निरागस भावनांची गीतांजली
निर्मली, भावफुलांची रंगोली
दीपज्योत! अंतरी संवेदनांची
निक्षुनी! सुरेल सत्य गुंफलेली
सात्विक, प्रीतभाव मनसागरी
अलवार प्रसवती शब्द ओंजळी
राशी! सुखदुःखांच्याच ललाटी
झरझरते भावगंगा ओथंबलेली
झाले मुक्तमोकळे, अव्यक्त मन
शब्दफुले! कवितेतूनी गुंफलेली
काव्यप्रतिभा! वरदान दयाघनी
प्रतिभा! जणु प्रांगणी मंतरलेली
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३४.
३ - २ - २०२२.
February 11, 2022
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी,
हेच जीवनाचे ध्येय असे,
आत्मा ईश्वरी अंश असूनी,
त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।
देह पिंजऱ्यांत अडकता,
बाहेर येण्या झेप घेई तो,
अवचित साधूनी वेळ ती,
कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।
कार्य आत्म्याचे अपूरे होता,
पुनरपी पडते बंधन,
चक्र आत्म्याचे चालत राही,
मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 7, 2016
अज्ञात दिवा मी मिणमिणणारा
संकटाचे येऊ देत वादळी वारे
वावटळही ती येऊ दे
आणि अंगावर येऊ देत सारे
पण मी विझणार नाही
मी जागृत रहाणार आहे
पेटूनऽ....
पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे
जरी मला ज्ञात आहे
गेल्यावर मी, फक्त....
दप्तरी नोंद होणार आहे
विस्मृती मला घेरणार आहे
पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे
जन्म-जीवन माझे मरण्यासाठी
मरण माझे माझ्या देशासाठी
खेचून विजयश्री मी आणणार आहे
रणधुमाळीतच मी विसावणार आहे
नसेन मी....
नसेन मी भव्य स्मारकावर
जागृत जनस्मृतीवर
फळ्या-फलकांवर
इतिहासाच्या अन्
भव्य - सोनेरी पानांवर
बलिदानातच मला
मान माझा गवसणार आहे
धडाडणाऱ्या तोफांना मी धडकणार आहे
मातीसाठी माझ्याच, मी मरणार आहे
या मातीची, या देशाची आणि विजयाची
इमारत जेव्हा उभी रहाणार आहे
लक्षात ठेवा.
पाया तिचा तो मीच असणार आहे
तो पाया मीच, मजबूतीही मीच
आणि पहा
पसरलेला तो... गडद लाल रंग
शाईचा-इतिहासाच्या पानापानातील
त्यातही तर मीच असणार आहे
मातेच्या विजयाचा कणन्-कण
मीच तर तो असणार आहे
नाही...
नाही मी विसरला जाणार....
मी मरणार नाही
मी अमर होणार आहे
देशभक्तीचे प्रिय अमृत प्राशून
मी मृत्युंजय होणार आहे
-- यतीन सामंत
October 18, 2022
माणसाचा अहंभाव रसातळाला नेतो. समाजात राहून आपल्या वेगळ्याच भ्रमात राहणा-या लोकांचे परिवर्तन या शब्दपुष्पाच्या माध्यमातून होर्इल अशी आशा बाळगूया!
July 5, 2012
मागील कर्म पुढे चालूनी,
कर्माची होई शृखंला,
फळ मिळते कर्मावरूनी,
मदत होई मुक्तीला ।।१।।
चांगले कार्य करीतेवेळी,
मृत्यू येता अवचित,
पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां,
खेचतो त्याच कार्यात ।।२।।
अपूरे झाले असतां कार्य,
ज्ञानेश्वराच्या हातून,
पुनरपि येऊनी पूर्ण केले,
आठरा वर्षे जगून ।।३।।
ध्रुव जगला पांच वर्षे,
अढळ पद मिळवी,
कित्येक जन्मीचे तपोबल,
पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।
कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,
जन्म-मृत्यू पासूनी,
‘कर्म’ फळानेच जे साधते,
‘मोक्ष’ म्हणती कुणी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 12, 2016
आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी
कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत
आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत
सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत
वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत
शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात
उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत
धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे
जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे
धुडकावून वर्तमानाचे सारे सावध पोलादी पहारे
त्या लहानमोठ्या आठवणींनी उठवावे अंगभर शहारे
अनुभवावा तो जुनाट श्वास मिटल्या पापण्यांमधूनी
उष्ण निश्वासासंगतीने पाघळावी स्निग्धता डोळ्यांकडांनी
जगता न येतो भूतकाळ, क्षण होतात हे निसरडे
आकंठ डोहात डुंबूनही, रहातो आपण कोरडे कोरडे
चुटपुटतो जीव धापा टाकत उसासतो वेड्यागत
उगा मन रहातं हिंदकळत दगड टाकल्या पाण्यागत
तो ओढाळ-ओढाळ वास अजूनही येतो
दाटून येतात कढ, श्वास घुसमटून जातो
मन होतं वेडंपिसं सांडलेले क्षण वेचता वेचता
लगबगतो जीव पाठी फिरता-फिरता
तेवढ्यातही फुटतात कोंब, मनाच्या गाभ्याला
क्षणिक का असो, उमलतेही पालवी मनाला
आठवणींच्या काळोख्या कप्प्याकप्प्याला आहे काचेचे दार
अंधुकसे दिसतात चेहरे सारे पण होता नाही येत पार
जाणवतात बंद दाराआडचे निश्वास नि दूरवर खोल हुंकार
घुमतात परिचित आभास नि परावर्तित होणारी गाज
दूर पहाता दिसतात लुकलुकताना माणुसकीचे दिवे
काळोखाचा होतो निचरा, प्रकटतात आठवणींचे थवे
धुसर चेहेऱ्याच्या बऱ्याच आठवणी करतात एकदम गलका
आतुरतेने, आकांताने देतात दारावर वारंवार धडका
दिसते रांगणारी गोंडसता ते दुडदुडणारी दांगटगर्दी
मस्तीखोर बेशिस्तीपासून ते शिस्तपूर्ण कवायती
दाराआडून डोकावतो मग गोबरा एक चेहेरा
सवय लागेस्तोवर शाळेचा कंटाळा करणारा
आईचा सोडताना पदर, डोळे भरुन येणारा
उगा कौतुकाला आसुसलेला हळवा निरागसपणा
झरझरतो काळ जलद चलचित्रागत डोळ्यांसमोर
जाणवतो हात तुमचा आयुष्यचित्राच्या रेखेरेखेवर
धाकाच्या धपाट्यापासून ते जिवाच्या जिव्हाळ्यापर्यंत
पाठी लागलेल्या शिस्तीपासून पाठ राखणाऱ्या आश्वस्त मिठीपर्यंत
जगण्याच्या सुरवातीपासून ते जग जिंकायच्या इर्षेपर्यंत
काळजातल्या ओलाव्यापासून नजरेतल्या निखाऱ्यापर्यंत
लोखंडाच्या परीसस्पर्शाच्या ध्येयप्रक्रियेच्या पूर्ततेपर्यंत
जागतात आठवणी, बापुडा जीव आसुसतो क्षणाक्षणाला
आपुलकीच्या ओढाळपणाला, मायेच्या वर्षावाला
आभाळाच्या छायेला नि सांभाळणाऱ्या सावलीला
चांदोमामाच्या सोबतीने, तिन्हीसांजेच्या दीपज्योतीला
आयुष्याच्या प्रगतीला होती जिद्द तुमच्या ध्येयाची
वळून पहावं जेव्हा, पाठराखण तुमच्या सावलीची
स्वप्नांना घेऊन उशाशी, आम्ही घरटी आभाळात केली
भावनेची गुंतवणूक तुमची, क्षितीजे आमची विस्तारित गेली
साठाव्या आठवणी, या आठवाव्या साठवणी
कराव्या हळूवार गोळा, नयनांच्या रांजणी
बनवावी दोन ओतीव, गाळीव त्यांची टिपं
असावी जी दाट, नात्याहूनही नीट
यावी त्यांना गूढ, सागराची अथांगता
ध्रुवाहूनही अढळ मिळावी चिरंतनता
रहावी तेवत ती शिल्पं कृतकृत्य
बनून दीपस्तंभ दोन्ही डोळ्यांत
- यतीन सामंत
July 28, 2022
जगी मी जगलो कसा कळले नाही
पण भोगले ते कधी विसरलो नाही
आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती
स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही
मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो
तो सहवास लाघवी विसरलोच नाही
भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान
दोष! कधीही कुणाला दिलाच नाही
लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे
दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही
सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला
हताश होऊनी मी कधी हरलो नाही
त्या कृपाळू, दयाघनाची साथ आहे
भयभीत! मी कधीही झालोच नाही
जन्ममृत्यू! अटळ कालचक्र सृष्टीचे
त्यातुनी जगी कुणाचीच सुटका नाही
जगणेही सुंदर! त्याहूनही मृत्यू सुंदर
साशंक, मी मनी कधी झालोच नाही
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३९
२८ - १० - २०२१
October 29, 2021
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले,
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला,
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।।
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 12, 2020
सरतेच आहे आयुष्य सारे
तरी मी कोण कळले नाही
धावलो, मी मृगजळापाठी
कां? कसा ते कळले नाही
लाभली नाती ऋणानुबंधी
ओढ कधी जाणवली नाही
भावनां, साऱ्याच कोरड्या
मनांतर कधी भिजले नाही
जगणे सारेच भोग भाळीचे
मी त्यास कधी टाळले नाही
जे लाभले ते निमूट भोगीले
त्रागा कधीच मी केला नाही
सत्संगास मी सदा भुकेलेला
तो मार्ग कधीच सोडला नाही
प्रारब्धयोगा भोगूनी संपवावे
हा विचार मी अव्हेरला नाही
विवेके केवळ सत्कर्म करावे
सूत्र! जगण्याचे भुललो नाही
कधीतरी भेटेलही तो भगवंत
ही मनीषा कधी सोडली नाही
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८६.
१९ - ३ - २०२२.
April 1, 2022
जेंव्हा जेंव्हा प्रवासाने
आम्ही दोघे दमलेलो असतो ........
थकून, कंटाळून घरी येतो,
झोमॅटो तिला नको असतं,
म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते !
माझी आवड सांभाळून ती
सांडगे पापड़ हि तळते .....
त्यासोबत न विसरता
लोणच्याची फोड वाढते
कारण आम्ही दोघे दमलेले असतो
तेंव्हा खरंच पिठलं भात
असा साधाच बेत असतो !
कैरी लिम्बाचे लोणचे ....
नेहमीच जेवणात असते.
म्हणून ती मिक्स भाज्यांचे
खमंग लोणचे सुद्धा बनवते
ती कंटाळली की नेहमी असेच होते.....
पिठल भात असा साधाच बेत ठरवते !
भात शिजे पर्यन्त रिकामा वेळ आणि ......
प्रवासातील थकव्याचा सुंदर मेळ मी घालतो..
दोनच ग्लास बियर घेऊन घसा ओला करतो..
कारण पिठलं भात असा साधाच मेनू असतो !
बियर सोबत,मला आवडतात म्हणून ...
चार कांदा भजी ती तळते ...
साध्या मेनूत हि रंगत आणते
कारण जेंव्हा जेंव्हा ती कंटाळलेली असते,
तेंव्हा तेंव्हा पिठल भात असा साधाच मेनू रांधते !
घरी आहेत म्हणून चार थेपले गरम ती करते
तुपाची धार सोडून त्यांना ओले करते ....
शेंगदाण्याच्या चटणी सोबत ..
टोमेटो काकडीची कोशिंबीर असते....
कारण पिठलं भात असा साधाच बेत ती करते !
जेवण खुप साधे झाले .....
हे तिलाही जाणवत असते....
फ्रिजमधल्या आइसक्रीमचे
फ्रूट सलाड ती बनवते
कारण ....
पिठल भात असा साधाच मेनू असतो !
साधाच मेनू असल्याने तिला, मी थोडासा नाराज वाटतो
उद्या नाश्त्याला मिसळीचे वचन देऊनच ती झोपी जाते ....
आमच्याकडे नेहमी असेच असते
ती कंटाळली की पिठल भाताला पर्याय नसतो !
संसार म्हणजे तडजोड आणि समझोता
मी नेहमीच करत असतो
ती दमली की पिठलं भात असा साधाच बेत नेहमी असतो !
ती माझी गृहलक्ष्मी,
कंटाळली तरी,अन्नपूर्णा असते.
चेहऱ्यावर स्मित बाळगून
माझी रसना तृप्त करते !
-- अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
May 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti