खरं सांगू तुझ्या विना
जीवन जसा एक थंड तवा
आणि भुकेला एक मुलगा
भाकरी शोधीत फिरावा ,
चंद्र अर्धा आहे
एका मुलीला कमी मार्क्स मिळाले आहेत
ती रडत आहे,
आणि सूर्य एखाद्या
आळशी शिक्षका प्रमाणे
सर्वा देखत घोरत पडला आहे,
आशा एखाद्या पुजारीन प्रमाणे
थकून पायरीवर बसली आहे,
आणि मंदिरात देव पारोसे
पूजे विना राहिले आहे,
दुस्वप्न वीजे समान
त्याच फांदीवर कोसळले आहे
जिथे माझ्या व्याकूळ तृष्णेने
घरटे बसवले आहे,
खरं सांगू तुझ्या विना,
आस ठेवत एक म्हातारी
आणीबाणीतील योजना मोजत आहे
तो सांगून गेला होता तीन दिवस
आज तीन युग लोटून गेले आहेत,
नाव व पत्ता ज्या चिठ्ठीवर
लिहून गेलास ती हरवली आहे,
तन मनाचे संपन्न कोश
हाय आता रीते होत आहे !!!
खरं सांगू तुझ्या विना
माझी नाही कोणतीच कहाणी
गीत माझे जसे उंच फांदीवर
लहडले आहेत आंबे,
बाल चमू नेम धरून दगडाने
तोडत आहेत आंबे,
आणि त्यांचे खरे मूल्य
कोणीच देऊ इच्छित नाही
खरं सांगू तुझ्या विना !
*****
मूल हिंदी कविता -
सच कहूँ तेरे बिना
शार्दुला झा नोगजा, सिंगापुर
मराठी अनुवाद - विजय नगरकर
March 18, 2022
क्षणभर
थांबतो का?
क्षणमात्र
उशीर हा
क्षमाशिल
असतात
साधुसंत
जगतात
क्षण क्षण
वेचतात
या क्षणिक
जिवनात
ज्ञानदान
करतात
ज्ञानदाता
जिवनात
ज्ञानेश्वरी
ज्ञानामृत
ज्ञानार्थि हे
हो संतृप्त
ज्ञात सारे
असावेच
विज्ञानात
शोधावेच
त्रस्त होती
मतदाते
व्यस्त होता
सत्ता भोक्ते
त्राहि त्राहि
जनता रे
नेता पाही
स्वहित रे
त्राता नाही
जनतेचा
नेता कोणी
या राष्ट्राचा
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
November 20, 2019
December 5, 2016
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 6, 2020
रंग निळ्यासावळ्या घनांचा, आज आभाळी पसरला,
जसा विविधरंगी मुलामा,
नभांगणाला कुणी दिधला, ---
दिनकर उगवला जसा ,
रंगांचे अगदी पेंव फुटतां,
नभी जादू -ई खेळ चालला,
जो पाहे तो चकित जाहला,--!!!
सोनेरी, पांढरट, निळा,
काळा जांभळा, पिवळा,
रंग सज्ज भास्कर-स्वागतां,
जणू विजयोत्सव साजरा,--
मित्रराज डुलत येता,
गडगडाट झाला ढगांचा,
मेघमल्हार कोणी गायला ,
कल्लोळ उठला पहा विजेचा,
सुरुवात झाली चमचमाटा,
धांदल सगळी मेघांची उडता,
सूर्यराज विराजमान झाला,---
धरती ल्यायली सोनशेला..!!!
प्रकाशाचे रांजण उधळता,--
प्रभाव सोनेरी किरणांचा,
आकाशात जसा पडला,
उन्हात न्हाली वसुंधरा,
उजेडाचा सारा पसारा,-
सीमा नाही तिच्या आनंदा,--!!!
हिमगौरी कर्वे ©
January 22, 2020
हक्क तुझा,हक्क माझा,
हक्क याचा अन त्याचाही.....
पण मला एक सांगा.....
हक्क कधी हक्काचा आहे का हो...?
एकदा आसच चालत आसतांनी....
रस्त्यानं.....!
अविरत पहात व्हतो....
वेगवेगळे रूपं....
ना निरगुण न ही निराकार....
ते तं होते,
आंकुचित....,
अन संकुचितही.....!
व्याख्याच बदलली व्हती
हक्कानं आपली....
सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
फाईल करप्ट व्हावी
तसा करप्ट झालता हक्क....!
अन मंग काय,
हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली.......
आपल्याच
हक्काची......!!!
स्वतःचीच......
स्वतःसाठी
हक्कानं चालवलेली.....!
हक्कालं वावडं व्हतं....
गरीबाच्या घामाच,
भटक्याच्या पालाचं,
श्रमिकाच्या झोपडीचं
अन विद्रोहाच्या चोपडीचं...!!!
हक्क पोचलाच नाही कधी
रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी.....
ना पालात,ना रानात,
नाही झोपडीत.....!
तो तं.....
आरामात राबतोय......
संस्थानिकांच्या महालातं.....
हक्कानं....!!!
©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
9405807079
November 14, 2023
लय फोफावलय तणकटं....
धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं.....
रान कमी पडलं मनुन काय की,
आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं...
आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं,
निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं...
काल घरातुन निंघताना भिंतीवर
एक पिंपळाचं झाड पाह्यलं...
मनात विचार आला,
मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय,
मनुनं ईथबी एक उगवलय काय की?
लय फोफावलयं....
गल्लीतंबी अन दिल्लीतंबी,
घरातंबी अन दारातंबी...
कुठं नाही मनुन सांगु,
ईथं जागाचं शिल्लक राह्यली नाही...
रस्त्यावुन पुढ चलतांनी,
याच तनकटांचे दोरखंडं व्हवून,
माघं खेचतायतं मलं...
असं वारंवार जाणवायलय आजकालं...
आज तं कहरच झाला...
मह्याच मस्तीत विहरत असतांनी ,
अचानक तनकटाच्या दोरखंडांनी,
महे पायचं आवळून जागीच थिजवले...
तसं पाह्यलं तं त्या तणकटाचं,
मह्या मार्गावर,
अतिक्रमनचं व्हतं ते......!
मी पुर्ण ताकदीनिशी मुक्तं व्हवू पहातं व्हतो....
जोर जोरातं ओरडतं मदतीची याचना करत व्हतो....
पण कुनिही मह्या मदतीलं येतं नव्हतं....
जो तो मह्याकडं पाहूनं हसतं व्हता...
मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतं व्हतो.....
पण न का जाने मह्याबी मनातं घालमेलं चालली व्हती....
क्षणातचं मह्याबी अंगावरं सळसळत्या गवताची,
हालचाल जानवाय लागली व्हती...
रोम आता राह्यलाचं नव्हता...
मह्या रोम रोमात तणकटं भिनतं व्हतं....
का मीच तणकटं बनतं व्हतो...?
मी भांबावलो,बावचळलो.....
सहज आजुबाजुलं पाह्यलं .....
आत्ता सगळ्या लोकांच्या डोक्यावरं
मलं तणकटं दिसतं व्हतं.....
अन त्याची मुळं,
आरपार मेंदुतं रूजलेली जानवतं व्हती.....
मी ओरडलो....तळमळलो....शेवटी हतबल झालो....
मग शेवटी त्या विधात्यालचं मनलो,
हे विधात्या.....,
तणनाशकानं शेतातल्या तनाचा नाश करता येईल रे....
पण मेंदुतल्या तनाचा नाश कुठल्या तननाशकानं करायचा.....?
©गोडाती बबनराव काळे
9405807079
July 27, 2023
गरिब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला
बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।
छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।
काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 14, 2017
शब्दांविना संवादू,
असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 20, 2019
चाहूल पहिल्या वळवाची,
मनात रिमझिम पावसाची,
घोंग-घोंग वारे व्हायले,
आकाशाने रंग बदलले !
पाऊस पहिला वळवाचा,
मनात साठवून ठेवायचा,
घन:शाम ढगांना घेऊन आला,
आठवणींना उजाळा दिला !
पाऊस पहिला वळवाचा,
अचानक धो-धो बरसायचा,
डोंगर दर्यांना खुणवायचा,
लता वेलींना हसवायचा !
पाऊस पहिला वळवाचा,
बच्चे कंपनीच्या आवडीचा,
कारण शाळेला दांडी मारायचे,
पावसात मनसोक्त भिजल्याचे !
पाऊस पहिला वळवाचा,
आवडता ऋतू प्रेमयुगलांचा,
चिंब भिजत भटकायचे,
दु:ख सारे विसरायचे !
पाऊस पहिला वळवाचा,
कणसं भाजून खायचा,
कांदा भजी सोबत,
वाफाळलेल्या चहा प्यायचा !
पाऊस पहिला वळवाचा,
बर्याच वर्ष अनुभवाचा,
मनात गुदगुदल्या होतांना,
ते दिवस आठवतांना !
जगदीश पटवर्धन
July 4, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti