मंदिरात दिवे पेटवले,
पण मनात अंधारच दाटला असेल,
ओठांवर प्रार्थनेचे शब्द असतील
आणि हृदय मात्र रिकामंच असेल,
तर सांग, असा देव कशाला?
हात जोडून उभं राहिलो,
पण तेच हात कुणासाठी पुढे आले नाहीत,
डोळे मिटून नमस्कार केला,
पण डोळ्यांत करुणेचे थेंब दाटले नाहीत,
तर अशी भक्ती कशाला?
भुकेल्या माणसाला भाकरी न देता
देवाला फुलांचा हार अर्पण केला,
रडणाऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता
मंदिरात घंटांचा गजर केला,
तर असा देव कशाला?
देव जर खरोखर कुठे असेल,
तर तो माणसांतच सापडतो
एखाद्या हसण्यात,
एखाद्या मदतीच्या हातात,
एखाद्या निरागस प्रेमात
तो शांतपणे फुलत असतो.
म्हणून मंदिर दूर कुठे नाही,
ते आपल्या वागण्यातच उभं असतं.
एखाद्याच्या अश्रूंना हात लावला,
एखाद्याच्या वेदनेला आधार दिला,
एखाद्याच्या भुकेला भाकरी दिली,
तिथेच देव शांतपणे उभा असतो.
आपण जर माणुसकी जपली,
तर देव शोधायला कुठेच जावं लागत नाही,
कारण माणसाच्या हृदयातच
देवाचा खरा पत्ता लिहिलेला असतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 29, 2026
November 5, 2021
आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?
तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,
सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,
कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,
विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी
मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,
मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा
समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,
मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,
आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालविते.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
मारुतिराया या देहातच दर्शन देई रे
श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।।
प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई
पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई
नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।।
उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती
रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती
नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।।
धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात
श्रीरामाचा जप चालू दे तेंव्हा हृदयात
तेज रवीचे झळको वदनी अंजनिकुमारा रे ।।३।।
रुंद रुंदशी छाती द्यावी प्रहार झेलाया
स्वकर्मकुसुमे गुंफू माळा तुजला पूजाया
आत्मबुद्धिचा वज्रासम तू निश्चय देई रे ।।४।।
द्रोणागिरि पेलला करावर सांभाळुन आणला
लंकेला जाळले, रावणा विक्रम दाखविला
सीतेला शोधले प्रयत्ने विमल बुद्धी दे रे ।।५।।
'जय बजरंगा जय हनुमंता' जयजयकार करू
तुझिया आशीर्वादे आम्ही अजिंक्य वीर ठरू
बालक रामा दास्यभक्ति तू आपण शिकवी रे ।।६।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
April 11, 2017
(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -)
स्वातंत्र्य मिळाले
तेव्हा ते म्हणाले
गरिबी हटाव!
त्यानंतर
कित्येक पंतप्रधानांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मुख्यमंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
आमदाराने खासदारांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर त्यांच्या कित्येक
बगल बच्यांनी
आपली गरिबी हटवली
स्वातंत्र्य मिळून
पन्नास वर्षे झाली
गरिबी कुठे हटली?
यांची बिचारी गरिबी
पिढ्यान् पिढ्या
कधी हटणारच नाही
गरिबीचे यांनी
केले कुत्रे
लाचार लूत भरलेले
यांच्या गरीबीचे
कुत्रे मात्र
लठ्ठ लाचेचा पाव खाते!
गरीबीचा मंत्र
जपायचा
डोळे झाकून
दुनिया झुकते
झुकणारी जनता
गरीबच असते
दिसते तसे नसते
म्हणून जग फसते
गरिबी हटली
तर श्रीमंती
राज करील कसे?
-- विनायक अत्रे.
July 21, 2022
हे घनश्यामा श्रीकृष्णा
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना ।।धृ।।
बोटे फिरवूनी मुरलीवरी
सप्तसुरांची वर्षा करी
सर्वा नाचवी तालावरी
रंगून जाती हे श्रीहरी
बोटांमधली किमया तुझी, नाहीं कळली कुणा ।।१।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
बोटांत बोटे गुंतवी
राधेला तूं नाचवी
गोपींना तूं गुंगवी
गोपांना तू खेळवी
कशी लागते ओढ तुझी, कळले नाही सर्वाना ।।२।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
पर्वत उचलूनी बोटावरी
वष्टी पासूनी रक्षण करी
नाचूं लागूनी गोकूळपुरी
तुझ्या भोवती ताल धरी
वाहूनी नयनांतील झरे, व्यक्त होई प्रेम भावना ।।३।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
प्रसंग पडतां रणीं
सुदर्शन फिरे बोटातूनी
रक्षण करण्या सज्जनीं
आलास तूं धावूनी
शब्द भावना अपुरी पडतां, वाट फुटे अश्रुना ।।४।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 13, 2016
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 23, 2020
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे ।
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।।
सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी
देह आणि मना, परिणाम करी ।।२।।
लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार
आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।।
जीवन विषयाचे, बनत असे वलय
रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
September 13, 2018
ना भावना, ना कल्लोळ मनी,
ना अश्रु, ना हास्य नयनी,
ना ध्यास, ना दिशा माहित,
मी दुनियेत माझ्या,
एकटी मी, एकटी मी!
एक चंद्र , एक तारा,
एक एकटा एकांत सारा,
एक एकट्या जीवनात माझ्या,
ज्योती असूनही काळोख सारा,
मी दुनियेत माझ्या,
एकटी मी, एकटी मी!
नको सोबत, नको आधार कोणाचा,
बस आहे आशिर्वाद माय – बापाचा,
बंधू – भगिनी चार दिवसांचे सोयरे,
ना मूल्य कोणास कोणत्याच नात्याचे,
मी दुनियेत माझ्या,
एकटी मी एकटी मी !
होईल अंत माझ्या जीवनाचा,
चार खांद्यांवर शेवट या सर्वांचा,
फरक पडणार होता कोणास या सर्वांचा?
दोन दिवस रडून परततील आपल्या मार्गाला,
शेवटी कोण नसते कोणाचे हेच खरे,
मी दुनियेत माझ्या,
एकटी मी, एकटी मी!
– श्वेता संकपाळ.
August 22, 2018
तुझी गळाभेट तर राहू दे!
तुझं दर्शनास तर येऊ दे!
तुझे निमिषार्धाचे नेत्र सुख दे!
तुझी वारी मनांतच तर रुजु दे!!
नामा वाट पाहे देवा अतुरतेनी
घास दहीभाताचा करी धरोनी
तुकयाचा कंठ अभंगे दाटुन आला
सुख झाले ओ साजनी गातांना !!
सावता म्हणे देवा फुलं कोमजली
थकलो रे विठु तुझी पाऊले शोधून
जना म्हणे देवा राहिले दळण कांडण
कशा थापू भाकर्या संत जमले द्वारा!!
देवा मुक्ता थांबली ताटीचे अभंग गाण्या
देवा महाद्वारी बघ ना बहिणाई थांबली,
सखु, कान्होपात्रा, तुझ शोधती विठुराया
आत्मा तो निर्मळ सांगत संतसोयराबाई!
एकनाथ, गोरोबा, चोखा, सेना, सारे संत,
दामाजी,नरहरी,पुंडलिक,देवा तिष्टले द्वारी
ज्ञाना खोळंबला देवा गाया पसायदानसवे
देवा दिंडी वारी सवे जावे वाटते या क्षणी
भेट रे विठू राया, नको वाट लाऊ पहाया
सा-या वारकर्यांच्या मनांत तुझाच वास,
गर्जतो,आता विठ्ठल विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल!
-- भास्कर पवार.©®
May 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti