एक होती अनु
फुलासारखी जणू
डोळे फिरवी गर्र गर्र
पाऊल टाकी भरभर
तिला लागली भूक
गडू दिला एक
बघितला रिकामा गडू
तिला आले रडूं
आईने दुध भरले
कांठोकांठ ओतले
तिला हवय जास्त
दूध आहे मस्त
रडरड रडली
आदळ आपट केली
सांडूनी गेला गडू
पाठींत बसला मात्र धम्मक लाडू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे,
नाहीसे का आज ओढाळ,--!!!
मंदमंद प्रेम प्रकाश,
हळूहळू नाहीसा होई,
जीवनीचा तम मग,
बघ, कसा वाढत जाई,--!!!
रोज रोज अमावस,
असे कसे चालायाचे,
रात्रंदिनी निष्प्रभ खास,
चंद्र - चांदणे मज भासे,---!!!
अनुभवल्या जिथे पोर्णिमा,
चंदेरी धवल लख्ख,
तेच प्रेमाभाळ वाटे,
धूसर तममय मख्ख,--!!!
कुठे गेला माझा चंद्र,
आणि त्याचे प्रेमळ चांदणे,
विरहार्त गीत गाई,
पक्षी एकाकी दिवाणे,--!!!
चंद्र चांदण्या भरून बहरे,
खरे तर रात्र लोभसवाणी,
जशी ती जवळ येते,
आठवांनी काळीज चरे,--!!!
या रम्य निरव एकांती,
पुन्हा एकदा तू जवळ यावे, पहिल्यासारखे लाजलाजूनी,
कवेत माझ्या सामावून जावे,--!!
पुन्हा एकदा व्हावा तो, लाजराबुजरा शृंगार ,
नदीस जसा सागर भेटतो,
बघत राहावे त्यांचे उभार,--!!!
© हिमगौरी कर्वे.
February 29, 2020
ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते !
इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!!
हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके,
झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!!
कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले,
ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले !!३!!
आईची परी पाठवणीत आश्रूंनी भिजली, बाहुली बाबांची हृदयातच निजली,
खळी गालांवरची ओठांत मिठली, मायेची ममता हुंदक्यात थटली !!४!!
मग माझ्याच घराचे बारसे जाहलें, माहेर म्हणवून पाहुणी बसवले,
हक्काच्या सदनीं पाहुणचार लडिवाळला, चार दिवसांत परतीचा निरोप गोंजारला !!५!!
माप ओलांडता लेक परके धन झालीं, नाळ कपल्याची वेदना मज तेव्हा बोचलीं,
कुठलं माहेर अन् कुठलं सासर होत? पोरकेपणात गुंफवणारी होती रेशीम गोठ !!६!!
-- कु. श्वेता काशिनाथ संकपाळ.
" गोठ " (१२/११/२०१९)
November 13, 2019
खेळ त्याचेच सारे
तो कुंभार आगळा
घडवितो, तोडितो
सर्वा लावीतो लळा
तो जीवाचा आत्मा
श्वासास जगविणारा
ब्रह्मांडी त्याची सत्ता
तोच एक तारणारा
जगणे केवळ भोगणे
प्रारब्धा मिठित घ्यावे
जन्ममरण प्रवास एक
चालता त्याला स्मरावे
पुनरपी जननं, मरणं
निर्णायक तोची ईश्वर
उगाच, कशाला चिंता
जगती सारे आहे नश्वर
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२४
३/९/२०२२
October 2, 2022
रेणुके जगदंबे आई दर्शन दे मजला
तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।
तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक
न होई चित्त एक
तूंच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
जमदग्नीची कांता परशूरामाची तूं माता
मनीं तुजला भजतां
आशिर्वाद तूं देई आनंदानें सर्वांला ।।२।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
गेले माझे जीवन तुझे नाम घेऊन
कंठ आले दाटून
चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,
परि न कळली रित
अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
नको मजला धन विटले आतां मन
सोडव मोहमायेतून
चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 14, 2020
विझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत
वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत ।
झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात
समई देवापुढील ही झालीय आता शांत ।
विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी
किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत ।
नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा
नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा एकांत ।
शिसवीचा पलंग सखे आतूर तुज भेटण्याला
आनंद सखे त्याचा न मावतसे या गगनात ।
सजला तो बकुळ फुलांनी स्वागतास सिध्द झाला
होईल स्वप्नपुर्ती त्याची सखे आपुल्या मिलनात ।
ये ग सत्वरी आता नको धरु शंका मनात
होईल मीलन अपुले मिळता नजर नजरेत ।
अधराशी मिळता अधर विसर पडेल या जगाचा
दोन शरीरांचे होईल मीलन दोन हृदये एक होता ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
२८ आक्टोंबर २०१८
November 16, 2018
एक भिकारी लीन-दीन तो,
भीक मागतो रस्त्यावरी,
फिरत राही एकसारखा,
या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।।
दिवस भराचे श्रम करूनी,
चारच पैसे मिळती त्याला,
पोटाची खळगी भरण्या,
पुरून जाती दोन वेळेला ।।२।।
मिठाई भांडारा पुढती,
उभा ठाकूनी खाई भाकरी,
केवळ मिठाईचा आस्वाद,
त्याच्या मनास तृप्त करी ।।३।।
देहाखेरीज कांहीं नव्हते,
त्याचे 'आपले' म्हणण्यासाठी,
परि समाधानी वृत्ती असूनी,
कल्पनेतील आनंद लुटी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 29, 2016
लोचनातुनी ओघळता मौन तुझे
प्रीत अर्थवाही अश्रुतुनी पाझरते
तूं ही अशीच अबोली सुंदर मुग्धा
तुला शोधण्या ही नजर भिरभीरते
ग्रहगोलांच्या अवकाशी भास तुझे
संध्याछायेत तुझेच रूप ओसंडते
मनगवाक्षी कवडसेच तव प्रीतीचे
अंतरंग माझे भावस्पर्शी दरवळते
जन्मोजन्मीचे नाते ऋणानुबंधी
मनांतराला अलवार कुरवाळीते
अशीच सुंदर मौनी प्रीत लाघवी
या श्वासाला शांत जगवित रहाते
*********
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. 321
6/11/2022
December 17, 2022
निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.
तो माणूस म्हणाला, 'माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.
बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.
साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!
ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!
July 8, 2016
आगमनाची प्रतीक्षा मज
तू श्वासांची शृंखला..
भावनांची विश्वस्त ठेव
तू सागरीचा शिंपला ..
काट्यात अडते पाऊल
तू फुलांचा सडा..
ह्रदयाच्या काठोकाठ
भरला प्रेम घडा..
रात्र चांदण्यांची नक्षी
तू चंद्र शीतल..
सांज आठवांची मैफिल
तू क्षितीज तरल..
सूर ताल लय संगीत
तू छेडीता तारा..
सप्तरंगी सजते इंद्रधनु
तू रंगांचा नजारा..
उन्मळून पडल्या पानांची
तू नवी पालवी..
जुन्या वळणावरती
तू वाट नवी..
फुला पानांत निजलेल्या
तू दवांच्या ओळी..
सुख स्वप्न साकार व्हावे
पहाटेच्या वेळी..
पुसटशी हातावरची
तू माझी जन्मरेख..
जन्मभर आखला हा
प्रेमाचा आलेख..
July 14, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti