( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
-- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !
May 3, 2021
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 9, 2021
November 24, 2021
बागेतील तारका-
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे
टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती
हातवारे करुन त्या, माना डोलावती
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी
अज्ञानी गरीब बिचार्या, जेंव्हा संकल्प करती
कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
December 3, 2012
दोन स्थरावर जगतो मानव, आंत बाहेरी आगळा ।
भिन्न भिन्न ते दर्शन घडते, यास्तव कांहीं वेळा ।।१।।
एकच घटना परी विपरीत वागणे ।
दुटप्पेपणाचा शिक्का बसतो, याच कारणे ।।२।।
देहा लागते ऐहिक सुख, वस्तूमध्ये जे दडले ।
अंतर्मन परि सांगत असते, सोडून दे ते सगळे ।।३३।।
शोषण क्रियेत आनंद असतो, ही देहाची धारणा ।
त्यागमधला आनंद मग तो, कसा कळे आत्म्याविणा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 30, 2015
दोघे मिळून आलां हातात घेऊन हात
हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात
दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे
सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे
एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती
रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती
ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत
गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत
एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे
एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com
September 5, 2018
June 8, 2010
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस... १
खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२
खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३
विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 9, 2015
उजाड रस्ता,
मोकळा पण भकास सूर्य
आणि उध्वस्त दिशा !
वाट नजरेच्या टप्प्यात आहे ,
पण पावलंच नाहीयेत ,
तरीही मला जायचंय
रांगत का होईना
मला जायचंय..
सगळं वाळवंट आहे.
तप्त उष्ण वाळू,
चटके बसतायत पावलांना,
गिधाडं घिरट्या घालतायत.
पाणी दिसतंय मला ,
पण फक्त डोळ्यातलं.
मला पळायचंय
वाचवायचंय स्वतःला...
काय सांगतोस ?
तो पण अडकलाय ?
अरे रे, तो ही अडकलाय,
हो मला कळलं
सगळेच अडकलेत.
बंधनात,
नात्यात,
प्रेमात
आणि व्यवस्थेत!
हळूहळू पोखरतेय ती मला.
कुरतडतेय माझी बोटं,
बधिर करत चाललीये माझी प्रत्येक नस,
जेणेकरून मी विसरेन मला,
मी विसरेन तुला,
मी विसरेन माणूसपणाला,
होईन एक प्राणी,
सर्कशीतला एक प्राणी,
"माणूस" नावाचा!
January 13, 2017
इमारतीचा झाला आहे आता खंडहर,
अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण,
एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला,
आहे का कोणी आपली काळजी घ्यायला?
काळ चालला आहे वेगात,
न थांबता, न संपता,
बिचाऱ्या पाहत होत्या वाट
आपल्या ‘कांती’ बदलाची !
ओसरला त्यांचा आनंद क्षणात,
आले होते कोणी इमारत पाडण्या,
काही होत्या सुपात काही जात्यात,
बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत !
संपला होता त्यांचा निवास,
करोनिया मन घट्ट,
सारोनिया दूर विचार,
फिरून नाविण्याचा पुनर्विचार !
जगदीश पटवर्धन
January 18, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti