नर्मदा परिक्रमा ही एकच अशी यात्रा आहे जिथे तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद सेवा मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते, असं मानलं जातं. प्रतिभा आणि सुधीर चितळे हे गेल्या चार वर्षांपासून ही सेवा देत आहेत. पुण्याहून यात्रेला निघताना चितळे दाम्पत्य आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी घेऊन निघतात. दरवर्षी अडीच ते तीन हजार भक्तांना- सकाळी आले तर चहा- नाश्ता. दुपारी आले तर भोजन आणि संध्याकाळी आगमन झालं तर जेवणाबरोबर झोपण्याची व्यवस्था केली जाते. त्यांच्या या सेवाकार्याविषयी..
एक तपश्चर्या म्हणून जेव्हा मी प्रथम नर्मदा परिक्रमा केली (नोव्हेंबर २००६) तेव्हा गेली अनेक वर्षे मनाच्या चांदण्यांत वास करून असलेली शांता शेळके यांची ही कविता सोबत होतीच..
दूर बासरी साद घालते कशी? कुठे?
सूर वाहती मला वाहती कसे? कुठे?
आभाळाच्या निळ्या कोंदणी खुणावते चांदणी
मी माझ्या मनातून सुटू पाहते तळमळते बंधनी
हे शब्दाविन ये आमंत्रण, कसे? कुठे?
परिक्रमेला निघण्याआधी मी माझ्या पतीला जेव्हा ही कविता ऐकवली तेव्हा ‘तुझं सगळंच जगावेगळं..’अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकत त्यांनी माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मात्र आम्ही परिक्रमा करून आल्यानंतर दीड वर्षांनी एका हळुवार क्षणी मी पुन्हा त्या कवितेची उजळणी केली तेव्हा मात्र त्यांचा बांध फुटला. पाणावल्या डोळ्यांनी माझा हात हातात घेत त्यांनी त्या कवितेच्या याओळी उद्धृत केल्या..
‘घर अंगणही पडले मागे, तुटले धागे कसे?
गूढ अशा त्या अभासाचे मजही लागले पिसे..
ऐकलं आणि वाटलं, जे हवं होतं ते सगळं मिळालं..’ प्रतिभाताई चितळे नर्मदा परिक्रमेमुळे जोडीदारामध्ये पडलेला जमीनअस्मानचा फरक उलगडत होत्या. नर्मदेच्या तीराने अनवाणी केलेल्या परिक्रमेने चितळे पती-पत्नीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आणि त्यांनी पुढील जीवन परिक्रमावासीयांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं ठरवलं. त्यानुसार ही जोडी गेली चार वर्ष (वर्षांतले आठ महिने) परिक्रमेच्या मार्गावर मुक्काम करत, नर्मदेच्या भक्तांना जेवणखाण्यापासून औषधांपर्यंत आणि कपडय़ांपासून पादत्राणांपर्यंत सर्व प्रकारची सेवा देत आहे.
प्रतिभाताईंचं स्फूर्तिस्थान म्हणजे त्यांचे मामा रामचंद्र वैद्य. त्यांनी तर तीन वेळा पायी परिक्रमा केली. तिसऱ्या फेरीच्या वेळी मामांचं वय होतं ८२ आणि मामीचं ७५. त्यांचे अनुभव ऐकताना प्रतिभाताईंचा निर्णय पक्का होत गेला. पण सुधीर चितळे यांचं म्हणणं होतं..‘देहाला एवढे कष्ट देण्याची गरज आहे का? तुझी इच्छाच असेल तर आपण आपल्या गाडीने एका महिन्यात परिक्रमा करून येऊ..’ आपलं हे म्हणणं पटवण्यासाठी त्यांनी अनेक सबबीही पुढे केल्या. परंतु पत्नीचा मनोनिग्रह बघून शेवटी ते तयार झाले. एवढी रजा कशी मिळणार म्हणून त्यांनी आपल्या नोकरीचा (सरव्यवस्थापक पदाचा) राजीनामा दिला. मात्र परिक्रमा सुरू झाली आणि त्यांची आधीची भूमिका (तू साधक आणि मी सेवक) हळूहळू बदलत गेली..
प्रतिभाताई म्हणाल्या, ‘‘परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक पैसाअडका बरोबर घेऊन कोणत्या तरी वाहनाने, किंवा अर्धी पायी व अर्धी किनाऱ्याने आणि तिसरी अनवाणी कोणतंही साधन न घेता निष्कांचनपणे. आम्ही तप म्हणूनच निघाल्याने शेवटचा पर्याय निवडला. सदाव्रत (डाळ, तांदूळ, कणीक इत्यादी शिधा) मागून उदरनिर्वाह करायचा हा या परिक्रमेतील एक नियम. हे सदाव्रत कोण देतं तर नर्मदा किनाऱ्यावरचे शेतकरी, आदिवासी आणि नावाडी बांधव. यातील काहींच्या घरात तर दुसऱ्या दिवशीचीही भ्रांत असायची, पण आमचं स्वागत मात्र आनंदाने व्हायचं. अर्थात रोज सदाव्रत मागून शिजवण्याची वेळ आली नाही. अनेक कुटुंबांतून वा आश्रमांमधूनही जेवण मिळतं. या त्यांच्या परिक्रमेतील ३५०० कि.मी.च्या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या काही घटना थक्क करणाऱ्या, काही परीक्षा पाहणाऱ्या तर काही साक्षीभाव शिकवणाऱ्या. चितळ्यांच्या परिक्रमेविषयीची चित्रफीत ‘यू टय़ूब’वर उपलब्ध आहे. तरी एक दोन प्रसंग लिहिण्याचा मोह आवरता येत नाही..
परिक्रमेच्या सुरुवातीचा दिवस. त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी. ओंकारेश्वरला दीपदानासाठी अलोट गर्दी उसळलेली. माणसाला माणूस चिकटलेलं. अशा परिस्थितीत अचानक पुढे असणाऱ्या पुरुषाचा राजस्थानी जोडय़ातला पाय प्रतिभाताईंच्या अनवाणी पावलावर पडला आणि त्या किंचाळल्या. ते ऐकून तो गरकन् वळला, त्याचबरोबर त्याचा बूटही वळला पण बरोबर त्यांच्या अंगठय़ाचं नख घेऊनच. त्या म्हणाल्या की, त्या क्षणी मी मेल्यातच जमा होते. बघता बघता तो अंगठा आवळ्याएवढा सुजला आणि दुसऱ्या दिवशी तर खडापहाड ओलांडायचं आव्हान होतं. हा पहाड पार करताना त्यावर हातापायाची बोटं रुतवत त्याला अगदी खेटून जावं लागतं. खाली अथांग नर्मदामैया. पाय जरा जरी घसरला तरी थेट मोक्ष. आसपास चिटपाखरूही नाही. अशा वेळी दोन परिक्रमावासी अचानक तिथे आले आणि त्याच्या मागोमाग ते जिथे बोटं रुतवतील तिथे तिथे त्यांचं अनुकरण करत (दुखरा पाय अधांतरीच) मी पलीकडे कशी गेले ते त्या मैयालाच ठाऊक. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरूनिया..’ हा अनुभव असा क्षणोक्षणी येणारा. एकदा तर चालताना आरपार गेलेला बाभळीचा काटा, बूड आत फसल्यामुळे त्यांनी दोन दिवस सोबत ठेवला. प्रतिभाताईंचं बोलणं ऐकताना जाणवत राहतं की अशा दिव्यातून सहीसलामत निभावण्यासाठी मनाची कोणती शक्ती काम करत असेल?
सुधीर चितळे म्हणाले, ‘‘सुरुवातीला माझी भावनिक गुंतवणूक नव्हती, पण जसजसे अनुभव येत गेले तसतसा मी विरघळत गेलो आणि शेवटी शेवटी तर परत जाऊच नये, असं वाटू लागलं.’’ त्यांनी सांगितलेला एक किस्साही असाच. ‘जून महिन्याच्या प्रारंभाला उत्तर तीरावरून चालताना उन्हाळा व श्रम यामुळे प्रतिभाताईंची तब्येत एवढी खालावली की त्यांच्या पायातली जोडवीही एक दिवस गळून पडली. हे लक्षात आलं केव्हा तर पुढच्या गावात गेल्यावर पाय धुताना. बरं ही जोडवीही महत्त्वाची. कारण अहमदनगरमधील त्यांच्या शेजारणीने ती दिलेली. कशासाठी तर परिक्रमा झाल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी. नर्मदामैयाला मनापासून प्रार्थना केली आणि हुरहुरत्या मनाने सकाळी पुढे चालायला सुरुवात केली तर कानांवर हाक, ‘‘मैयाजी! (परिक्रमावासीयांना याच नावाने संबोधतात) रुको, चाय पिके जाना।’’ चहापानानंतर ती बाई अदबीने म्हणाली, ‘‘कृपा करून नाही म्हणू नका. मला तुम्हाला जोडवी भेट द्यायची आहेत.. काय म्हणणार या योगायोगाला?’’
नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झालेली चितळ्यांची परिक्रमा एक वर्ष पाच महिन्यांनी म्हणजे मार्च २००९ मध्ये सफल संपूर्ण झाली आणि सुधीर चितळे वयाच्या ५८ व्या वर्षी पुन्हा त्याच ग्रुपमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. यावेळी तर पगार आधीच्या तिप्पट मिळाला. ही नोकरी तीन वर्षे केल्यावर त्यांनी विचार केला, आता कमावणं बस्स झालं. तिन्ही मुलगेही आपापल्या पायांवर उभे होते. त्यांना त्यांचे जोडीदारही मिळाले होते. परिक्रमेमुळे गरजाही कमी झाल्या होत्या. त्यांनी ठरवलं आता पुढचं जीवन सेवेसाठी. परिक्रमा करताना आपल्यावर बऱ्याच जणांनी खर्च केलाय. ते कर्ज आता उतरवायचं. प्रतिभाताईंची साथ होतीच. दोघांनी हेदेखील ठरवलं की कुठल्या तरी आश्रमात जाऊन किंवा कोणाच्या तरी हाताखाली सेवा नाही द्यायची. जे काही करायचं ते स्वत:च्या बळावर, स्वत:च्या मर्जीने.
२०१२ हे त्यांच्या सेवेचं पहिलं वर्ष. त्यासाठी त्यांनी सर्वेक्षण करून मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्य़ातील बगलवाडा हे गाव निवडलं. सेवेची गरज कुठे आहे याचा शोध ते दरवर्षीच घेतात. कधी आपल्या अनुभवावरून तर कधी परिक्रमावासीयांनी दिलेल्या माहितीवरून ठिकाण निश्चित केलं जातं. मात्र पहिल्या वर्षी अनुभव नसल्याने राहाण्याची जागा गावात आणि सेवा देण्याचं स्थळ परिक्रमा मार्गावर असं दोन ठिकाणी बस्तान बसवल्याने काही परिक्रमावासीयांची चुकामूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे पुढच्या वर्षांपासून परिक्रमेच्या मार्गावरच राहून सेवा द्यायची हे निश्चित झालं. झालंच तर प्रथम पाणी, चहा व बिस्किटं.. इतपत सेवा द्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. (कारण जवळच्या आश्रमात जेवणाची सोय होती). परंतु जेव्हा महाराष्ट्रीय परिक्रमावासी येत तेव्हा बरेच दिवसांनी आपल्या पद्धतीचं जेवण (म्हणजे पिठलं भात/ तूप, मेतकूट भात) मिळेल या आशेने रेंगाळत. ते पाहून चितळ्यांची सेवा चहा- बिस्किटांपासून दोन्ही वेळच्या जेवणापर्यंत विस्तारली. पुढच्या वर्षांपासून ते जेवणाखाणाबरोबर अंथरूण- पांघरूण/ औषधं/ कपडे/ चपला.. असं परिक्रमावासीयांना ज्याची जी गरज असेल ते ते पुरवायला सुरुवात केली.
सुधीर चितळे म्हणाले, ‘दरवर्षी साधारणपणे लाखभर भक्त परिक्रमा करतात. त्यातील २० ते २५ हजार पायी परिक्रमा करणाऱ्यांपैकी अडीच ते तीन हजार आम्हाला भेटतात. (दिवसभरात ५० ते १००, कधी दीडशेही) ते ज्या वेळेला येतील त्याप्रमाणे व्यवस्था करायची. सकाळी आले तर चहा- नाश्ता. दुपारी आले तर भोजन आणि संध्याकाळी आगमन झालं तर जेवणाबरोबर झोपण्याची व्यवस्था. जेवण म्हणजे गावात मिळेल ती भाजी टाकून केलेलं सांबार, भात आणि गव्हाच्या चपात्या. शिवाय लिंबाचं लोणचं, तूप, मेतकूट हे असतंच.
रोज सकाळी उठून पहिलं काम म्हणजे दहा किलोची कणीक मळून ठेवणं. तिकडे घरोघरी गहू पिकतो. गावात चक्की असतेच आणि गरज असेल ते आणायला आमचं वाहन सज्ज असतंच (चितळे पुण्याहून आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व इतर सामान भरून निघतात. हे इतर सामान म्हणजे ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी) तेल, तिखट, मीठ इत्यादी त्या त्या गावी घ्यायचं. ते म्हणाले, ‘‘आणि हो, सगळा स्वयंपाक तीन दगडांच्या चुलीवर. एक बैलगाडी भरून लाकडं घेतली की सहा महिने पुरतात. आम्ही पुण्याहून गाडीतून गॅस व शेगडीही घेऊन जातो. पण तो वेळी-अवेळी पटकन चहा करून देण्यासाठी राखून ठेवायचा..’’
रोज १० किलोची कणीक मळायची या कल्पनेनेच माझे हात भरून आले. मी विचारलं, ‘‘म्हणजे पोळ्या किती लाटाव्या लागत असतील?’’ यावर प्रतिभाताईंचं उत्तर, ‘‘हेतू शुद्ध असला की कष्टांच्या चढत्या भाजणीनुसार उत्साह वाढत जातो. शिवाय परिक्रमावासी मदत करतातच की! चितळेंनाही सगळा स्वयंपाक येतो. कणीक मळायचं काम त्यांचंच.’’ त्यांनी सांगितलं की, ‘बरोबर सोलर लॅम्प ठेवले तरी रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी उरकावं लागतं, नाहीतर पानात किडय़ांची मेजवानी ठरलेली. झालंच तर नैसर्गिक विधींसाठी आजूबाजूचं जंगल
आणि कडाक्याच्या थंडीतही नर्मदेत स्नान हे वेगळं सांगायला नको.
हा जीवनक्रम ऐकताना मनात आलं, ‘‘संकल्पाची ताकद काही वेगळीच. नाही तर वयाच्या ५०/५५ पर्यंत नळ, लाईट, गॅस, कुकर, मिक्सर.. अशा ‘कम्फर्ट झोन’मध्ये वावरलेल्यांना त्यातून बाहेर येऊन असं जगणं किती अवघड!’’
चितळे पती- पत्नीने २०१२ ते २०१४ अशी तीन वर्षे (प्रत्येक वर्षांचे आठ महिने) अनुक्रमे बगलवाडा, छोटी छिपानेर व रमपुरा या मध्य प्रदेशातील तीन ठिकाणी मुक्काम करून सेवा दिली. मात्र चौथ्या वर्षी त्यांनी आपल्या व्हॅनने उलटय़ा दिशेने परिक्रमा करायचं ठरवलं. त्यामुळे परिक्रमावासी समोरून येताना दिसत. मग त्यांना घेऊन जवळच्या एखाद्या पाराखाली तीन दगडांची चूल मांडून चहा किंवा जेवणाची तयारी. यात्राही झाली आणि सेवाही.
चितळ्यांचे हे सेवाकार्य माहीत झालेले अनेकजण त्यांच्याजवळ सेवेची इच्छा व्यक्त करतात. या इच्छुक सेवेकऱ्यांचं नियोजन करण्यासाठी आणि परिक्रमेतील अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये हॉल घेऊन एक सभा घेण्यात येते. मात्र चितळे शक्यतो कोणाकडून पैशांची मदत घेत नाहीत. हे सेवाकार्य कुठवर करणार यावर त्यांचं उत्तर ‘‘जवळचा पैसा आणि अंगातलं बळ यापैकी काहीही संपलं की तिथं थांबायचं..’’
सेवेच्या या सोनेरी पर्वात त्यांनी जे अनुभवलं ते शब्दातीत असंच. प्रतिभाताईंनी सांगितलं, ‘‘पंचेंद्रिये सक्षम असतानाही पायी परिक्रमा करणं महाकठीण. परंतु जेव्हा दोन्ही पाय नसलेला (फक्त कुबडय़ांचा आधार) आणि कालांतराने दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला अशा दोन साधकांना एकटय़ाने परिक्रमा करताना पाहिलं तेव्हा आमचा उरलासुरला अभिमानही गळून पडला. मे-जूनपर्यंत परिक्रमावासी कमी कमी होत जातात आणि नंतर येतात ते साधू. त्यांचा सत्संग ऐकताना समाधान मिळतं..’’
दोघांनी एकमुखाने सांगितलं की, ‘‘ही एकच अशी यात्रा आहे, की जी तुम्ही एकही पैसा बरोबर न घेता करू शकता. तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते. पुन्हा कधी भेटू याची शाश्वती नाही. एकमेकांकडून कसलीही अपेक्षा नाही. फक्त प्रेमाची देवाण- घेवाण. या परिक्रमेनेच आम्हाला शिकवलं की यापुढे संचय करायचा नाही. परिक्रमेच्या काळात जे सुख रोज नव्याने भेटलं ते दोन्ही हातांनी वाटण्याचा प्रयत्न करायचा..’’ शिकलेलं अंगीकारत प्रतिभाताई आणि सुधीर चितळे यांची पावले त्याच मार्गावर पडत आहेत..
-- संपदा वागळे
संपर्क – ९१५८९९११७५
संपदा वागळे यांचा WhatsApp वरुन आलेला हा लेख तुमच्यासाठी शेअर केलाय...
June 30, 2017
सध्या मुक्काम पोस्ट अमेरिका.इथे हव्या त्या गोष्टी करायला वेळ नेहमी पेक्षा अधिक मिळतो. दहा बारा दिवसांपासून f b वर एक add येत होती. online कोर्स उपवास पदार्थ, मुखवास, इन्स्टंट मसाले.इ.हे सगळे free कोर्स होते. मात्र त्यांची भारतीय वेळ होती दुपारी 3. मला ते कोर्स करणे शक्य नव्हते.याचे कारण इथे या वेळेस मध्य रात्रीचे अडीच वाजलेले असतात.म्हणून तो नाद सोडून दिला.तीन चार दिवसांपूर्वी हाॅटेलच्या चवी प्रमाणे भाज्या घरच्याघरी बनवा अशी add आली.
August 26, 2023
अस्सल पुणेरी भाषेत असलेली ही मॅकडोनाल्ड्सची पाटी
November 10, 2012
२०१४ चे अर्धवर्ष सरत असताना आपल्या मराठी चित्रपटांचा कानोसा घेताल्यावर एक बाब लक्षात येईल की पारंपारीक चौकट मोडून समांतर तसंच “ऑफबीट” विषयांच्या सिनेमांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. कुठेतरी सिनेमा हे माध्यम म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत कशा पध्दतीने पोहचेल असा विचार सध्याचे चित्रपट निर्माते करतना दिसताहेत; तंत्रात आधुनिकतेसोबतच, मार्केटींगचा प्रभावी वापर हे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल…
July 21, 2014
मुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं.
September 28, 2013
हेल्मेटसक्ती करू नये असं म्हणणारे हेल्मेट वापरू नये असं कधीच म्हणत नाहीत. त्यामुळे हेल्मेटसक्ती ह्या विषयावर विचार करताना हेल्मेटचे फायदे तोटे ह्यापेक्षा सक्ती ह्या गोष्टीवर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हावा. विशेषत: कल्याणकारी लोकशाही राज्यपद्धतीमधे कशाची सक्ती असावी आणि कशाची नसावी ह्याबाबत विचार व्हावा. हेल्मेटसारख्या गोष्टीची सक्ती करणं आणि ती पोलीस यंत्रणेमार्फत राबवणं हा लोकशाही सरकारनं केलेला मर्यादाभंग आहे. लोकशाही सरकारनं लोकांचं किती कल्याण करावं ह्या प्रश्नाची हेल्मेट ही मर्यादा आहे.
दिवाकर रावते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादकांवर / विक्रेत्यांवर प्रत्येक वाहनाबरोबर दोन हेल्मेट्स दिलीच (म्हणजे विकलीच) पाहिजेत अशी सक्ती जरूर करावी, जसे चार चाकी वाहनांमधे पट्टे असतात. कारण त्यांनी विकलेल्या वाहनामुळे ग्राहक डोके आपटून मरण्याची शक्यता आहे. म्हणजे ते दुसर्यांना धोका पोचेल अशी वस्तू विकत आहेत, म्हणून तिथे सरकारनं लक्ष घालणं आवश्यक आहे. पण ह्याच न्यायानं त्यांनी पोलिसांना मिळालेले कोणाही निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजेत, कारण हेल्मेट न वापरल्यानं कोणतीही व्यक्ती अन्य कोणालाही काहीच धोका निर्माण करीत नसते. त्यामुळे अशा बाबतीत सरकारनं लक्ष घालण्याचं कारणच नाही. हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे त्यात राज्य सरकार काही करू शकत नाही हे जेमतेम अर्धसत्य आहे. राज्य सरकार त्यात नक्कीच बदल करू शकतं कारण मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यांच्या आखत्यारीतच आहे. वस्तुत: केंद्राच्या कायद्यालाच कोणा प्रबळ सामाजिक संस्थेनं आव्हान दिलं पाहिजे.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून "मार्केटिंग" करणं हा प्रकार जगभर सर्रास चालू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑंर्गनायाझेशनच्या मदतीनं आभासी रोगांची आवई उठवून जगभर औषधं खपवली जात आहेत. सामान्य लोकांना फारसे उपयोगाचे नसलेले प्रचंड खर्चाचे मोठमोठे प्रकल्प विविध सरकारं हाती घेतच असतात. दिल्लीत खर्च मंजूर करून घेऊन गल्लीबोळात सीमेंट रस्ते होत आहेत, हे आपण पाहतोच आहोत. नशीब अजून कुठल्या औषधाची किंवा बुलेटप्रूफ जाकिटाची सक्ती नाही. रॉय किणीकर ह्यांच "इथे जगण्याची सक्ती आहे" नावाचं पुस्तकच आहे. ते हुकूमशाहीबद्दल आहे. आता लोकशाहीतही आपण तोच अनुभव घेतो आहोत. असांजला लोकशाही देशच छळतायत.
याच विषयावर २००५ मध्ये साप्ताहिक सकाळमधे माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो येथे वेगळा प्रकाशित करत आहेच.
निनाद माटे
पत्ता : जे ६ हिमाली सोसायटी, दीनानाथ हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे ४११००४
फोन : (०२०) २५४३६११२
ईमेल : ninadmate@gmail.com
February 17, 2016
त्या वाघाच्या मावशी……
February 7, 2011
दिवाळीमध्ये सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. लहानपणी या दिवसांमध्ये रात्री चांदण्यांनी खच्च भरलेले आभाळ पहायला मिळायचे. दिवाळी खर्या अर्थाने साजरी करायची असेल तर इतरांचे आयुष्य उजळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. दिवाळी हा सामाजिक उत्सव नसून तो कौटुंबिक सण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा आनंद लुटतो.
November 4, 2010
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, …..
May 21, 2014
”माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन, शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन!!!“ — राजन राजे
December 31, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti