May 25, 2021
उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल,
संपतील तणाव चिंता,
स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, ----
मोल देत कसा नाचेल ,
भरारी घेत आभाळा,
उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना,
सतत रुंजी घालत राहील,--- इवल्याशा त्याच्या मनात,
*मुक्तीचा आनंद भरेल,
विश्वास ठेवू तरी कसा,
मनी भावना उफांळेल,---
सुटली ही भयानक कारा
ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां,
आता आपल्या कवेत घेईल, झुगारून तुटक्या बंधनांना,
जगावर साऱ्या राज्य करेल,---
आता कशा असंख्य वाटा,
जीव कसा आनंदेल,
स्वर्गीय स्वरूपीं समाधानां,
हृदयात तो सांभाळेल,---
अवलोकत पूर्ण क्षितिजा ,
कसा मग तो भिरभिरेल,
पाहून येईल मोक्षद्वारा ,
जिथे जाणे अंती असेल,--!!!
© हिमगौरी कर्वे.
January 3, 2020
परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद ।।
मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।।
नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।।
प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार ।।
आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति ।।
ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।।
ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।।
वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।।
धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।।
हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।।
झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती ।।
धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण ।।
भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी ।।
होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी ।।
वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण
समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
May 11, 2014
माझं तुझ्यावर अनंत प्रेम आहे,
आकाशाच्या काठावर विसावलेल्या संध्येसारखं,
दिसतं थोडंसं,
पण पसरतं अथांग.
पुरावा काहीच नाही माझ्याजवळ,
ना शब्दांची
शिक्कामोर्तब साक्ष,
ना शपथांचा आवाज.
फक्त हृदयाच्या गुहेत
तुझ्या नावाचा मंद नाद.
हे प्रेम दीपस्तंभासारखं,
वादळातही शांत उभं.
जळतं आतून अखंड,
पण धूर कुठेच नाही.
तुझी आठवण येते तेव्हा
वेळ थांबत नाही,
पण क्षण थबकतो;
जणू पाण्यावर उमटलेलं चांदणं
हलकंसं थरथरतं.
मी तुला कधी सांगितलं नाही
त्या नजरेतला समुद्र,
त्या शांततेतली भरती.
कारण लाटांना शब्द नसतात,
त्या फक्त किनाऱ्यावर विरघळतात.
माझं प्रेम असंच आहे,
न लिहिलेलं, न बोललेलं,
पण प्रत्येक श्वासात गुंफलेलं.
तुझ्या अनुपस्थितीच्या सावलीतही
प्रकाशासारखं जिवंत.
आणि जर जगानं विचारलं
“साक्ष कुठे?”
तर मी आकाशाकडे पाहीन
कारण अनंताला
पुराव्याची गरज नसते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 27, 2026
चल ये पटकन खूप घट्ट मिठी मार,अरे बघ थोडी अजून जागा शिल्लक आहे,
मिटवायचं आहे ना हे पण अंतर मग सांगते तसं कर ना, घट्ट घट्ट अजून घट्ट मिठी मार!
बघ तू मी जे सांगते ते ऐकतच नाहीयेस, एका जागेवरून कणभर हलत सुद्धा नाहीयेस!
नुसतं एक टक बघत राहतोयस माझ्याकडे, लुक्स काय देतो ? असं विचारल्यावर नेहमी सारखा खिदळत सुद्धा नाहीयेस.
झोपताना बोलायचास भान ठेवत जा गं त्या हातांचं,
जप जरा त्यांना,हे अंतर मिटवण्यासाठी त्यांनी खूप ऍडजस्ट केलय गं स्वतःला!
आज निजताना ना त्या हातांची ऍडजस्टमेंट करत आहेस,
आणि बघ तर रात्रभर थकूनही एकमेकांवर पहुडण्याचा त्यांचा हट्टी रोमान्सही संपला नाहीये!
तू नेहमी बोलायचास कसलीही तमा न बाळगता तुला हवं तेवढं तु उड,
परतून मात्र माझ्याच कुशीत येऊन झोप हं!
आज माझ्या पंखात बळ नाही उरलंय बघ उडण्याचे,
अन तुझ्यात जिगर नाहीये त्या फ्रेम भोवती अडकवलेल्या माळेला तोडण्याचे !
मला तुझ्या सोबत जगायचं होतं, तुझ्या नावाने सजायचं होतं!
तू दिलेल्या दागिन्यांचं सुंदर कलेक्शन करायचं होतं,
तू जाशील तिकडे हातात हात घालून तुझ्यासोबत मिरवायचं होतं,
आज तू निघून गेलास पुढे, माझं नाव, गाव, श्वास आणि सर्वस्व घेऊन!
- श्वेता संकपाळ (१३/०७/२०२३) .
July 16, 2023
ती आणि तो
खरे चर्चेचा विषय असतात
अर्थात दुसऱ्याच्या दृष्टीने
त्यांना विचारा..
ते सहजतेने म्हणजे ईझींली घेतात
पण.....हा पण महत्वाचा असतो
जेव्हा ब्रेंक अप होतो तेव्हा मात्र
चर्चा सुरु होतात..
त्या दोघांच्या मनात देखील
ब्रेंक अप हा शब्द इतका रूढ होतो
त्यातला तो किवा ती
कधीकधी
ह्या शब्दापार असतात....
काहीच वाटत नाही
आणि मग दोघांच्या बाबतीत शेवटी कधीतरी
फक्त व्यवहार उरतो
जो लग्न नावाच्या
मांडवाखाली उरकला जातो........
-- सतीश चाफेकर.
December 14, 2021
रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति ।
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति....१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं ।
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी...२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते ।
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला ।
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 16, 2020
भिंत ओलेती मनाची
तुझ्या आठवणी झिरपलेल्या,
धुळीत थेंब टपोरे , देती आठव
ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या,
तुझ्या हास्याची जाळी काढी
नक्षी त्या छताला,
प्रतिबिंब तुझे झळकते
जेव्हा पाहतो स्वतःला,
किती भकास उदास
तुझ्याविना घर मनाचे गं
जन्म देण्यास आतूर
जडावलेले गर्भ घनाचे गं,
झाली जीर्ण वास्तू मनाची
तुझे येणे होत नाही,
अवकळा येते त्या घरास
जिथे स्त्रीचे पाऊल फिरत नाही,
किती किती वाटते तुला लेखणीत बांधावेसे
पुन्हा नव्याने तुला जुने काही सांगावेसे
कित्तीदा भास झाला तू येऊन गेल्याचा
मनाचा उघडा दरवाजा पुरावा होता तू गेल्याचा,
आत्मा कधीचा पाण्यात ठेऊन बसलेला ,
उंबरठ्यावर एक तांब्या उपडा हीं घातलेला
कधी वळत नाहीत तुझी पावले इथवर
प्रतिक्षा हीं किती काळाची न कुठंवर
वास्तू कोसळण्याआधी जमेल का ग तुला येणे
बांधू नव्याने घर , रचू पुन्हा नवे गाणे
साद देतो हि अंतिम अन प्रतिक्षाहीं थकलेली,
अक्षरे बोलावती तूज , विरहात माखलेली..
-- अँडव्होकेट ऐश्वर्या वैजापूरकर
(नावासहित share करावी)
September 10, 2018
शिव कुणाचे चिंतन करितो ?
प्रश्न पडला मनी,
तोच तर आहे प्रभू जगाचा
काय तयाचे ध्यानी...१,
जेव्हां आम्ही चिंतन करितो,
ध्यान लावी प्रभूकडे,
प्रयत्न करूनी जगास विसरे,
लक्ष केंद्रितो त्याजकडे....२,
उलट दिशेने शिवाचे चिंतन,
चालते जगतासाठीं
ध्यानामध्यें स्वतःसी विसरे,
लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ....३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 12, 2016
दाखवू नकोस प्रेम
उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत
केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले
आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा
परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी
झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते
आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता
ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी
आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 30, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti