नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि !
April 10, 2018
१ ऑक्टोबर २००२ रोजी ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मला मिळाला. अध्यक्षस्थानी ठाण्याचे महापौर रमेश वैती, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येतो. विख्यात व्हायोलिन वादक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एन्. राजम या संगीताच्या क्षेत्रातील माझ्याबरोबरच्या मानकरी होत्या.
हा पुरस्कार आणि पेढे घेऊन मी लगेचच माझे गुरु पं. विनायकराव काळे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. रागदारी संगीतातील महान व्हायोलिनवादक श्रीमती एन्. राजम यांच्याबरोबर मला हा पुरस्कार मिळाल्याचे ऐकून सर विशेष आनंदित झाले. 'कितीही पुरस्कार मिळाले आणि कार्यक्रमांची संख्या कितीही वाढली तरी येणारा प्रत्येक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग हे एक नवीन आव्हान असणार आहे हे कधीही विसरू नकोस.' सरांचा हा मोलाचा सल्ला कानात रेंगाळत असतानाच आणि उद्या गाण्याच्या क्लासला यायचे आहे हेही विसरू नकोस. हे त्यांचे पुढील शब्द कानावर पडले. संगीताच्या क्षेत्रात ऋषितुल्य काम करणारे काळे सरांसारखे गुरू मला लाभले हे माझे केवढे मोठे भाग्य! दुसऱ्या दिवशी माझ्या ठरलेल्या वेळी संध्याकाळी साडे सात वाजता सरांकडे गेलो. सर सकाळी सहापासून शिकवायला सुरवात करत. माझा क्लास हा त्या दिवशीचा शेवटचा क्लास असायचा. "कालच तुला पुरस्कार मिळाला आहे ना, मग आज तुझा आवडता राग घेऊ या." असे म्हणत सरांनी मालकंस राग गाऊन घेतला. आपल्या गुरुंसोबत गाणे ही आनंदाची पर्वणी असते. आपण अगदी निर्धास्तपणे काहीही वेगळे गाऊ शकतो. कारण त्यात काहीही चुकले तर गुरू आपले बोट धरून पुन्हा आपल्याला योग्य त्या ठिकाणी आणतात. त्यादिवशी सरांनीच स्वरबद्ध केलेल्या 'शतरंजकी चाल' आणि 'कारी कारी कारी कजरीया' या मालकंसमधील रचना गाताना फारच आनंद झाला. गाणे संपवून तानपुरा खाली ठेवताना मला कल्पनाही नव्हती की सरांबरोबरचे हे माझे शेवटचे गाणे असणार आहे. आणि माझा क्लास त्या दिवशीचाच नव्हे तर सरांचाही शेवटचा क्लास असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मंगलाताईंचा फोन आला की बापूंना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. सरांना अस्वस्थ वाटत होते. तेव्हाही मला म्हणाले,
“काल चांगला गायलास. फक्त आलापी करताना घाई करू नकोस. स्वरांचा आनंद घेत आलाप गावेत.”
“मला नाही जमत ते अजून. तुम्ही लवकर बरे व्हा आणि मला शिकवा, मी म्हणालो. पण ती वेळ कधीच येणार नव्हती. दुसऱ्याच दिवशी सकाळी ४ ऑक्टोबर २००२ रोजी काळे सर आम्हा सर्वांपासून खूप दूर निघून गेले. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. सरांचा सहवास मला चोवीस वर्षे लाभला. सरांकडून फक्त गाणेच नाही तर बरेच काही शिकलो. ईश्वराला आपण दयाळू म्हणतो, पण तो तितकाच निष्ठुरदेखील आहे. आपली आयुष्ये समृद्ध करण्यासाठी सरांसारखी ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व तो आपल्या संपर्कात आणतो म्हणून दयाळू. तर आपल्याला कोणतीही कल्पना न देता अचानक तो अशा व्यक्ती आपल्यापासून दूर घेऊन जातो म्हणून निष्ठुर. सरांच्या मृत्यूमुळे माझ्या आयुष्यात एक भयंकर पोकळी निर्माण झाली. आजही मंगळवार आणि शुक्रवारी साडेसात वाजले की तंबोऱ्याचा नाद, त्यावर सरांचा विलक्षण आवाज आणि एका रागाची सरांनीच स्वरबद्ध केलेली रचना कानामध्ये ऐकू येऊ लागते आणि डोळ्यात अश्रू तरळतात.
- अनिरुद्ध जोशी
July 24, 2022


गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती.
मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ?
आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ?
सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला म्हणाला, “चल, चमेली.”
ताबडतोब ती खुर्चीखालून बाहेर येऊन आळस झटकून मालकामागे धांवली होती.
कोंड्याचा ग्राहक दूर रहात होता.
वाटेत कोंड्याने संवयीप्रमाणे दोन गुत्त्यांमधे ताकदीसाठी दोन प्याले रिचवले.
चमेलीला आठवले रस्त्यात ती अगदी चक्रमपणे वागली.
बाहेर फिरायला आणल्याच्या आनंदात उड्या मारल्या, गाड्यांच्या मागे भुंकत धांवली आणि तिने रस्त्यावरच्या कुत्र्यांना पळवून लावले.
ती कोंड्याच्या नजरेआड झाली की तो ओरडे, “कुठे गेली बदमाष ! चल सरळ !”
कोंड्याचं काम झाल्यावर तो बहिणीच्या घरी गेला.
तिथेही प्याला, कांही खाल्ले आणि एका पुस्तकं बांधणाऱ्याकडे गेला.
तिथून खानावळीत व नंतर एका मित्राकडे गेला.
संध्याकाळपर्यंत कोंड्याने बरीच दारू ढोंसली होती व तो धड चालू शकत नव्हता.
तो तत्त्वज्ञान बरळत होता, “माणसाची सगळी मस्ती जीता असेपर्यंतच, मेला की फक्त राख.”
मधेच चमेलीला म्हणे, “चमेली, तू एक क्षुद्र प्राणी आहेस. माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
एवढ्यांत बँडचा आवाज येऊ लागला.
सैनिकांची संचलनाला निघालेली तुकडी त्यांच्याकडेच येत होती.
तो आवाज चमेलीला असह्य वाटला.
चमेलीचं धैर्य गळालं, ती गोल गोल फिरत भुंकू लागली.
तिला कळेना की तिचा मालक सैनिकांकडे आनंदाने कां पहात होता आणि त्याने सलाम कां ठोकला ?
ती जोरांत भुंकत पलिकडल्या फूटपाथवर पळाली.
ती भानावर आली, तेव्हां बँड गेला होता पण मालकही गायब होता.
ती डावीकडे, उजवीकडे, समोरच्या फूटपाथवर सगळीकडे मालकाला शोधून आली पण त्याला जणू जमिनीने गिळले असावे.
ती जमिनीचा वास घेऊ लागली पण तिथून बरेच लोक जाड बूट घालून गेल्यामुळे मालकाच्या पायांचा वास नाहीसा झाला होता.
तिथे रबराचाच वास येत होता.
तोपर्यंत रात्र झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे लागले.
घोडागाड्या, हातगाड्या, भराभर जात येत होत्या.
फूटपाथवर माणसांची वर्दळ वाढली होती.
अनोळखी माणसे उगाचच ये जा करून तिला अडथळा करत होती.
तिने माणसांची वर्गवारी मालक आणि ग्राहक अशी केली होती.
कोंड्याला तिला बोलायचा, मारायचाही अधिकार होता. ग्राहकांना नाही.
जाणारे, येणारे तिला पायांनीच ढकलू पहात होते आणि ती त्यांच्या पायाला चावू पहात होती.
माणसांची गर्दी कमी झाली.
चमेली फिरून आणि भुंकून थकली.
थंडी वाढली होती.
ती जवळच्याच घराच्या दाराशी गेली आणि मुटकुळे करून झोपली.
दिवसभरांत एकाकडे एक बिस्कीट तर खानावळीजवळ एक मांसाचा छोटा तुकडा एवढचं खाल्ल्यामुळे ती भुकेली होती.
ती माणूस असती तर म्हणाली असती, “एवढ्यावर कशी जगू, त्यापेक्षा जीव देते.”
थकव्यामुळे तिला डुलकी लागली तोंच दरवाजा उघडला.
दरवाजा तिला जरासा लागला आणि एक माणूस बाहेर आला.
ती कूं कूं करत त्याच्या पायांत घोटाळली आणि त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
त्याने खाली वांकून तिला विचारले, “अरे, भू भू, तूं कुठून आलीस ? लागलं कां तुला ? माफ कर. अशी रागावू नकोस, ये.”
चमेलीने त्याच्याकडे पाहिलं.
तो गुबगुबीत इसम बाहेर चालला होता.
त्याने टोपी घातली होती.
चमेलीला त्याची भाषा कळली नाही पण आवाज आश्वस्त करणारा वाटला.
ती त्याचा हात चाटू लागली व करूणपणे कूं, कूं करू लागली.
तो म्हणाला, “मजेशीर आहेस तू ! कोल्हा वाटतेस अगदी ! कधी तरी उपयोगी येशील.”
त्याने तिला खूण केली. “चल माझ्या बरोबर !”
तें चमेलीने ओळखलं.
चमेली त्याच्यामागून गेली.
पंधरा वीस मिनिटांनी ती एका मोठ्या खोलीत होती.
तो डायनिंग टेबलाशी बसला होता आणि ती मान एका बाजूला कलती करून त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती.
तो जेवताना अधून मधून तिच्याकडे चपाती, चीज,मांसाचे तुकडे, कोंबडीची हाडकं असं कांही टाकत होता.
जे पडेल ते ती पटापट खात होती.
जशी खायची तशी तिची भूक वाढायची.
तिचं तें भराभरा खाणं पाहून तो म्हणाला, “तुझा मालक बहुदा तुला खायला पुरेसं देत नसावा !
किती हडकुळी झालीयस तू ?”
चमेली खाण्यात मग्न होती.
खाऊन ती समाधानाने बसली व शेपूट हलवू लागली.
मालक आरामखुर्चीत बसला असतांना चमेली विचार करत होती की सुताराकडे ती बरी होती की इथे बरी आहे ?
ह्याच्या खोलीत फारच थोडे सामान होते.
कोंड्या सुताराकडची खोली वस्तूंनी भरलेली होती.
शिवाय व्हार्निशचा सुंदर वास यायचा.
तिथे बसायला किती जागा होत्या.
पण ह्या माणसाकडे खायला खूप असावं.
तो बाजूलाच सिगार ओढत बसला असताना एकदाही तिच्यावर डाफरला नाही.
कोंड्या सुताराने एवढ्या वेळात दहादा शिव्या देऊएकदा तिचा उध्दार केला असता आणि एखादी लाथही पेकाटात घातली असती.
मग तो परका इसम बाहेर जाऊन एक दरी घेऊन परतला.
ती त्याने कपाटाच्या बाजूच्या कोंपऱ्यांत अंथरली आणि म्हणाला, “ये, इकडे. ह्याच्यावर झोंप.”
चमेली जाऊन मऊ दरीवर झोंपली.
तो दिवा घालवून खोलीतून गेला.
चमेलीला झोपेत मधेच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू आले.
ती प्रतिसाद देणार होती पण एकदम आपल्यावर आलेला प्रसंग आठवून दुःखी झाली.
तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागले.
कोंड्याचा नाठाळ मुलगा बबन्या तिला आठवला.
ती अशी बसली की बबन्या तिच्याशी खेळायला येई.
त्याचे खेळ तिचे डोळे पांढरे करत.
मालक बाजूला आराम करत असे.
बबन्या तिचे मागचे पाय धरून तिला बांकाखालून ओढून बाहेर काढी.
मग तिला धरून फक्त मागच्या दोन पायावर चालायला लावी.
तिला उचलून घंटा हलवावी तशी हलवे.
तिला सिगारच्या तंबाखूचा वास घ्यायला लावी.
चमेली ह्या विचारांतून लौकर बाहेर आली आणि पेंगू लागली.
स्वप्नात तिने कितीतरी कुत्रीं पाहिली. माणसे पाहिली.
ती आणि बबन त्या माणसांच्या मागे धावत होती.
मग अचानक बबनही कुत्रा झाला व त्या माणसांवर भुंकू लागला.
दोघानी एकमेकांच्या नाकाचा वास घेतला मग दोघं मजेत धांवत सुटले.
सकाळी चमेली जागी झाली तेव्हां खोलीत एकटीच होती.
तिने खोलीच्या सर्व कोपऱ्यांचा वास घेतला.
लक्ष घालण्यासारखं काहीच तिला मिळालं नाही.
तेव्हा खोलीच्या दुसऱ्या दरवाज्यावर तिने खुडबुड केली आणि जरा छातीने ढकलला तर तो उघडला.
आंत तोच इसम झोपेत घोरत होता.
एक दोनदा भुंकून तिने त्याला जागं करायचा प्रयत्न केला मग तो नाद सोडून दिला.
खुडबुड करून तिने त्याही खोलीचा दुसरा दरवाजा उघडला.
आत जाताच तिला वेगळाच वास जाणवला आणि सावध होऊन ती थबकली.
खोलीच्या भिंतीना ठिपके ठिपकेवाला कागद डकवला होता.
चमेली आत शिरताच एक राखी रंगाचा हंस पंख पसरून आवाज करत तिच्या अंगावर आला.
त्याच्या जवळच एक केसाळ मांजर होते.
चमेलीला पहातांच त्याने अंगावरचे केस फुलवले, डोळे वटारले आणि पाठ फुगवून तें ही “फीस्स्” आवाज करू लागले.
चमेली जरा घाबरलीच पण ते बाहेर न दाखवतां भुंकत ती मांजराच्या दिशेने पुढे जाऊ लागली.
मांजराने आपली पाठ आणखीच धनुष्यासारखी वांकवली व फिस्कारत आपला पंजा चमेलीच्या डोक्यावर हलकेच मारला.
चमेलीने मागे उडी घेतली व मध्येच बसून ती कर्कश भुंकू लागली.
तोपर्यंत मागून येऊन हंसाने आपल्या चोचीचा प्रसाद चमेलीला पाठीवर दिला.
चमेलीने हंसावर उडी मारायचा प्रयत्न केला.
तो इसम आत येऊन ओरडला,“काय चाललंय ? ह्या गडबडीचा अर्थ काय ? चला, आपापल्या जागेवर जा.”
मांजराकडे जाऊन थोपटत तो म्हणाला, “काय मन्या ! तुला लढाई करायचीय ? चल गप्प बस बघू.”
मग हंसाकडे वळत म्हणाला, “हंसराज, तुझ्या घरात जागेवर जा बघू.”
मांजर आपल्या दरीवर आडवे झाले व त्याने डोळे मिटून घेतले.
त्याच्या चेहऱ्यावरून त्याला उगीच चिडल्याचा पश्चात्ताप होत होता.
चमेली गुरगुरत होती तर हंसराज भराभर आवाज करून मालकाला बरंच कांही आपल्या भाषेत सांगत होता.
मालक म्हणाला, “ठीक आहे, ठीक आहे पण तुम्ही मित्र बनून शांततेने राहिलं पाहिजे.”
मग चमेलीला जवळ घेत तो म्हणाला, “आणि तू घाबरू नको. ते चांगले दोस्त आहेत. ते तुला त्रास नाही देणार.
अरे, तुला कांही तरी नाव द्यायला हवं. हं ! तुला आपण आंटी म्हणूया. ठीक आहे, आंटी !”
मग पुन्हा पुन्हा आंटी म्हणत तो बाहेर गेला.
चमेली बसली आणि पाहू लागली.
मन्या दरीवर डोळे मिटून झोपल्याच सोंग करत होता.
हंसराज पाय आपटत मान उंच करून भराभर कांहीतरी बोलतच होता.
तो हुशार असावा.
एक लांबलचक भाषण करून एक पाऊल मागे जाऊन आपल्याच भाषणावर खूष झाल्याचं दाखवायचा.
त्याच्या बोलण्याला गुर्रर्र ची साथ देत चमेली बसली होती.
मग ती उठली आणि तिने सर्व कोपरे हुंगले.
एका कोपऱ्यात एका वाडग्यांत पावाचे तुकडे आणि वाटाणे पडलेले होते.
चमेलीने दोन तुकडे खाल्ले.
आपलं खाणं चमेली खाते आहे म्हणून हंसराजला बिलकुल राग नाही आला.
तो अधिक उत्साहाने बोलू लागला व त्यानेही येऊन कांही वाटाणे खाल्ले.
कांही वेळानंतर तो इसम परत आला.
त्याने बरोबर कांहीतरी विचित्र वस्तु आणली होती.
ती दोनच्या आकड्यासारखी होती.
मधोमध दोरी बांधलेली घंटा होती.
तिथे एक पिस्तुलही होते.
त्याने ती वस्तु खोलीच्या मधोमध ठेवली.
मग त्याने हंसराजला बोलावले.
हंसराज पुढील आज्ञेची वाट पाहू लागला.
तो इसम म्हणाला, “हंसराज, प्रथम सर्वांना वांकून नमस्कार कर. व्यवस्थित.”
हंसराजने मान प्रथम उंच करून चारी बाजूना फिरवली मग पाय दुमडत मान झुकवली.”
तो इसम म्हणाला, “खूप छान ! आता मरून जा.”
लागलीच हंस पाठीवर उताणा झोपला व पाय वर करून पडला.
अशाच आणखी कांही गोष्टी करून दाखवल्यावर तो इसम ओरडला, “आग, आग, बचाव.”
हंसराज त्या वस्तूकडे गेला व दोरी धरून जोरजोरात घंटा हलवू लागला.
तो इसम खूष झाला.
त्याने हंसराजच्या मानेवरून मायेने हात फिरवला.
“शाब्बास, हंसराज. आता तू हिरे, सोन्याचे दागिने विकणारा व्यापारी आहेस.
तुझ्या दुकानात चोर घुसतात.
मग तू काय करशील ?”
हंसराजने जाऊन पिस्तुलाशी जोडलेला दोर ओढला.
मोठ्ठा आवाज झाला.
चमेलीला ह्या दोन्ही गोष्टी पाहून एवढा आनंद झाला की त्या चौकटीभोवती भुंकत ती गोल गोल फिरली.
तो इसम म्हणाला, “आंटी, बस. गडबड नको करूस.”
हंसराजचं काम अजून बाकी होतं.
आणखी एक तास त्या इसमाने त्याला गोल फिरायला लावलं.
वाटेत असलेल्या रींगमधून उड्या मारायच्या, मधेच बसायचे, वगैरे त्याला करायला लावत होता.
चमेलीला ते फार आवडलं.
एक-दोनदा तीही त्याच्या मागे फेरी मारून आली.
त्याने मोलकरणीला हाक मारून म्हटले ‘मारीयाला आण’.
थोड्याच वेळात एक वेगळाच आवाज खोलीत आला.
चमेली घाबरली नव्हती पण सुरक्षेसाठी त्या इसमाजवळ जाऊन बसली.
मोलकरणीने एक काळी डुक्करीण खोलीत आणली.
चमेलीच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आत येताच डुक्करीणीने बसून आपले दोन्ही पुढचे पाय उचलले व आनंद दाखवत हवेत हलवले.
ती मालकाला, हंसराजला व मन्याला पाहून खूष झाली होती.
ती हंसाच्या व मांजराच्या जवळ जाऊन आनंद दाखवून आली.
तिच्या हालचाली आणि आनंद पाहून चमेलीला वाटले हिच्यावर भुंकणं व्यर्थ आहे.
मालकाने ती चौकट बाजूला ठेवली व मन्याला हांक मारली, “मन्या, चला, आता पिरॅमिड करूया.
मन्या आळस झटकत अगदी नाईलाजाने पुढे आला आणि डुक्करीणीजवळ गेला.
मग मालकाने बराच वेळ तिघांना कांही समजावले व तो म्हणाला, “एक, दोन.. तीन.”
त्या बरोबर हंसराज उडी मारून डुक्कराच्या पाठीवर उभा राहिला.
मग अगदी कांही विशेष न केल्यासारखं दाखवत मन्या आधी उडी मारून डुक्करीणीच्या पाठीवर आणि मग हंसराजच्या पाठीवर जाऊन मागच्या दोन पायांवर उभा राहिला.
चमेली खूषीने भुंकू लागली.
मग अशाच कांही गोष्टी तो मालक त्या तिघांना शिकवत राहिला.
त्या दिवशीचा अभ्यास संपला.
चमेलीला वेळ कसा गेला तेंच कळलं नाही.
मोलकरीण येऊन डुक्करीणीला घेऊन गेली.
मन्या कांही झालंच नाही असं भासवत आपल्या दरीवर जाऊन झोपला.
रात्रीसाठी चमेलीची दरी पण त्याच खोलीत आणली गेली.
भरपूर खाऊन चमेली तिथेंच हंस आणि मन्या यांच्याबरोबर झोंपली.
असा एक महिना गेला.
चमेलीला भरपूर खायची संवय झाली होती.
तिने नवे आंटी हे नावही स्वीकारले होते.
तिला त्या मालकाची आणि नव्या सोबत्यांचीही संवय झाली होती.
दिवस आरामात चालले होते.
रोज सर्वात आधी हंसराज उठे व त्याचं अखंड बोलणं सुरू होई.
मग चमेली जागी होई.
चमेली त्याची वटवट ऐके.
लौकरच तिच्या लक्षांत आलं की तो उगीचच बडबडतो.
तशी ती त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करू लागली.
मन्या सर्वांत शेवटी जागा होई व तरीही डोळे मिटून पडून राही.
त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन “हे जग तुच्छ आहे” असा होता.
चमेली उठल्यावर सर्वत्र फिरून वास घेई.
तिला आणि मन्याला घरभर फिरायची परवानगी होती.
हंसराजला मात्र त्याच खोलीत रहावं लागे.
डुक्करीणीच घरं कुठे तरी बाहेर बागेत होतं.
मोलकरीण तिला फक्त सरावाच्या वेळी घेऊन येई. मालक उशीरा उठे.
उठल्यावर चहा घेऊन तो त्यांना नव्या गोष्टी शिकवत असे व सराव करून घेत असे.
रोज तीच तालीम.
तीन चार तासांनी मन्या थकून दारूड्यासारखा चाले तर हंसराज चोंच उघडून श्वास घेऊ लागे.
मालक सारखा कपाळावरचा घाम पुसे.
ती तालीम आणि जेवण चमेलीला आवडत होतं पण तिची संध्याकाळ खराब जाई.
रोज मालक संध्याकाळी हंसराज आणि मन्या दोघांना घेऊन बाहेर जाई.
चमेली तेव्हा कंटाळून नुसती पडून राही.
तिला व्हार्निशचा वास आठवे.
कांही माणसं आठवत.
तिची शेपटी हलू लागे.
मग परत ती निपचीत पडून राही.
तिची वाढ आता पूर्ण झाली होती आणि प्रकृतीही चांगली झाली होती.
एक दिवस मालक म्हणाला, “आंटी, आता तू पण कांही तरी काम करायला पाहिजे. तुला कलाकार व्हायचंय ना !”
त्याने तिला वेगवेगळ्या कसरती शिकवल्या.
मागच्या दोन पायांवर उभं रहाण्याचा पहिला धडा ती पटकन शिकली.
दुसऱ्या धड्यात मागच्या दोन पायांवर उभं राहून उंच उडी मारून मालकाच्या हातातले बिस्कीट खाऊ लागली.
मग ती नाच करायला शिकली, दोरीबरोबर गोल फिरू लागली, घंटा वाजवू लागली, पिस्तूलाचा बार काढू लागली आणि पिरॅमीडमधे मन्याची जागा घेऊ लागली.
ती भराभर शिकायची.
प्रत्येक गोष्ट केल्यानंतर भुंकून आनंद व्यक्त करायची.
तिचा मालक खूश होता.
तो म्हणे हिच्यात उपजत कला आहे.
खरी कलाकार आहे.
तिला 'कला' शब्द इतका आवडे की कला म्हटल्याबरोबर ती उडी मारत असे, जणू कांही ते तिचं नांव होतं.
एकदा चमेली अथवा आंटीला कुत्र्यांना पडावं असं स्वप्न पडलं.
ती धांवत होती व एक हमाल झाडू घेऊन तिचा पाठलाग करत होता.
ती दचकून उठली.
आजूबाजूला अंधार होता.
खोली कोंदट होती.
तिला काळोखाची भीती वाटत नसे पण आता ती भ्यायली व तिला भुंकावेसे वाटू लागले.
तिच्या मालकाने दुस-या खोलींत उसासा सोडलेला तिने ऐकला.
आदल्या दिवशी मन्याच्या वाटणीचा कबाब तिने मधेच पळवला होता व कपाटाआड दडवला होता.
त्याची तिला आठवण झाली पण रात्री अंधारात फिरायची मनाई होती.
मग झोपण्यासाठी तिने पुन्हा डोळे मिटले आणि अचानक हंसराजने किंचाळल्यासारखा विचित्र आवाज केला.
काय झालं तें न कळल्यामुळे तिने नुसतीच गुरगुर केली.
तिने परत जरा डुलकी घेतली.
स्वप्नांत दोन मोठे कुत्रे कांही तरी खात होते व तिच्यावर गुरगुरत होते.
एका शेतकऱ्याने त्यांना हांकलले मग ती तें खाऊ लागली.
एवढ्यात हंसराज पुन्हा जोरात किंचाळला.
आंटीला हंसराज ओरडतोय, हे लक्षांत आले नाही.
खोलींत कुणीतरी आलंय अशी तिची खात्री झाली.
ती भुंकू लागली.
बाहेर डुक्करीणही आवाज करत होती.
तिचा मालक हातात दिवटी घेऊन आला.
आंटीला खोलीत कुणी परका दिसला नाही.
हंसराज झोपला नव्हता.
त्याचे पंख पसरले होते व चोंच
उघडी होती.
तो खूप थकलेला दिसत होता.
मन्याही जागाच होता.
मालकाने विचारले, "हंसराज काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत म्हणून ओरडतोयस?"
हंसराज गप्पच होता.
मालकाने थोडा वेळ त्याच्या मानेवरून हात फिरवला मग तो परत गेला.
पुन्हा काळोख झाला.
आंटी पुन्हा घाबरली.
कुणीतरी बाहेरचे खोलीत आहे असे तिला सारखे वाटत होते.
बाहेर डुक्करीणीची खुडबुड चालूच होती.
मन्याही अस्वस्थ होता.
सर्व गोष्टी चिंताजनक होत्या. पण कां?
मग कधी नव्हे तो मन्या जवळ येऊन तिचे पाय चाटू लागला.
तिनेही त्याला चाटले.
हंसराज पुन्हा किंचाळला.
मालक आत येत म्हणाला, “हंसराज,” हंसराज पंख पसरून गप्प पडून होता.
मालक त्याच्या बाजूला बसून हात फिरवत म्हणाला, “हंसराज, तूं मरत आहेस कां ? अरे देवा ! मी विसरलोच.
आज घोड्याने तुझ्यावर पाय दिला होता !”
आंटीला त्याचं बोलणं कळलं नाही पण मालकालाही कांही भयानक घडणार आहे, असे वाटतेंय, हे तिला समजले.
ती मालकाकडे पाहून भूंकू लागली.
मालक म्हणाला, “आंटी, हंसराज मृत्यूला सामोरा जातोय.
मृत्यू ह्या खोलींत आलाय ! आपण काय करणार ?”
मालक उदास होऊन बाहेर गेला.
घाबरलेली आंटी त्याच्याबरोबर बाहेर आली.
थोड्याच वेळांत मन्याही तिथे आला.
मालक सारखा, “काय करणार ?” म्हणत होता.
मग त्याने एका थाळ्यात पाणी भरलं आणि हंसराजपुढे ठेवलं, “पी, हंसराज !”
पण हंसराज पाणीही पिऊ शकत नव्हता.
मालकाने त्याची मान वाकवून चोच थाळ्याला टेकवली.
ती चोच तशीच तिथे राहिली.
हंसाने पंख जास्तच पसरले.
मालक म्हणाला, “कांहीच उपयोग नाही. हंसराज आपल्याला सोडून गेला.
माझ्या प्रिय मित्रा, किती बेत केले होते मी !
ह्या वसंत ऋतुंत तुला गांवी नेणार होतो गवतावर चालतांना तुझा रूबाब मला पहायचा होता. कां गेलास लवकर ?
आता तुझ्याशिवाय मी काय करू ?”
सकाळी येऊन माळी हंसराजला उचलून घेऊन गेला.
आंटी खोलीतून बाहेर आली.
कपाटाआड दडवलेला कबाबचा तुकडा तिथेच होता पण आंटीला तो खावासा वाटला नाही.
ती सोफ्याखाली जाऊन बसली.
एका संध्याकाळी मालक कांही ठरवून आत आला.
तो म्हणाला, “आंटी आज तू आमच्या बरोबर चल. आता पिरॅमिडमधे हंसराजची जागा तुला घ्यायचीय.”
मग तो स्वत:शीच बडबडू लागला.
“आज आपलं हसं होणार. आपण कांही तयारी केली नाही.
आपण तालमी पण नाही घेतल्या. छे !”
तो बाहेर जाण्याचा वेश करून आला होता.
त्याने मन्याला उचलून घेतले व तो म्हणाला, “आंटी चल.”
आंटी उठली आणि त्यांच्यामागून जाऊ लागली.
ते गाडीतून एका नव्याच जागी येऊन पोहोचले.
गाडीतून उतरल्यावर समोर मोठी खोलगट बशी उलटी करून ठेवली तर दिसेल अशा आकाराचं कापडाचं घर दिसत होतं.
त्यावर सर्व ठिकाणी दिवे होते.
प्रवेशद्वारावर खूपच रंगीत दिवे होते आणि माणसांची गर्दीही होती.
बरेच घोडेही दिसत होते.
पण आंटीला कुत्रे दिसत नव्हते.
आंटीला आणि मन्याला उचलून घेऊन मालक एका काळोख्या रस्त्याने आंत एका खोलीत गेला.
आंटीला जातांना एक खूपच मोठी खोली दिसली.
त्यांत माणसांची भीतीदायक गर्दी दिसत होती.
आंटी थोडी घाबरली.
मन्या जणू कांही बेफिकीर असल्यासारखा चेहरा करून होता.
त्या खोलीच्या पडद्यातूनही माणसांची गर्दी थोडी थोडी जाणवत होती.
खोलीत आल्यावर मालकाने दोघांना खाली उतरायला सांगितले.
त्याच्या हातांतून त्यांनी खाली उडी मारली.
त्या खोलीत एक टेबल होतं आणि एक स्टूल होतं.
मन्या जाऊन स्टूलाखाली बसला.
मालकाने आपला वेश बदलायला सुरूवात केली.
प्रथम डोक्यावर एक रंगीबेरंगी उंच टोपी घातली.
तोंडाला पांढरं कांही तरी फासलं.
मग जाड मिशा लावल्या.
भुवयांवर जाड भुंवया लावल्या.
मग फुलं फुलं असलेल्या कापडाची विचित्र पँट घातली.
ती बूटांवरून खाली येत होती.
आंटीने अशी पँट कधीच पाहिली नव्हती.
मग विचित्र रंगाचे साॅक्स घातले.
वर जाकीट घातलं.
त्यावर पाठी एक तारा होता.
तर पुढचा भाग रंगीत होता.
आंटीला विचित्र वाटत होते पण स्थितप्रज्ञ मन्याकडे पाहून तिला धीर वाटत होता.
आंत येऊन एक मुलगी मालकाला म्हणाली, “आतांचा एक खेळ झाला की तुमची वेळ. तयार रहा.”
त्यांचा मालक अस्वस्थ होता.
आज गोंधळ होणार अशी त्याला भीती वाटत होती.
ती मुलगी परत येऊन म्हणाली, “चला, तुमची वेळ झाली.”
मालक उठला, “आंटी, चल.”
असं म्हणतं त्याने मन्याला एका पेटीत घातले व ती पेटी हातांत घेतली.
आंटीला काय चाललंय ते कळत नव्हतं.
मालकाने तिलाही उचलली आणि पेटीत टाकली.
मन्या तिच्या पायांखालून सुटायसाठी प्रयत्न करू लागला.
ती पेटीच्या बाजूवर नखांनी कुरतडू लागली.
अंधारात तिला आवाज येऊ लागले.
मग मालकाचा मोठा आवाज आला, “नमस्कार, आम्ही आज परत आलो आहोत.”
लोकांचा आरडाओरड ऐकू आला.
मालक गर्दीच्यावर मोठा आवाज काढत म्हणाला, “ऐका.”
लोक शांत झाले.
“माझी काकी स्वर्गात गेली. जातांना ही पेटी मला देऊन गेली. पाहूया आपण पेटीत काय आहे ? बहुतेक खूप नोटा असतील. मलाही माहित नाही. उघडू ?”
त्याने पेटीच कुलुप काढून झाकण काढताच आंटीने व मन्याने खाली उडी मारली.
लोकांनी मोठा ओरडा केला.
आंटी घाबरली. ती भूंकत मालकाभोवती फिरू लागली.
मालक म्हणाला, “अरे हा तर मन्याकाका आणि ही आंटी. माझे नातलग.”
असं म्हणत मालक जमीनीवर उपडा पडला व मन्याला आणि तिला त्याने जवळ घेतले.
थोड्याच वेळांत आंटी त्याच्या हातून निसटून उभी राहिली.
त्याने जवळ घेतले म्हणून झालेला आनंद गिरक्या घेऊन दाखवू लागली.
तिला सभोंवताली चेहरे, चेहरे आणि चेहरेच दिसत होते.
बाक असे वर वर गेले होते आणि वरपर्यंत माणसे भरली होती.
“आंटी, आपण बसाल कां ?” आंटीला कळलं काय करायचं ते.
ती टूणकन उडी मारून एका खुर्चीवर बसली.
लोकांनी टाळ्या वाजवल्या, गिल्ला केला.
मालकाच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच माया होती पण तो हंसत होता, हातवारे करत होता.
आंटीला कळले की मालक खूष आहे.
तीही प्रेमाने मोठ्याने भुंकली.
मग मालक म्हणाला, “आंटी मी आणि मन्याकाका नाच करतो, तोपर्यंत तू बसून रहा.”
मग त्या दोघांचा बँडच्या तालावर नाच सुरू झाला.
मन्या त्यात मजा वाटत नसल्यासारखा पण शिकवल्याबरहुकुम नाचत होता.
त्यांच्या नाचाला लोकांनी खूप दाद दिली.
मग मालक आंटीला म्हणाला, “आंटी, आतां तू !”
त्याने एक बाजा खिशातून काढला व तोंडाला लावून तो वाजवू लागला.
आंटीला वाद्यवादन आवडत नसे.
ती चुळबुळ करू लागली. भुंकू लागली.
चारी बाजूनी त्याला लोकांनी दाद दिली.
त्याने एक वरचा सूर लावला आणि अचानक प्रेक्षकांमधून एक मुलगा मोठ्याने ओरडला, “आंटी ? ही आंटी नाही. ही तर चमेली ! चमेली !”
लगोलग बेवड्या कोंड्या सुताराचा आवाज आला, “ही आपली चमेलीच आहे. बबन्या ! ही चमेलीच ! चमेली !”
एकाने शिट्टी वाजवली. व दोघांनी परत हांक मारली, “चमेली, इकडे.. इकडे ये !”
आंटीने आवाजांच्या दिशेने पाहिलं.
उभे राहिलेल्या दोघांचे चेहरे तिला उजेडात दिसले.
एक कुरळ्या केसांच्या झिपऱ्यावाला बेवडा चेहरा तर दुसरा गुबगुबीत गालांचा गोल चेहरा.
तिला ओळख पटली.
ती धडपडत उठली, खूर्चीवरून खाली पडली, वाळूत कसंबसं तिने सांवरलं आणि पडत धडपडत त्या दोघांच्या दिशेने धांवू लागली.
लोकांनी मोठा आवाज केला.
पुन्हा बबन्याची हांक आली, “चमेली, चमेली.”
चमेलीने सर्कशीतल्या गोल कठडा ओलांडला लोकांच्या गर्दीत उडी घेतली.
सर्वांचे हात तिला पुढे पुढे जायला मदत करत होते.
ती ते हात चाटत होती.
चेहरे चाटत होती आणि वरच्या बाकांच्या, त्या आवाजांच्या, दिशेने जात होती.
शेवटी गॅलरीत बबन्याच्या हातांत ती विसावली.
अर्ध्या तासानंतर चमेली व्हार्निश आणि शिरस ह्यांचा वास येणाऱ्या माणसाच्या मागून चालत होती.
गटारापासून लांब कसं रहायचं, हे तिला ठाऊक होतं.
कोंड्या म्हणत होता. “किती पापी मी ! आणि चमेली तुलाही जरा अक्कल कमीच आहे.
माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
बाजूने बापाची टोपी घालून बबन्या चालत होता.
चमेलीला मागून चालतांना घामट कपड्यांतल्या त्यांच्या पाठी दिसत होत्या.
ती त्यांच्यामागून अशी अनंत काळ चालत आली होती व तिला वाटत होतं तिच्या आयुष्यांत त्यांत एका मिनिटाचाही कधी खंड पडला नव्हता.
तिला ती कळकट खोली, तो हंसराज, मन्या, ते चविष्ट जेवण, ती तालीम, ती सर्कस, हे सर्व आठवलं.
पण तिला अनेकदा पडणाऱ्या स्वप्नातलं तें एक घाणेरडं भयानक स्वप्न ह्या सदरांत तिने टाकून दिलं.
-- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - काष्टंका
मूळ लेखक - अँटन चेकॉव्ह
July 29, 2022
नमस्कार मित्रांनो, आजची कथा थोडी मोठी आहे, पण सत्य आहे आणि माझ्याच बाबतीत घडलेली आहे. कथा हरवलेल्या वॉलेटची!
July 4, 2022
“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!
February 9, 2022
सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड होत असताना तिच्या पृष्ठभागावर कवच निर्माण झाले. जणू दुधावरची साय. तिचा पृष्ठभाग थंड झाला, घन बनला. कवच्याच्या खोलगट भागात पाणी साचले. तिथे महासागर निर्माण झाले. उरलेला भाग म्हणजे भूखंड. थोडक्यात कवचावर जमीन आणि पाणी अशी वाटणी झाली. जमीन असलेले शिलावरण आणि पाणी असलेले जलावरण! शिलावरणाचे नाव होते पांगेआ (Pangea). तर आजही पृथ्वीचा अंतर्भाग शिलारसाने भरलेला आहे.
आणि एके दिवशी भूगर्भातील अनाकलनीय घटनेमुळे ह्या भूकवचाचे दोन तुकडे झाले. परत ह्या तुकड्याचे आणखी सहा मोठे व बारा-तेरा लहान तुकडे झाले. हे तुकडे हालचाल करू लागले. एकमेकांपासून दूर सरकू लागले. त्यामुळे आताचे ऑस्ट्रेलिया व भारत हे देश आफ्रिकेपासून सुटून दूर गेले. भारत ज्या भूकवचावर आहे त्या कवचाचे नाव गोंडवन. हा गोंडवन उत्तर दिशेला असलेल्या युरेशियन ह्या भूकवचाच्या तुकड्याकडे सरकू लागला.
सुमारे ९० कोटी वर्षांपूर्वी युरेशियन व गोंडवन ह्यांच्या सीमा ‘टेथिस' समुद्राने निश्चित केल्या होत्या. ह्या दोन्ही भूखंडावरून येणाऱ्या नद्या आपल्या बरोबर गाळ आणत होत्या व टेथिस समुद्रात आपल्या बरोबर आणलेला गाळ समर्पित करत होत्या. शेवटी एके दिवशी ह्या गाळाने हा समुद्र उथळ झाला.
गोंडवन उत्तरेकडे सरकतच होते आणि ५-६ कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसाच्या प्रचंड शक्तीने हे दोन्ही भूखंड दोलायमान झाले. भारत ज्या भूखंडावर आहे तो भूखंड उचलला गेला व युरेशियन भूखंडावर आदळला. बिचारा टेथिस समुद्र या भूखंडांच्या मधे चिरडला गेला. तळाच्या गाळासह टेथिस समुद्र दुमडला व त्याचा तळ उचलला गेला. त्याच्या तळाला असंख्य वळ्या पडल्या आणि हिमालयाचा जन्म झाला. ह्या वळ्या म्हणजेच हिमालयाच्या पर्वतरांगा! आजही हा तळ दुमडला जात आहे. त्यामुळे वर्षास ९ ते १५ सें.मी. वेगाने पूर्व दिशेला हिमालयाची वाटचाल सुरू आहे तर दरवर्षी १.५ ते ५ सें.मी.ने त्याची उंची वाढत आहे.
दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे उलटत होती. वातावरणात बदल होत होते. हिमालयाचे रूप बदलत होते. पर्वत शिखरे बर्फात हरवू लागली. उन्हाने बर्फ वितळून प्रवाह वाहू लागले. उंच कड्यावरून खोल दऱ्यात ते झेपावू लागले. वृक्ष-वल्लीत परिसर नटू लागला. हिरवाईत हरवू लागला तर निरनिराळ्या फुलात खुलू लागला. ह्या सौंदर्याचे वर्णन सर्वांना सांगण्यासाठी झरे, नद्या वाहू लागल्या. पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.
आणि एके दिवशी मानवाची पावले ह्या परिसरात पडली. निसर्गाचे हे वैभव पाहून तो थक्कच झाला. एका वेगळ्याच अनुभूतीने त्याला भारून टाकले. त्याची प्रतिभा खुलू लागली. विचारात प्रगल्भता आली. त्याने राहण्याची, विचार करण्याची, आचाराची, उच्चाराची एक धारा निश्चित केली व एका संस्कृतीचा उदय झाला. एका धर्माचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यात हिंदू धर्माचा उदय झाला. आपले प्रगल्भ विचार, कल्पना त्याने हिमालयाच्या कुशीत वेद, उपनिषदे, पुराणाच्या रूपात सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी तो हिमालयाला विसरला नाही. वेदात तर तो हिमालयाची केवळ स्तुती करून थांबला नाही तर त्याला देवत्व दिले आहे व हवी अर्पण करून त्याची आराधना केली आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात म्हटले आहे की, ज्याचा महिमा विशाल हिमवान म्हणून गायला जातो त्याचे महानत्व समुद्र व धरती गात आहे. अनंत दिशा ज्यांचे विशाल बाहू आहेत, असा हा हिमालय आहे.
काही ऋचांवरून किंवा संदर्भातून एक निष्कर्ष निघतो की हिमालय हे अनेक औषधी वनस्पतींचे आगर आहे. अथर्ववेदातील काही ऋचांचा अर्थ हिमालयात उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या आम्हाला औषधी वनस्पती देतात, असा निघतो. रामायणातील एका प्रसंगी लंकानिवासी वैद्यराज सुर्पणानेही 'संजीवनी १४/ हिमशिखरांच्या सहवासात औषधीचे स्थान' म्हणून हिमालयाचा उल्लेख केला आहे. वस्तुतः हिमालय ही अगणित औषधी वनस्पतींचा खजिना आहे.
वेदात, उपनिषदात तसेच वायुपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण इ. जवळ जवळ सर्वच पुराणात हिमालयाचा उल्लेख खूप ठिकाणी आढळतो. मार्कंडेय पुराणात हिमालयाचे वर्णन करताना, 'हा पर्वत पूर्व व पश्चिम समुद्रापर्यंत धनुष्याच्या खेचलेल्या दोरीसारखा दिसतो.' असे केले आहे. तर विष्णुपुराणात भारतीयांची ओळख करून देताना पुराणकारांना हिमालय आठवला आहे तो असा:
उत्तरे यत्समुद्रस्य हिमाद्रे श्चैव दक्षिणम् ।
वर्ष तद भारतं नाम भारती यत्र सततिं ।।
स्कंदपुराणाच्या केदारखंडात तर हिमालयातील नदी-नाले, सरोवरे, पर्वत-शिखरे व गुहांची तसेच अनेक स्थानांची पवित्रता सूचित करण्यासाठी विविध कथा कथन केल्या आहेत व शेवटी सांगितले आहे की ह्या भागाची यात्रा करणारा जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो. त्याचा परत जन्म होत नाही. उलट त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. पुराणात हिमालयाची व्याप्ती पाच खंडात झाल्याचे म्हटले आहे.
खण्डा: पंच हिमालयस्य कथिता नेपाल कुर्माचलौ ।
केदारोऽथ जलोधरोऽथ रुचिर: काश्मीर संज्ञोऽन्तिमः ।।
प्रथम खंड म्हणजे नेपाळ तर दुसरा खंड म्हणजे कुर्माचल (आताचा कुमाऊ). तिसरा खंड म्हणजे केदारखंड (आताचा गढवाल) चौथा खंड म्हणजे जालंधर-पंजाब (आताचा हिमाचल प्रदेश) तर पाचवा खंड म्हणजे काश्मीर.
-प्रकाश लेले
July 4, 2022
पुरुषांची गाड्यांबद्दलची craze, त्यांच्या भावविश्वात शिरून मांडायचा प्रयत्न केलाय.. झालाय का successful?
September 7, 2019
“मैत्री” म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.आपल्या life index मधला सगळ्यात वरचा कप्पा…
August 23, 2018
हे रेडिओ चे चित्र पाहिले आणि मन चार दशके मागे गेलं. शाळेची तयारी करून वडिलांच्या सायकल जवळ त्यांच्या निघण्याची वाट पाहत उभा असलेला मी आणि कानावर ऐकू येणाऱ्या या जाहिराती
September 3, 2022
December 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti