परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"
"immigration च्या requests ने system झालीये hang
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"
"असं कर बाप्पा एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"
"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला......
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
January 15, 2013
मोहक सुंदर रंग लेवूनी आलो धरतीवरती
July 12, 2026
आनंदाने नाचत गात,
घेत हृदयाचे ठाव ,
चाललो मी पुढे पुढे ,
झरा माझे नाव,--!!!
कपारीत डोंगराच्या,
जन्म होई माझा,
झुळझुळ वाहत जाता,
होत असे मी मोठा,--!!
शांत निर्मळ पाणी,
हळूहळू पुढे जातसे ,
पारदर्शक थेंब लोलक,
नजरेत ना भरती कसे,--!!
असे धवल थेंब धावती,
त्यांची बनते सुरेख नक्षी,
ती बघण्यास उत्सुक हा,
सारखे येती माझ्यापाशी,--!!
अशांत, अस्वस्थ चित्ता,
क्षणार्धात करतो शांत ,
मनस्ताप होता क्षणी,
धावती इथे निवांत,--!!
अवतीभोवती वृक्षराजी,
अन पक्ष्यांचे मंजुळ कूजन,
माझ्या पाण्याची धून मंजुळ,
हा पक्षीगान ते मधुर,-?-!!
मंद वारा संगतीला,
अखंड नित्य वाहे,
जो येईल तो आजूबाजूस,
निसर्गचित्रच पाहे,---!!!
तहान भागवण्या येती,
लहानथोर कित्येक पक्षी,
गोड पाण्याने तृप्त होतां
रमती बघा माझ्या वक्षी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 15, 2019
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा ।।४।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा ।।५।।
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 6, 2017
नाही गेली अटूनी माया,
आजही वाहते झऱ्यासारखी,
उगांच कां तू खंत करशी,
न होशील मज पारखी ।।१।।
वाहत असता फुटले फाटे,
जीवनातील वळणावरी,
जो तो घेई उचलूनी वाटा,
नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।
कसा राहील 'साठा' आता,
मनसोक्त ते जाण्या वाहूनी,
तृप्त करील परी तृष्णा तुझी,
ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।
कुणीतरी आहे पाठीराखा,
आनंदाने चालत रहा,
थकूनी जाता देईल पाणी,
आखंडीत प्रेम झरा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 20, 2014
आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 1, 2020
कोण लागतात माझे,
नाते ते ठाऊक नाहीं,
देऊनी जातात मात्र,
बरेच मजला काहीं ।।१।।
विठ्ठल- रामाचा नाद,
गुंजन करितो येथें,
पवित्र वातावरण,
येण्यानी होवून जाते ।।२।।
देवाण घेवाण आत्म्याची,
आपसामध्यें चालती,
शब्द फुलांची गुंफण,
त्वरीत होऊन जाती ।।३।।
फुले देऊनी मजला,
हार गुफूंन घेतात,
दोघे मिळूनी तो हार,
प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।
अदृश्य असले नाते,
असावे दोघांमध्ये,
भाषा आत्म्याची जाणतां,
मन नाचते आनंदे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 26, 2020
वळून बघता पूर्व आयुष्यी,
प्रखरतेने हेची जाणले
घडले नाही कधीही ते ते,
हवे असूनी मनी योजीले....१
सभोवतालची देखूनी स्थिती,
आखती योजना कल्पकतेने
खेळामधली चाल नियतीची,
ध्यानी न येते दुर्दैवाने.....२
मार्ग तिचे ठरले असूनी,
बांधलेले इतर जीवांशी
अपूर्व योजना निसर्गाची,
कळेल कुणाला सहज कशी....३
जाळीतल्या धाग्याची टोके,
गुंतली असती ग्रह गोलाशी
फिरता फिरता खेच पडे,
वा ढीली होवून जाती कशी.....४
सुख दु:खाचे परिणाम हे,
असेच दिसून येती मग
अनपेक्षीत हे जेव्हा घडते,
म्हणती त्यासी दैवी अंग....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 22, 2016
जखमा उरांत माझ्या,
आहेत अजूनी ताज्या,
शासनकर्त्या नाकर्त्या तू
हो आता तरी जागा
गेंडयाच्या तव कातडीची तू,
कुठवर राखशी नीगा?
त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू
काढ शोधूनी धागा
स्फोट मालिका सदाच घडती,
मुंबापुरीच्या कुशीत,
निद्रीस्त सुरक्षा तुझी,
घुसती अतिरेकी वेशीत
पूरे जाहले नाटक तुमचे,
समिती-चौकशी--खटल्याचे,
वरातीमागून धावत येते,
घोडे तुमचे नित्याचे
जनतेच्या मग पैशावरती,
दान वाटिता लाखाचे ,
कसे कळावे मोल तुम्हांला
निरपराध्यांच्या मरणाचे?
ह्याचसाठी कां हुतात्म्यांनी
रक्त होते सांडिंले?
स्मरुन त्यांना गिरवा थोडे
देशभक्तीचे धडे
गिरवा माणुसकीचे धडे
-- सौ. अलका वढावकर
February 13, 2016
तुझ्या माझ्या मिलनी,गंधाळली रातराणी,
वारा सांगे गुजगोष्टी,
तुझी माझी प्रेम कहाणी,
चाफा वरती वरती फुले,
त्याचे झुळकांवरी झुले,
जाईजुईचे मांडव खाली,
मोगऱ्याचे त्यास विळखे
सायलीचा नाजूक मंद,
गंध सुवासिक करे धुंद,
अबोलीचे झुबके केवढे,
कानोकानी सांगते गुपित,
उधळीते बकुळ आपुली,
सुगंधित फुले चहूकडे,
दरवळू दे प्रीत सुगंधी,
घालते कुलदेवां साकडे,
शैया गुलाबांनी फुलली,
बहरून ये पाकळी, पाकळी,
जिवलगासमवेत आज,
रात,सारी खुलली निराळी,
वरून पाहते शुक्र चांदणी,
तमांतील मिलाफ गोड,
चंद्र करतो प्रेमक्रीडा,
चांदण्याभोवती धरून फेर,
दिवसाहूनही रात्र मोहक,
बेभान नशिली प्रणयी,
पाहून आपल्याकडे मात्र, भास्करासाठी झुरे यामिनी---!!!
हिमगौरी कर्वे ©
May 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti