आभाळ दाटून आले चहूकडे अंधार झाला
तोडण्यास लचके कुणाचे लांडगा सिंह झाला
फुंकली हवा शिडात विषारी जातीयतेची
भिडवतात धर्मांधांना भरण्या तुंबडी स्वतःची।
भासवती निधर्मी स्वताला येथे तुम्हा आम्हास
ऊचलता तळी ऊपऱ्यांची यांचा जातो जन्म लयास
बहुसंख्य जातोय बळी ना अंत लांगुलचालनास
भावना पायदळी तुडवतात ना खंत कधी कुणास ।
टपलेत मदारी येथे रोज दाखवती नवीन खेळ
मिथ्या आरोप करुन ते रोज ऊडवतील राळ
परी पुरुन ऊरशील तू त्या ढोंगी मदाऱ्यांना
वेळ येताच तुझी तू लोळवशील खास त्यांना ।
लागलीय एकदा ठेच ना अक्कल अजुनी आली
का पडतोय आपण सतत ना जाणीव त्यांना झाली
आता पुन्हा एकदा आलेत ते खचीतच मस्तीत
होईल कपाळमोक्ष हे त्यांचे भविष्य आहे निश्चित ।
पाहून या काजव्यास मनी संतोष आज झाला
मुकाबला करण्यास रात्रीचा काजव्याचा जन्म झाला
आता एकची आधार तू हा अंधार मिटवण्याला
रुप घेऊन काजव्याचे साक्षात सुर्य धरतीवर आला ।
-- सुरेश काळे
सातारा.
मो.9860307752
दि. २३ आक्टोंबर २०१८
November 17, 2018
सरतेच आहे आयुष्य सारे
तरी मी कोण कळले नाही
धावलो, मी मृगजळापाठी
कां? कसा ते कळले नाही
लाभली नाती ऋणानुबंधी
ओढ कधी जाणवली नाही
भावनां, साऱ्याच कोरड्या
मनांतर कधी भिजले नाही
जगणे सारेच भोग भाळीचे
मी त्यास कधी टाळले नाही
जे लाभले ते निमूट भोगीले
त्रागा कधीच मी केला नाही
सत्संगास मी सदा भुकेलेला
तो मार्ग कधीच सोडला नाही
प्रारब्धयोगा भोगूनी संपवावे
हा विचार मी अव्हेरला नाही
विवेके केवळ सत्कर्म करावे
सूत्र! जगण्याचे भुललो नाही
कधीतरी भेटेलही तो भगवंत
ही मनीषा कधी सोडली नाही
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८६.
१९ - ३ - २०२२.
April 1, 2022
वसंत ऋतूवर निलेश बामणे यांची एक कविता..
February 20, 2016
झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ,
विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी
कुणी गडद, कोणी लालेलाल झाला
बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला
कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला
कोणता अधिक सुंदर ते विचार करे
माझा रंग बिनतोड', ते पक्के ठरवे
मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,--
निसर्गघटक कितीतरी, असती,
कोण दाखवेल असे औदार्य,--?
एकट्या मला या जगी तोड नसे,
कुणी कोणतेही रंग आणो,
निळ्या नभाला तर 'होड" नसे,--!!
रंग माझे बदलती, नेहमी
रंग पांढरे, काळसर,केशरी,
रंगतदार सूर्योदयी, सूर्यास्ती,
धुळवड खेळतो रोज मी,--
सांगा कोणता रंग नसतो,
इंद्रधनुष्याची पहा ना जादू,
रंग सारे उतरती खाली,
धरतीला घालती न्हाऊ,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 14, 2019
आम्हास नाही तमा,
संपत्तीची अन सत्तेची
जोपासली आहेत आम्ही,
नाती निष्ठेची अन् भक्तीची
शिवरायांचा जाज्वल्य अभिमान,
पाहिला अन् अनुभवलाही
म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा
भिनवलाही अन् जपलाही
कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर
आम्ही अनेक अवघड गणिते
सोडविली
सत्तेची, राजेशाहीची धुरा
आम्हीही सांभाळली
इतिहास घडविला आम्ही
तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही
विविधरंगी कलांनी
जीवनेही रंगविली आम्ही
आमचे शौर्य, स्वाभिमान, बुद्धीमत्ता
आणि हो आमची खाद्यसंस्कृती
सारेच कसे भारदस्त,
आणि आगळेवेगळे मस्त !
काय वर्णावी चव
खिचडीची
बिरठ्याची अन् कोलंबीच्या
आजही चवीने मजा लुटतो आम्ही
निनाव्याची अन् कानवल्यांची !
आम्हास अभिमान आहे
आमच्या जातीचा अन् मातीचा
आमचे अस्तित्व अबाधित आहेच
हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !
हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !!
सौ. मृणाल महागांवकर, महाड
May 11, 2024
बदलून गेले जीवन
अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण
जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें
ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने
माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने
अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने
निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट
निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट
प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल
विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल
सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा
शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका
परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 6, 2017
उन्हांत फडफडणारी
एकाकी
फांदी................
वर आभाळापर्यंत
हात पोहचत नाहीत
आणि खाली
कुठलाच समुद्र
स्वागताला उत्सुक नाही .................
तिचे अस्तित्वच
असे,
पणांला लावलेले
बदमाष ऋतुंनी
बहरांतच शापलेले ....................
-- सुषमा एडवण्णावर
August 31, 2010
धागा धागा मिळून,
बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
May 23, 2019
अंतर्मनात
शोधण्या तुजला
मन कधीचे आतुर
डोकवावे आत खोलवर
बाहेर पाहावे खूप दूरवर
ठसवावे तुजला आतवर
तुझ्यात मी, माझ्यात तू
सर्वव्यापक एक तू
तू तो ईश्वर
तरीही मी एक
..देह नश्वर..
-- अरुण वि. देशपांडे
पुणे.
March 7, 2019
जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,--?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,-- कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,--!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,--!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,--!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,--!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,--!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
March 4, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti