पंढरीदादा जूकर

जूकर, पंढरीदादा

चित्रपटसृष्टीची फार ढोबळ ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाला असते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपैकी छायाचित्रण, संकलन या विभागाची कामे काय असतात याचे थोडेफार तरी ज्ञान अनेकांना असते; परंतु ‘मेकअप’विषयी साधारणत: फारच कमी आणि त्रोटक माहिती चित्रपटसृष्टीच्या बाहेरील लोकांना असते. ‘मेकअप’ म्हणजे ‘तोंड रंगविणे’ असा एक सर्वसाधारण ठोकताळा असतो. मात्र असे ‘तोंड रंगविणाऱ्याला’ व्यक्तिरेखांचा अभ्यास असेल, अभिनेत्याच्या चेहऱ्यात नेमके काय कमी आहे आणि काय अधिक आहे याचा अंदाज असेल आणि या ज्ञानाचा उपयोग तो ‘मेकअप’ करताना जाणतेपणी करीत असेल तर ‘मेकअप’ हा ‘मेकअप’ राहत नाही, त्याची कला बनते.

पंढरीदादा जूकर यांनी ‘मेकअप’ला असे महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देता देता स्वत:ही एक कलावंत म्हणून स्थान मिळविले. गेली जवळपास ५० वर्षे पंढरीदादा आपली या क्षेत्रातली ‘दादगिरी’ टिकवून आहेत. आज या क्षेत्रात काम करणारे जवळपास सर्वच तंत्रज्ञ कधीतरी पंढरीदादांच्या ‘हाताखालून’ गेलेले आहेत. मेकअपचे तंत्र जेव्हा पुरेसे विकसितही झाले नव्हते तेव्हापासून दादांचा परिसस्पर्श हजारो चेहऱ्यांना झालेला आहे. चित्रपटसृष्टी ‘कृष्णधवल’कडून रंगांच्या युगात आली तेव्हा छायाचित्रण, वेशभूषा, रंगभूषा या सर्वच गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ‘कृष्णधवल’च्या युगात ज्यांची चलती होती, असे अनेकजण ‘रंगांशी’ जुळवून घेण्यात अपयशी ठरले किंवा कमीतरी पडले. पंढरीदादा जूकर यांनी मात्र हे आव्हान सहजगत्या स्वीकारले .‘मधुबाला’पासून ‘मीनाकुमारी’पर्यंत आणि तेथून माधुरी दीक्षित, जुही चावलापर्यंतचा एक मोठा टप्पा गाठला. माधुरीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यावं लागलं कारण पंढरीदादांच्या मते माधुरी दीक्षितचा चेहरा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडल्या काळातला सर्वाधिक वेधक चेहरा होता. माधुरीनंतर त्यांना थोडेफार आकर्षक, आव्हानात्मक वाटले ते मनिषा कोइराला आणि सुश्मिता सेन हे दोनच चेहरे. आजही प्रत्येक मोठी नायिका आणि हिंदी-मराठी मालिकांमधील छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याला पंढरीदादांच्या मेकअपचा स्पर्श व्हावा म्हणून उत्सुक असतात. कारण त्या त्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे काय आहेत, पडद्यावर चेहर दिसतो तेव्हा नेमका तो कोणत्या बाजूने अधिक आकर्षक दिसतो याबाबतचे नेमके मार्गदर्शन पंढरीदादा करतात. १९६१ साली सुरू झालेला त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, मीनाकुमारी, माला सिन्हा, मधुबाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, श्रीदेवी, स्मिता पाटील असा आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला आहे. त्या काळात मेकअपसाठी केवळ ‘व्हाइट जेली’ उपलब्ध असे, भूवया कोरण्यासाठी काजळाचा वापर होत असे आणि व्यक्तिरेखा ‘म्हातारी’ करताना केस पांढरे करण्यासाठी अंडय़ाचा बलक हा एकमेव पर्याय असे. एवढय़ा मर्यादित साधनांचा वापर करूनही नायिकांचे सौंदर्य पडद्यावर उठून दिसत असे कारण दादांच्या मते त्या चेहऱ्यांमध्येच नैसर्गिक गोडवा होता. पंढरीदादा जर ‘मेकअप’साठी उपलब्ध नसतील तर मीनाकुमारी चित्रिकरणासाठी येतच नसे. ‘त्यांच्या चेहऱ्यांवर फार कमी मेहनत घ्यावी लागत असे,’ असे दादा आवर्जुन सांगतात; परंतु सुंदर चेहरेही अधिक सुंदर करण्यात दादांचा हात कोणी धरू शकत नाही. ‘चांदणी’ किंवा ‘लम्हे’मधली श्रीदेवी आणि ‘हम आपके है कौन’मधील माधुरी नेहमीपेक्षा वेगळी भासते कारण पंढरीदादांनी त्यांना ‘मेकअप’मधून काही वेगळी वैशिष्टय़े बहाल केली होती. ‘डर’च्या वेळी जुही चावला आणि पंढरीदादांची प्रथमच गाठ पडली. हा चित्रपट पाहून जुही चावला म्हणाली ‘मी यापूर्वी कधीही एवढी सुंदर दिसले नव्हते.’ गेली पााच दशके ‘ग्लॅमर’ला ग्लॅमरस करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पंढरीदादा जूकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कर देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शनाव्यतिरिक्त इतर अंगांना क्वचितच असे पुरस्कार दिले जातात. पंढरीदादांच्या निमित्ताने पुरस्कार देणाऱ्यांचे लक्ष अशा उपेक्षित विभागांकडे गेले तर खुद्द पंढरीदादांनाही त्याचा अधिक आनंद होईल. आज आथुनिक साधने हाताशी असताना अनेक गोष्टी सहजसाध्य झालेल्या आहेत, परंतु हे सर्व नसतानाही आजच्यापेक्षा अधिक उत्तम परिणाम साधला जात होता याचे रहस्य आहे कलांच्या जाणिवांमध्ये आणि निष्ठेमध्ये!

Author