कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,
दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।
धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,
कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।
नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,
परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।।
जीवन कशासाठीं कळले नाही कुणां
जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।
तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले
मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
March 9, 2015
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 3, 2020
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 12, 2021
जाणता वेदना जगातील
मम वेदनाही विरुन गेली
पाहता दुःख या जगीची
मम वेदनेलाही शरम आली ।
होतो कवटाळून मी बसलो
लहानशी वेदनाही फक्त माझी
वेदना माझ्यहून किती कठोर
जगी आहे कुणी भोगलेली ।
प्रत्येकाचे आहे दुःख वेगळे
आहे वेदनाही हर एक निराळी
पाहूनी तु सोसलेल्या वेदना
खरी वेदना मजला कळाली ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
७ ऑगस्ट २०१८
August 8, 2018
आषाढी कार्तिकी
जसा पाहतसे वाट
तसा माझा बाप
गावी उभा राऊळी
डोळ्यात जशी विठूच्या
प्रतीक्षा लेकरांची
म्हाताऱ्या बापाचीही
अवस्था तीच
त्याला तरी आहे
विटेची सोबत
थकलेला माझा बाप
उरे एकाकी
आणावे वाटते
शहरात त्याला
पण नाही हवा
म्हणे मानवत
उमगते मला
तगमग त्याची
पण भ्रांत पोटाची
करी हतबल
गावच्या मातीशी
त्याची नाळ जुळलेली
अन् शहराच्या बेड्या
माझ्या पायी बांधलेल्या
समजून घेतो बाप
अडचणी साऱ्या
दडवून दुःख
ठेवी अंतरात
भक्ताच्या मनीचे विठू
जाणतसे गुज
तसे माझे मन जाणे
बाप विठूराया
- महेन्द्र कोंडे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
April 5, 2023
ह्या सप्त रंगातल्या
इंद्रधनुष्याच्या
कमानीखाली
मेघराजा
गालात
हसा
ना
-- सौ.माणिक शुरजोशी
December 13, 2019
May 25, 2022
कितीक वेळा धुतला कोळसा, रंग न बदले त्याचा ।
उगाळता झिजून जाई, परि काळेपणा कायमचा ।।
भट्टीत घालून त्यास जाळता, घेई रंग लाल कसा ।
शुभ्रपणा हा दिसून येतो, राही न जेंव्हा कोळसा ।।
मलीनता ही मनामधली, खोल रूजली असे ।
विचारांतील तर्कज्ञान , शुद्धीसाठी पुरे नसे ।।
गुरू लागतो अग्नी सारखा, चित्त शुद्धी करिता ।
ज्ञानभट्टी पेटवून देई, जाळण्या अशुद्धता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 15, 2020
कशासाठी जगतो आपण,
विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे,
हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे,
हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही,
देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या,
बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेवून ही,
शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते,
तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा,
जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून,
शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण,
अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 29, 2020
दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti