मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 22, 2019
एक ती झोप स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप जीवास सुख देई
स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा
एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां
स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 12, 2017
चिंगी
'पहाट झाली,
चिव चिवते चिमणी
उमज येईना,
उठविले तिजला कोणी.....१,
आई आहे कां ?
जी उठवी शाळेसाठी,
गुदगुदल्या करूनी
कुरवाळिते हळूंच पाठी....२,
घड्याळ उठवी
घण घण करूनी नाद
घरट्यामधुनी,
नाही ऐकला असा निनाद.'..३,
चिमणी –
' उषाराणी येते,
साऱ्यांची आई बनूनी
प्रेमानें मोडी झोंप,
नाजूक करकमलांनी.....४,
घड्याळ आमचे,
दवबिंदू पडतां पानावरूनी
चाळविती निद्रा,
टपटप आवाज करूनी' .....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 7, 2021
सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,
उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,
जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,
जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,
निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,
सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 8, 2021
स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे. आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींना सामावून घेत ती आयुष्याला नवं परिमाण देते.
असंच आयुष्याला परिमाण देणार्या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे.
महिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या सर्व नाटकांमध्ये एक सृजनशील सूत्र आणि नकळत जाणवणारी लय सापडते आणि हे या लिखाणाचं आणि आणि म्हणूनच सगळ्या नाट्यांचं बलस्थान ठरलं. या सगळ्याच्या पलिकडे अत्यंत खडतर आयुष्य जगत असताना, पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व असणार्या समाजात स्वत:चं माणूसपण सिध्द करत समाजासाठीच झटणार्या या सगळ्या स्त्रिया, ज्यांच्यामुळे सामान्य स्त्रियांना जगण्यासाठी बळ मिळेल.
गाथा स्त्री शक्तीची (आकाशवाणीवरील नभोनाट्ये)
लेखिका : माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २००/- रुपये
पाने : १८३
October 18, 2016
आली दारात वरात
गुलमोहर फुलला,
लक्षुमीच्या स्वागताला
सडा फुलांचा घातला ।
आली दारात वरात
दारी तोरण हिंदोळे
पैंजणांच्या चाहुलीने
मोर मण्यांचे जाहले ।
आली दारात वरात
लिंबलोण आणा कुणी
दृष्ट लागू नये तिला
सून माझी बहुगुणी ।
आली दारात वरात
दार आडवी बहीण
म्हणे - अडविते आज
उद्या पाठीशी घालीन ।
आली दारात वरात
पूस डोळे सूनबाई
उंबर्याच्या पलिकडे
उभी आहे एक आई ।
आली दारात वरात
माप दारी कलंडले
शकुनाच्या पावलाने
अमाप सुख घरी आले ।
आली दारात वरात
पायघड्या अंथरल्या
कुंकवाच्या पावलांच्या
वेली देव्हार्याशी गेल्या ।
आली दारात वरात
भाणोसं भरा ग कुणी ।
नको वाजवूस ठेव
काढी हलक्या हातानी ।
आली घरात वरात
साखरेची वाटी भरा ।
भरभरोनी गोडवा
असा लाभू दे संसारा ।
October 11, 2018
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी
हेच जीवनाचे ध्येय असे
आत्मा ईश्वरी अंश असूनी
त्यालाच मिळण्या उत्सुक असे
देह पिंजऱ्यांत अडकता
बाहेर येण्या झेप घेई तो
अवचित साधूनी वेळ ती
कुडी तोडूनी निघून जातो
कार्य आत्म्याचे अपूरे होता
पुनरपी पडते बंधन
चक्र आत्म्याचे चालत राही
मुक्त होण्याचा येई तो क्षण
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
April 15, 2019
पाठिंबा देणारी माणसं कमवा,
पाठीमागे नाव ठेवणारी तर खूपच असतात…
समोर उभं राहून खांद्यावर हात ठेवणारी माणसंच
खरं बळ देऊन जातात.
सावलीसारखी साथ करणारी कमीच भेटतात,
बाकी प्रकाशात उभी राहून
अंधारात दगड फेकणारी गर्दी असते.
तुमच्या यशावर टाळ्या वाजवणाऱ्यांपेक्षा
तुमच्या अपयशातही
“मी आहे” म्हणणारी माणसं कमवा.
नाव ठेवणारे शब्द फेकतात,
पाठिंबा देणारे आयुष्य घडवतात.
पहिले आवाज करतात,
दुसरे माणूस घडवतात.
म्हणूनच…
लोक काय म्हणतात याकडे नाही,
कोण सोबत उभं राहतं याकडे पाहा.
कारण शेवटी आठवणीत राहतात तेच,
जे पडताना हात देतात,
नाव ठेवणारे नाही.
* कीर्तिराज आगलावे
July 13, 2026
चंद्र आज एकला नभी उगवला ।
रात पुनवेची मधूर भासला ।। १
मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।
शितल वारा अंगी झोंबू लागला ।। २
उलटून गेली रात्र मध्यावरती ।
लुक लुकणारे तारे आतां दिसती ।। ३
पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।
तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।। ४
त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।
जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।। ५
उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।
निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 19, 2021
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करीते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनुभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पुनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 5, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti