चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली
वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे
आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे
घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा
मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा
भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला
कचरा आणि घरटे काढून खिडकीतुनी फेकला
काम संपवूनी सांज समयी घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे पाहून चकित झालो
पहाट होता चिमण्या उडाल्या काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस परी जिद न सोडी ते
चार दिवसाची सुटी घालउन गांवाहून परतलो
घरटे बघता संताप येऊन मुठी वळवूनी धावलो
घरट्या मधूनी चिमणी उडाली बसली पंख्यावरती
चिव चिव करुनी विनवू लागली दया दाखवा ती
परी मी तर होतो रागामध्ये चढलो माळ्यावरी
मन चरकले बघून अंडी छोट्या घरट्यामध्ये
असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज करुणायुक्त नयनी
यश मीळाले तिनेच शेवटी भूत दया जागवूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 29, 2019
सय माहेराची येते
मन झुलते झुलते
क्षणात माहेरी जाते
मी तिथेच रमते।।१।।
आहे प्रेमाचे आगर
तिथे मायेचा सागर
घडे प्रितीचा जागर
हा बंधू भगिनीत।।२।।
हे केवड्याचे कणीस
सुगंध रातराणीस
बकुळ माळे वेणीस
परसदार खास।।३।।
मित्र मैत्रिणींचा मेळा
जमतो ना वेळोवेळा
झिम्मा फुगडीही खेळा
हा मैत्रीचा सोहळा।।४।।
आई माझी सुगरण
करी पुरण वरण
मिळे स्वादिष्ट भोजन
अगत्याचे योजन।।५।।
आठव साऱ्या साऱ्याची
मनी पिंगा घालायाची
अडसर संसाराची
ओढ ही माहेराची।।६।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 13, 2020
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं,
जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।।
वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं,
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।।
जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी,
जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला,
परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।
प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे सरकण्याचा,
शक्तीरुप तेथेंच असूनी त्याच्यांत सामावून जाण्याचा ।।५।।
भीती मनीं वसते कसे जाऊं आंसाकडे,
तुकडे होतील देहाचे जेव्हां आसांत पडे ।।६।।
सोडूनी देण्या सारा खेळ केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे,
विसरुन जाता देहाला प्रभू समर्पण करण्यांत असे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 28, 2017
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 27, 2016
काय आणि कसे बोलतो,
त्यांना माहीत नव्हते,
सहजपणे सुचणारे,
संभाषण ते असते ।।१।।
शिक्षण नव्हते कांहीं,
अभ्यासाचा तो अभाव,
परि मौलिक शब्दांनी,
दुजावरी पडे प्रभाव ।।२।।
जे कांहीं वदती थोडे,
अनुभवी सारे वाटे,
या आत्म्याच्या बोलामध्ये,
ईश्वरी सत्य उमटे ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 25, 2016
बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव
उमटविती भाव मनावर आमच्या ||१||
चांदण्याची शितलता,मनाची प्रफूल्लता
देहाची आल्हादकता लाभली चंद्राचे ठायी ||२||
नाजूक सहवास, मधूर मिळे वास,
कोमलतेचा भास जाणविला फूलांनी ||३||
रंगाची विविधता, छटाची आकर्षकता,
मनाची वेधता इंद्रधनुष्य देई || ४||
पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता,
वेगाची तीव्रता, भासे हरिणाच्या पायी ||५||
प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता,
स्वभावाची निर्मलता, समजली नदीमुळे ||६||
शक्तीचे दर्शन, क्रूरता भयान,
निर्दयतेची जाण, दिसली हिंस्त्र पशूत ||७||
जीवनाची प्रेमलता, हृदयातील अक्षरता,
भावनेची कोमलता मातेच्या रुपाने मिळाली ||८||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
February 16, 2015
ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।
आम्ही बंधू चौघेजण,
झालो एका पिंडातून,
कसा येईल भाव परका ?
असतां एकची जीव, चार शरीरीं
कैकयीला भरत विचारी ।।१।।
वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
आदर्श जीवन रघूवंशाचे,
कसली शंका मनांत होती ?
पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
कैकयीला भरत विचारी ।।२।।
सर्व जणांचे प्राण होता,
जगणे कठीण झाले आतां,
रोष कशाला घेसी त्याचे,
अकारण ते आपल्या शिरावरी ?
कैकयीला भरत विचारी ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 3, 2017
खिळ्यांचे जगही असेच असते,
चुकांमधून सुधारत असते !
लहान खिळ्यांना चुका म्हणतात,
चुकता चुका खिळे होतात !
चुकांचे सुद्धा किती प्रकार,
टेकस, छोटेखिळे विविध आकार !
लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय?
खिळे बनवितांना चुका झाल्या काय?
चुकल्या चुका, नादावले खिळे,
चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे !
रुसल्या चुका, रुसले खिळे,
लाकडात शिरण्या नाही रुचे !
किती वर्ष असे लपून राहायचे?
मुक्त श्वास घेण्या कधी बाहेरे यायचे?
आमचे जीवन असेच सरायचे,
चाकोरीच्या बाहेर कधीच नाही जायचे !
हातोड्यांचे घाव सोसतो आम्हीं,
स्वत:चा कार्यभाग उरकता तुम्हीं !
-- जगदीश पटवर्धन
February 9, 2016
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ती' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ती रुप आकार त्यासी नसती
शक्ती समजोनी करावी भक्ती आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित विद्वान सामान्यात
बहूजनांपेक्षां ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ती सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।
तर्क शक्ती थोर “आहे चा नाही” करणार
“नाहीं ला आहे” पटविणार , करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद वाद करीत राही
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय हे साध्य, मार्ग हे साधन
वाया जाई आयुष्य माध्यम साधन समजून ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।
अनेक मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
सकळजन आयुष्य खर्ची त्या पोटी ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
टाकी आयुष्य मातीमोल करुन ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
नष्ट करा त्वरीत लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।
न कुणी मोठे न लहान सारेच आहे समान
असती सारे मानवनिर्मित घ्या सारे समजून ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
न कळे अज्ञाना सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।
मानव शक्ती तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
सगुण रुप देऊनी आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
जीवन सुखी करण्या प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 17, 2021
रंगात उधळल्या
किरणांच्या ओळी..
लपून छपून चालला
कुठे तू सांजवेळी?
मोरपंखी रंगाचा
मोरपीस अलवार..
सांज नभातून
झुकली तालेवार..
आल्हाद मनाचा
राजस सुकुमार..
बासरी वाजवीता
मन झाले अधीर..
रंगात रंग सावळा
उतरलाच गाली..
सांजेची आभा
लालेलाल झाली.
July 8, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti