कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं....१,
विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते....२,
देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती....३,
फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात....४
अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 12, 2019
वृत्त :- मानसी
लगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा*
आगीत पेटलेले गाव पाहिले मी
चोरास साथ देण्या साव पाहिले मी
++++++++++++++++++
गावात श्वापदांची वाढली मुजोरी
डोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी
+++++++++++++++++++
भूकेजला कसा आत्ताच गाव माझा
धान्यास फेकणारे राव पाहिले मी
++++++++++++++++++
हास्यात आज होते दु:ख गोठलेले
ह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी
+++++++++++++++++++
थाटात आज होते गावचे पुढारी
जोषात हारणारे डाव पाहिले मी
++++++++++++++++++
भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात दडवलेले पाव पाहिले मी
++++++++++++++++++
© जयवंत वानखडे,कोरपना
July 26, 2018
वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत
क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत
अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत
ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत
उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र
व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र
लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत
मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात
- महेश सूर्यवंशी
( पुणे,सासवड)
August 21, 2018
थोडे अपयश,थोडी भरारी ठेव
मुबलक जमीन व थोडे आकाश ठेव
सर्वोच्च शिखरा साठी हजार पायऱ्या ठेव
जमिनीवर येण्या साठी
मात्र एक घसरण ठेव
आता कुठे तो देह अन
आग बाकी आहे
चर्चाच आता हजार बाकी
तू आता माझ्या समीप आहे
माझ्या वैऱ्या बरोबर
नमस्कार राम राम राहू दे
तूझ्या शहरात आता
माझे एक घर राहू दे
माझ्या पराजयचे कारण
तूच राहू दे
हे सत्य कुणा सांगू नकोस
हा भ्रम आपल्यात राहू दे
माझ्या हृदयातील हे डाग
निसंकोच मिटवून दे
जुन्याच एक दोन जखमा
मात्र अंगावर राहू दे
तुझ्या आश्रयात
मला बेहोष राहू दे
आता आपल्या देहात
हा थकवा असाच राहू दे
मूळ हिंदी गज़ल- ध्रुव गुप्त
मराठी अनुवाद- विजय नगरकर
December 7, 2021
तळपतो रात्रंदिन
कण कण तप्त ज्वाला
श्वासातही निर्मितीचा
नवा ध्यास आहे त्याला..
तेजःपुंज आदित्याचे
अग्निहोत्र निशी दिन
रूप रंग उर्जा दान
सृष्टी नवसंजीवन...
उगवल्या दाही दिशा
अंधकार मिटवून...
झळाळून सोने येते
प्रभातीस सजवून..
माथ्यावरी पोहचता
शीघ्रकोपी प्रभाकर
सांजवेळी अस्ताला तो
शीत भासे प्रभाकर..
नवग्रह अधिपती
पंचतत्व व्यापकता..
बुद्धी तेज आशीर्वाद
वर लाभे अर्घ्य देता
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
July 29, 2026
जगणे असते होरपळ,
तना-मना-भावनांची,
रोज रोज प्रत्येक पळ,
जाणीव होई असुरक्षेची,
षट्रिपुंचे जगात वर्चस्व,
ते जनांवर हक्क गाजविती, माणुसकी करुणा अहिंसा,
भावना थोर मागे पडती,
सत्ता पैसा लालच,---
अधिकार फक्त ठाऊक असती, कर्तव्य खाती कशाशी,
कुंठित झालेली मती,--!!!
असते कोणाचे कोण-?
ना आई बापा विचारती,
*अंधश्रद्धेखातर केवळ,
लेकरेबाळे बळी देती*,
सत्य सुंदर शिव,
सगळ्यांना खुपसले पोटी, सैतानाचे नाव मानव,
ही शोकांतिकाच मोठी,
अशा या दुनियेत प्राण,
देवा माझे घुसमटती,
सुटका व्हावी आता यातून,
कित्येक तुला असे आळवती,
कुठे दिसेना खरे प्रेम,
मद माया मोह असती,
सूत्र जीवनाचे किती उथळ,
सर्व त्याच्या आहारी जाती, जिवाची ही अशी तडफड,
सांगा कुठे कशी लपवावी
प्राणपक्षी उडण्या उत्सुक,
मरणवेळही का तरसावी,--??
हिमगौरी कर्वे. ©
August 27, 2019
तो श्रावण होता धीट
शीळ घालीत
मला खुणवीत
मागुनी गेले
त्या रंगी रंग रंगले .......१
ऊन त्याच्यासंगे चाले
बांधुनी चाळ
पावसाची माळ
घालुनी ओले
रूप आरसपानी ल्याले .....२
सांडले इंद्रधनुचे
रंग रानात
फुलापानात
शिवारी सजले
पालवले पालव सगळे .......३
उधाण नदी ओढ्यास
शहारे वारे
चिंब जग सारे
झोके झुलले
देवलोक भूवरी सजले .......४
वरखाली झुलता झोका
पोपटी तरवे
भासले रावे
जसे उडाले
मन खेळी दंग दंगले ........५
सूर सारे गारे गात
सरीवर सर
झरे झरझर
मारवा बोले
मीच श्रावणगाणे झाले .......६
..... मी मानसी
September 30, 2019
अंगणातल्या शांत कोपऱ्यात
एक चाफा उभा असतो,
ना त्याला गर्व कसला,
ना कुणाकडून मान हवा असतो.
पहाटेच्या मंद वाऱ्यात
त्याच्या पाकळ्या हलक्या थरथरतात,
आणि त्या शुभ्र हास्यातून
तो आयुष्याचं गूढ सांगत राहतो.
कधी उन्हाची तीव्र झळ,
कधी पावसाची ओल,
कधी वाऱ्याचे जोरदार झोके,
सगळं काही तो शांतपणे सहन करतो.
तरीही प्रत्येक सकाळी
तो पुन्हा फुलतो,
जणू जगाला सांगतो...
“सहन कर, पण सुगंध देणं थांबवू नको.”
लोक येतात, जातात,
कुणी त्याची फुलं वेचून नेतं,
कुणी देवाच्या चरणी अर्पण करतं,
कुणी केसांत गुंफून माळतं.
पण चाफा मात्र
कधीच काही मागत नाही…
तो फक्त देत राहतो
आपली शांतता, आपला सुगंध.
एक दिवस त्याची पाकळी
हळूच जमिनीवर पडते,
कुणाच्या नजरेत न येता
मातीशी एकरूप होते.
पण त्या गळलेल्या पाकळीचाही
सुगंध हवेत राहतो,
जणू सांगतो...
“अस्तित्व संपलं तरी
प्रेम कधी मरत नाही.”
तसंच माणसाचं आयुष्य
क्षणभंगुर, नाजूक,
आज आहे, उद्या नाही…
पण माणूस निघून गेला तरी
त्याचं हसू, त्याची माया,
त्याचे शब्द, त्याचा स्पर्श
लोकांच्या मनात जिवंत राहतो.
म्हणून चाफ्यासारखं जगावं
शांत, साधं, निरागस,
स्वतः फुलत राहावं
आणि आपल्या सुगंधाने
इतरांच्या आयुष्यात
आनंदाचा वसंत पेरत राहावा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 5, 2026
November 9, 2021
उदबत्तीचा सुगंध
दरवळे चोहोकडे,
कोठे लपलीस तूं
प्रश्न मजला पडे ।।१।।
मंद मंद जळते
शांत तुझे जीवन,
धुंद मना करिते
दूर कोपरीं राहून ।।२।।
जळून जातेस तूं
राख होऊनी सारी,
तुझे आत्मसमर्पण
सर्वत्र सुगंध पसरी ।।३।।
तुझेपण वाटते क्षुल्लक
दाम अति कमी,
आनंदी होती अनेक
जेव्हां येई तूं कामीं ।।४।।
लाडकी तूं भक्तांना
तुजवीण पूजा नाहीं,
प्रफुल्ल करुन चेतना
प्रभू भाव मना येई ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti