December 11, 2021
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला परि न जाणला संसार ।।
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 23, 2017
अगणित तारे जीव जीवाणूं ।
अथांग विश्व अणू रेणू ।।
रंगरूप हे नेत्री दिसती ।
भिन्न भिन्न राहूनी जगती ।।
रस गंध दरवळे चोहीकडे ।
जगण्याचा तो मार्ग सापडे ।।
हे जर आहे रूप ईश्वरी ।
बघती त्याला आमुच्या नजरी ।।
सुख दु:ख ही त्याची निर्मिती ।
फिरे सदा आमचे भोवती ।।
निराकार निर्गुण, म्हणती त्याला ।
म्हणूनच तो साऱ्यात सामावला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 29, 2016
वसंत जेथे तेथे सुमने
सुमनांपरी ही दोन मने
दोन मनांतुन प्रीत दरवळे
रंग एक परि गंध वेगळे
दोन मनांतुन प्रीत दरवळे
बकुळफुलांचे घुंगुर बांधून
प्रीत सुगंधा करिते नर्तन
नादमधूर या झंकारातून
भाव मनीचा तुला मिळे
शुभ्र धवल मोगरीची
पुष्पमाळ गुंफिते
चैत्र पौर्णिमेची सख्या
प्रीत वाट पाहते
क्षणाक्षणाची आस तुझी
लाख युगे मोजिते
अंतरीच्या मूर्तीला मी
भावफुले वाहते
वसंत जेथे तेथे सुमने
सुमनांपरी ही दोन मने
दोन मनांतुन प्रीत दरवळे
पी. सावळाराम
March 2, 2017
तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां
आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,
शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी
फडफड करित मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी
जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकूनी हास्य टिपते
हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते
अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसूनी येती
दिव्यामधले तेल संपता, काजळी धरल्या दिसे वाती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 11, 2019
रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर,
प्रत्येक नात्याचा वेगळा आदर
आईच्या गर्भात नात्याची रुजवात,
जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात
भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती,
नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी
आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक
नात नव जुळत असतं,
जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं
म्हणून तळहाताच्या फोडासारख,
जपाव लागत नात,
अन् कळीसारख अलवार,
फुलवाव ते लागत
नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं,
गरीब- श्रीमंत, जात-धर्म, बंधन त्याला नसतं
सरणावरती जळतो,
तरी जळत नसत नातं,
नावासारख मागे उरत
तेच खर नातं, तेच खर नातं
-- सौ. अलका वढावकर
January 12, 2016
March 1, 2014
जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,--?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,-- कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,--!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,--!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,--!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,--!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,--!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
March 4, 2020
बालकविता
ससेराव, ससेराव,
निघालात कुठे ,
चांदोबावर स्वार
अगदी भल्या पहाटे,--!!!
भोवती किती ढग,
वाजत नाही का थंडी,
अंगात तुमच्या लुसलुशीत ,
पांढरी पांढरी बंडी,--!!!
ससोबा ससोबा,
कान करून उभे,
वटारून आपले डोळे,
बघता काय मागे,--!!!
तुमच्यासंगे हरिण,
आज नाही का आले,
का छोट्या बाळागत,
आईच्या कुशीत झोपले,--?
ससेराव ससेराव,
भीती वाटते मला,
हलता हलता चंदामामा,
पाडेल ना तुम्हाला,--!!!
मग काय तुमची,
चार पायांची गाडी,
तुरूतुरू धावत,
गायब होईल स्वारी,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 23, 2020
सुरु होते सुरळीत । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।
आला अदृश्य विषाणू । माजविला हाहाःकार ।। १ ।।
किती उपाय योजिले । दूर ठेवण्यासि त्यास ।
रोज डांबून ठेविले । घरी सकळ जनांस ।। २ ।।
हात सतत धुतले । पाणी प्यायले कोमट ।
तरी सरता सरेना । विचारांचे जळमट ।। ३ ।।
नको कसलाच धोका । सारे झालो भावनिक ।
रिचविला काढा ,गोळ्या । भरीस अर्सेनिक ।। ४ ।।
एकैक ऐकोनि अनुभव । गेली मने हेलावून ।
निद्रादेवी ही रात्रीस । आता हसे वेडावून ।। ५ ।।
सारे आकडे पाहता । साऱ्या लाखाच्याच गोष्टी ।
सारी प्रजा अन राजाही । जाहले दुःखी कष्टी ।। ६ ।।
नको नको रे माणसा । असा उतावीळ होवू ।
तीन मासाचे प्रयत्न । नको धुळीस मिळवू ।। ७ ।।
सर्वा कळून चुकले । त्वरित सोडेना हा पाठ ।
त्याच्या सोबत जगणे । बांध आता स्मरण गाठ ।। ८ ।।
नको नकोसे वाटले । परि यात आहे तथ्य ।
आता पाळायाच हवी । काही सामाजिक पथ्य ।। ९ ।।
घराबाहेर पडता । सदा मुख-नाक झाक
तेथे दिसता सवंगडी । मार दुरूनच हाक ।। १० ।।
तरी समीप ते येता । घाल स्वतःवरी बंधन ।
नको हस्तस्पर्श आलिंगन । केवळ हाताने वंदन ।। ११ ।।
द्रव्य खर्चण्या आधी । कोष्टक मांड तू त्रिवार ।
मुख्य गरजा सांभाळ । नको चैनीचा विचार ।। १२ ।।
जरी नैराश्य भवताली । ठेव उल्हासित चित्त ।
परिस्थिती सुधारण्या । तू व्हावेस निमित्त ।। १३ ।।
शासकांच्या हाती असे । केवळ सुविधांचा दर्जा ।
परि तुझ्या जीविताची मात्र । तूच आहेस उर्जा ।। १४ ।।
काळ जरी हा कठीण । अटळ आहे त्याची हार ।
काळ हेच असे औषध । तोच नेईल अटकेपार ।। १५ ।।
सर्वकाही करू आता । जगण्याच्या आसक्तीने ।
पिटाळून लावू त्यास । शक्ती-युक्ती-भक्तीने ।। १६ ।।
पण एकट्याचे कर्म नव्हे । हवे सर्वांचेच दायित्व ।
अन्यथा अशक्य आहे । त्यावर मिळविणे प्रभुत्व ।। १७ ।।
अदृश्य शत्रूच्या चालीचं ।आता अवघं गणित मांडलं ।
संशोधनाचे फळ मिळता । घालोनि कवच कुंडलं ।। १८ ।।
सर्व मिळून निश्चित । वाचवू एक एक श्वास ।
दिवस येतील सुगीचे । दृढ आहे हा विश्वास ।। १९ ।।
आशेच्या या किरणांनी । नष्ट करू अंधःकार ।
पुन्हा सुरळीत करू । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।। २० ।।
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
August 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti