तप्त हृदयाला शांतवी,
त्याला मित्र म्हणावे,
रुक्ष मनाला पालवी,
त्याला दोस्ती म्हणावे,--!!!
वियोगाचे दुःख भोगी,
त्यात समजावे त्याला,
याच दुःखा हलके करुनी,
प्रेम करे, तो सखा सोबती,--!!!
संतापलेल्या मनींचे,
ओरखाडे मिटवी तो,
जो अशी साथ देई,
त्याला मित्र म्हणावे,--!!!
कडक उन्हात जो गारवा,
आपणहून जिवां देई,
हाताला धरून सावलीला,
जो स्वतः आणून बसवी,--!!!
थेंबभर अश्रू पाहुनी डोळा,
आपसूकच ज्याचे डोळे भरती, चटकलेल्या हृदयावरती,
फुंकर घालण्या जे उठती,--
अशी दोन हृदये एक असती,
त्यांनाच मित्र म्हणावे,--!!!
कोसळणाऱ्याला सावरणे,
ज्यांना ठाऊक असते ,
अवघड प्रसंगी हात देऊनी,
मैत्री अलगद आधार देते,--!!!
माहीत ज्यांना,मधाळशब्दांनी, जखमेवर औषध लावणे,
संकटात मग पुढे येऊनी,
स्वतः फक्त मदत करणे,--!!!
दोस्त असे मैत्रीस पात्र,
अशी करावी खरी दोस्ती,
थंडीत बनती उब जे,---
उन्हाळ्यात घनगर्द सावली,--!!!
अडचणीत बनती दिलासा पावसात धरती छत्र,
रक्ताचे नाते नसूनही,
जे असती एकरूप ,--!!!
अशा एकजीवी सोबतीस,
खराच मित्र म्हणावे,
मीच्याही पुढेच जाऊनी,
एकमेकां तारत रहावे,--!!!
हिमगौरी कर्वे©
June 17, 2019
बरसत, बरसत ये रे घना
चिंब चिंब भिजव रे मना
आसक्त,अधीर प्रीतभाव
बरसत, बरसत ये रे घना
सांग कसे, मीच रे सावरुं
हे निळ्या सावळ्या घना
तुझ्यात रे स्पर्षतो सावळा
बरसत, बरसत ये रे घना
हेच गगन, हीच वसुंधरा
उताविळ, मिलना रे घना
तूच रे, चैतन्य या सृष्टिचे
ये सजवित ब्रह्मांडा रे घना
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४८
७ - ६ - २०२२.
July 22, 2022
November 28, 2021
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे १
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले २
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ३
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ४
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ५
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ६
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ७
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ८
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ९
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण १०
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ११
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 4, 2019
बाह्य जगीं प्रभूसी शोधतो,
विसरे जेव्हा ' अहं ब्रह्मास्मि '
कांही काळची विस्मृती ही,
ईश्वर चिंतनाच्या येई कामी...१,
शरिर जेव्हां रोगी बनते,
सुदृढतेची येई आठवण
प्रकाशाचे महत्त्व वाटते,
बघूनी अंध:कार भयाण...२,
चालना देयी विस्मरण ते,
शोध घेण्या त्याच शक्तीचे
उकलन होते मग प्रभूची,
स्मरण होता अंतर्यामीचे...३
- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 16, 2016
सात कोटीची वस्ती असूनी,
सुंदर वसले शहर एक ।
प्रत्येक जण स्वतंत्र असूनी,
कार्ये चालती तेथे अनेक ।।
सुसंगता शिस्तबद्ध
साह्य करिती एकमेकांना ।
शत्रूची चाहूल येतां,
परतूनी लाविती त्या घटना ।।
अप्रतिम शहर असूनी,
नाव तयाचे असे 'पुरूष' ।
'पुरू' म्हणजेच गाव असूनी,
मालक त्याचा आहे 'ईश ।।
अशीच अगणित शहरे,
या अथांग विश्वाच्या शरीरी ।
विधात्याची वास्तूकला,
अप्रतीम अजोड ठरे खरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 28, 2016
पण आणि परंतु,
मध्ये सारखे येती,
निर्माण करती किंतू ,
जीवनही ते बिघडवती --!!!
गोष्ट कुठली सरळ ,
आयुष्यात होत नाही,
प्रत्येकाचे त्यांच्यावाचून ,
पदोपदी अडत राही,--!!!
सुख-- दु:खांची असो भेळ,
असो अडसर भोवती,
मार्ग नसण्यात निव्वळ
चोख भूमिका निभावती,--!!!
ते नसते तर आयुष्याची,
मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,--!
अस्तित्व त्यांचे जन्म देई, आभाळाएवढ्या कर्तृत्वाला, मातीतून वर उठत,
काही स्पर्शती आभाळाला,--!!!
सुखदुःखामधील रेषा,
पण परंतु सदैव आखती, अहंकाराचे पाय कापावया, अविश्रांत ते तयार असती,--!!!
अमर्याद सगळ्या दुःखांची, परिभाषा तिथूनच सुरू होई,
पण परंतु आणखी किंतू ,
शब्द महत्व राखत जाई,--!!!
ते नसते तर जीवनच बेचव, असल्यामुळे किती खोळंबा,? मानत नाही त्यांना मानव,
नीट समजून त्यांचे मर्म बा,--!!
© हिमगौरी कर्वे
October 18, 2019
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 5, 2019
अबोलाही बोलतो काही
ऐकूनी होतो असे ।
अबोल मी आहे कधीचा
कोणाही न कळले कसे?
.....मी मानसी
November 2, 2019
आळस देत देत बाळकृष्णा
भजनाचे सूर आळवीत होता आणि
दामू ठाकूर ढोलक्यावर
थापा मारीत त्याला साथ करीत होता
बाबांच्या मुखांतून रामरक्षा
वातावरण भक्तिमय करीत होती
त्याचवेळी धोंडू सबनीस
नगराची सेवा करण्यासाठी
लगबगीने निघाले होते
आळसावलेला सदा धुमाळ
हातांत मशेरी घेऊन
अंगणातच पचापचा
थुंकून अंगण काळे करीत होता
आणि ....
डोक्यावर टोपले घेऊन
व फटकूर नेसून
सुंद्रा कालवे आणण्यासाठी
खाजणाकडे निघाली
एव्हं! नां उन्हे रणरणली
कराड्याच्या पोरांनी
अंगणातच रस्ता वेढून
गोट्यांचा खेळ मांडला
खिशांतील चिठ्या सावरीत
क्लोजिंगचा हिशोब करीत
दि ना सबनीस लगबगीने
घराबाहेर पडला
-श्री. सु. ग. दिघे.
May 20, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti