. गोंधळी आले नाहीत तर भटजीला बोलवून गोंधळ घाला म्हणून तो नाचायला लागला होता. एवढा टाईम होउुनही ते लेकाचे अजून का आले नाहीत म्हणून बापू चिंतेत होता. तसल्या काळ्याकुट्ट अंधारात कुणीही एकटा जायला तयार झाला नसता म्हणून बापूने दामा आणि गण्याला सायकली घेउुन शिंदेवाडीकडे पिटाळले.
दोघेही सायकलवरून रस्त्याचा अंदाज घेत बॅटरीच्या उजेडात चालले होते. अर्धा रस्ता गेल्यावर त्यांच्या कानावर संबळाचा आवाज येउु लागला. दोघांचेही कान खडे झाले. त्यांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. काहीतरी आक्रित घडलं होतं यात वादच नव्हता. त्या रस्त्याने जसजसे ते जवळ जाउु लागले तसतसा त्यांच्या कानावर माणसाच्या गाण्याचा आवाजही यायला लागला. अजून पुढे गेल्यावर संबळ आणि गोंधळाची पदं ऐकू येउु लागली. पांदीतल्या भूताने दोघा गोंधळयांना धरलंय याची त्यांना खात्रीच झाली.
गोंधळयांनी शिंदेवाडीतला एक गोंधळ आटोपला. बराच उशिर झाला होता. आडगेवाडीच्या सुपारीला दिवस बुडायच्या आत या म्हणून सांगितले होते. पण तिथेच मुक्काम करायचा आहे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून सायकलीवरून ते आडगेवाडीकडे निघाले. ते नेमके भूताच्या पांदीत आले आणि कुठून कुणास ठाउुक दोन भलेमोठे लांडगे समोर येउुन उभा राहिले.
सायकली तशाच बाजूला टाकून लांडग्यांना पळवून लावण्यासाठी दोघांनी खूप आरडाओरडा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लांडगे मागे हटायला तयार नव्हते. अंधारात त्यांचे चकाकाणारे डोळे बघितल्यावर दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. लांडगे गुरगुरायला लागल्यावर विचार करायला वेळही नव्हता. दोघांनीही सरळ संबळ काढले, कमरेला करकचून बांधले, हात जोडले आणि “आई अंबाबाईच्या नावानं …” सुरू केलं. लांडग्यांनाही मजा वाटू लागली. उभे असणारे लांडगे संगीत गोंधळ ऐकत पायावर पाय टाकून आरामात खाली बसले. संबळ थांबला की गुरगुरायचे. गोंधळयांचे सगळे देव बोलवून झाले. संबळ बडवून हात दुखायला लागले पण लांडगे हटेनात.
दामा आणि गण्या सावधपणे पांदीजवळच्या चढावर आले. खालच्या तालीतून आवाज येत होता. समोर दिसायला काहीच मार्ग नव्हता. आधीच रात्र, त्यात मोठमोठ्या झाडांनी अजून काळोख वाढला होता. सायकली वरच्या बाजूला उभा करून कानोसा घेत ते हळूहळू खाली उतरू लागले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांना समोरचा सीन दिसू लागला. दोन भलेथोरले लांडगे आरामात पायावर पाय टाकून दर्दी रसिकासारखे गोंधळ ऐकत बसले होते आणि या दोघांचा गोंधळ रंगात आला होता. थोडावेळ ह्या दोघांनीही त्या अनोख्या मैफलीची मजा घेतली. शेवटी गोंधळ्यांना तर घेउुन जायला पाहिजे म्हणून त्यांनी आरडाओरड करत बॅटरीचा उजेड लांडग्यांच्या डोळयांवर मारला आणि त्यांना पळवून लावले तरीही अंगात आल्यासारखे गोंधळी सुंबूळुंग गुंबूळुंग वाजवतच होते. पुढचे दोन लांडगे पळून गेल्याचा त्यांना पत्ताच नव्हता.
“कोल्हापुरची लक्षुमी गोंधळाला यावं न् जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावं.” हे त्याचं चालूच होतं. शेवटी दामा आणि गण्याने जाउुन त्यांचे हात धरले तेव्हा ते भानावर आले.
“ये खंडेरायाच्या लाडक्यांनो, बास करा आता. च्यायला, दिवस बुडायच्या आत या म्हटल्यावर हा टाईम आहे होय रे तुमचा? गुंडाळा आता हे सगळं आन् चला आमच्यामागं गपगुमानं.”
कपाळावरचा घाम पुसून धरथरत्या अंगाने दोघा गोंधळ्यांनी आपला बाडबिस्तरा आवरला आणि निमुटपणे ते दामा आणि गण्याच्या मागे चालू लागले. शेवटी भेदरलेल्या गोंधळयांची वरात घेउुन ते आडगेवाडीत पोहोचले आणि दिवसातला तिसरा गोंधळ चालू झाला.
©विजय माने, ठाणे
http://vijaymane.blog
चित्र : खलील आफताब
July 26, 2018
जीवनात सदैव तू
पुढे बघून चालशील
अडखळलेल्या खड्ड्यांची
जाणीव ठेवुन वागशील
कर्तव्यापासून तू कधी
दूर नको पळू
तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी
आसु नको ढाळू
सर्व काही मनासारखे होइल
अशी अपेक्षा नको धरूस
पण तुझ्या आवडी निवडींना
कधी नकोस पुरूस
संसार हि तारेवरची कसरत
नंतर तुला कळेल
इतकी ही तडजोड नको करूस
कि मन तुझं जळेल
माहित आहे मला तुला
सारं कसं निटनेटक लागतं
जास्त हट्ट नको करूस
चुकून नातं ते फाटतं
जीवन आहे ते बाळा
कधी वादळ यायचं
आयुष्य थोड विस्कटलं
तर नाराज नाही व्हायचं
शपथ आहे तुला बाळा
माझं थोडं तू ऐकायचं
विरहाची जाणीव नको
अगदी आनंदाने तू जगायचं
सर्वांची खूप काळजी करतेस
स्वभाव आहे तुझा
स्वतःसाठी पण जग बाळा
आशिर्वाद आहे माझा.
- डॉ. सुभाष कटकदौंड
August 10, 2018
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 15, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti