असाच एखादा क्षण येतो |
सर्वस्व सारं घेऊन जातो |
थोडसं काही ठेऊन जातो |
त्याचंच नाव स्मत़ी असतं || १ ||
अशीच एखादी झुळुक येते |
स्वत:मध्ये सामावून घेते |
मध्येच दूर सरसावते |
त्याच नाव मिलन असतं || २ ||
अशीच एखादी सर येते |
तालावर ती नाच करते |
श़ंगाराने भिजवून जाते |
त्यालाच नाव प्रिती असतं || ३ ||
असाच एखादा काळ येतो |
सारं काही नष्ट करतो |
क्षणींच भंगण बनवितो |
त्याला कोणतं नांव असतं ? || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
December 31, 2015
गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 10, 2023
मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ....।।धृ।।
सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं...१
मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं...२
मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं...३
मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू...४
मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं...५
मीच माझा गुरू
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 24, 2019
हॄदयस्थ ब्रह्म.!
नित्य नांदते आहे!
अंतरीचे भावशब्द
स्वरी गुंफले आहे!
स्वरात मी दंगलो
भान हरपलो आहे!
आलाप गंधर्वांचा
षड्जाचाच आहे!
अव्यक्त प्रीतीभाव
शब्दी सांडले आहे!
तृप्त मी, तृप्त मी
जीवन सुखद आहे!
लाभले सारेच
संचिती दान आहे!
कृपा दयाघनाची
मीही कृतार्थ आहे!
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १६३.
२७ - १२ - २०२१.
January 16, 2022
वर्षानुवर्षे आम्ही संघर्षच करतोय
पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोय ----
उद्योग धंद्यावर मंदीचे सावट
आहे त्याच रोजगारात घट
हाताला काम नाही
बेकारांचा आकडा फुगतोय
वास्तवाचं भान हरवलेला तरुण
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
दोन कोटी रोजगाराचा शब्द
मेघा भरतीवर टळतोय --------
दुनियेचा पोशिंदा
मुठीने पेरून रास उभारतो
विस्कटता पुन्हा सावरतो
भाव मिळेल औन्दा
सोन्याचं पीक कवडीमोल विकतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
हमीभावाचा शब्द
कर्जमाफीवर टळतोय -------
जातीधर्माचा नामानिराळा
सारेच एकीने वसती
इतिहास आहे साक्षी
सारेच इमान मातीशी राखती
सर्व धर्म समभावाचा मानस
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
साऱ्यांच्या विकासाचा शब्द
आरक्षणावर टळतोय -------
लिंक रोड समृद्धी महामार्ग
मेट्रोचा गवगवा
डोईवर घागर घशाला कोरड
भर पावसाळ्यातही तहानलेला
थेंबा थेंबा साठी आरड
टँकरची वाट पाहणारा
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
जलयुक्त शिवाराचा शब्द
दुष्काळावर टळतोय --------
कर्ज बुडव्यांना पळवाट
जगाच्या पाठीवर कुठेही वहिवाट
गरिबास आट
नुसत्या जाहिरातीचा घाट
भांडवलासाठी कौशल्य झिजवतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
पंधरा लाखाचा शब्द
चुनावी जुमला म्हणून टळतोय ------
वासनांध भर दिवसा
देहाची लक्तरे ओरबाडतो
फाशीची शिक्षा होणाराही
दिरंगाईमुळे सुटतो
न्याया पुढे नथमस्तक देह
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
सुरक्षतेचा शब्द
चौकीदारावर टळतोय --------
सळसळत्या रक्ताला
शिवरायांचे वरदान
जन्म महाराष्ट्राच्या मातीतला
जगण्याचा अभिमान
सागरी तटही आसलावूनी
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
शिव स्मारकाचा शब्द
आराखड्यावर टळतोय ---------
-- असलम अंबर शेख
December 8, 2019
पूजित होतो प्रभूसी ध्यान एकाग्र करुनी
भाव भक्तिने तल्लीन होत असे भजनी ।।१।।
काव्यस्फूर्ति देऊनी कवि बनविले मजला
शब्दांची फुले गुंफवूनी कवितेचा हार बनवविला ।।२।।
सुंदर सुचली कविता आनंदी झाले मन
ध्यास मज लागता गेलो त्यांतच रमून ।।३।।
पुजेमधले लक्ष्य ढळले काव्याच्या मागे जावूनी
भजनांतील चित्त वेधले तपोभंग तो होऊनी ।।४।।
मधाचे बोट चाटवूनी मोहात ओढले मजला
दूर सारुनी अमृत घट परिक्षा घेता झाला ।।५।।
अडथळे येऊनी तप साधनेत कस लावतो सत्वाची
हीच आहे प्रभूची रीत परिक्षा घेई भक्ताची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 5, 2019
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।
सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।।
पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।
अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।।
फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।
पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2018
ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे.
अचानक हातात कागदाचे भेंडोळे घेऊन कोटवाल्यांची धावपळ सुरू झाली… तिकडे बिचाऱ्यांची पळापळ झाली… आता न्याय मिळेल असे बिचाऱ्यांना वाटू लागले होते… पण… झाले मात्र वेगळेच… न्यायाचे दान काही पदरात पडले नाही… सत्य काही समोर आलं नाही… बिचारे हताश झाले… उदास झाले… डोळ्यात पाणी दाटलं… तसेच निघाले होते माघारी… डोळ्यात पाणी दाटलेलं.. समोरचं चित्र धुकेलं… काही दिसेनासे झालेलं… त्याचवेळी एका बिचाऱ्याचा पाय लागला… तिथे पडलेल्या एका गाठोड्याला… तसे ते गाठोडं हललं… बिचारा भयंकीत झाला… हादरला.. भ्यालाही… तसं ते गाठोड उभं राहिलं… म्हणालंही ‘कुणी लाथ मारली’ म्हणून. बिचाऱ्याची बोलती बंद झालेली… न्याय न मिळाल्याने ग्लानी आलेला तो बिचारा. झाल्या प्रसंगाने पुन्हा गांगरला.. काय बोलावे सुचेना… तरीही हिंमत एकवटुन म्हणाला… ‘माझाच पाय लागला तुम्हाला… माफी द्या… पण… तुम्ही कोण? इथे कसे? का पडलात इथे?’ एका दमात त्यानं विचारून टाकलं सारं…. तसे ते गाठोडं थोडं मोकळं झालं… म्हणालं… ‘जेव्हा पासुन तुम्ही हे मंदिर बांधलं ना, तेव्हा पासुन मी इथेच आलोय रहायला… पुर्वी आत रहायचो… पण अलिकडे आत मला जागा मिळेनाशी झाली… तेव्हा मी माझं बस्तान हलवलं… बाहेर पडलो… मग इथे असतो पडुन… गपगुमान…’.
गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? बिचाऱ्याची मती गुंग झाली… काही केल्या त्याला काही कळेना… तसं गाठोडं म्हणालं… ‘हे मंदिर बांधलय खुप छान. दिमाखदार इमारत आहे त्याची. पण त्यात माझी किमत शुन्य झालीय, पैशांची मात्र वाढलीय. मंदिरात सत्याची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली… तसतशी माझी अवस्था खराब होऊ लागली… मंदिरातून मी बाहेर पडलो आणि इथेच पडुन असतो पडुन…’. आता कुठे बिचाऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला… म्हणजे मंदिरात मी जे शोधायला आलो होतो, जे मिळवायला आलो होतो, ते सत्य इथे बाहेर पडलयं…. गाठोडं होऊन… सत्याची ही अवस्था झालीयं.. कुणी केलीय… कशासाठी केलीयं… एक ना अनेक प्रश्न बिचाऱ्याच्या मनात उसळू लागले… तसा निर्धाराने त्याने गाठोड्याचा हात धरला म्हणाला, मी सामान्य माणुस आहे… साधारण आहे… पण सत्य बोलण्याची ताकद माझ्यात आहे… चल माझ्याबरोबर मी सांभाळीन तुला प्राणपणाने… असे बोलून बिचारा आणि गाठोड्यातलं सत्य दोघेही चालू लागले…!
दिनेश दीक्षित जळगाव.
May 10, 2019
May 21, 2013
कीटक ते लहान असूनी
रहात होते फळामध्यें
विश्व तयाचे उंबर फळ
जीवन घालवी आनंदे......... १
ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
उंबराच्या नसे पलिकडे
ज्यासी ते अथांग समजले
बघूनी त्या एका फळाकडे ...........२
माहित नव्हते त्या कीटकाला
झाडावरची अगणित फळे
सृष्टीतील असंख्य झाडे
कशी मग ती त्यास कळे .............३
आपण देखील रहात असतो
अशाच एका फळावरी
हीच फळे असंख्य असूनी
असंख्य झाडे विश्वावरी ...............४
डॉ. भगवान नागापूरकर
१९२-१००३८४
e-mail- bknagapurkar@gmail.com
November 4, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti