देव शोधू नकोस दूर, आकाशात वा पाषाणात,
तो तर उगवतो हळूच, तुझ्या प्रत्येक विचारात.
जिथे हेतू शुद्ध असतो, निःस्वार्थी प्रत्येक श्वास,
तिथेच घडते उपासना, तिथेच ईश्वराचा वास.
सुंदर विचार म्हणजे मौनातील प्रार्थना,
न बोलता केलेली, पण काळजात कोरलेली भावना.
स्वतःला हरवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी उभा राहतोस,
तेव्हाच देव तुझ्या रूपात जगाला भेटतो.
अहंकार वितळतो जेव्हा सत्याच्या प्रकाशात,
तेव्हा अंतरात्मा न्हाऊन निघतो निर्मळ विश्वासात.
ना घंटानाद, ना मंत्र, ना धूप-दीपांची साथ,
एक शुद्ध विचार पुरे, देव ठेवतो हातात हात.
जोपासना म्हणजे लढा, स्वतःतील अंधाराशी,
प्रकाश जन्माला घालणं प्रत्येक चांगल्या इच्छेशी.
जिथे विचार पवित्र, तिथे जीवन पावन सेवा,
कारण सुंदर विचारांची जोपासना, हीच खरी ईश्वर सेवा.
* कीर्तिराज आगलावे
July 13, 2026
दगड़ा मातीच्या विटांनी
उभारलेल्या चार भिंतित
मनातलं घरपण सजलयं
फुलदाणीच्या फुलांफुलात.....
सुखाला शोधित शोधित
दुःखांना निवारत निवारत
जणु सप्तरंगली सावलीच
उतरलीय नभातून अंगणात....
पण मन माझं भिरभिरतय
एकटंच निरभ्र नभांगणात
उरि, प्रारब्धाला कवटाळत
गुंतलय ऋणानुबंधी पाशात....
काळ, झरझर सरतो आहे
मनामनांत, मनेही गुंतलीत
सारं काही छान होणार आहे
हा भाव जपला आहे अंतरात....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४०
१९/९/२०२२
September 24, 2022
रामास शोधण्या मी धामास जात नाही
धोंड्यास मानने हे माझ्या युगात नाही
देवास भेटण्याला गर्दी जमाव सारा
त्या माणसातली तीमा झी जमात नाही
तीर्थास लोक जाता देवास मागता
ते तीर्थामधील देवा ऐकूच येत नाही
कित्येक सोसले मी घावास पोसले मी
धावून संकटी तो काळास येत नाही
शोधावयास देवा मी माणसात गेलो
तेथेच तो मिळाला बाकी कशात नाही
कवीराज महेश पुंड.....
January 14, 2020
दे हाक आपल्या जन्मदात्या
संकटात धावून येती ते
दे हात तयांना वृद्धपणी
कृतकृत्य होतील नक्की ते
हाक जन्मदात्यांसी
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 9, 2020
गझल; वृत्त: मेनका; लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
March 11, 2018
ब्रम्हांडातील ग्रहतारे, दुरून मजसी दिसती,
सारे सवंगडी माझेच,
राहती दूर अंतरी,--!!!
नाव माझे वसुंधरा,
माझ्यावरच जगते सृष्टी,
सृजनाची किमया न्यारी,
पाहता पाहता झाली मोठी,--!!!
खाली मी एकटी, एकाकी,
आभाळा पाहत राहते,
भास्कर करतो वंचना तरी,
सारखी सहज सहत राहते,--!!!
सहनशीलता का माझ्यागत,
सांगा आहे कोणामध्ये,
अंतराळातून वेगळे काढले,
दुःख माझ्या काळजामध्ये,--!!!
माता म्हणून स्वीकारले,
मी माझे एकटेपण,
लेकरांसाठी जन्म अवघा,
वहायाचा आता ठरवून,--!!!
माझ्या मातीत सारी जगती,
सकल चराचर सृष्टी,
मानवप्राणी वृक्षवेली,
यांसाठी ती खरी संजीवनी,--!!!
मातीतून जन्मती,--
मातीतच जाती,---
पुन्हा कालांतराने वर येती,
अखंड असे चक्र चालू राही, मानवांना मात्र कदर नाही,--!!!
जो उठे तो घाव घाले,
माझिया हृदयावरी,
करत सारखी भाऊबंदकी, नात्यातही मोजमाप करी,--!!!
मानवाइतुका स्वार्थी,
कोणी बघितला नाही,
आईवर घाव घालायां,
कमी जराही करत नाही,--!!!
जमिनीच्या तुकड्यांसाठी परस्परांच्या जिवावर उठती,
*तीव्र शूळ उठे उरी,
माझे जगणे माती माती*,--!!!?
हिमगौरी कर्वे.©
May 23, 2019
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।। १
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।। २
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।३
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।। ४
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 6, 2021
दुपारचे ते भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 25, 2019
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।
सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।।
पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।
अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।।
फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।
पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2018
नासिकेसमोर हात ठेवा लागेल तुम्हां गरम हवा
थंड हवा आंत जाते गरम होऊन बाहेर येते
अन्न पाणी घेतो आपण ऊर्जा निघते त्याच्यातून
आत्म्यापरि फुगते छाती हवा आंत खेचूनी घेती
आतल्या ज्वलनास मदत होते उष्णता त्यातून बाहेर पडते
भावना जेंव्हा जागृत होती रोम रोम ते पुलकित होती
अवयवे सारी स्फुरुन जाती देहामधूनी वीजा चमकती
धनको ऋणको विद्युतसाठे अलग अलग दिसती मोठे
विजातीय लिंग येतां जवळी परिणाम दिसे विजेचा त्यावेळी
प्रकाश आहे आपल्या देही ज्ञानीजन तो सहज पाही
स्थिर करुन चंचल मना प्रकाश दिसेल ह्रदयी सर्वाना
उष्णता वीज प्रकाश शक्ति हींच ईश्वरी रुपें असती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti