शून्य होऊन जगता यावं,
कुणाची वाट पाहत नाही,
कुणाच्या आठवणींनी
रात जागवावी असंही नाही.
कोणी भेटलं तर ठीक,
नसलं तरी चालेल,
मनाला एवढंच कळलं पाहिजे
आपण पुरेसे आहोत,
हे कुणी सांगायला नको.
हसू येईल तेव्हा हसावं,
डोळे भरले तर
त्यांना थांबवू नये,
दुःख आलं
म्हणून स्वतःवर रागही नको.
कुणी सोबत राहिलं
तर आभार मानावेत,
कुणी निघून गेलं
तर दोष कुणालाच नको,
सगळं होतंच,
म्हणून होतं
इतकंच समजून घ्यावं.
शून्य म्हणजे एकटेपणा नाही,
ते म्हणजे मनाचं
हलणं थांबणं,
जिथे काही हवं नसतं,
आणि तरीही
श्वास शांत चालू असतो.
शून्य म्हणजे पोकळी नाही,
तो एक अथांग आकाश आहे,
जिथे ‘मी’ हळूहळू विरघळतो,
अहंकाराचा आवाज मंदावतो,
आणि इच्छांची राख
शांतपणे खाली बसते.
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे काही मिळवायचं नसतं,
काही सिद्ध करायचं नसतं,
आणि तरीही
असण्याची जाणीव
पूर्णत्वाने धगधगत राहते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 30, 2026
नमन माझे श्री गणेशाला
वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला
भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला
परमात्म्याची विविध रुपें ।।१।।
परमेश्वराची लीला महान
घ्यावी सर्वानी जाणून
टाकून सारे ब्रह्मांड व्यापून
चालवितसे खेळ जीवनाचा ।।२।।
विश्वाचा तो अधिनायक
जीवन धर्माचा तो पालक
जीवन गाड्याचा तो चालक
परब्रह्म परमात्मा ।।३।।
नसे त्यासी मृत्यु- जन्म
कार्य करी तो अवतार घेऊन
कुणामध्यें अंशरुपे येऊन
जीवनचक्र चालूं ठेवी ।।४।।
प्रभूसी समजावे समर्थ
जाणून घ्यावा जीवन अर्थ
हेच आयुष्याचे सार्थ
आपल्या जीवनाच्या ।।५।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२५
एकसष्टीनंतर जीवनातील प्रमुख बाबींची प्रश्नावली मुलांच्या हाती द्यावी
ती कशी सोडवतात, त्याकडे सजगतेने नजर ठेवावी
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
May 15, 2013
मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले
मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले ।
मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली
आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली ।
हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे
त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे ।
जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई
जाशील खरोखर दूर तर मग माझे काय होई ।
जगणे तुझ्याविना ही जाणीवही असह्य आहे
निरोप तुझ्याआधी घ्यावा हेच सुखकर आहे ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
दि. ६ आक्टोंबर २०१८
November 14, 2018
स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 31, 2014

गल्लीबोळा हिंडून हिंडून
बरीच झाली फिरती
आणि सुखाची झोप लागली
इवल्या जागेवरती
August 20, 2026
मनाची समजूत कशी घालावी
नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची
सांगना मी तुला गं विसरु कसे
हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची
क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते
निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची
प्रीतीविना कां? असते जीवन
लाभते प्रीती, संचिती सुखाची
कोवळ्या कळीत मकरंद मधुर
भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची
सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे
त्याविण नसे, प्रचिती सुखाची
भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे
कृपा सार्थकी, त्या भगवंताची
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५३.
२१ - ६ - २०२२.
August 3, 2022
चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.
November 9, 2016
भीतीपोटी सारे करतां,
असेच वाटते....।।धृ।।
विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते
त्रिकाळ चाले पूजा अर्चा,
प्रभूविषयी होई चर्चा,
बालपणींच पडे संस्कार,
सारे देण्या समर्थ ईश्वर,
कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते,
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते ।।१।।
चूक असे हे ठसें मनाचे,
कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे,
सहभाग नसे यात प्रभूचा,
सारा खेळ असे तो मनाचा,
अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते
भीतीपोटी सारे करता असेच वाटते ।।२।।
ऐषआरामाचे आम्ही पाठीं,
धडपड चाले सुखासाठी,
साशंक सदा मन असते,
म्हणून सारे वंचित होते,
मिळवण्यासाठीच त्याला भजावे, ही भावना मनी येते,
भीतीपोटी सारे करता असेच वाटते ।।३।।
वाद नसे ईश्वर शक्तीचा,
चालवी सतत गाडा विश्वाचा,
खेळ बघे तो दूर राहूनी,
सारे देई तुम्हावरती सोपवूनी,
परि मन वेड्या आशेने, त्याजकडे धावते,
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 9, 2016
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
हा दोष तुझाच, तु त्यांना रोखले नाही.
ज्यांने हे व्रत राखयचे त्यांनी राखले नाही.
जरी टिळक,आगरकर,गोखले,आंबेडकर मज लाभले.
आज बघ मला कसेनको नको त्यांनी दाबले.
नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
गल्ली दैनिकात चालते,तेच दिल्ली दैनिकात चालते.
सांगती लोक किती जरी त्यांचे घडेच पालथे.
लाजवितो कॅमेरा
लेखणी टॊचते आहे.
कसे सांगु मी तुला ?
कुठे कुठे बोचते आहे ?
माझेच मला माहित,
मी हे सोसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
परस्परच कारभार,कुणी कारभारी बघतो.
लोकशाहीचा चौथा खांब,आज चौथाई मागतो.
मजबूत होता पाया जो,तोच नेमका उकरला जातोय.
ज्यावर लोकशाही उभी तो खांब पोखरला जातोय.
सांग वाळवी ही इथे,घुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
ना टोचती खिळे मला,झाले गुळगुळीत मी.
सप्तरंगांत रंगुनि सार्या झाले बुळबुळीत मी.
ज्यांच्याविरुद्ध लढायचे तेच माझे मालक झाले.
करणारांनी केले पोरके,नको ते चालक-पालक झाले.
क्रुर ही थट्टा बघून,मनात मी हासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
जेंव्हा मालक सांगतील तेंव्हा,
वृत्तपत्रीय युद्धाचे शंख फुकले जातात.
स्वागतमूल्याच्या नावाखाली,
रूपायातही अंक विकले जातात.
नंबर वन कोणचे?
फालतू प्रश्न पडतात इथे.
वाचकांना पटविण्यासाठी,
लक्की ड्रॉ ही काढतात इथे.
जिल्हावार आवृत्यांची, फौज पोसते कशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
बातम्या लिहिण्या वेळ कोणा?
सरळ झेरॉक्स मारली जाते.
कॉपी-पेस्टच्या तंत्राने
बातमी सहज पेरली जाते.
त्यांचेच अनुकरण केले जाते
जे कुणी म्होरके असतात.
कधी अगदी विरामचिन्हासहित
अग्रलेखही सारखे असतात.
विचारांची ही दुर्मिळता,
आज भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
लायकांची ओळ नसते,
नालायकांच्या आरत्या येतात.
लेखणीस शाई पाजता,
लेखण्यांना स्फुर्त्या येतात.
प्रसिद्धीपत्रकांच्या बातम्या,
पुरवण्याही प्रायोजित असतात.
फुकट्यांना विचारतो कोण?
ते काय पैसे मोजित असतात?
कुठे भाडे प्रतिसेकंद, कुठे कॉलम-सेंटीमीटरशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
इलेक्ट्रॉनिक तर प्रिंटच्या दोन पावले पुढे आहे.
चोविस तास दामटलेले ब्रेकींग न्युजचे घोडे आहे.
उद्या काया दाखवायचे?हाच आजचा सवाल आहे.
स्टींग-बिंग फोडीत राहते बेडरूमचा काय हालहवाल आहे?
माझीच मी मला, भेसूर भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मिणमिणत्या का होईना,
अजून काही पणत्या आहेत.
जाहिराती आणि बातम्या
ओळख तु कोणत्या आहेत?
कोणत्या पापाची आज मी फेड करते आहे ?
कसलीही न्युज असो,आज ती पेड ठरते आहे.
मी शीलवान असूनही,सहज फसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मलाही ठाऊक आहे
पोटाला तर जाळले पाहिजे.
समाजसेवेचा आव आणता,
काही तरी पाळले पाहिजे.
लेखणीच्या धारला आज
कॅमेर्याचे बळ आहे !
मी तुझ्यासमोर ओकली,
ही जनमाणसाची कळ आहे !!
बारीक बघितले तर,
आत्याबाईलाही असते मिशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मोबा.९९२३८४७२६९
-- सूर्यकांत डोळसे
July 18, 2010
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................
-- श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर)
February 15, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti