नको बनूस अविचारी
जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।
प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले
विवेक करण्या मनी यश तुला साधले
नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।
जाऊनी भावनेच्या आहारी
प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची
विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची
नको बनूस अहंकारी ।।२।।
जाऊनी भावनेच्या आहारी
बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी
राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी
नको जाऊस दारोदारी ।।३।।
जाऊनी भावनेच्या आहारी
प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी
ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी
कां मनाचा गोंधळ करी ।।४।।
जाऊनी भावनेच्या आहारी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 2, 2016
चिव चिव करीत, एक चिमणी आली ।
दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।। १
बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती ।
वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।।२
उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी ।
चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।।३
औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही ।
कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी लागून राही ।।४
चोंच मारीते आवाज करिते, यत्न्य केले सारे ।
श्रम होवूनी थकूनी गेली, हातीं न कांहीं उरे ।।५
चिंता लागली चिंता बघूनी, या चिमणीला ।
चलबिचल ही जेवढी होती, तसेंच दिसे हिला ।।६
स्वबांधवांना मदत करणे, त्यांच्या संकटी ।
पशू पक्षांतही दिसून येते, तत्वें ही मोठी ।।७
चालले होते प्रयत्न निष्फळ, या चिमणीचे ।
परि जिद्द ठेवतां भान नव्हते, आपल्या देहाचे ।।७
कांच पडली फूटून खालती, तडा त्यास जावूनी ।
एक आवाज तेथे घुमला, घाबरली चिमणी ।।८
जरी देह झाला रक्तबंबाळ, यश चमकले तेथें ।
समजत होती चिमणी बिचारी, बंधन तोडले ते ।।९
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 14, 2020
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
समोर ये तूं केंव्हा तरी,
बघण्याची मज ओढ लागली,
फुलूनी गेली बाग कशी ही,
बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।
कल्पकता ही अंगी असूनी,
दूरद्दष्टीचा लाभ वसे,
अंधारातील दुःखी जनांची,
चाहूल तुज झाली असे ।।२।।
शीतल करुनी दुःख तयांचे,
जगण्याचा तो मार्ग दाखविला,
सोडूनी सारे वाटेवरी,
आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।
आस्तित्वाची चाहूल येते,
आज इथे केंव्हातरी,
तव आशीर्वादे जगतो सारे,
हीच पावती त्याची खरी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 24, 2017
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।।
तुळसीहार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि रुप ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजित ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।
June 28, 2026
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,
फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,
चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,
वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 22, 2019
तुझे नित्य येणे जाणे
हळूच वळूनी पाहणे
नाही कधी विसरलो
तुझे ते लाघवी लाजणे
आठव ते सारे सुखद
निःशब्दी, प्रीतचांदणे
तुझे कटाक्ष सांत्वनी
निर्मली तुझे गंधाळणे
निष्पाप त्या जाणिवा
मनास भुलवुनी जाणे
तूंच हसरी कमलिका
सालस ते तुझे वागणे
अजूनही मी स्मरतो
रुप तुझे गोजीरवाणे
तू स्मरणगंधी सुगंधा
तुझे उमलुनी बहरणे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२५
४/९/ २०२२
October 3, 2022
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।१
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।२
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।३
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।४
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 8, 2020
निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा
गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा /
तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची
रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा !
कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार
दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा !
अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू
बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा!
झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे
जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा !
शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला
मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा!
जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे
मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा!
-- श्रीकांत पेटकर
February 24, 2019
February 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti