जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.
January 25, 2022
लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.
May 16, 2014
जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 17, 2017
‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक होते.
शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.
शकील अहमद यांचे नाव चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याम उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील बदायूँनी यांची जोडी संगीतकार हेमंत कुमार यांच्या बरोबर चित्रपट सृष्टीत जास्ती जमली.
शकील बदायूँनी यांनी हेमंत कुमार यांच्या सोबत बेकरार कर के हमें यूं न जाइये.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह दो जी.. निशाना चूक ना जाये, भंवरा बड़ा नादान है बगियन का मेहमान है, ना जाओ सइयां छुड़ा के बहियां, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये.. अशी अप्रतींम गाणी दिली.
निर्माता-निर्देशक ए.आर.कारदार यांच्या चित्रपटात शकील बदायूँनी यांनी गाणी लिहिली होती. १९४७ मधील चित्रपट दर्द मधील गाणी शकील बदायूँनी यांनी लिहिली होती की जी सुपरहिट झाली होती. त्या नंतर या दोघांनी दुलारी, दिल्लगी, दास्तान, जादू, दीवाना, दिले नादान, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटासाठी एकत्र काम केले. शकील बदायूँनी यांनी गुरुदत्त, महबूब खान, के आसिफ, राज खोसला, नितिन बोस यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.
दिलीप कुमार यांच्या मेला, बाबुल, दीदार, आन, अमर, उड़न खटोला, कोहिनूर, मुग़ले आज़म, गंगा जमुना, लीडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष व आदमी या चित्रपटांची गाणी शकील बदायूँनी यांची होती.
शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९६० मध्ये चौदहवी का चांद या चित्रपटातील चौदहवीं का चांद हो या आफताब हो..१९६१ मध्ये 'घराना' या चित्रपटातील हुस्न वाले तेरा जवाब नहीं, व १९६२ मध्ये 'बीस साल बाद' या चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल या गांण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. शकील बदायूँनीयांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शकील बदायूँनी यांनी लिहलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=PImNG74M0H8
https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w
August 3, 2017
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. स्वप्नवत वाटणारं हे यश मिळवताना स्वप्नात देखील बहुदा तो गाण्याचाच विचार करत असतो. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे.
महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, जेव्हा त्याची आई शास्त्रीय संगीताचे तास घेत असे, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर मा.रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे. दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. गेल्यावर्षी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. राहुल देशपांडे आणि महेश काळे हे दोघेही समृद्ध गायक आहेत. राहुलच्या अनुभवाचाही उपयोग महेशला नक्कीच झाला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी केली तरी महेश काळेनी सदाशिवची गाणी गायली. अरुणी किरणी या गीतामध्ये तर त्याने संपूर्ण चित्रपटाची झलकच प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. त्याचा आवाज, त्याची क्षमता आणि संगीताबद्दलची त्याची आसक्ती या गीतामधून आधोरेखित होते. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 14, 2019
मराठी संतकवियित्री परभणी जिल्हातील गंगाखेड येथे जन्म. माता लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशी हि एक आख्यायिका आहे. पूढे नामदेवास आपले सर्वस्व मानून नामयाची दासी जनी या नावाने ती वावरली ती शेवटपर्यत अविवाहित होती.
जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले. तिच्या नावावर हरिश्चदाख्यात, प्रल्हादचरित्र कृष्णजन्म बाळकीडा,थालीपाक द्रौपदीस्वंयवर वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते तिची काव्यरचना साधी रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.
March 12, 2015
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल' एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला.
कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती.
दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना.
रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama". १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता.
आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला.
'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा.
'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं.
संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
January 8, 2019
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 3, 2018
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.
पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे.
सूरसिंगार संसद संस्थेचा सूरमणी, गानवर्धन संस्थेचा स्वर-लय भूषण, सम संस्थेचा संगीत शिरोमणी, पूर्णवाद प्रतिष्ठानचा संगीत मर्मज्ञ आणि स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न असे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले.
केवळ गायिका म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यापेक्षाही मुक्त हस्ते विद्यादान करून अनेक शिष्य घडविणाऱ्या गुरू आणि ‘निगुनी’ या टोपणनावाने अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधणाऱ्या वाग्येयकार म्हणून कोरटकर यांचे कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर (15-Nov-2017)
डॉ. सुहासिनी कोरटकर (11-Nov-2019)
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर (27-Jun-2019)
#DrSuhasiniKoratkar
June 7, 2022
निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
October 10, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti