पहाटे जाग येते तेव्हा
खिडकीतून चंद्रप्रकाश
अंगभर पसरलेला असतो
जणू आईच्या मायेची
अंगभर चादर पसरतो
शीतल शांत निराकार
आईची कुशी उबदार
जावेसे वाटते फार चंद्रा
तिच्या मायेच्या मांडीवर
चंद्रा तुझ्या शितल
चांदण्याचा स्पर्श
जणू मायेने तोंडावर
फिरतोय आईचा हस्त
आहे ना रे आई माझी
तुझ्या संगे देवापाशी?
तिच्या मायेचा हात
असेच येऊ दे तुझ्या किरणात!
-- विनायक अत्रे.
July 15, 2022
विषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल
July 25, 2017
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 23, 2020
हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी
केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी १
असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे
सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे २
सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी
कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी ३
मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा
सर्वजणाची दु:खे झेलण्या, वज्र देह हा धारीला असवा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 15, 2021
एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत
पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी
भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व.
वात पित्ताची प्रकृती त्याची.
थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.
लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,
कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर
व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता,
मध्येच मान वर करून बघत होता,
विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,
हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर
सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या,
शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार
चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या
उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे
या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले
लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....
स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.
साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे,
हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।
तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,
अर्पितो भाव माझे श्री हरी....
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२
अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,
अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४
अर्पितो भाव माझे श्री हरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 15, 2019
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासरे पाव्हणं आलेत ग बाई
सासर्यांनी काय आणलंय ग बाई
सासर्यांनी आणली मिठाई
मिठाई मी खात नाही
सांगा मी येत नाही
दाराचं लॅच लावा ग बाई
गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई
सासुबाईंनी काय आणलंय ग बाई
सासुबाईंनी आणलीय पैठणी, पैठणी
साड्या मी नेसत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।२।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
नणंद पाहुणी आली ग बाई
नणंदेनं काय आणलंय ग बाई
नणंदेनं आणलंय रुचिरा ग बाई
स्वयंपाक मी करत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।३।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
हिरो पाहुणे आलेत ग बाई
त्यांनी काय आणलंय ग बाई
त्यांनी आणलेयं सुमो ग बाई
सुमोत मी बसते
सांगा मी निघते
पटकन् दार उघडा ग बाई
फ्रिजमधून कोल्डड्रिंक काढा ग बाई
October 11, 2018
दिवा होता छोटासा, एक मजकडे
इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे
तळांत होती योजना, तेल सांठवण्याची
शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची
छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन
मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी
देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे
प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे
केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं
व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती
ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं
तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2019
डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।
महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।१।।
जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।
आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।२।।
दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।
परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।।३।।
डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।
कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।।४।।
कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।
परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।।५।।
आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।
परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।।६।।
ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।
पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।।७।।
विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।
मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।।८।।
अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।
अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।।९।।
गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।
चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।।१०।।
विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।
परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।।११।।
ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।
हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।।१२।।
तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।
नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।।१३।।
अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।
चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी ।।१४।।
प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या ।
करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या ।।१५।।
दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे ।
आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे ।।१६।।
विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला ।
अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला ।।१७।।
फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले ।
कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।
विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा ।
वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा ।।१९।।
सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई ।
कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई ।।२०।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 7, 2018
भीतीपोटी सारे करतां
असेच वाटते....।।धृ।।
विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते
त्रिकाळ चाले पूजा अर्चा
प्रभूविषयी होई चर्चा
बालपणींच पडे संस्कार
सारे देण्या समर्थ ईश्वर
कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते....१
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,
चूक असे हे ठसें मनाचे
कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे
सहभाग नसे यात प्रभूचा
सारा खेळ असे तो मनाचा
अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते.....२
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
ऐषआरामाचे आम्ही पाठीं
धडपड चाले सुखासाठी
साशंक सदा मन असते
म्हणून सारे वंचित होते
मिळवण्यासाठीच त्याला भजावे, ही भावना मनी येते....३
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
वाद नसे ईश्वर शक्तीचा
चालवी सतत गाडा विश्वाचा
खेळ बघे तो दूर राहूनी
सारे देई तुम्हावरती सोपवूनी
परि मन वेड्या आशेने, त्याजकडे धावते...४
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti