वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
-- निखिल मुदगलकर
March 26, 2010
मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो.
आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो, आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.
चला तर मग ही लसूण आपले बारीक सारीक आजार बरे करून आपल्याली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.
१)नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!
२)ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो साधा सोपा उपाय लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.
३)लसुण ही डोळयांचे आरोग्य देखील उत्तम राखते बरे का. त्या करीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.
४)सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या बघा गॅस कुठल्या कुठे पळुन जाईल.
५)सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणा-या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा ह्या उपायाने निश्चित फायदा होईल.
६)ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.
तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 11, 2016
पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये २९ सप्टेंबर २०१६ पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया भारतीय जवान चंदू चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इ-सकाळ ला दिलेल्या मुलाखतीचा अंश
July 10, 2017
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर.
लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. अगदी फिलिप्सचे रेडिओ ते इतर अनेक नावाजलेल्या ब्रॅंडसच्या वस्तू उल्हासनगरमध्ये मिळायच्या. मात्र उल्हासनगरचा माल हा कायमच डुप्लिकेट म्हणून हिणवला गेला. खरंतर त्या उत्पादनांमध्येही एक ताकद होती. उल्हासनगरची ही उत्पादने त्यांच्या नावाने विकली गेली असती तर त्याचवेळी उल्हासनगरची ही बाजारपेठ स्वत:च्या आस्तित्त्वाचा ठसा उमटवू शकली असती. तसे झाले असते तर Made in Ullhasngar च्या ऐवजी हाच माल Made in India म्हणूनच विकला गेला असता. कदाचित त्यामुळे चिनी माल भारतात येण्याऐवजी इथलाच माल देशोदेशी गेला असता.
मात्र कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हे जाणवले असावे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या व्यावसायिक गणितात हे बसत नसावे. नाहीतर जी मेक इन इंडियाची घोषणा पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये केली ती इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या भारताच्या दोन महान पंतप्रधानांना करणे सहज शक्य होते. त्यांच्यात ती धमकही होती.
कालांतराने उल्हासनगरचे हे महत्त्व कमी होत गेले आणि चिनी बनावटीचा माल भारतीय बाजारपेठेत स्थिरावायला सुरुवात झाली.
आज भारतात जवळपास सर्वच क्षेत्रात चिनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. कपडे, खेळणी हे तर सोडाच, पण दिवाळीतले कंदील आणि रोजच्या पूजेतील धूप, अगरबत्तीसारख्या वस्तूही यातून सुटल्या नाहीत. मुंबईत रस्तोरस्ती फूटपाथवर हा चीनी वस्तूंचा बाजार भरलेला असतो. याचे गमक हे चिनी वस्तूंच्या अत्यंत कमी किमतीत आहे.
असे म्हणतात की पश्चिमेकडच्या बाजारात काही नवे उत्पादन आले की लगेच त्याची चिनी आवृत्ती बाजारात येते. ती स्वस्त असते, पण टिकावू किंवा खरोखर उपयोगी असते असे म्हणणे धाडसाचे होईल. बहुसंख्य चिनी उत्पादनांचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते एक वर्षाचे असते. यातली काही तर दुकानातून घरी घेउन गेल्याबरोबर बंद पडतात. मात्र ती उत्पादने चिनी कंपन्यांच्या नावावर विकली जातात. यामुळे चीन हा जागतिक बाजारपेठेत एक ब्रॅंड बनला.
२०१५ मध्ये प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आल्यावर. चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत कमी केली. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून आर्थिक मंदीचा सामनाही करतोय आणि भारतातीलच नाही तर इतरही देशांतल्या बाजारपेठा काबिज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. शेवटी गिर्हाईकाला जे स्वस्त मिळेल ते तो घेणारच. .
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मात्र दुर्दैवाने यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही आणि दररोज चिनी माल खरेदी करुन चिनची अर्थव्यवस्था बळकट करायला एकप्रकारे मदत करतोय.
चिन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पदोपदी पाकिस्तानला मदत करतो हे काही आता लपुन राहिले नाही. भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्येही चिनच्या कारवाया सुरुच आहेत. एकीकडे आपले वीर जवान सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांना बळी पडतात, शहिद होतात आणि आपण इकडे चिनी बनावटीच्या वस्तू राजरोसपणे रोज खरेदी करतो. आपण एकदातरी असा विचार केलाय का, की नकळत का होईना आपण आपल्या शूर शहिद जवानांचा अपमान करतोय?
भारत ही चीनची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन भारतीय बाजारपेठेत दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवसाय करतोय. यातील बराचसा माल चोरीच्या मार्गाने येत असावा त्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. मात्र जाणकारांच्या मते जवळपास काही लाख कोटी रुपयांची उलाढाल चीन केवळ भारतात करतो.
सीमेवर शहिद होणार्या भारतीय जवानांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची ही आपल्याला संधी आहे. चिनला एक संदेश देण्याचीही हीच संधी आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार तरी परिणाम करण्याची संधी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आहे. फक्त एक महिना कोणतीही चीनी बनावटीची म्हणजेच Made in China वस्तू खरेदी न करण्याचे जर भारतीयांनी ठरवलं तर ? चीनी बनावटीची कोणतीही वस्तू न विकण्याचं भारतीय व्यापार्यांनी ठरवलं तर?
बर्याचदा आपल्याकडे No TV Day आयोजित केले जातात. एकाद्या ठराविक दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा नाही असे आवाहन केले जाते.
असाच एखादा No Chinese Goods Month पाळायला काय हरकत आहे? विचार करा.. पटलं तर इतरांना पटवा. मेलवरुन, फेसबुकवरुन, WhatsApp वरुन.. कसंही !
नाही पटलं तर खाली मान घालून स्वस्थ बसून रहा. आपल्या स्वस्थ बसण्याने कदाचित येणार्या काळात आपल्याला दूधही चिनमधल्या म्हशींचं प्यायला लागेल !
-- निनाद अरविंद प्रधान
January 18, 2016
कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी.
May 19, 2021
वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज!
August 23, 2023
बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली.
February 28, 2026
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.
December 30, 2022
स्त्रीचे जास्त वय (३० च्या पुढे), वाढलेला रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, पूर्वी झालेले गर्भपात, मधुमेही स्त्री, आधीचा मृत गर्भ, अगर पूर्वी बाळ जन्मल्यावर थोड्याच वेळात मृत झाल्यास, जन्मतः बाळाचे वजन फारच कमी (दोन किलोपेक्षा कमी) पोटात जुळे गर्भ, आधीचे सिझेरिअन असेल अगर आता करण्याची शक्यता असेल, पाणमोट बरेच दिवस आधी फुटल्यास, अपेक्षित तारखेपेक्षा जास्त दिवस वर गेल्यास, मातेचा रक्तगट आरएच निगेटिव्ह असल्यास, गर्भवतीच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण खूप कमी- इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊनच डॉक्टर योग्य ती चाचणी करण्याचा सल्ला देतात.
June 24, 2023
भगवान श्रीवैकुंठनाथांच्या अपार गुण वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री शब्दरचना साकार करतात,
October 21, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti