बरेच दिवस झाले
काही लिहिले नाही
तुझ्या आठवणीत...
तुझी ती आठवणच
हरविली नाही ना ?
माझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज रचल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज सोडल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
माझ्या आयुष्यातील कित्येक
वर्षे वाया गेली
तुझ्या आठवणीत...
मी राहात होतो
तुझ्या नाजूक हृदयातील
माझ्या आठवणीत...
आठवणीतील माझी तू
तुझा मी राहतील
जगाच्या आठवणीत...
©निलेश बामणे
May 28, 2017
बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं
काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१,
तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे
परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२,
शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला
मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३,
बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें
समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४,
मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे
मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५
शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा
पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा...६,
जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगते
धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते...७
मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने
दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने...८,
तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने
असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे...९,
पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे
भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे....१०,
फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी
विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी...११
कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी
पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी....१२,
भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला
शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला....१३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2018
दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले, ह्या जगावरती
रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती.....१,
धन्य जहाले वाल्मिकी व्यास, ज्यांनी ग्रंथ लिहीले
मानवातील विविधतेचे, दर्शन ते घडविले....२,
विश्वामधला प्रत्येक विषय, हाताळला दोघांनी
शोधून काढण्या काही, निराळे समर्थ नाही कुणी....३,
आद्य कवी वा लेखक म्हणूनी, मान तयांना आहे
अनुकरण ते त्यांचे करिता, पुष्प तयांना वाहे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 4, 2018
शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप
October 8, 2018
आपापल्या महालात
तुम्ही सर्वेसर्वा असता,
मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे
सरदार असा किंवा शिलेदार.
बाहेर पडल्यावर मात्र
तुम्ही बनता
जगातील कुणीतरी,
लहानमोठे.
कुणापुढे तरी
तुम्हाला
झुकावं लागतं .
पण ,
आणखी कुणाला तरी
तुम्ही
स्वत:पुढे वाकायला लावता .
आणि त्यामुळे ,
फक्त त्यामुळेच ,
तुम्ही
मोठे मोठे
बनत जाता -
डोंगराएवढे
पर्वताएवढे .
पण ,
तें मोठेपण
केवळ दरबारातच असतं
केवळ देवडीवरच रहातं .
रणशिंग फुंकलं जातं
आणि
तलवारी भाले उंचावून
सारेजण
स्वत:ला
लढाईच्या धुमश्चक्रीत
झोकून देतात
तेव्हां ,
शिलेदार काय
अन् पेशवा काय
सारे सारखेच असतात .
पानपतावर
एखादा बारगीर पडतो
तसाच
एखादा विश्वासरावही पडतो,
कुणाची तरी
निनावी गोळी लागून .
एखादा भाऊ सापडतो
दुश्मनांच्या भाऊगर्दीत,
आणि धराशायी होतो
कुणा अनामिकाच्या
तलवारीच्या फटकाऱ्यानं .
रणधुमाळीत
नसतात शिलेदार , नसतात पेशवे,
नसतात हुद्दे , नसतात नावें ;
असतात फक्त -
पेशवे आणि हुजरे यांना
एकाच पातळीवर आणून सोडणारी
अस्ताव्यस्त पडलेली शवें .
बस्स .
हेंच एक चिरंतन सत्य आहे ,
आणि हेंच आपण
ध्यानीं ठेवायला हवें,
यशाची उत्तुंग शिखरें चढतांना ,
जीवनाच्या पानपतावर
प्राणपणानें लढतांना ,
आणि ,
हिरवा चुडा फोडून टाकून
धाय मोकलून रडतांना देखील .
-- सुभाष स. नाईक, सांताक्रुझ, मुंबई .
May 19, 2016
January 31, 2022
तु ऐकतेस तो नवा सूर आहे..
जवळचा भासतो तरी दूर आहे..
वेगाने वाहते पाणी आताच सारे
म्हणून साचलेला जणू पूर आहे...
नव्यानेच वाचले पान हे जगाचे
जगण्याची कसब येथे जरुर आहे..
जळणे संपत नाही दिवस रात्रीचे
धुमसला कोठून मग असा धूर आहे..
जखमांची खोल काळजात उरते
वेदनांचा हिशोब मात्र पुरेपूर आहे..
थकशील जेव्हा लढताना एकट्याने
तुझ्या शिवाय सांग कोण शूर आहे
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 28, 2026
माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,
अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर....१,
राम नाम जपत, कुणी एक येतात
घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात....२,
रोज देती मजला, ओंजळभर फूले
कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले....३,
त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो
बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४,
फूलांची ओंजळ ती, नव्हे तो तर शब्दांचा ठेवा,
कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा....५,
शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो
विषय मिळूनी, काव्य मी रचीतो....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 13, 2016
ठेवावं लांब लोका , भविष्य सांगणाऱ्या
बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /
गलका कसा बरे हा ? भवताल भाटगाने
हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /
आणील आसमंता ,ठेवील या कराशी
तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /
सारेच आनंदी वातावरण भोवताली
शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /
गझलेत 'कौशला ' म्हणे हा मक्ताच झाला
नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या
-- श्रीकांत पेटकर
February 25, 2019
मह्या शेतातं जोंधळं,
डोले डौलं वार्यावरं
पानं हिरवे वल्लेचिंब,
सळसळती तालातं...!!!
वारं गाई गाणं छानं,
घुमे शिळं कपार्यांत,
कणीस डोकाऊनं पाहते,
धुंडते शिळकर्यालं..!!!
पानावर पानं सात,
पानं बसले चोपून
जसं नववारी लुगडं,
नेसलं नटुनं थटुनं.!!!
दानं भरती कनसातं,
मोती पवळंयाची आरासं
लपत येई चिमना चोरं,
नेई दानं पळवुनं...!!!
फुलपाखराच्या संगतीनं,
फुलं पहाती लपुन,
मध्ये लुडबुडे सुगरनं,
खोपा सांधत सांधत़...!!!
भरली निसर्गाची शाळा,
पक्षी किटकांचा मेळं
झाडं बसले रांगेतं
रंगला सृष्टीचा खेळं....!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 10, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti