Login Here Join Now

C-ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी…माझ्या अस्तित्वाचा श्वास

    मराठी ही केवळ भाषा नाही,
    ती काळाच्या कपाळावर उमटलेली ओळ आहे.
    मातीच्या सुगंधातून उठलेली प्रार्थना,
    आणि मनाच्या गाभाऱ्यात जपलेली वेदना आनंदाची खोल लय आहे.

    संतांच्या चरणी ती प्रथम फुलली,
    संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांतून विश्व उलगडलं,
    संत तुकारामांच्या अभंगांतून भक्तीचं आकाश दाटलं.
    त्या शब्दांनी सामान्यांच्या ओठांवर
    आत्मज्ञानाचा दिवा पेटवला.

    नंतर साहित्याच्या सभागृहात
    तिने नव्या रूपात प्रवेश केला
    कुसुमाग्रजांच्या कवितेत तिचा ज्वालामुखी उसळला,
    मानवतेच्या स्वातंत्र्याची घोषणा शब्दांनी केली.
    कादंबऱ्यांच्या पानांतून ती हळवी झाली,
    नाटकांच्या रंगमंचावर ती जिवंत उभी राहिली.
    वाचनालयातील शांततेत
    तिच्या अक्षरांचा मंद सुवास दरवळत राहिला.

    आणि रणांगणात?
    तेथे तिच्या शब्दांनी तलवारींना धार दिली.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला
    मराठीनेच आवाज दिला.
    त्या घोषणांत तिचा अभिमान दुमदुमला,
    त्या शपथांत तिचा आत्मा उजळला.

    मराठी कधी कोकणच्या लाटांसारखी कोमल,
    कधी सह्याद्रीच्या कड्यांसारखी कठोर.
    ती अंगाईगीताची अलगद झोप आहे,
    आणि क्रांतीची जाज्वल्य हाकही आहे.

    ही भाषा माझ्या श्वासांत मिसळलेली,
    माझ्या विचारांत रुजलेली,
    माझ्या स्वप्नांना दिशा देणारी.

    मराठी म्हणजे माझं साहित्य, माझा इतिहास,
    माझं स्वातंत्र्य, माझा अभिमान.
    तिच्या प्रत्येक अक्षरात
    माझं संपूर्ण अस्तित्व जिवंत आहे.

    जेव्हा मी एकटा पडतो,
    तेव्हा तिची अक्षरं माझ्या खांद्यावर हात ठेवतात.
    जेव्हा मी हरवतो,
    तेव्हा तिचे शब्द मला माझ्याच मुळांशी नेऊन ठेवतात.

    “आई” म्हणताना जसा गळा दाटतो,
    तसंच “मराठी” म्हणताना हृदय भरून येतं.
    कारण ही भाषा फक्त बोलली जात नाही,
    ती जगली जाते,
    ती जपली जाते,
    ती रक्तातून वाहते.

    माझ्या शेवटच्या श्वासावर जर एखादा शब्द उमटला,
    तर तोही मराठीच असेल…
    कारण माझं अस्तित्व जिथे संपेल,
    तिथे तिचं प्रेम सुरूच राहील.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 13, 2026


  • झेपेचं वय

    झोप कधीही घेता येते,
    थकल्या मनाला विसावा देता येतो…
    पण स्वप्नांना पंख देण्याची वेळ
    नेहमीच थांबून राहत नाही.

    वयाच्या एका टप्प्यावर
    धाडसाची उर्मी कमी होत जाते,
    उंच भरारी घ्यायची इच्छा असली
    तरी पावलं थोडी थबकतात.

    म्हणूनच वेळ हातात असताना
    आकाशाला स्पर्श करून घ्या,
    कारण झोप तर कधीही घेता येते…
    पण झेप घेण्याचं वय
    पुन्हा परत येत नाही.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • मनापासून जगण्याची शिक्षा

    स्वप्नांच्या वाटेवर मी चालत होतो,
    मनात आशेचे दिवे पेटले होते.
    निरागस शब्दांनी नाती जोडली,“मनापासून जगण्याची शिक्षा”
    भावनांचे धागे अलगद विणले होते.

    मनातल्या भावना जपून ठेवल्या,
    शब्दांतून त्यांना अर्थ दिला.
    नात्यांच्या त्या कोमल धाग्यांना
    मी प्रामाणिकपणाचा स्पर्श दिला.

    कुणाला दुखवायचा हेतू नव्हता,
    मनात फक्त प्रेमच जपले होते.
    पण काळाच्या या कठोर वळणावर,
    का नियतीनेच माझी साथ सोडली?

    नजरेत प्रश्नांचे सावट दाटले,
    उत्तर मात्र कुठेच दिसेना.
    मनाला समजावत राहिलो तरी,
    दुखणे काही कमी होईना.

    जगाच्या हिशेबात कदाचित
    भावनांना किंमत नसते कधी.
    मनापासून जगण्याची शिक्षा
    बहुतेक अशीच मिळते कधी.

    नजरेत अनेक प्रश्न दाटले,
    उत्तर मात्र शांत राहिले.
    हृदयाने जे काही दिलं होतं,
    तेच का जगाला खटकलं असेल?

    आणि मग मनात एकच प्रश्न घुमतो...

    *अपराध माझा असा काय झाला?*

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • लाटांच्या साक्षीने

    नदीच्या शांत तीरावर तू अलगद बोलली होतीस,
    लाटांच्या मंद गाण्यात एक प्रतिज्ञा ठेवली होतीस.

    संध्येच्या फिक्या उजेडात वेळ जरा थांबला होता,
    तुझ्या त्या साध्या शब्दांनी जीव माझा भरला होता.

    वारा साक्षीदार झाला, आकाशही ऐकत होतं,
    दोन मनांच्या त्या गाठीला विश्व जणू पाहत होतं.

    आज प्रवाह बदलले,
    घाटही मागे राहिले,
    पण तुझ्या त्या बोलण्याचे स्पंदन मनात राहिले.

    कधी नदीकाठ आठवला की हसू नकळत उमलतं,
    कारण तिथेच आयुष्याने एक स्वप्न हळूच जपलं होतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • लेखणीची प्रार्थना

    हे देवा...
    माझ्या लेखणीला दुःख जाणण्याची ताकद दे,
    निःशब्द अश्रूंनाही शब्द मिळण्याची वाट दे.
    जगाच्या जखमा कागदावर उमटू देत,
    आणि प्रत्येक ओळीत माणुसकीची हाक दे.

    माझी लेखणी फक्त शाईत न भिजो,
    ती मनांच्या वेदनेत खोलवर न्हाऊ दे.
    तुटलेल्या स्वप्नांचा हळवा आवाज
    माझ्या शब्दांत अलगद सामावू दे.

    जगाच्या गर्दीत हरवलेल्या मनांना
    माझ्या कवितेत थोडा निवांत श्वास मिळू दे.
    अशी ओळ उमटू दे देवा,
    की वाचताना कुणाच्या डोळ्यात दडलेला अश्रू वाहू दे.

    माझे शब्द मोठे नसले तरी चालतील,
    पण त्यात करुणेची ऊब असू दे,
    माझी कविता फक्त वाचली जाऊ नये,
    ती एखाद्या जखमी मनाला हलकेच समजून घेऊ दे.

    शेवटी इतकंच मागणं देवा तुझ्यापाशी,
    माझी लेखणी माणुसकीची ज्योत बनू दे.
    मी नसतानाही कधीतरी कुणाच्या ओठांवर
    माझी कविता एखाद्या आशेचा श्वास बनू दे.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • नातं इतकं सुदंर असावं

    भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
    कुठलंच कारण न लागावं.
    मनात आलं, हसू उमटलं,
    आणि दार आपोआप उघडावं.

    न सांगताही सगळं कळावं,
    नात्यात शब्दांची गरज नसावी.
    हक्क नको, अटी नको,
    फक्त आपुलकीची ओढ असावी.

    ना अपेक्षांचा ओझं असावं,
    ना गैरसमजांची भिंत.
    भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
    नातं इतकं साधं… सरळ… नितांत सुंदर असावं.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026


  • सुंदर विचारांची जोपासना हीच खरी ईश्वर सेवा

    देव शोधू नकोस दूर, आकाशात वा पाषाणात,
    तो तर उगवतो हळूच, तुझ्या प्रत्येक विचारात.
    जिथे हेतू शुद्ध असतो, निःस्वार्थी प्रत्येक श्वास,
    तिथेच घडते उपासना, तिथेच ईश्वराचा वास.

    सुंदर विचार म्हणजे मौनातील प्रार्थना,
    न बोलता केलेली, पण काळजात कोरलेली भावना.
    स्वतःला हरवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी उभा राहतोस,
    तेव्हाच देव तुझ्या रूपात जगाला भेटतो.

    अहंकार वितळतो जेव्हा सत्याच्या प्रकाशात,
    तेव्हा अंतरात्मा न्हाऊन निघतो निर्मळ विश्वासात.
    ना घंटानाद, ना मंत्र, ना धूप-दीपांची साथ,
    एक शुद्ध विचार पुरे, देव ठेवतो हातात हात.

    जोपासना म्हणजे लढा, स्वतःतील अंधाराशी,
    प्रकाश जन्माला घालणं प्रत्येक चांगल्या इच्छेशी.
    जिथे विचार पवित्र, तिथे जीवन पावन सेवा,
    कारण सुंदर विचारांची जोपासना, हीच खरी ईश्वर सेवा.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026


  • नमन त्या प्रत्येक स्त्रीला

    ती फक्त नावाने नाही “स्त्री”,
    ती शक्ती आहे, ती माया आहे.
    घराच्या प्रत्येक कोपऱ्यात
    तिच्या प्रेमाची छाया आहे.

    कधी आई बनून जपते जगाला,
    कधी बहीण होऊन आधार देते.
    कधी मुलगी बनून घर उजळते,
    कधी पत्नी बनून संसार नेते.

    तिच्या डोळ्यात असते स्वप्नांची दुनिया,
    तिच्या मनात असते अपार धैर्य.
    अडचणींना हसत सामोरी जाऊन
    ती घडवते आयुष्याचे सुंदर भविष्य.

    तिला नको दया, नको सहानुभूती,
    तिला हवी फक्त समान ओळख.
    कारण तिच्या पावलांमुळेच
    जगाला मिळते नवी दिशा आणि शक्तीची झलक.

    नमन त्या प्रत्येक स्त्रीला…
    जी आयुष्याला सुंदर अर्थ देते...

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • तुझ्यातल्या तुला जप

    तुझ्यातल्या तुला जप,
    लोकांच्या मनाला नाही.
    माझा देह सगळ्यांना दिसतो,
    पण माझं असणं मात्र, अजूनही अदृश्यच आहे.

    मी देहात राहते म्हणून मोजली जाते,
    आत्मा आहे म्हणून विसरली जाते.
    माझ्या श्वासालाही चौकटी आहेत,
    माझ्या इच्छांना नावं दिली जातात.

    माझ्या गर्भात जन्म घेतो काळ,
    पण निर्णय माझे नसतात.
    मी सृष्टीला आकार देते,
    तरी मला ‘पूरक’ म्हणूनच ओळखतात.

    मी प्रश्न विचारते तेव्हा बंडखोर,
    मी गप्प राहते तेव्हा सहनशील.
    माझं अस्तित्व नेमकं कुठे आहे,
    या दोन टोकांच्या मधे मी झिजते रोज.

    आज मी स्वतःलाच हळूच सांगते,
    तुझ्यातल्या तुला जप.
    देह संपेल, नावं बदलतील,
    पण तुझं असणं… तेच तुझं अंतिम सत्य आहे.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026


  • वारसा

    “साहेबांचा उत्तराधिकारी कोण?”
    हा प्रश्न मोठ्याने विचारला गेला,
    पण त्यामागे दडलेली भीती
    कुणालाच ऐकू आली नाही.

    दादा होते म्हणून
    भिंती भक्कम वाटायच्या,
    त्यांच्या शांत उपस्थितीत
    वादळही सौम्य भासायचं.

    कधी वाटलंच नव्हतं,
    की दादांचा उत्तराधिकारी
    शोधण्याची वेळ येईल,
    तो दिवस फार दूर आहे
    असं सगळ्यांनाच वाटलं.

    पण काळ थांबत नाही,
    तो कुणासाठी थांबत नाही,
    आणि एका न बोलल्या क्षणी
    सगळं हळूच बदलून जातं.

    साहेबांना पुढे पाहायचं होतं,
    मार्ग आखायचा होता,
    पण नियतीनं त्यांच्या हातात
    दादांचा वारसा दिला.

    दादांचा उत्तराधिकारी
    साहेबांना व्हावं लागणं
    हा विजयाचा क्षण नव्हता,
    तो एक असा क्षण होता
    जिथे डोळे ओलावतात
    आणि शब्द गळून पडतात.

    काही नाती घोषणा मागत नाहीत,
    ती जबाबदारी बनून येतात,
    आणि काही वारसे
    साजरे करण्यासाठी नसतात,
    ते शांतपणे पेलण्यासाठी असतात.

    आजही प्रश्न तसाच आहे,
    पण आवाज मंद झाला आहे,
    “उत्तराधिकारी कोण?”
    याऐवजी आता
    “हा वारसा सांभाळता येईल ना?”
    असा तो हळूच विचारतो.

    •ॲड.कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026