करेन कोटी, करेन कोटी
करेन कोट्या कोटी कोटी
सांभाळीन त्या छातीच्या कोटी
केवळ अस्सल एक ना खोटी
सरस्वती थैमाने ओठी
कोटीला मग कसली खोटी
- यतीन सामंत
July 19, 2022
त्रिभाव युक्त जीवन,
सत्व रज तमो गुण,
स्वभावाची अंगे तीन,
सर्वात दिसून येती ।।१।।
कांहीं असे सत्वगुणी,
कांहीं असे रजोगुणी,
काही मध्ये तमोगुणी
दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।
प्रेम, दया, क्षमा, शांति,
कांहींचे अंगी वसती,
सत्वगुण लक्षणें ती,
कांहींत दिसून येती ।।३।।
राग, लोभ, अहंकार,
षडरिपू हेच विकार,
त्यांतच तो जगणार,
तमोगुण वाढवून ।।४।।
सत्व तमोगुणी पूर्ण,
मिळणे फार कठीण,
दोन्ही गुणांचे मिश्रण,
म्हणती त्याला रजोगुण ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 14, 2016
तुझ्या घरि आले विसंबूनी, तव प्रेमाचे पडतां बंधन
सात पाऊले टाकीत टाकीत, सोपविले तव हातीं जीवन
सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली
घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी
ऋणानुबंधाच्या ह्या गांठी, बांधल्या गेल्या पडतां भेटी
जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी
असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक होऊनी
काळाच्या त्या ओघामध्ये, हलके हलके जाय मिटूनी
गतजन्म तो स्मरे न कांही भविष्य काय ते माहित नाही
चालत असेल जोडी आपली, युगानुयुगे दोघे राही...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 23, 2020
जग काय म्हणेल...
या एका विचाराने,
कितीतरी स्वप्नं जन्माआधीच मरून जातात...
कितीतरी हसू,
ओठांपर्यंत येऊन परत फिरतं...
कितीतरी मनं,
स्वतःसाठी जगायचं विसरून जातात...
सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना,
स्वतःच्या इच्छा मात्र
नेहमीच अपूर्ण राहतात...
पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचार...
तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगलास?
कधी मनसोक्त हसलास?
कधी आवडीचं गाणं ऐकत
वेळेचं भान विसरलास?
कधी स्वतःच्या मनाचा
एखादा छोटासा हट्ट पूर्ण केलास?
जर उत्तर "आठवत नाही..." असं असेल,
तर आता वेळ आली आहे...
स्वतःला पुन्हा भेटण्याची...
स्वतःवर पुन्हा प्रेम करण्याची...
आणि मनाला पुन्हा मुक्तपणे जगू देण्याची...
कारण...
आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नसतं...
ते आनंद शोधण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त इतरांना खुश करण्यासाठी नसतं...
ते स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त श्वास घेण्याचं नाव नाही...
तर प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचं नाव आहे.
म्हणून...
लोक बोलतील...
आजही बोलतील...
उद्याही बोलतील...
पण ते तुमचं आयुष्य जगणार नाहीत.
मग त्यांच्या शब्दांचं ओझं
आपल्या स्वप्नांवर का ठेवायचं?
स्वतःसाठी जगा...
स्वतःवर प्रेम करा...
स्वतःचं मन जपा...
कारण...
जगाचं काय...?
ते कालही बोलत होतं...
आजही बोलतंय...
उद्याही बोलणारच...
पण तुमचं आयुष्य...
ते फक्त एकदाच मिळणार आहे.
म्हणून...
जग काय म्हणेल यापेक्षा,
तुमचं मन काय म्हणतंय ते ऐका...
कारण मनापासून जगलेलं आयुष्यच,
खऱ्या अर्थाने सुंदर आयुष्य असतं...
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 29, 2026
चाललो पंढरीला पायी
पाहतो विठ्ठलरखुमाई ।।धृ।।
वेचूनी संतांच्या सद्गुणी
गुंफितो मी भावफुलांची वेंणी ।।१।।
रांगलो , खेळलो , धावलो
या तुझ्या विश्वाच्या अंगणी ।।२।।
नुमजे मजला गाथा ज्ञानेश्वरी
मी अज्ञानी ऐकतो संतांची वैखरी ।।३।।
लावूनी टिळा गंध कपाळी
दंगलो दिंडी, किर्तनी टाळ मृदंगी ।।४।।
गायली मी , जीवनाची भैरवी
आता लागली ब्रह्मानंदी टाळी ।।५।।
लोचनी विठाई सावळी विटेवरी
जय हरी विठ्ठल , पांडुरंग हरी । ६।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र.४१
दिनांक:- १६-३-२०२१
June 3, 2021
माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,--!!!
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,--
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,--!!
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,--?
टोचे सले असे एकटेपण,--!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,--
टोचे, सले, असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,--
टोचे सले असे एकटेपण,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
August 6, 2019
टीप : माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.
ये रे ये घना | तोषवी तना |
तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु ||
हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी |
पुरे पुरे आता, राख-रांगोळी |
सुकल्या माझिया देहावरी,
जल शिंपना | ये रे ये घना | ये रे ये घना .....|| १ ||
व्याकुळ मी ही, तरु-वेलीही |
आटले सारे, नद्या-नालेही |
वाट पाहुनी, तुज हाकारी |
तुझी मेघना | ये रे ये घना | ये रे ये घना . || २ ||
तापल्या तनुला, तुझीच आंस |
तुझिया स्पर्शाचा, ओला सुवास |
अधिर, आतुर, मिलन क्षणाची |
भूक भागवना | ये रे ये घना | ये रे ये घना ... || ३ ||
तुझ्यावाचुनी, कोंब ना उगे |
पक्षी पाखरे, कोण रे जगे ?
कैसे विनवू ? तूची सांग ना |
पुरवी कामना | ये रे ये घना | ये रे ये घना .. .|| ४ ||
केव्हांची तुला , साद घालते |
ये रे ये झणी, तुज झेलते |
रिमझिम त्या, तालावरी |
करी नर्तना | ये रे ये घना | ये रे ये घना.... || ५ ||
सखया अंबरी, कां रे थांबला ?
लपंडाव हा, फार लांबला |
विरह, वेदना, सोसू मी कशी ?
सोसे न यातना | ये रे ये घना | ये रे ये घना ..|| ६ ||
क्षमावंत तू, क्षमाशील तू |
हाकेला देवा, धावशील तू |
चुकला मानव, तो ही आळवी |
हे दयाघना | ये रे ये घना | ये रे ये घना....... || ७ ||
©कवी : उपेंद्र चिंचोरे
May 9, 2016
कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी
वाटे मजला, तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती
बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती
ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी
ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी
फुलातील गंध, तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना
फळातील रस, देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला, देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी
देई देहा सुख, अल्हाद्कारी
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 7, 2020
खिशांत माझ्या पडली होती,
सुटी नाणी काही,
वस्तूंची ती खरेदी करण्या,
सर्व बाजार पाही ।।१।।
सराफ्याच्या दुकानी दिसला,
एक हिऱ्याचा हार,
डोळे माझे चमकूनी गेले,
फिरती गरगर ।।२।।
दाम विक्रीचे जाणूनी घेता,
हताश मी झालो,
हातातील धनाचे मोजमाप,
करू मी न शकलो ।।३।।
दोन वेळची पूजा करूनी,
जप माळ जपती,
खूप साचले पुण्य आपले,
हे कांहीं समजती ।।४।।
कसा मिळेल ईश्वर त्यांना,
तपोबलाच्या अभावी,
जन्मोजन्मीचे पुण्य साचता,
दर्शन मिळे प्रभावी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 16, 2017
सखया तुझ्याचसाठी,
मन माझे अंथरले,
पायरवाने रे तुझ्या,
हर्षभरित ते जाहले,
सखया तुझ्याचसाठी,
डोळ्यात दिवे लावले,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं,
मनोमन तुझं ओवाळले,
सख्या तुझ्याचसाठी,
हृदयाचे सिंहासन केले,
विराजमानी त्यावर तुला,
स्वप्न डोळा पाहिले,
सख्या तुझ्याचसाठी,
ओठी गीत स्फुरले,
शब्दांचे हार करुनी,
फक्त तुज अर्पियले,
सखया तुझ्याचसाठी,
चित्ती उगा थरारले,
नवथर भावना कल्लोळी,
रात्रंदिन बघ हिंदोळले,
सखया तुझ्याचसाठी,
प्रेमरस ना उफाळले, शृंगाराच्या कल्पनांनी
अंगांग माझे शहारले,
सखया, तुझ्याचसाठी,
स्त्रीत्त्व सार्थ वाटले,
सर्वस्व रे अर्पायला,
"सिद्ध" मी जाहले,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
February 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti