नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.
लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार करु लागली. ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “
” काय केले मानसीने?” मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.
” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”
देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.
आज तरी ह्या जगाचा, ह्या मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही. जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी आहे. निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी गुणधर्म, असे समजण्यास हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.
तेव्हा मीच म्हणेन - -
ती म्हणजे- – - मानसी- – - शिकलेली शहाणी माझी नात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 3, 2020
त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली. गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो.
March 4, 2022
गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .
December 17, 2017
रमेश पोतदार आणि सविता पोतदार यांची एकुलती एक मुलगी, सधन कुटुंबात लाडात वाढलेली, आजच्या ग्लोबल जगात हि तिने मर्यादा व सुसंस्कृत पण सोडला नव्हता, तसे दोघांनीही तिच्यावर केलेल्या संस्काराचा विसर पडला नव्हता तसे सर्व गुण तिच्या अंगात मुरलेले होते. तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते
August 5, 2023
शेवटी हा सगळा प्रवास आपला एकट्याचाच असतो नाही! आपल्याला उगाच वाटतं, आज हा आला, उद्या तो आला..
October 6, 2019

शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते!
पिसा येथे, स्क्वायर अॉफ मिरॅकल्स या ठिकाणी, असणाऱ्या तिन्ही वास्तू खरोखरच अप्रतिम ! बांधकाम कलेचे उत्कृष्ट उदाहरण. तीनही पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पासून बनवलेल्या. सभोवतालच्या हिरवळीवर आणि आकाशी अंबराच्या पार्श्वभूमीवर तर या चांदण्यां सारख्या चकाकत होत्या. अशा या सौंदर्यपूर्ण इमारतींना सामावून घेणारा हा चौक म्हणूनच स्क्वायर ऑफ मिरॅकल्स या नावाने ओळखला जातो. एवढ्या विशाल इमारती, त्यावर असणारी शिल्पकला, त्याचे आर्चस् ,त्यावरील अगणित नाजूक दिसणारे असंख्य खांब हे सारं अक्षरशः एखाद्या चमत्कारा सारखंच आहे. बघता क्षणीच या जागेला दिलेले नाव अगदी साजेसं आहे असे लक्षात आले.
बापेस्ट्री,कॅथॅड्रल व लेनिंग टॉवर ऑफ पिसा या संगमरवरी वास्तू लांबून बघितल्या असता, एका सरळ रेषेत असाव्यात असे वाटते. पण जवळ गेल्यानंतर प्रत्येक वास्तू केवढ्या तरी अंतर ठेवून स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या दिसून येतात.
बापेस्ट्री. बापेस्ट्री ,हा चर्च चाच एक प्रकार.पण प्रार्थने शिवाय येथे इतर धर्मियांचे धर्मांतर करून त्यांचा ख्रिश्चन धर्मात समाविष्ट केले जाते,ते ठिकाण.अशी माहिती मिळाली.
संपूर्णपणे गोलाकार असणारी ही वास्तू ,आपल्या कर्नाटकातील विजापूरच्या गोलघुमटाची आठवण करून देते. इटलीमध्ये आर्चस् चे जरा जास्तच महत्त्व आहे असे दिसून आले.या वास्तूला ही भरपूर छोटे-मोठे आर्चस् असून प्रचंड मोठा व्यास असणारी ही वास्तू आहे.तिचे आज किती महत्त्व आहे माहीत नाही, पण इटलीच्या प्राचीन इतिहासात ही अतिशय महत्त्वाची असणार एवढे मात्र नक्की. इतिहासाचा मागोवा न घेता पर्यटनाचा आनंद लुटावयाचा या हेतूने केलेले आमचे पर्यटन मात्र सफल होत आहे हे लक्षात आले.
कॅथेड्रल,आयताकृती रचनेतून साकारलेले पण त्यावर भरपूर आर्चस्, पुतळे असणारे हे चर्च खूपच मोठे आहे.कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ असू देत, मंदिर,मज्जीद ,चर्च किंवा आणखीन कोणतेही तेथे गेले की, ती वास्तू प्रसन्नपणे आपल्याकडे बघून स्मित हास्य करत,आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवत असल्याचा भास होतो.आपले मनही आनंदून जाते.आपल्या डोळ्यात मावणार नाही असे हे कॅथेड्रल कितीतरी लोकांना मन:शांती बहाल करते.
लेनिंग टॉवर ऑफ पिसा, ज्याला आपण पिसाचा झुलता मनोरा असे संबोधतो.सकृत दर्शनी हा मनोरा म्हणजे, कॅथॅड्रल चाच एक भाग असावा असे वाटते. पण जवळून बघितल्या नंतर दोन्ही स्वतंत्रपणे उभे आहेत हे लक्षात येते.इ.स.१११३मध्ये 'बोनॅन्नो पिसानो' नावाच्या अभियंत्याने या मनोऱ्याचे डिझाईन बनवले.जगातल्या सात आश्चर्यांच्या ओळीत बसलेला हा मनोरा नंतर मात्र ओळीतून बाहेर पडला.
एकूण आठ माळ्यात बनलेला हा मनोरा आहे.सर्वच माळे गोलाकार आहेत.तर समान अंतरावर असणाऱ्या एकावर एक चढवलेल्या पिलर्स वर हा मनोरा उभा आहे प्रत्येक पिलर ला जोडणारे आर्चस् अत्यंत रेखीव आणि आकर्षक आहेत. संपूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी पाषाणात बांधलेला हा मनोरा, त्याचे बांधकाम चालू असतानाच साधारण चौथ्या माळ्या पासून झुकत चाललाय हे लक्षात आले. ३.९०अंश ते ५.५०अंशाने मनोरा एका बाजूला झुकल्याचे दिसून येते.जाणकारांच्या मते,या मनोऱ्याचा पाया हा सॉफ्ट ग्राउंड वर बांधला गेला आहे. त्यामुळे वर चढत गेलेले मनोर्याच ओझे हा पेलू शकला नाही. म्हणूनच हा झुकला असावा. या मनोऱ्यावर चढण्यासाठी एकूण २८४ पायऱ्या आहेत.चढावयास ३० मिनिटे लागतात.एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत यात लोकांना आत प्रवेश करता येतो. बाकी सहा महिने मात्र बाहेरूनच बघावा लागतो. आत मध्ये मोठ्या मोठ्या घंट्या ( बेल्स) लावलेल्या आहेत.
पिसाचा हा मनोरा जरी किंचित झुकलेला आहे,तरीही त्याचे सौंदर्य अद्वितीय आहेच. आपल्या डोळ्यांमध्ये तो जास्तीत जास्त साठवून ठेवावा असेच प्रकर्षाने वाटते.शेवटी कॅमेरात कैद केलेले सौंदर्य हे डोळ्यांनी बघितलेल्या सौंदर्यापुढे केंव्हाही गौणच.स्क्वायर आॅफ मिरॅकल्स चा हा नजराणा दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर हटूच नये त्यावरुन असे वाटत रहाते,हे मात्र अगदी खरे!
यानंतर आम्ही उंच टेकडीवरअसणाऱ्या,'पिझ्झाल्ले माईकॅंजेल्लो' या चौकात आलो. येथे भव्य उंचच उंच असा, संपूर्ण उभा असणारा डेव्हीड चा पुतळा आहे. संपूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या पुतळ्याचे अंगावरचे केस अन केस तसेच पोटाच्या आतील अवयवांचा बाहेरुन दिसणाऱ्या खुणांसह एवढा अप्रतिम बनवलेला आहे की तो हुबेहूब डेव्हीडच वाटतो.
इटली हा कला,संस्कृती, इतिहास यांनी संपन्न असणारा देश आहेच. कलेचे माहेरघर आहे. शिल्पकला चित्रकला संगीत क्षेत्रातले खूप नावाजलेले जास्तीत जास्त कलाकार इटलीमध्ये आहेत.
तेथे आपल्याला रस्त्यांवर सुद्धा ठिक ठिकाणी आपली कला सादर करत असणारी कलाकार मंडळी चौका चौकातून दिसतात.
डेव्हिडच्या भव्य पुतळयाला बघितल्यानंतर आम्हाला याच टेकडीवरून फ्लोरेन्स शहराचे दुर्बिणीतून दिसणारे विहंगम दृष्याने मनाला मोहूवून टाकले., कितीतरी टॉवर्स आणि कॅथॅड्रल चे डोंब तसेच सर्वच घरांची लाल रंगाची छतं हे नयनमनोहर चित्र आपल्याला विलक्षण भावते.
दिवसभर केलेल्या इटलीतील या साऱ्या गोष्टींची मनातल्या मनात समाधानाने उजळणी करत करतच आम्ही फ्लॉरेन्स शहरात प्रवेश केला. जवळजवळ युरोपभर किंबहुना, इटलीमध्ये जरा जास्तच प्रमाणावर, हॉटेलिंग करणारे लोक हॉटेलच्या बाहेर टेबल खुर्च्यांवर बसून लंच डिनर वगैरे घेताना दिसून येतात.या लोकांची आवडती जागा किंवा पद्धत म्हणता येईल ही. हॉटेल्सच्या डायनिंग मध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेणारे खूपच कमी लोक असतात तेथे.
फ्लॉरेन्सला रात्रीचा आराम घेत सकाळी नाश्ता आटोपत, आम्ही रोम या राजधानीच्या शहरात प्रवेश केला. येथून उतरलो, आणि 'Rome is not built in a day' ही प्रसिद्ध म्हण आठवली.
व्हॅटिकन सिटी,हा धार्मिक अधिष्ठानावर उभा असणारा एक स्वतंत्र देश. रोम शहरातच वसलेला, पवित्र चर्चेस साठी प्रसिद्ध.सर्वात कमी लोकसंख्या असणारा (केवळ एक हजार) आणि सर्वात कमी क्षेत्रफळ. म्हणून हा जगातील सर्वात लहान असा स्वतंत्र देश आहे.
मुस्लिमांना मक्का मदीना जेवढे पवित्र, तेवढेच ख्रिश्चन लोकांना पवित्र असणारी ही व्हॅटिकन सिटी. छोटा आहे तरीही या देशाला आपली स्वतःची अशी राज्यघटना, राष्ट्रध्वज, चलन,पासपोर्ट या सर्व गोष्टी आहेत. त्यांचे मुख्य धर्मगुरु पोप हेच या देशाचे राजे असतात. त्यांचे वास्तव्य येथे असते.या देशातील चर्च फारच बघण्यासारखी आहेत. एक कोटींपेक्षा जास्त अनुयायी असणारे हे पवित्र ठिकाण आहे.
व्हॅटिकन म्युझियम व सिस्टीन चॅपेल ही दोन्ही ठिकाणे अप्रतिमच. चित्रकलेचा राजा असणाऱ्या मायकेलअँजेलोने काढलेले सुंदर सुंदर पेंटिंग्ज व थक्क करून टाकणारी सिलिंग पेंटिंग्ज बघून,"आ वासून बघणे", म्हणजे काय असते?याचा प्रत्यय येतो. म्युझियम मध्ये चित्रकलेशिवाय शिल्पकला स्थापत्यकला यांच्या एकापेक्षा एक सुंदर सुंदर नमुन्यांचा अक्षरशः भरणा आहे. त्यांची भव्यता दिव्यतेच्या साथीने आपल्याला थक्क करून टाकते.
सिस्टीन चॅपेल हे येथील पोप यांचे निवासस्थान. सिलिंग पेंटिंग या कलेचा आणि त्याचबरोबर चित्रकलेचा कळस गाठणारी ही ठिकाणं. एवढ्या प्रचंड उंचीवर पेंटिंग्ज कशी साकारली गेली असावित? या विचाराने मती गुंग होऊन जाते.केवळ शब्दातीत असणारे हे सौंदर्य बघून आपले डोळे दिपून जातात,हे वेगळे सांगणे नकोच.
पवित्र बॅसिलिका या वास्तूला भेट हा एक अनोखा अनुभव होता. बॅसिलिका म्हणजे एक विशेष प्रकारची डिझाईन केलेली भव्य अशी पवित्र वास्तू. प्राचीन काळात राजकीय आणि कायदेविषयक चर्चा करण्याकरता या वास्तूचा उपयोग व्हायचा.बॅसिलिका म्हणजे मोठ्ठे असे पवित्र कॅथॉलिक चर्च. येथे मुख्य धर्मगुरूंचे वास्तव्य असते. या वास्तूचे पावित्र्य आणि स्टेटस् उच्च स्थानी रहाण्याची परंपरा कायम राखली जाते.बॅसिलिका हे स्थापत्य कलेचे वैभव संपन्न ठिकाण आहे.
रोम शहरातच असणारी पण स्वतंत्र देशाचा दर्जा राखणारी,ही पवित्र नगरी व येथील ठिकाणं आपल्याला आपल्या चार धाम यात्रेच्या पावित्र्याची आणि मांगल्याची आठवण करून देतात हे खरे.
भाग १० समाप्त.
क्रमशः
© नंदिनी म. देशपांडे
January 19, 2019
स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं.
December 21, 2023
आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत..
October 23, 2023
एक महापंडित होते. सर्व शास्त्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या होत्या. मात्र महापंडित असूनही राजा आपल्याला 'राजगुरु' करीत नाही, ही त्याची खंत होती.
एकदा ते राजाकडे गेले व आपणास “राजगुरू” करावे म्हणून साकडे घातले. राजा म्हणाला. माझ्या तीन प्रश्रांची उत्तरे दिलीत तर मी तुम्हाला राजगुरू करीन. उत्तरे पटली नाहीत तर मात्र मृत्युदंडाची शिक्षा देईन.
परमेश्वर कोठे असतो? तो कोणत्या दिशेकडे पाहतो आणि तो नेमके काय काम करतो? हे राजाचे तीन प्रश्र होते.
खरे तर या प्रश्रांची उत्तरे पंडिताला माहीत होती. मात्र, जर राजाला ती पटली नाहीत तर आपला बळी जाईल या कल्पनेनेच ते धास्तावले. त्यांनी उत्तरासाठी तीन दिवसाची मुदत मागितली. महापंडित घरी आले
त्यांचा नोकर खूपच हुशार होता. दरबारातली घटना कळली तेव्हा तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. तीन दिवसांनंतर मीच राजाकडे जाईन व बळी गेला तर माझाच जाईल. तीन दिवसांनंतर तो नोकर राजाकडे गेला व त्याने महापंडितांऐवजी मीच तुमच्या प्रश्रांची उत्तरे देईन व ती पटली नाहीत तर मृत्युदंडही स्वीकारीन, असे म्हणाला.
“परमेश्वर कोठे राहतो?” या पहिल्या प्रश्नासाठी, त्याने पेलाभर दुध मागविले. मग म्हणाला “हे दूध आहे मात्र त्याच्या कणाकणात असलेले लोणी दिसत नाही. तसेंच प्रत्येक अणू-रेणूत परमेश्वर असूनही तो दिसत नाही.”
“परमेश्वर कोणत्या दिशेला पाहतो?” या उत्तरासाठी त्याने एक पेटलेली मेणबत्ती मागवली. ती दाखवत तो म्हणाला, “ही मेणबत्ती कोणत्याही विशिष्ट दिशेकडे पाहात नाही. तिचा प्रकाश मात्र चारही दिशांना पसरला आहे. परमेश्वरही चारही दिशांना सदैव पाहतो त्यामुळे तो सगळीकडे आहे.”
आता तिसरा प्रश्र. “परमेश्वर काय करतो?” तर राजा म्हणून तुम्ही जे करता तेच! म्हणजे एखाद्याला वर चढविणे, खाली ढकलणे, कोणाला जीवनदान तर कोणाला मृत्युदंड देणे. ही जशी कामे तुम्ही करता तसेच परमेश्वरही अशी कामे करतो. म्हणजे, तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो.
राजाला ही तिन्ही उत्तरे लगेच पटली व त्यालाच त्याने राजगुरू होण्याची विनंती केली. मात्र नोकर म्हणाला, त्या जागेसाठी माझे मालकच योग्य आहेत. राजानेही विचार केला की, नोकरच एवढा हुशार तर महापंडित खरेच ज्ञानी असावेत. त्यामुळे त्यांना बोलावून त्वांनी त्यांची राजगुरू पदावर नियुक्ती केली..
December 8, 2017
एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.
श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
श्रीकृष्ण हसून म्हणाले " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ' कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ' म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. "
जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.
१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.
२ - तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.
त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.
ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.
ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 19, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti