(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाइटोमो कंदरीं

    न्यूझीलंडला जाण्याआधीच त्याच्या सृष्टीसौंदर्याबद्दल, तिथल्या रस्त्यांच्या चढ-उतारांबद्दल, निरम आकाशाबद्दल इतकंच काय पण तगड्या गाईबद्दलही खूप वर्णनं ऐकली होती, वाचली होती. हल्ली स्वित्झर्लंड खूप महाग झाल्याने बऱ्याच सिनेमांचे शूटिंगही न्यूझीलंडमध्येच होते ही माहितीही आमच्या पोतडीत जमा झाली होती. त्यामुळे न्यूझीलंड पहाण्याची इच्छा प्रबळ झाली व आम्ही एका कंडक्टेड टूरचा तपास सुरू केला. आमच्या वेळेसाठी योग्य अशी 'जेट अबाउट' ची एक टूर बऱ्याच प्रयत्नाने मिळाली. यावेळी आमच्या टूरमध्ये आम्ही दोघे व आमचा मुलगा असे तीनच प्रवासी होतो. त्यामुळे कुठेही स्पेशल बस नव्हती. टूरमध्ये वाइटोमो केव्हजचा समावेश आहे असे वाचले तेंव्हा खरंतर थोडी नाराजीच झाली कारण अशाच प्रकारच्या चुनखडी (लाइमस्टोन) च्या गुहा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशियात पाहिल्या होत्या. इथे आणखी वेगळं काय दिसणार? एखादे वेगळे प्रेक्षणीय स्थळ असायला हवे होते, असे वाटले. पण इलाज नव्हता. शेवटी टूरच्या आखलेल्या कार्यक्रमानुसारच जावे लागते. पण तिथे आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव येणार आहे याची कल्पनाच नव्हती. ऑकलंडची प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली. किती प्रचंड चढउतार या शहरात आहेत याचे आश्चर्य करून झाले. मोटारी कशा पुढची दोन चाके फुटपाथवर चढवल्याखेरीज व्यवस्थित पार्क करता येत नाहीत याचीही नोंद घेऊन झाली. ऑकलंडच्या टॉवर वरून आजुबाजूचे विहंगम दृश्य डोळे भरून पाहिले व टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेस्कच्या खूप उंचीवरच्या काचेच्या जमिनीवरून चालण्याचा विलक्षण अनुभवही घाबरत घाबरत घेतला. दोन-तीन दिवस शहरात मस्तपैकी भटकून झाल्यावर आम्ही पुढचा मुक्काम-रोटोरुआ कडे जायला निघालो. इथल्या प्रवासाची जरा वेगळीच गंमत दिसली. आम्हाला विमानतळावरून जो गाईड कम कार ड्रायव्हर हॉटेलवर घेऊन आला तो परत कधीही दिसला नाही. रोज नवीनच माणूस आम्हाला ऑकलंड दाखवायला न्यायचा, तोच माहिती सांगायचा व दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम हॉटेलची रिसेप्शनीस्ट सांगायची. तसे ऑकलंड सोडायच्या वेळी नवीनच माणूस आला व आम्हाला बस स्टँडवर घेऊन गेला. ऑकलंडच्या स्टँडवरून निघणाऱ्या प्रवासीबसने आमचा पुढचा प्रवास होता. ऑकलंडपासूनचा प्रवास हायवेवरून होता. रस्त्याच्या एका बाजूला स्वच्छ नदी होती तर दुसऱ्या बाजूला मोठमोठी चराऊ कुरणे. त्यात गाई व मेंढ्या चरत होत्या. जमीन किती सुपीक होती ते त्यांच्या आकारावरूनच समजत होते. त्यांची राखण करणारे कुत्रे भीतीदायक दिसत होते व तगडे घोडेही चरताना दिसत होते. माणसे मात्र अभावानेच दिसली. कधी सरळसोट तर कधी वळणे घेणारा काळाभोर रस्ता समोर दिसत होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मात्र फारशी दिसत नव्हती. आजुबाजूचे निसर्गसौंदर्य पाहतापाहता दोन तीन तासांचा प्रवास कसा संपला कळलेच नाही आणि आम्ही वाइटोमो डिस्ट्रिक्ट मधल्या 'केव्ह'पाशी आलो. जेवणाचा स्टॉप वायटोमो केव्हजचा होता. बस थांबताच स्थानिक गाईड पुढे आला आणि त्याने बसमधल्या प्रवाशांचा तांडा ताब्यात घेतला. सगळे त्याच्यामागोमाग निघाले.

    समोर वाइटोमो केव्हजची दिशा दर्शविणारा एक उंच खांब टॉटेम पोल होता. त्यावर मावरी पद्धतीचे कोरीवकाम खूपच छान होते.

    समोर एक छोटीशी टेकडी अन् त्यामागे आणखी काही तुरळक टेकड्या.

    'वाइटोमो केव्हज' हे आता प्रवासी लोकांसाठी एक आकर्षक ठिकाण झाल्याने ह्या गुहा व त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी झालेली आजुबाजूची वस्ती एवढाच काय तो वाइटोमो खेड्याचा पसारा दिसत होता. वीस लाख वर्षांपूर्वीपासूनच्या या ४-५ गुहांच्या आस्तित्वाची 'मावरी' लोकांना कल्पना होती. परंतु अंतर्भागात शिरण्याचा रस्ता, आतील रचना वगैरे गोष्टी स्थानिक मावरी प्रमुख 'त्याने तीनोराउ' ह्याने इंग्लिश संशोधक 'फ्रेड मेस'ह्याच्या मदतीने १८८७ च्या सुमारास शोधून काढल्या, आणि आपली पत्नी 'हुती' व इतर कुटुंब सदस्यांच्या मदतीने प्रवासी लोकांना या गुहा अत्यल्प फी आकारून दाखवायला सुरुवात केली. प्रवाश्यांची संख्या वाढत गेली तसतसे प्रशिक्षित वाटाडेही तयार होऊ लागले. १९०६ मध्ये सरकारने या गुहांची व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन गुहेत दिवे, रस्ते, कठडे इत्यादी सोई केल्या आणि १९८९ च्या सुमारास त्या गुहांचा ताबा परत ताने तीनोराऊ यांच्या वारसांना मिळाला.

    न्यूझीलंडचे मूळ रहिवासी मावरी. भरपूर उंच धिप्पाड म्हणावे अशी अंगकाठी. पण काटक, चपट्या नाकाचे, तांबूस वर्णाचे मावरी वृत्तीने लढवय्ये असले तरी शिक्षणाअभावी त्यांचा गोऱ्यांपुढे टिकाव लागला नाही. पण न्यूझीलंड मध्ये त्यांच्या भाषेचा ठसा कायम आहे. वाइटोमो हे नाव मावरी भाषेतलेच. 'वाइ' म्हणजे पाणी, 'टोमो' म्हणजे जमिनीतील पोकळी किंवा खाच. म्हणजे वाइटोमो ह्याचा साधा अर्थ "जमिनीखालच्या भोकातून वाहणारे पाणी” हा भूभाग लक्षवधी वर्षे समुद्रतळाशी एकावर एक साठलेल्या चुनखडी दगडांचा व त्यामधल्या प्राण्यांच्या अवशेषांचा तयार झालेला आहे. भूगर्भात सतत चाललेल्या हालचालींमुळे या चुनखडीच्या (लाईमस्टोन) टेकड्या वर आल्या. समोर दिसत होती ती टेकडी पांढरट चॉकलेटी, क्वचित ठिकाणी अंगाखांद्यावर झुडुपे, गवत वागवणारी होती. टेकडीच्या खडकांचा रंग बऱ्याच ठिकाणी काळपट लालही होता. एकूणच दृश्यात बाहेरून तरी खास आकर्षक काही नव्हते. ग्लोवर्म केव्ह, रुआकुरी केव्ह, अरानुई केव्ह, आणि गार्डनर केव्ह यांचा समूह म्हणजे वाइटोमो केव्हज. या पैकी अरानुई केव्हजच्या पोटात जाण्यासाठी आम्ही तयार झालो.

    टेकडीच्या चढण्याचा मार्ग पायऱ्या पायऱ्यांचा व काही ठिकाणी सपाट होता. टेकडीच्या जवळ जवळ अध्र्या उंचीपर्यंत चढल्यावर आम्ही टेकडीमध्ये तयार केलेल्या भुयारात शिरलो. लाकडी फळ्या टाकून २-३ माणसे एका वेळी जाऊ शकतील अशी वाट केली होती. त्यावरून आम्ही भुयारात चालू लागलो. आजुबाजूला अगदी अंधुक उजेड होता. जास्त प्रखर प्रकाशाचा चुनखडीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून ही खबरदारी असे गाईडने सांगितले. आधारासाठी कडेच्या कठड्याची सोय होती म्हणून बरे. कारण अंधारात अडखळायला झाले तरीही झीज होईल म्हणून बाजूच्या चुनखडीच्या दगडांना हात लावायला परवानगी नव्हती. मधे मधे थोड्या थोड्या अंतरावर ऑब्झरवेशन डेकसारखे मंच तयार केले होते. तिथे थोडे थोडे प्रवासी एकत्र नेले जायचे व पटकन दिवे लागायचे. समोरचे दृश्य एकदम प्रकाशमान व्हायचे.

    प्रत्येक वेळी समोर वेगळेच दृश्य दिसायचे. कधी नाटकाचा रंगमंच तर कधी दोन डोंगरांच्या आडून डोकावणारा सूर्य. मधूनच उडणारे पक्षी त्यातभरच घालायचे. एका ठिकाणी प्रकाशझोत अशा तऱ्हेने अचानक फिरला की जणू नायलॉनचा एक तलम झिरझिरीत पडदाच एका बाजूने उलगडत उघडत जातोय. रंगीबेरंगी दिव्यांच्या झोताने त्यात अनेक रंग भरले आणि एक अप्रतिम दृश्य नजरेसमोर साकार झाले. पहाता पहाता संपूर्ण पडदा वरच्या बाजूला गुलाबी, मधे मधे हिरव्या, पांढऱ्या, केशरी, निळ्या, रंगांनी न्हाऊन निघाला आणि सोनेरी रंगाच्या झालरीने अधिकच सुशोभित झाला.

    जेमतेम दीड-दोन मिनिटांचा खेळ, पण या अगोदर बऱ्याच पायऱ्या चढण्याचे झालेले श्रम विसरायला लावणारा होता. प्रवाशांच्या प्रत्येक समूहाबरोबर असणारे गाईड त्या नयनरम्य दृश्याचे सुरस वर्णन करून त्या दृश्यात आणखी रंग भरत होते. पुन: मिणमिणत्या प्रकाशात पुढची वाटचाल सुरू झाली तरी डोळ्यासमोर मात्र पडद्याची उघडझाप चालूच होती. डोंगराच्या वरच्या बाजूने भेगांमधून खाली झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबांबरोबर चुन्याचे कण वाहून येतात. गुहांच्या छपरापासून हे थेंब ठिबकतात व असे चित्रविचित्र आकार-स्टॅलॅक्टाइट व स्टॅलॅग्माइट-छपरापासून निघतात आणि तळाशी तयार होतात. पुढे अशी बरीच गंमत जंमत करणारी दृश्ये होती. कुठे खांब छतापाशी लटकतोय तर कुठे अर्धवट लोंबकळणारी भिंत तर कुठे रंगमंच. त्यातच गाईडने "समोर जो उंच सुळका दिसतोय ना त्यावर चढून विवाहबद्ध होण्यासाठी प्रेमी युगुलेही कधी कधी येतात' असे सांगितले व नवीनच दृश्य डोळ्यांसमोर साकार झाले. कडक सुटाबुटातला प्रियकर व पांढऱ्या पायघोळ वधुवेशात नटलेली प्रेमिका एकमेकांना आधार देत हातात हात घालून त्या अरूंद उंच सुळक्यावर उभे आहेत व टाळ्यांच्या गजरात एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देताहेत....नजरेसमोर मस्त दृश्य साकार होत होते. धन्य त्या प्रेमिकांची! पण प्रश्न एवढाच पडला की पाद्रीबाबा आणि वऱ्हाडी कुठे उभे राहिले असतील?

    चुनखडीपासून तयार झालेली शिल्पे पहात पहात आम्ही पुढे सरकत होतो. प्रत्येक दृश्याचे काही वेगळेच रंगरूप होते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे नवीन बघण्यासारखे असतेच याचा पुन: प्रत्यय आला. डोंगराच्या पोटात किती पायऱ्यांची चढ उतार झाली असेल त्याची आमचे थकलेले पाय अधूनमधून जाणीव करून देत होते. पोटातले कावळेही आता भुकेची आठवण करून देत होते. दोन तास कसे संपले कळले देखील नाही. आम्हाला बाहेर पडायचे नव्हते तरी पायाखालची वाट हळूहळू प्रकाशमान व्हायला लागली व आम्ही डोंगराच्या पोटातून बाहेर आलो. नाही म्हटले तरी चुनखडीच्या कोंदट वासातून मोकळ्या हवेत आल्यावर खूप बरे वाटले. सगळ्यांची पावले आपोआपच पोटपूजेकडे वळली. तिथे असणारे छोटेसे उपहारगृह व सुव्हीनीयर विकणारे एक लहानसे दुकान आमची वाट पहात होते. त्याला यथाशक्ती आश्रय देऊन आमचा मोर्चा 'ग्लोवर्म केव्हज' कडे वळला.

    त्यासाठी आम्हाला डोंगराला थोडा वळसा घालून बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावे लागले. खाली जाईपर्यंत कल्पना नव्हती की, पुढचा प्रवास छोट्याशा नदीतून होता. पायऱ्या जिथे संपल्या तिथे रूंद प्लॅटफॉर्म होता. त्याच्या धक्क्याला छोटीशी बोट आमची वाट पहात होती. नदीच्या पाण्यात डोंगरावरची चुनखडीची वेगवेगळी लोंबणारी झालर आपले प्रतिबिंब पहात होती. आम्ही बोटीत बसताच चालकाने ती बांबूच्या सहाय्याने डोंगराच्या पोकळीत ढकलली.

    दहा-बारा माणसे बसू शकतील अशी एक छोटी होडी जेमतेम जाऊ शकेल एवढीच रुंद नदी डोंगराच्या अंतर्भागातून वहात होती. तिचा उगम व शेवट कुठे होत होता कोण जाणे. असा नदीचा प्रवाह मी पहिल्यांदाच पाहिला. काळेशार पाणी व दोन्ही बाजूंना डोंगराच्या पोटातील बोगद्याची भिंत. त्यावर सतत पाणी झिरपत होते. हवा थंडगार होती. पाण्याचा व होड्यांचा चुबुक डुबुक असा आवाज येत होता. आम्ही होडीत बसताच प्रवाहाबरोबर होडी अलगद पुढेपुढे जाऊ लागली. गाईड गप्प होता. आम्हालाही बोलणे सुचत नव्हते. फक्त नावाडीच काय ते एकमेकांशी संपर्क साधण्यापुरते बोलत होते. मी तर 'हा नावाडी आता वल्हे कसे मारणार?' या विचारात होते कारण हात लांब केला तर भिंत लागे, एवढीच बोगद्याची रुंदी होती. लांबवरचं फार काही दिसत नव्हतं. जेव्हा पायऱ्या उतरून खाली आलो होतो, तेव्हा लख्ख नाही पण सगळीकडचं साधारण दिसू शकेल इतपत उजेड होता. होडीत बसलो तेव्हाही आजूबाजूचे झिरपणारे पाणी, समोरचा प्रवाह, थोड्या अंतरावर एखादी होडी दिसत होती. पण होडी चालू झाली अन सगळं बरंच अंधुक झालं. तरीही भिंती नावाडी वगैरे दिसत होते. 'वल्ही कशी मारणार' याचे उत्तर लगेच मिळाले. नावाडी उभा राहिला आणि त्यानं वर लावलेला आडवा दोर धरून त्याच्या आधाराने होडी पुढे न्यायला सुरुवात केली. "पाण्यात हात घालू नका, वाकू नका, अनावश्यक आवाज करू नका..." वगैरे आवश्यक सूचना देऊन तोही गप्प झाला. होडीखेरीज दुसरा आवाज नव्हता. आम्ही कुठून कुठे जात होतो काहीही कळत नव्हतं. ५-१० मिनिटे पाण्यातून पुढे गेल्यावर अचानक धबधब्याचा ध्वनि ऐकू आला.

    डोंगराच्या आतच साधारण २५ फूट उंचीवरून पाणी खाली पडत होते. अगदी एका रेषेत पडणारे पाणी आपल्या आवाजाने आजुबाजूची शांतता भंग न करण्याची पूर्ण काळजी घेत होते. या ठिकाणी एक-दोन पांढरे व एक-दोन रंगीत दिवे होते. त्यांचा उजेड पाण्यावर पडून वेगवेगळ्या रंगछटा निर्माण होत होत्या. खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार इंद्रधनुष्याचे रंग घेऊन चमकत होते, क्वचित आम्हालाही भिजवत होते. खूपच छान दृश्य होते ते. त्याचे फोटो काढून आम्ही पुढे सरकलो. पुन्हा दिव्यांच्या उजेडाची सोबत संपली व होड्या अंधाराच्या पोटात घुसल्या.

    नदीच्या पात्रातील एका घुमटासारख्या मोठ्या गोलाकार जागेत आमची होडी थांबली. आता मात्र सगळीकडे मिट्ट काळोख होता. पण डोळे अंधाराला सरावल्यानंतर इकडे तिकडे थोडेफार दिसू लागले. पाण्यावर छोटे छोटे प्रकाशाचे ठिपके नाचत होते. जणूकाही पाण्याच्या पृष्ठभागावर छोट्या छोट्या दिव्यांची रांगोळी काढल्यासारखे दिसत होते. आम्ही पाण्यातले दृश्य पहाण्यात गर्क होतो तोच एकदम गाईडचा आवाज आला--"वर बघा." सगळ्यांच्या माना एकदम वर गेल्या. काय चमत्कार.......आकाश आणि चमचमणाऱ्या चांदण्या!!!!! बोलायचे नव्हते तरी हलक्या आवाजात "वाव" अस चित्कार तोंडून निघालाच. जणू संपूर्ण डोंगरमाथा कापून काढला होता आणि आपण बाहेर मोकळ्यावर आलो आहोत असे वाटू लागले. काळेभोर निरभ्र आकाश व चमचमणाऱ्या असंख्य चांदण्याच चांदण्या. पण चांदोबाचा पत्ता नव्हता. सहजच आम्ही तिघे नक्षत्रे ओळखायच्या प्रयत्नाला लागलो... अश्विनी, भरणी, मृग, सप्तर्षी-एक ना दोन. आणि मग लक्षात आले की या तारका नसून हे Arachnocampa luminosa या जातीचे, डासाच्या आकाराएवढे, बहुतांश करून न्यूझीलंड मध्येच आढळणारे काजवे आहेत. गुहेच्या छतावर असणारा हा कीटक अद्भुत, थक्क करणारी किमया दाखवीत होता. निळसर, पांढरे, हिरवट, असे असंख्य छोटे मोठे लुकलुकणारे प्रकाशाचे बिंदू छतावरून इकडून तिकडे हलत होते. त्याच्या लुकलुकण्यामुळे अगदी चांदण्यांचा भास होत होता. आम्ही ते अद्भुत दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होतो. एखाद्या गर्भरेशमी चंद्रकळेसारखे काळेभोर छत चमचमत्या खडीने शोभिवंत दिसत होते.

    'चमचम तारापुंज भूषणे शोभिवंत वसनी

    ज्योत्स्नेचे मृदु वस्त्र रेशमी ल्याली ती रजनी'

    कालिदासाच्या काव्याची आठवण झाली नसती तरच नवल! अनेक प्रवाशांची मात्र घोर निराशा झाली असणार, कारण फ्लॅश फोटोग्राफी मना होती.

    अनिमिष नेत्रांनी पापणीही न लववता आम्ही ते दृश्य पहात होतो. तेवढ्या वेळात नावाड्याने होड्या अशा चलाखीने वळवल्या की, एकाद्या प्लॅनेटेरियममध्ये बसल्यासारखे आकाश संपूर्ण तारकासमूहासह आमच्या भोवती फिरले. होड्या पुढेमागे करून, एकमेकांना वाट करून देत नावाडी चलाखीने परतपरत त्या आकाशमंडलाखाली आम्हाला आणून हा अनोखा अनुभव देत होते. हे दृश्य पहाता पहाता नावाड्यांनी होड्या कधी बाहेरच्या दिशेने वळवल्या कळलेसुद्धा नाही. परतीच्या प्रवासात सुद्धा काजव्यांचे भिंतींच्या कपारींवर झालेले गुच्छ, छतावरून लोंबकळणाऱ्या माळा आमचे लक्ष वेधून घेत होत्या. मधून मधून आजुबाजूच्या भिंतींवर व छतावर चुकारकाजवे आपला कळप सोडून हिंडताना दिसत होते. जणू काही आम्हाला 'लौकर परत या बरं का, आम्ही वाट पहातोय" असा निरोप द्यायलाच ते आले होते. हा निरोप समारंभ चालू असतानाच हळू हळू प्रकाश वाढू लागला व आम्ही पायऱ्यांपाशी परत आलो. वीस-पंचवीस मिनिटांची ही काजव्यांची सफर एक विलक्षण अनुभव देऊन गेली. आज इतकी वर्षे झाली तरीही 'ग्लो वर्म' केव्हज मधल्या त्या काजव्यांच्या दुनियेची किमया स्मृतीतून कणभरही पुसली गेली नाही. अगदी छोटेसे आयुष्य असणारा, अंधाराशिवाय इतरवेळी लक्षातही न येणारा जीव दुसऱ्याला किती मोठा आनंद देतो हे अनुभवल्यावर आपण त्या काजव्यांना "धन्य ही जीवनकळा..." एवढेच म्हणू शकतो.

    --अनामिका बोरकर

      November 30, 2022


  • बाजारसावंगीची रेणुकामाता यात्रा

    चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते….

      January 16, 2013


  • चाळीतले प्रेम

    मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

    माझा नंबर आला, तरी दुसर्‍यांना जाऊ द्यायचो.

      April 21, 2011


  • तो मराठी मुलगा असतो…!!

    ओर्कुट वर अनेक मुले असतात,पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो , तो मुलगा मराठी असतो…!!

      September 13, 2010


  • कथा एका कथेची

    एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्‍याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात.

      November 2, 2024


  • वारली चित्रकलेचा आधार !

    कलेचे आदिवासी जमातीशी असलेले घनिष्ट नाते वारली चित्रकलेतून दिसून येते. या समाजाने परंपरेने लाभलेली ही कला जतन केली आहे. या कलेच्या माध्यमातून आदिवासी युवकांना रोजगाराची संधी ही उपलब्ध झालेली आहे.

      September 28, 2010


  • वक्त ने किया क्या हँसी सितम : गीता दत्त

    जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा समावेश जगातील उत्कृष्ट गाण्यात होतो. हे कसे घडले असावे? मला असं वाटतं की त्यांच्या आतली अतीउत्कट अशी मानवीय संवेदना गाण्याच्या रूपाने अशी बाहेर आली असावी. अनेक मान्यवर गायक वा गायिका असे मानतात की गाणे दोन प्रकारचे असते एक जे गळ्यातुन येते आणि दुसरे जे हृदयातुन येते. यात जर आवाजाची नैसर्गिक देणगी असेल तर हृदयातुन गळ्याद्वारे बाहेर पडणारे गाणे नि:संशयपणे अप्रतिम होते. गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता दत्तचे असेच काहीसे होते.

    वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता रॉयला गायनाची पहिली संधी मिळाली ती कोरस मधील दोन ओळीच्या रूपात. खूप मोठ्या जमिनदाराच्या १० अपत्यापैकी गीता एक होती. त्यात मुलगी असून गाणे शिकते व गाणे गाते हा तसा विरोधाभासच होता. तिचे वडील आपली ईदीलपूरची जिल्हा फरीदपूर (आताचा बांगला देश) मधील सर्व जमिन व इस्टेट मागे ठेवून कलकत्ता व आसामला आले. पूढे मग त्यांनी मुंबईला येऊन दादरला एक फ्लॅट खरेदी केला व तेथेच राहू लागले. त्यावेळी गीता रॉय १२ वर्षांची होती. लहानपणा पासूनच संगीताची ओढ गीताला होती. हनुमान प्रसाद नावाच्या एका संगीतकाराने गीताचा आवाज ऐकला आणि तिला गाणे शिकवण्याची जबाबदारी घेतली. पूढे त्यानीच मग “भक्त प्रल्हाद” नावाच्या चित्रपटात कोरस मधील दोन ओळी गाण्याची संधी दिली. पूढेही काही गाणी मिळाली पण फारसा प्रभाव नाही पडला. मात्र १९४७ मधील ‘दो भाई’या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बित गया’’ या गाण्यातुन तिच्या प्रतिभेची चुणूक मिळाली आणि पार्श्वगायीका म्हणून तिच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. या नंतर दोनच वर्षांनी ‘महल’ मधल्या “आयेगा आयेगा …आयेगा आनेवाला” म्हणत लता दिदीचे नाव दुमदुमू लागले. याच काळात सचिन देव बर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांच्यातल्या चाणाक्ष संगीतकाराने गीता रॉयच्या नैसर्गिक आवाजातली जादू ओळखली. काय योगायोग बघा याच काळात बंगलोर मधील वसंतकुमार पडूकोण नावाचा एक तरूण कोलकत्ता, पूणे प्रवास करत मुंबईत आला होता. लवकरच या तरूणाशी गीता रॉयची भेट होणार होती आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार होते.

    १९५१ मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होता वसंतकुमार पडूकोण उर्फ गुरू दत्त. गाणी रेकॉर्ड होत असतानां गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील ‘तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गीता रॉयच्या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. तिच्या पार्श्वगायनाचे सर्वच दरवाजे उघडे झाले आणि खरेखरच तिची तकदीर बन गयी. दरम्यान गीता रॉय देखिल गुरूदत्तच्या प्रेमात पडली आणि २६ मे १९५३ रोजी दोघांनी विवाह केला. गीता रॉय गीता दत्त झाली. त्यानां तरूण व अरूण ही दोन मुलं आणि निना ही मुलगी झाली. नंतरची चार वर्षे तिचा गळा बहरत गेला. अनेकजण असे मानतात की तिच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. पण मला ते फारसे पटत नाही. तिने पाश्चात्य सुरावटीची व तशी बाज असलेली गाणी सुंदरच गायली यात दुमत नाही. पण मग खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन), सुनो गजर क्या गाए (बाज़ी)]न ये चाँद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त),कैसे कोई जिए, जहर है जिन्दगी (बादबान), जाने कहाँ मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55), ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है (भाई-भाई), आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा), वक्त ने किया क्या हँसीं सितम (कागज के फूल), आन मिलो आन मिलो (देवदास), हम आपकी आंखो मे..रफी सोबत (प्यासा), बाबूजी धीरे चलना (आरपार), ना जाओ संया छुडा के बयाँ (साहब बिबी और गुलाम),मुझे जा न कहो मेरी जान (अनुभव), घुंगट के पट खोल (जोगन) अशी एकापेक्ष एक सरस गाणी गीता दत्तने गायली. यात अस्सल भारतीय मातीची लोक संगीतावर आधारीत अशीही गाणी होती. नंतर गुरूदत्तच्या बहुतेक सर्व चित्रपटाची गाणी ती गात राहिली. मात्र नंतर अचानक या सर्वाला ग्रहण लागले. जीए कुलकुर्णी यांच्या कथेत प्रकर्षाने आढळणारी नियती किंवा प्राक्तन या दोघांच्या आयुष्यात आडवे आले.

    १९५७ च्या सुमारास गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात अस्पष्टशी भेग पडली आणि हळूहळू यातील अतंर वाढत गेले. गुरूदत्त यानां वाटायचे की गीताने आपल्याच चित्रपटासाठी गाणी गावीत. पण गीता प्रतिष्ठीत झालेली पार्श्व गायिका होती. बाहेरच्या चित्रपटाच्या ऑफर्स येणे साहजिक होते. गीता दत्तला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख होती, एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. मग स्वत: एक संवेदनशील मन असणाऱ्या गुरूदत्तने हा हट्ट का धरला असेल? संगती लागत नाही. १९७३ मधील हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान’ मध्ये असेच काहीसे कथानक होते. ज्यात अमिताभ आणि जया भादूरी यांचा उत्कृष्ट अभिनय होता. तर सुरूवातीला या गोष्टीला नकार देणाऱ्या गीताने मग त्याच्या प्रेमापोटी हळूहळू माघार घेतली. पण यामुळे संगीतकारही हळूहळू बाजूला होत गेले. यात भर म्हणून की काय वहिदा रेहमानचा गुरूदत्तच्या आयुष्यात झालेला प्रवेश. या सर्वाचा परिपाक म्हणजे गीता वेगळी राहू लागली. हृदया पासून गाणारी गीता आतल्या आत कोसळू लागली. खरं तर सचिनदा यानां तिच्या आवाजावर खूप विश्वास होता. पूर्वी गाण्याच्या भरपूर रिहर्सल होत असत त्यात गीता दत्त म्हणावी तशी मेहनत घेतानां दिसेना. जर खरोखरच तशी मेहनत घेतली असती तर तिच्या गायकीचे अनेक रंग दिसू शकले असते. याच काळात मग आशाताई आपल्या प्रचंड मेहनतीने वर येत गेल्या. गुरूदत्तवर गीता दत्तने मनापासून प्रेम केले. कदाचित त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यात अंतरिक तळमळ होती, उर्मी होती……. पूढे जेव्हा वहिदा रेहमान गुरूदत्तच्या आयुष्यातुन निघून गेली तेव्हा गुरूदत्त पूरता दारूच्या आहारी गेला. परीणाम १९६४ ला अतीमद्य आणि झोपेच्या गोळ्या सेवनाने गुरूदत्तचे निधन झाले. या दुसऱ्या धक्कयाने मात्र गीता दत्त पार कोलमडून गेली. ती नर्व्हस ब्रेकडाऊनची शिकार झाली. आर्थिक कटकटीचा गुंता अधिक वाढत गेला. त्यासाठी मग काही स्टेज शो पण करावे लागले. १९६७ मध्ये “बधू बारन” नावाच्या एका बंगाली चित्रपटात मूख्य भूमिका केली. पण मन आणि शरीर यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. १९७१ मध्ये कनू रॉय या संगीतकारासाठी गीता दत्तने शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट होता बासू भट्टाचार्य यांचा ‘अनुभव’. पूढे गीता दत्तचा आजार वाढतच गेला. गीता दत्त याचं “वक्त ने किया क्या हंसी सितम…” हे गाणे जेव्हा आज कानावर पडते तेव्हा नकळत मनात विचार येतो की खरंच काळाने गुरूदत्त आणि गीता दत्त दोघांवरही अत्याचरच केला. गुरूदत्त गेला तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर गीता दत्तने अखेरचा श्वास वयाच्या ४१ व्या वर्षी घेतला…..

    -दासू भगत (२० जुलै २०१७)

      January 6, 2018


  • कास्प आणि सी. एफ.आय. (C.A.S.P & C.F.I.)

    सर्वप्रथम या संस्थेला मी मनापासुन मानाचा मुजरा आणि लाख-लाख धन्यवाद देतो कारण;’कास्प’ ही एक अमेरिकान संस्था आहे आणि भारतातील गरीब गरजु मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत करते.

      January 20, 2011


  • वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

    अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

      July 16, 2011


  • “जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां…..”

    सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर "जादू तेरी नजर" या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची "जादू" आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी "जादू" शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !
    मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी "माझ्या" वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की "जादू" या शब्दातच एक प्रकारची अशी "जादू" आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने "आज्ञा" करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !
    या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा "गुगल" नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !
    मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?
    लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं ! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !
    आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.
    माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, "काळी जादू" किंवा "चेटुक" या विषयात एखाद्या "गाववाल्याचे" जेवढे "ज्ञान" (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0.001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या "गाववाल्याचा" अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने "चुकून" वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं "लिंबू" फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?
    मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून "तो" आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !
    तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा !
    शुभं भवतु !
    --प्रमोद वामन वर्तक,
    सिंगापूर.
    ०३-१२-२०२२
    Mob. 9892561086
    (सिंगापूर)+6594708959

      December 6, 2022