July 21, 2013
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं,
जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।।
वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं,
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।।
जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी,
जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला,
परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।
प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे सरकण्याचा,
शक्तीरुप तेथेंच असूनी त्याच्यांत सामावून जाण्याचा ।।५।।
भीती मनीं वसते कसे जाऊं आंसाकडे,
तुकडे होतील देहाचे जेव्हां आसांत पडे ।।६।।
सोडूनी देण्या सारा खेळ केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे,
विसरुन जाता देहाला प्रभू समर्पण करण्यांत असे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 6, 2020
तीळगुळ घ्या हो
गोड गोड बोला।।
खाली सांडू नका,
आणि भांडू नका।।धृ।।
ऊस ,बोरं ,ओंब्या,
वाण लावू चला।।
काटेरी हलवा
गोडव्याची कला।।
द्यायला मुळीच
विसरूच नका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।१।।
सुगड्याचं वाण
लावूया गं छान।।
उपयोगी वस्तू
त्यांना देऊ मान।।
हवाय कशाला
प्लॅस्टीकचा हेका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।२।।
उखाणा घेऊया
मौजही करुया।।
घरोघरी जाऊ
स्नेह हा वाटूया।।
राग,द्वेश,सारे
काढूनच टाका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।३।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 15, 2020
खरं सांगू तुझ्या विना
जीवन जसा एक थंड तवा
आणि भुकेला एक मुलगा
भाकरी शोधीत फिरावा ,
चंद्र अर्धा आहे
एका मुलीला कमी मार्क्स मिळाले आहेत
ती रडत आहे,
आणि सूर्य एखाद्या
आळशी शिक्षका प्रमाणे
सर्वा देखत घोरत पडला आहे,
आशा एखाद्या पुजारीन प्रमाणे
थकून पायरीवर बसली आहे,
आणि मंदिरात देव पारोसे
पूजे विना राहिले आहे,
दुस्वप्न वीजे समान
त्याच फांदीवर कोसळले आहे
जिथे माझ्या व्याकूळ तृष्णेने
घरटे बसवले आहे,
खरं सांगू तुझ्या विना,
आस ठेवत एक म्हातारी
आणीबाणीतील योजना मोजत आहे
तो सांगून गेला होता तीन दिवस
आज तीन युग लोटून गेले आहेत,
नाव व पत्ता ज्या चिठ्ठीवर
लिहून गेलास ती हरवली आहे,
तन मनाचे संपन्न कोश
हाय आता रीते होत आहे !!!
खरं सांगू तुझ्या विना
माझी नाही कोणतीच कहाणी
गीत माझे जसे उंच फांदीवर
लहडले आहेत आंबे,
बाल चमू नेम धरून दगडाने
तोडत आहेत आंबे,
आणि त्यांचे खरे मूल्य
कोणीच देऊ इच्छित नाही
खरं सांगू तुझ्या विना !
*****
मूल हिंदी कविता -
सच कहूँ तेरे बिना
शार्दुला झा नोगजा, सिंगापुर
मराठी अनुवाद - विजय नगरकर
March 18, 2022
कर पडले चरणीं
भाव जाण देवा ।।धृ।।
देह झुकला पुढती
लिनतेनें मान वाकती
मनाची करूनी एकाग्रता
भावनेला वाट देतां
अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १
कर पडले चरणी भाव जाण देवा,
प्रथम येई भावना,
जागृत करते मनां
मनाचा ताबा देहावरी
तेच तुजला प्रणाम करी
घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २
कर पडले चरणी भाव जाण देवा
मुखीं नाम तुझे घेई
देह सारा शहारून जाई
आनंदाची फूटते उकळी
नाचते मन सर्व काळी
मनाचा चंचल स्वभाव समजोनी तूं घ्यावा ३
कर पडले चरणी भाव जाण देवा
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 13, 2016
प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत ।।
ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते ।।
प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा ।।
जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।
फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई ।।
परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।
चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले ।।
जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग ।।
प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 8, 2021
असा साप तो कात टाकुनी शिरला ढोलीमध्ये
July 12, 2026
क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून
मोठे प्रसंग आम्ही टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो,
जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता
ढोबळतेचा विचार होतो, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो,
मृत्यू येई तो हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला
गेला क्षण तो परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई,
समाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला
घटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह प्रभू सेवेत,
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 10, 2018
जात असता गाडी मधूनी,
दुर्घटना ती घडली,
अचानकपणे एक दुचाकी,
आम्हा पुढे धडकली ।।१।।
प्रयत्न होऊनी योग्य असे,
थोडक्यात निभावले,
वखवखलेल्या काळालाही,
निराश व्हावे लागले ।।२।।
घिरट्या घालीत काळ आला,
झडप घातली त्याने,
वेळ आली नव्हती म्हणूनी,
बचावलो नशिबाने ।।३।।
अपमान झाला होता त्याचा,
सुडाने तो पेटला,
थोड्याशाच अंतरी जावूनी,
दुजाच बळी घेतला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥
असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
काळालाही नसावा वेळेचा काही धाक
ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।
जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥
जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥
जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥
(जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)
-यतीन सामंत
June 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti