घरातला तो जुना फॅन
आवाज करत होता…
किरकिरत, कधी थोडा हट्टी,
कधी जरा दमलेला.
पण त्या आवाजात त्रास नव्हता,
तो घराचं नाडी-स्पंदनचं होता,
छताखालून फिरणारा
एक जिवंत श्वास.
त्याच्या पंख्यांवर
धुळीपेक्षा जास्त साचल्या होत्या आठवणी,
उन्हाळ्याच्या तळपत्या दुपारी,
आईच्या पदराची सावली बनून तो अलगद फिरायचा.
घामेजलेल्या कपाळावर जेव्हा त्याची झुळूक उतरली की,जणू कुणीतरी म्हणायचं
“घाबरू नकोस, मी आहे.”
रात्रीच्या अंधारात
तोच आपल्या स्वप्नांचा रखवालदार,
त्याच्या आवाजाच्या तालावर
आपण झोपेच्या गावात शिरायचो.
घरात भांडणं झाली,
शब्द तापले,
मनांचे कोपरे गरम झाले,
तरी तो शांतपणे फिरत राहिला,
जणू सांगत होता,
“वादही या घराचाच भाग आहे.”
आणि जेव्हा हसण्याचे लोट उसळले,
टाळ्यांचा नाद घुमू लागला,
तेव्हाही त्यानेच
आनंदाची हवा सगळीकडे पसरवली.
नंतर नवे फॅन आले
चकचकीत, निःशब्द, अभिमानी.
त्यांच्या गारव्यात सुविधा होती,
पण आपलेपणा नव्हता.
हा जुना फॅन मात्र
घरातला माणूसच झाला होता.
न बोलता समजणारा,
न मागता देणारा.
आज तो थांबून गेला आहे,
छतावर त्याची जागा रिकामी आहे.
पण घर अजूनही कधी कधी
त्याचा आवाज ऐकतं,
आठवणींच्या आतून.
कारण काही गोष्टी
फक्त वस्तू नसतात,
त्या घराचा इतिहास असतात,
नात्यांची फिरती साक्ष असतात.
तो जुना फॅन,
आता फिरत नाही.
पण मनाच्या छताखाली,
तो अजूनही हळूच गोल फिरतो…
आणि प्रत्येक फेरीत
आपुलकीची झुळूक देऊन जातो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212