विपरित वागूनी मन, नाश करिते शरिराचा
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां - कर्णाला
शरिर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 8, 2019
जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।
बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।
काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।
प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 21, 2021
एक होती म्हातारी, ती सर्वांना धारेवर धरी
उपास तापास नी सोवळ ओवळ
त्रस्त केल तीन घर सगळ
तिच्यापुढे चालेना कुणाच काही
कारण ती बाबांची होती आई.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2019
जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही...
मायमराठीचे काव्यरत्न
कविवर्य मंगेश पाडगावकर
प्रथम पुण्यस्मरण
३० डिसेंबर २०१६
January 1, 2017
प्रदीप निफाडकरांची गझल
April 19, 2010
शेतात टाकले
विषाक्त रसायने
तिकीट कैंसर ट्रेनचे
एडवान्स काढले.
टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.
January 24, 2018
बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं
काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१,
तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे
परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२,
शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला
मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३,
बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें
समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४,
मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे
मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५
शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा
पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा...६,
जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगाते
धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते...७
मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने
दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने...८,
तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने
असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे...९,
पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे
भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे....१०,
फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी
विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी...११
कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी
पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी....१२,
भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला
शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला....१३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 13, 2020
कशांत दडले समाधान ते
शोधत असतो सदैव आम्ही
धडपड सारी व्यर्थ होऊनी
प्रयत्न ठरती कुचकामी
बाह्य जगातील वस्तू पासूनी
देह मिळवितो सदैव सुख
क्षणीकतेच्या गुणधर्माने
निराशपणाचे राहते दुःख
'समाधान' ही वृत्ती असूनी
सुख दुःखातही दिसून येती
चित्त तुमचे जागृत असतां
समाधान ते सदैव मिळते
सावधतेने प्रसंग टिपता
समाधान ते येईल हाती
सुख दुःखाला दुर सारता
अंतरभागी समाधान दिसती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 17, 2019
समोर ये तूं केंव्हा तरी,
बघण्याची मज ओढ लागली,
फुलूनी गेली बाग कशी ही,
बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।
कल्पकता ही अंगी असूनी,
दूरद्दष्टीचा लाभ वसे,
अंधारातील दुःखी जनांची,
चाहूल तुज झाली असे ।।२।।
शीतल करुनी दुःख तयांचे,
जगण्याचा तो मार्ग दाखविला,
सोडूनी सारे वाटेवरी,
आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।
आस्तित्वाची चाहूल येते,
आज इथे केंव्हातरी,
तव आशीर्वादे जगतो सारे,
हीच पावती त्याची खरी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 30, 2021
सोडत नसतो केव्हाही, निसर्ग आपुल्या मर्यादा,
चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा १
साधूबाबा महाराज कित्येक आहेत ह्या जगती
नांव घेवूनी प्रभूचे चमत्कार दाखविती २
अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा
चमत्कार दाखविण्यामध्ये हात नसतो प्रभूचा ३
तो महान असूनी क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी
प्रेमभावना घेण्या कशास पडेल कष्टी ४
नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी,
दु:खींचे शोषण करती वाम मार्गाने जावूनी ५
आम्ही केवळ भाविक, वेडे श्रद्धाळू असती,
जो आपल्या अकलेने, उपयोग त्याचा घेती ६
गंडे, दोरे, जादू - टोणा हे सारे थोतांड,
चूक मार्गाने जावून शोधत राहतो ब्रह्मांड ७
विश्वास साधूंवरी देवापेक्षाही जास्त
म्हणून चटकन लाभे किंमत त्याची स्वस्त ८
भाषा त्यांची ठरलेली, राहू, केतू, शनी
जर फारच भोळे असाल तर म्हणती झाली करणी ९
संकटाचा काळ सांगती तीन वर्षाचा
दु:ख जावुनी सुखी व्हाल, शब्द देती आशेचा १०
ह्यात काही नवे नसते, हे तर चक्र निसर्गाचे,
सुख दु:खाच्या घटना घडते घडणे चालते नित्याचे ११
विश्लेषण करीता कळेल, आम्हीच करितो घटना,
परि हिंमत नसते आमची फळ त्याचे घेण्या १२
आम्हास हवा इतर कुणी झेलण्यास त्या दु:खाते
शब्द दाखवूनी प्रेमळ लुटीत असतो धनाते १३
फरक पडत नसतो, आमच्या कर्म फळात,
त्यांच्या मंत्र – तंत्राने, सहन करतो समाधानात १४
भयग्रस्त असूनी मन, चिंतेत आम्ही असतो,
आधाराचा शब्द बोलूनी, आशा आम्हास दाखवीतो १५
पारखोनी घ्या खरा गुरु दूर रहा भोंदूपासून,
फरफटत जाल जीवनी मृगजळास नीर समजोनी १६
गुरु दाखवी मार्ग, तुमच्या आत्मशुद्धीचा,
त्यातच त्याला समाधान, संदेश देतो ईश्वराचा १७
जवळ असूनी दूर असतो, हेच सार ईश्वराचे,
भक्तीभाव ठेवा , यश मिळेल जीवनाचे १८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 15, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti