शिवापासून वेगळा झालेला जीव
पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा
काळ म्ह्णजे जीवन...
पण जीव रमतो
जगण्यातील मजा लुटण्यात
आणि गुंतून पडतो असंख्य मोहात...
शिवाला विसरलेल्या जीवाला
पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच
कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय
महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत...
कवी- निलेश बामणे
March 7, 2016
इवलेसे लहानसे
होते विश्व ते छानसे
चार भिंतितले कसे
ते मोरपंखी जसे।।१।।
मनमानी वागायचे
हवे तेव्हा उठायचे
दिस कोड कौतुकाचे
पिलू आई-बाबांचे।।२।।
भोकाड पसरायचे
लोटांगण घालायचे
ढोंगी बगळा व्हायचे
खोटच रडायचे।।३।।
पोट दुखतं म्हणावे
घरी खुशाल लोळावे
आईच्या मागे फिरावे
अभ्यासाला टाळावे।।४।।
बालपणी रमतांना
गमती आठवतांना
खुप खुप हसतांना
गंमत वाटतेना।।५।।
सौ.माणिक शुरजोशी
January 12, 2020
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 25, 2012
निरांजनात मी ज्योत,अखंड सारखी तेवत,
पुढे माझा भगवंत,
नतमस्तक मी राहत,--!!!
मी समईतील वात,
झिजत राहते सतत,
चाल माझी मंद-मंद,
उजेडाचे रक्षण करत,--!!!
मी पणतीतील ज्योत,
मंद तरीही ठळक,
तमाला मात देत,
सर्वांना मार्ग दाखवत,--!!!
चिमणीतली मी ज्योत,
इवलीशी पण काम करत,
धीमी - धीमी प्रकाशत,
भोवताल थोडा दाखवत,--!!!
मी घरातली लेक,
वाढले लाडांकोडांत,
तेज माझे प्रखर,
विश्वाला चकित करत,--!!!
*मी घरातली सून ,
कर्तव्ये सारी निभावत,
दिवस-रात्र की कष्टत,
परसुखासाठी जळत जळत*,--!!!
© हिमगौरी कर्वे.
January 8, 2020
सरतेच आहे आयुष्य सारे
तरी मी कोण कळले नाही
धावलो, मी मृगजळापाठी
कां? कसा ते कळले नाही
लाभली नाती ऋणानुबंधी
ओढ कधी जाणवली नाही
भावनां, साऱ्याच कोरड्या
मनांतर कधी भिजले नाही
जगणे सारेच भोग भाळीचे
मी त्यास कधी टाळले नाही
जे लाभले ते निमूट भोगीले
त्रागा कधीच मी केला नाही
सत्संगास मी सदा भुकेलेला
तो मार्ग कधीच सोडला नाही
प्रारब्धयोगा भोगूनी संपवावे
हा विचार मी अव्हेरला नाही
विवेके केवळ सत्कर्म करावे
सूत्र! जगण्याचे भुललो नाही
कधीतरी भेटेलही तो भगवंत
ही मनीषा कधी सोडली नाही
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८६.
१९ - ३ - २०२२.
April 1, 2022
छान चाललंय सगळं आपलं,
फक्त थोडंसं वातावरण तापलं,
गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,
हळूच स्मृतींच गाठोड मापलं…
इतभर सुख गोड मानलेलं,
पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,
सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,
गुपीत तरी कोणी जाणलेलं?
झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,
आयुष्य भूरर्कन निघून गेलं,
रेसलींगच्या या वाटेवरती,
नेहमी भेटलं सारख्यास वारखं…
तूं तू – मी मी करता करता,
नात्यांचा धागा झीजुन गेला,
आपलेपणाचा काळा शालू,
माणुसकीने पांघरलेला……
– श्वेता संकपाळ (१७-०७-२०१८)
July 21, 2018
या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
© हिमगौरी कर्वे.
March 2, 2020
एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली. अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे.
January 30, 2019
माझ्या अक्षर यात्रेतल्या प्रवासात
स्पदनांचं धुकधुकणं थांबलंय
अफाट वेगाची मर्यादा
भोवाळतीय मनाला
सतत धावणं ,सतत गुरफटणं वळणांचा ससेमिरा
ही फार रे..
पायाखालचा रस्ता भुलवत नेतो
त्या सांदी कपारीतून
अव्यक्ताचं देणं असल्या सारखं
शोध कुठवर घ्यायचा ..?
मग माझ्या मनातले गहींवर
ओंथंबून येतात..
एकेक शब्द लयींचा किनारा होतो..
निळ्याशार शाईचा समुद्र होतो..
बुद्धी भ्रष्टतेचे फासे दोन ,चार सहा
कसे ही पडतात..
पण एक अधांतरी असणारा विचार
स्थिरावतो ,त्या गुलाबी कागदी नभावर
माझी कविता सहत्रावर्तनात
अवतरते अलगद,हळुवार त्या
त्या मेघमालांचा साक्षात्कार घडवत
तूफान कोसळतो विचारांचा नभ
एका उन्मुक्त कवितेचा
जन्म होतो .. माझ्याच अश्रुंच्या
उधाणलेल्या तांडवात...
-- ©लीना राजीव.
September 14, 2019
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।
पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१
शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी
शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि....२
शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी
ज्ञानीजन ते असती, अगाध ज्यांची मति
टीका करीत राहूनी, विसरती ते अडचणी
परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 12, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti