नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 19, 2021
WhatsApp वरुन आलेली कविता
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
-- WhatsApp वरुन आलेली कविता
-- सुशांत
July 1, 2017
जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने,
पडेल प्रवाहीं तिच्या कुणी, लागते त्याला वाहणे....१,
काही काळ वाहतो देह, डूबून जाणे लक्ष्य तयाचे
कसा वाहतो केंव्हां डुबतो, वेग ठरवी हे प्रवाहाचे....२,
बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती
वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होवून काठी राहती,....३,
देह क्षणाचा जरी, त्याची कर्मे चिरंतर राहती
कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना आठवण देती...४,
त्या कर्माच्या राही आठवणी, मार्गदर्शक जी बनती इतरा
डुबणाऱ्या त्या देहाकडूनी, सावध राहूनी कर्म करा....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 18, 2019
बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी
रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १
बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे
लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २
अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन
किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३
शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली
नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४
गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी
शोधूं लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५
चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली
सुचवित होती मिष्कीलपणें का तारकांच खाली ? ६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 12, 2016
श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला,
चक्रव्युंहामधली रचना,
हुंकार मिळे त्याला,
सुभद्रा झोपली असताना ।।१।।
गर्भामधले तेजस्वी बाळ,
ऐकत होते सारे काही,
जाण आली त्याची कृष्णाला,
वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।
चक्रव्यूहांत शिरावे कसे,
हेच कळले अभिमन्यूला,
अपूरे ज्ञान मिळोनी,
घात तयाचा झाला ।।३।।
गर्भामधला जीव देखील,
जागृत केंव्हां होवू शकतो,
खरा ज्ञानी तोच असूनी,
सुप्तावस्थेत सदैव असतो ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 5, 2020
डोहात वेदनेच्या, आनंद शोधतो मी, दु:खातही हसावे, हृदयास सांगतो मी
September 14, 2018
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१
तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे
तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६
केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली
काय हवे तिजला, या अवचित वेळी....७
जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती
हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य....११
चाहूल माझी लागता, सावध परि झाला
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 24, 2017
रोज रोज तुला सकाळी पाहतो । तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो ।
रोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी । तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी ।
कित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ । फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात।
जेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग । तोच तर आहे माझ्या प्रेमाचा खरा भाग....!!!!!!
कवी - सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com
Mob -8459493123
August 6, 2018
सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,
अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 29, 2021
बघतां बघतां
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
इवलं होतो मुक्त पाखरूं
वारा पिऊन बागडणारं
क्षणात रुसणारं-फुगणारं
क्षणामधें खुदकन् हंसणारं.
होतं हंसू निर्व्याज मोकळं
होतं सकाळचं ऊन कोवळं.
हळूंच सारं पसार झालं
किलबिलतांना कळलंच नाहीं.
अचानक येऊन यौवनानं
‘टक्-टक्’ करून केलं जागं
आणि उंबरठा ओलांडून
मस्तीत राहिलं पुढे उभं.
मी स्वार होतांक्षणीं
भरधाव सुटला वारू
सारं जग जिंकायची
तुफान दौड झाली सुरूं.
मनामधें जिद्द होती
मनगटात होता जोर
यशशिखर काबीज करायचं
उद्दिष्टही होतं समोर.
एकामागुन एक भराभर
हवं तें सारं मिळवत राहिलो
वरती-वरती पुढे-पुढे
स्वत:च स्वत:ला पळवत राहिलो.
पळत राहिलो, चढत राहिलो
थांबलो नाहीं फारसा
दरम्यान चौकट बदलत गेली,
बदलत गेला आरसा.
पण आरशावरचं मखमली आवरण
कधी मुळी मी काढलंच नाहीं.
खरं म्हणजे, सुचलंच नाहीं.
खरं तर,
मला बर्याच गोष्टी करायच्या होत्या
अनेक स्वप्नं होती
खूपशा इच्छा होत्या.
करायचं होतं शिवबांसारखं
कार्य महान, भव्य
करायचं होतं स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे
देशासाठी कांहीं दिव्य;
पुसायचे होते मला
पीडितांचे आंसू
पहायचं होतं दीनांच्या डोळ्यात
फुललेलं हंसू.
द्यायची होती
नृत्य-संगीताला
दिल खोलूऽन दाद
घ्यायचा होता कथा-कवितांचा
मनमोकळा आस्वाद.
ज्ञानोबा-तुकोबांसारखं
भक्तिरसात पोहायचं होतं
पंढरीच्या वारीत
नाचत-गाऽत जायचं होतं.
बरंऽच कांहीं करायचं होतं.
विणून ठेवलं होतं कधीचं
मी नाजुकसं जाळं,
पण कवटाळुन अर्धा क्षणही
घेतां नाहीं आलं;
बंद कप्पे धुंडाळायला
मला अजिबात जमलंऽच नाहीं.
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
- सुभाष स. नाईक
M : 9869002126.
April 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti