तुझा उपयोग नाही काम झाल्यावर
तुला उमजेल का आराम झाल्यावर ?
पुढे घेऊन जाते सायकल साधी
कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर
तुला समजेल बघ आहे किती सुंदर !
तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर
नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर
विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर
तुझा आवाज बाकी गोड आहे; पण
नको बोलूस तू बेफाम झाल्यावर
बदल घडला जरी चिंताजनक मोठा
दखल घेईल जग परिणाम झाल्यावर
-- ॐकार जोशी
July 31, 2019
रोज थोडे तरी कार्य
केल्यावाचून राहू नकोस,
ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरु नकोस....
तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही...
पायात पाय घालून पाडवतीलही....
घाबरून त्यांना तू तुझं
उभे राहणं सोडू नकोस..
सद्गुरू पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असंही नाही...
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास कधी कचरु नकोस...
सद्गुरु पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुला सुद्धा मन आहे
माहीत आहे सद्गुरूला.....
पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं
मात्र कधी सोडू नकोस ...
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
रडावंसं वाटत तेव्हा
रडून सरळ मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
लढून ही मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य कधी विसरू नकोस
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझ्या कार्याचे पुरावे
कोणाला द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य
सोडायचीही गरज नाही....
सद्गुरू संकल्पासाठी पुढे
चालणं सोडू नकोस..
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
February 23, 2019
माझाच जन्म व्हावा
म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...
माझ्या जन्माचं कोडं
त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...
माझा जन्म आता
मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...
मला शक्य असतं तर
या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...
किती बरं झालं असतं
या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
June 6, 2017
ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो..
घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कष्टकर्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ
फक्त हिमतीने लढ
!! आवडली तर इतरांनाही Share करा !!
June 7, 2017
लिहितो मराठी बोलतो मराठी
शिकतो मराठी शिकवते मराठी
संस्कार मराठी संस्कृती मराठी
शब्द मराठी शब्दात मराठी
म्हणून भाषा मराठी
सण मराठी वार मराठी
उत्सव मराठी उत्सवात मराठी
पाडवा मराठी गोडवा मराठी
वारी मराठी वारकरी मराठी
म्हणून टाळ चिपळीचा नाद मराठी
विर मराठी शुर मराठी
तिर मराठी नुर मराठी
सैनिक मराठी सैन्यात मराठी
क्रांतीवीर मराठी स्वातंत्र्यवीर मराठी
म्हणून मातीत मराठी
ताल मराठी चाल मराठी
सुर मराठी स्वर मराठी
गीत मराठी संगीत मराठी
गाणं मराठी गाण्यात मराठी
म्हणून सरस्वतीची विणा मराठी
मनात मराठी कणात मराठी
देहात मराठी रक्तात मराठी
ढाल मराठी तलवार मराठी
भगवा मराठी सह्याद्री मराठी
म्हणून शिवाजी महाराजांचा बाणा मराठी
देश मराठी वेश मराठी
धर्म मराठी कर्म मराठी
जात मराठी बात मराठी
माणूस मराठी माणसात मराठी
म्हणून बहिणाबाईच्या ओवीत मराठी
लेखणी मराठी देखणी मराठी
बोल मराठी बोलणार मराठी
लिहा मराठी लिहिणार मराठी
जागवा मराठी वाचवा मराठी
कारण माझी माय मराठी
-'संजय धनगव्हाळ'
(अर्थात कुसूमाई)
९५७९११३५४७
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक संजय धनगव्हाळ ह्यांनी लिहिलेली ही कविता...
February 27, 2024
सुचले होते सारे कांहीं , ढळत्या आयुष्यीं ।
संधिप्रकाश दिसत होता, सूर्य अस्ताशीं ।१।
काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे ।
कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे ।२।
समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें ।
खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे ।३।
विषय सारे अथांग होते, अवती भवती ।
कसा पोहू या ज्ञान सागरीं, विवंचना होती ।४।
निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न लागे ।
क्षणांत चमकूनी प्रकाश देणें, हीच विजेची अंगे ।५।
वर्षा येवून निघून जाते, न्हाऊं घाली धरणीला ।
हिरवे प्रफुल्लित वातावरणीं, आनंद दिसे सर्वाला ।६।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 30, 2016
कितीही सारी धडपड करशी
लाचार ठरतो अखेरी
जाण माणसा मर्यादा तव
आपल्या जीवनी परी ... ।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी
जीवन असे तुझे सारे
पतंगा परि उडत राहते
जसे सुटत असे वारे... ।।
निसर्गाच्याच दये वरती
जागत राहतो सदैव
कृतघ्न असूनी मनाचा तूं
विसरून जातो ती ठेव... ।।
निसर्गाच्या मदती वाचूनी
जगणे शक्य नसे तुजला
जीवन कर्में करीत असतां
आठवित जा त्या प्रभूला... ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 28, 2019
दिवस बदलले तरी
'Middle Class' जात नाही
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
दुधाची साय, तुपाची खरवड
तिळाची वडी, पुरणाची पोळी,
आईच्या जेवणाची सर
पिझ्झाला येत नाही.
हॉटेलात गेले तरी
मेनूवर 'दर' दिसत राही
रिक्षा केली तरी
मीटरवरून नजर हटत नाही.
जीन्स घातली तरी
साडीची हौस सुटत नाही.
घरातून निघताना आजही
पाया पडायला विसरत नाही.
शो रुमचे दर पाहून
पाय ठेववत नाही.
केली खरेदी जास्त
तर झोप येत नाही.
नाताळ साजरा केला,
'विश' केले 'मदर्स डे'ला,
तरी वाढदिवसाला आईने
ओवाळणं सुटत नाही.
घर कितीही मोठ्ठ असो,
सगळे असताना, गप्पा मारत
हॉलमध्ये, ओळीने झोपण्यासारखी
मजा कशातच येत नाही.
पैसा असो पैसा नसो
स्वभाव जात नाही.
सुंभ जळला तरी
पीळ जळत नाही.
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
-- WhatsApp वरुन आलेली पोस्ट. आवडली म्हणून शेअर केली.
-- सुशांत
July 1, 2017
July 5, 2013
हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे.
( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ
प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार)
**********
रापी चालवताना
त्याने माझ्याकडे क्षणभर वर खाली पाहिले
आणि दयनीय स्वरात
तो हसत म्हणाला -
'बाबुजी, खर सांगू - माझ्या नजरेत
कोणी छोटा नाही
कोणी मोठा नाही
माझ्या दृष्टीने प्रत्येक माणूस एक जोडी चप्पल आहे.
जो माझ्या समोर
दुरुस्ती करीता उभा आहे.
आणि मुख्य गोष्ट म्हणजे
तो आपल्या जागी कोणीही असो.
जसा आहे, ज्या ठिकाणी आहे.
आजकाल, कोणीही व्यक्ती चपलेच्या मापाबाहेर नाही.
तरी सुध्दा माझे लक्ष असते की
व्यावसायिक हात व फाटलेल्या चपलेच्या मध्ये
कोठे ना कोठे एक साधारण माणुस आहे
ज्याच्यावर टाके पडतात
जो चपलेच्या बाहेर डोकावणा-या अंगठयाची जखम
छातीवर घाव सोसत सहन करतो.
येथे नानाविध चपला येतात
आणि माणसाला निरनिराळया आपआपल्या पसंती दाखवतात.
सर्वांचा आप आपला चेहरा आहे.
आपआपली शैली आहे.
उदाहरणार्थ- एक चप्पल आहे
चप्पल काय ती एक ठिगळांची थैली आहे
जिला एक चेहरा वापरतो
जो देवीच्या व्रणाने भरलेला आहे.
विश्वास दर्शक हसण्यामध्ये
टेलिफोन खांबावर अडकलेली पतंग आहे.
जी फडफड आवाज करीत आहे
'बाबुजी या चपलेवर पैसे व्यर्थ का उधळता?' ,
मी हे बोलु इच्छितो परंतु
माझ्या आतुन एक आवाज येतो-
काय मानुस आहे?
आपल्या जातीवर थुंकतो आहेस,
तुम्ही विश्वास ठेवा त्या क्षणी मी
ठिगळाप्रमाणे मी डोळे शिवुन घेतो
आणि संकटात पडलेल्या माणसाची
मोठ्या मुश्कीलीने सुटका करतो,
एक चप्पल अशी आहे
जी गुंफून एक माणुस निघतो सफरीवर ,
तो हुशार नाही वेळेचा ताबेदार नाही
त्याच्या डोळ्यात लालच भरलेली आहे
हातात त्याच्या घड्याळ आहे
त्याला कोठे जायचे नाही परंतु
चेह-यावर त्याच्या गडबड आहे
तो कोणी व्यापारी आहे किंवा दलाल
परंतु उध्दट असा कि हिटलरचा नातु आहे
इथे बांध,तिथे काप, इथे ठोक तिथे पिट
चांगले घास,असे चमकवं, चपलेचा आरसा बनवं
ओफ्फ किती उकाडा आहे!
रुमालाने हवा घेत तो हवामानावर संतापतो
सडकेवर येणा-या जाणा-यावर
वानराप्रमाणे टवकारुन पाहतो
यावर कडी म्हणजे घंटाभर काम करुन
मजुरी देताना साफ नाटक करतो
सज्जन लोकांना लुटता का ? असे डाफरत तो
काही नाणी फिरकावतो व
पुढे निघून जातो.
अचानक दचकत तो सडकेवर धावतो
आणि मार्गस्थ होतो.
व्यवसायावर जेव्हा घाव पडतो
तेव्हा कोठेतरी एक चोर खिळा
दबा धरुन वेळ मिळताच
अंगठ्यात रुततो.
याचा अर्थ असा नाही की माझा
गैरसमज झालेला आहे.
प्रत्येक क्षणी मला असे वाटते की
चप्पल व व्यवसायाच्या दरम्यान
कोठेतरी एक साधारण माणुस असतो
ज्याच्यावर टाके पडतात
जो चपलेच्या बाहेर डोकावणा-या बोटाची जखम
छातीवर हातोड्याचे घाव सोसत सहन करतो,
आणि बाबुजी, खरे सत्य हेच आहे की
जिवंत राहण्यासाठी खरा तर्क नसेल तर
रामनाम विकून या वेश्यांची दलाली करुन
रोजीरोटी कमावण्यात काहीच फरक नाही
आणि हेच ते ठिकाण आहे जिथे
प्रत्येक माणुस आपला धंदा सोडून
गर्दीत उजळणारा हिस्सा बनतो
सगळ्या लोकाप्रमाणे
भाषा त्याला चावते
मौसम सतावतात
आता तुम्ही त्या वसंताकडे पहा.-
हा दिवसा धाग्याप्रमाणे ताणतो
झाडावरील लाल लाल हजारो पानांच्या टोकाला
उन्हात शिजवण्यासाठी लटकावतो,
खरे सांगतो त्या समयी
रापीची मुठ हातात सांभाळणे
फार मुश्कील बनते
डोळे कोठे जातात तर हात कोठे तरी चालतो
मन त्रासलेल्या बालकाप्रमाणे
कामावर परतण्यास इंकार करते
वाटते की चमड्याच्या सज्जनतेमागे
एखादे जंगल आहे
जो माणसावर
झाडामागून वार करतो
आणि हे धक्कादायक नव्हे तर विचार
करण्या योग्य गोष्ट आहे,
परंतु जो जीवनाला पुस्तकांनी मापतो
जो सत्य आणि अनुभवाच्या दरम्यान
हत्येच्या क्षणी डरपोक आहे
तो मोठ्या सहजपणे म्हणू शकतो
यार तु मोची नव्हे तर शायर आहेस
जो विचार करतो की आग
सर्वांना जाळते, सत्य सर्वांच्या पलीकडे आहे
काही आहेत ज्यांना शब्द गवसले आहेत.
काही आहेत जे अक्षरांसमोर आंधळे आहेत
ते प्रत्येक अन्याय चुपचाप सहन करतात
आणि पोटाच्या आगीसमोर डरपोक बनतात.
जेव्हा मी हे जाणतो की-
"नकाराने व्याप्त एक आरोळी "
आणि "एक समजुतदार मौन"
दोघांचा मतलब एक आहे
भविष्य घडवण्यासाठी 'मौन' व 'आरोळी'
आप आपल्या जागी एक प्रकारे
आप आपले कर्तव्य बजावीत असतात.
-- विजय प्रभाकर नगरकर
December 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti